बागेतल्या एका झाडाखाली एक पिकलेले पान गळून पडले. बघता बघता झाडावरची सर्व पाने गळून पडली. वाऱ्याची थोडी मोठी झुळूक आली आणि पानांनी फेर धरला. वाळलेली पाने हुंदका देऊन रडू लागली. विदुलचं तिकडे लक्ष गेलं. तो झाडाजवळ आला. तो वाळलेल्या पानांना म्हणाला, ‘तुम्ही का रडत आहात?’
 पाने म्हणाली, ‘आम्ही याच झाडावर जन्मलो तेव्हा आमची कोवळी तांबूस पालवी होती. आम्ही खूपच गोड दिसायचो. येणारे जाणारे सगळे आमची चैत्रपालवी कौतुकाने बघायचे. चैत्र संपला, वैशाख उजाडला, आम्ही थोडे मोठे झालो. शेंडय़ांचा पोपटी रंग मोहक दिसू लागला. ज्येष्ठ-आषाढात तर आम्ही चांगलेच मोठे झालो. या झाडावरच आम्ही जन्मलो, वाढलो, सळसळलो आणि आता वाळलेला पाचोळा होऊन खाली पडलो आहोत. आता आमचा काहीच उपयोग नाही.’
 त्यावर विदुल म्हणाला, ‘हा तर सृष्टीचा नियम आहे.’
‘अरे, ते आम्हालाही कळतंय. पण आता आम्हाला या झाडाखाली एकत्र राहायचं आहे. या झाडाखाली एकत्र बसून तो वैशाखात फुलणारा गुलमोहर, मोगऱ्याचा घमघमाट, श्रावणातला नाजूक पारिजातकाच्या फुलांचा पहाटे पडणारा सडा, थंडीत दरवळणारी रातराणी, पौषातला मोहोराचा सुगंध, माघातल्या अगदी छोटय़ा कैऱ्यांनी लगडलेला आंबा, आम्हाला हे आमच्या झाडाखाली एकत्र बसून बघायचं आहे. या आमच्या झाडावर अनेक पक्ष्यांचे संसार फुललेले आहेत. पक्ष्यांच्या गुलाबी पिल्लांची कोवळी किलबिल, पक्ष्यांचे पिलांना भरवणं, हे सारं आम्हाला बघायचं आहे. थंडीतली सकाळची सूर्याची वेल्हाळ किरणं, आश्विन महिन्यातले पौर्णिमेचे चांदणे. चंद्राच्या प्रकाशातील पानांची जाळीदार सावली. असे कितीतरी सृष्टीचे कौतुक आम्हाला आमच्या झाडाखाली एकत्र बसून बघायचे आहेत. पण विदुल, या वाऱ्याची आमच्यावर हुकमत असते. आत्ताच बघितलंस ना! थोडा जोराचा वारा आला आणि त्यांनी आम्हाला फेर धरायला लावला. सोसाटय़ाचा वारा सुटला की, आम्हाला तो इकडून तिकडे उडवून लावेल. कचरापेटीत, रस्त्यावर कुठेही आम्ही जाऊन पडू. मग आमचा काहीच उपयोग होणार नाही.’
त्यावर विदुल पानांना म्हणाला, ‘ पानांनो, जगात कुठलीही गोष्ट वाया जात नाही. तिचा कोणता ना कोणता उपयोग निश्चितच होतो. मी तुम्हाला एक सुचवू का? तुम्हाला मी नदीत नेऊन सोडतो!’
‘नदीत!’ सर्व पाने एकदम ओरडली. ‘नदी तर आम्ही कधीच पाहिलेली नाही. जर आम्हाला एकत्र राहायला मिळणार असेल तर सोड आम्हाला नदीत. नदीत सोडल्यावर आम्ही काय करायचं?’
 विदुल म्हणाला, ‘तुम्ही वाहात वाहात शेताच्या कुंपणापर्यंत जायचं. मग पुढे काय करायचं ते सगळ्यांचा अन्नदाता, प्रत्येक व्यक्तीचे भरण पोषण करणारा शेतकरी ठरवेल.’
‘ठीक आहे, सोड आम्हाला नदीत’ वाळलेली पाने म्हणाली.
विदुलने सर्व पाने एका पोत्यात भरली आणि ती नदीत सोडली. वाळलेली पाने पोहत पोहत निघाली. त्यांना मासे भेटले. त्यांना मासे बघून खूपच आनंद झाला. नदीच्या संथ पाण्याबरोबर जाताना त्यांना खूपच गंमत वाटत होती. मस्त्य गरुडाचा रानवट आवाज मधूनच येत होता. क्वॅक् आवाज करून बगळे उडत होते. भुंडय़ा शेपटीच्या रानकोंबडय़ा लाजत मुरकत नदीच्या काठाने फिरत होत्या. पाकोळ्यांचा थवा उडत होता. नदीच्या काठावरचे सृष्टीसौंदर्य बघत बघत पाने अगदी मजेत चालली होती. शेताचे कुंपण कधी आले त्यांना कळलेदेखील नाही.
दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांने बघितलं, खूप सारी पाने शेताच्या कुंपणापर्यंत आली होती. त्याने सर्व पाने गोळा केली. एक खड्डा खणला. त्यात पाने टाकली. त्यावर माती टाकून खड्डा बुजवला. उन्हाळा संपला, पावसाळा संपला. शेतकऱ्याने रब्बी पिकांची, गहू, हरबऱ्याची पेरणी केली. काही दिवसांत हिरवी कोवळी रोपं डोलू लागली. शेतकऱ्याने खड्डा उकरला. वाळलेल्या पानांचे काळेभोर, भुसभुशीत खत तयार झाले होते. त्याला आनंद झाला. त्याने बायकोला-आवडाला बोलावलं, ‘अगं ए! इकडे ये. खत बघ कसं झ्याक झालं आहे, चला आपण दोघे मिळून खत घालूया.’
आवडा गाणं म्हणू लागली-
‘मोलाचं शेत माझं हो! राखावं किती!
माझ्या काळ्या आईची हो! मशागत करावी किती?
सुपीकता, सुपीकता तिला द्यावी कशी
खतं द्यावी तिला, द्यावी तिला कशी नि किती?’
तिला उत्तर देत शेतकरी म्हणू लागला-
‘पानं मी कुजवीन, त्यातून शेत मी सजवीन.
वाळक्या, साळक्या पानांतुनी, नवी पानं मी जगवीन.
मोलाचं शेत माझं हो! फुलवीन फळवीन!
सोन्याचं पीक मी काढीन! काढीन!’
शेतकऱ्याने खत घातलं आणि काही दिवसांतच गव्हाच्या कोवळय़ा लोंब्या दिसू लागल्या. होळी पौर्णिमा जवळ आली. शेतं पिवळी पडू लागली. पिवळय़ा शेतात गव्हाचा सोनेरी दाणा भरला. त्याने कापणी केली. मळणी केली. सोनेरी गहू घरी आणला. आवडाने गव्हाचं बारीक पीठ केलं. पिठाच्या मऊसूत पोळ्या केल्या. शेतकऱ्याच्या मुलांना आईच्या हातच्या तुपाची धार सोडलेल्या शालूच्या घडय़ांसारख्या पोळ्या खूपच आवडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा