प्रज्ञा दया पवार ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ या आपल्या नव्या कवितासंग्रहात ‘दलित साहित्य’ हे लेबल फाडून टाकताना दिसतात. त्या यात निसर्गदत्त माणूसपणाचे खोलवर चिंतन करताना दिसतात. त्यांना शारीर संवेदनेच्या पलीकडे जाऊन नि:शब्दाची- म्हणजे ग्रह-पूर्वग्रहाच्या पलीकडे जाऊन मानव्याचा कल्लोळ प्राशन करण्याची अनिवार तृष्णा लागल्याचे जाणवते. कवितेच्या निर्मितीसाठी चलबिचल, अस्वस्थ होत ‘चल ये जवळ शब्दात लडबडून जगायचंय मला तुझ्यासकट’ अशी तिला- म्हणजे कवितेला तृषार्त साद त्यांनी घातली आहे. म्हणून त्यांची कविता सर्वागाने भरगच्च बहरून आपल्याला भिडते.
स्व आणि स्वेतरबाह्य़ विश्वाची करुणा हा या कवयित्रीचा संवेदनस्वभाव आहे. समोरच्या गृहितकांवर सपासपा धारधार सुरी चालवावी आणि उभ्या-आडव्या भरभक्कम संरचनेतून चालत स्वत:चा लगदा होण्यापासून वाचवावं लागतं, असा आत्मसंघर्षही तिला करावा लागतो. त्याशिवाय खैरलांजीसारख्या अमानुषतेशी लढा देता येत नाही.
सामाजिक अमानुष घटनेवर अत्यंत अल्पक्षरांत बंडखोरीचा, प्रतिहिंस्रतेचा, प्रतिशोधाचा साधा उच्चारही न करता विश्वाच्या कोपऱ्या- कोपऱ्यापर्यंत पोहोचणारी कळ काही कवितांमध्ये ऐकायला येते. कवयित्रीला समाजातील वैचारिक विन्मुखता अस्वस्थ करते..
‘हे मिथक आहे का भीमा
की, मी उच्चार करते तुझ्या नावाचा
आणि उमलून येतात टचकन्
असंख्य कमळं आरस्पानी त्वचेची
हे मिथक आहे का
की, मी उच्चार करते तुझ्या नावाचा
आणि इतिहास जिवंत होतो
रक्ताळलेल्या रजोअस्तरासारखा’
वैचारिकतेची भरभक्कम बैठक असणारेच असा आविष्कार करू शकतात. इतिहासाला रजोअस्तराची उपमा हिंस्रता प्रकट करते. सहजतेने ते रजोअस्तर टाकून द्यावे तशी अनेकानेक खरलांजी प्रकरणे घडत आहेत. याचे समाजाला, राजकारणाला आणि वेगळेपणाने जगणाऱ्या नवप्रगत आणि बुद्धिजीवी समाजालाही काहीच वाटत नाही. आंबेडकरांना, त्यांच्या जीवनकार्याला, त्यांच्या संघर्षांला, ‘गुलामी’तील मानवमुक्तीच्या लढय़ाला पाहिलेली, अनुभवलेली पिढी अजून आहे. इतक्या अल्पावधीत डॉ. बाबासाहेबांचे एक मिथक होऊन बसावे, हा कोणाचा पराभव आहे? सबंध भारताची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लाभलेला हा महापुरुष अल्पावधीत मिथक व्हावा, ही कवयित्रीने घेतलेली शंका आहे. असे सांगायलाही तेवढीच प्रतिभा लागते.
‘लव इन दि टाइम ऑफ खरलांजी’ ही कविता म्हणजे कवयित्रीने डॉ. आंबेडकरांशी व्याकूळ होऊन साधलेला संवाद आहे. यात आंबेडकरांचा वारसा दिसतो. कारण त्यांची विचार करण्याची रीत कवयित्री आत्मसात करीत असल्याची ही खूण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पचवून वाङ्मयनिर्मिती करणाऱ्या शंकरराव खरात यांच्या नंतरची ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’मधील कविता आहे.
पुरातन काळापासून ग्लोबलायझेशन झालेल्या काळापर्यंत दलितांचे शोषण होत आहे. दंग्यात, युद्धात, अनुलोभात शिरकाण दलितांचेच होत आहे, हे समाजशास्त्रीय सत्य आहे. हा हजारो वर्षांचा इतिहास वाचून कवयित्री रडत आहे. ‘या देशाने हरवली मूळ माणसं तरी देशाला हरवून बसलो नाही आम्ही. इतकं करंटं तू होऊ दिलं नाहीस आम्हाला हे तूच दिलेलं द्रष्टेपण भीमा’ हे सत्य कवयित्रीने अत्यंत साध्या शब्दांत स्पष्ट केले आहे. ‘चैत्यभूमीला साक्षी ठेवून’ या कवितेत निर्धारही केला आहे. ‘बाईच्या जिवंत मेंदूतून या सनातन लाडक्या प्रारूपाला ओलांडून मी ओलांडते- ताठ मानेने चालत राहीन आर्यकारणभावाने ज्यासाठी मी आजवर तसू तसू माझे आतडे जाळले’ हा आंबेडकरी विचारांचा परिणाम आहे.
संग्रहातील एक्क्याऐंशी कवितांपैकी वरील दोन कविता वेगळ्या आहेत. त्या कशाचाही त्याग न करता ‘क्ष’- किरणांचा मारा करून संसर्गित अवयव पुन्हा आपण निसर्गसिद्ध करतो, त्याची अपेक्षा करणाऱ्या आहेत. विध्वंसक आणि प्रतिशोधाची आग त्यात नाही. केवळ माणूसपणाची तृष्णा आहे.
याचसोबत या संग्रहातील कितीतरी कविता ‘मी’पणाच्या बाहेर जाऊन स्त्री-दु:खाच्या वैश्विक कारणांचा शोध घेणाऱ्या आहेत. ही कवयित्रीची आध्यात्मिकताच आहे. अशा वेळी ती नि:शारीर विचार मांडताना दिसते.
‘पुरुष- योनीला खिंडार पाडणाऱ्या’, ‘मेट्रो मॅन’, ‘मी दंश करते’, ‘सुरुवात कुठून करू?’ या कवितांमध्ये दैहिक संवेदना प्रकट झाल्या आहेत.
संग्रहातील भाषेचा पल्लेदार, पिळदारपणा अर्थलाघवांनी भरलेला आहे. सपक घोषणाबाजी नसल्याने भाषा अनलंकृतपणे भारावून टाकते. ‘रक्ताचे फूल’, ‘पाकोळीचे स्वप्न’, ‘थेरडा भूतकाळ’, ‘बाहेर ठेवलेला पाऊस’, ‘संज्ञेचा आकार’, ‘डोळ्यांचा झिलमिल पडदा’, ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’, ‘इतिहासाला सोडचिठ्ठी’, ‘मुग्ध कार्यकारी बोट’, ‘अपेक्षांचं कुबट थारोळं’ हे वाक्यप्रचार पाहिल्यानंतर कवितेचा भाषिकस्तर रांगडा वाटेल, परंतु त्याने भाषा मुलायम होते, याचा प्रत्यय संग्रह वाचताना येतो.
संग्रहात आलेल्या प्रार्थना उन्नत करतात. कवी ऋत्विज (काळसेकर), संजीवनी खोजे, विवेक मोहन राजापुरे यांच्यावरच्या कविता मनाला चटका लावतात.
‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ – प्रज्ञा दया पवार, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १४१, मूल्य – १८० रुपये.
करुणा आणि प्रज्ञेचा अथांग समुद्र
प्रज्ञा दया पवार ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ या आपल्या नव्या कवितासंग्रहात ‘दलित साहित्य’ हे लेबल फाडून टाकताना दिसतात.
आणखी वाचा
First published on: 23-11-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drushyancha dhobal samudra by pradnya daya pawar