आसिफ बागवान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘बिटकॉइन हा काही आर्थिक मंच नव्हे किंवा ते काही चलनही नाही. ती एखादी बँकिंग व्यवस्थाही नाही किंवा डिजिटल चलनही नाही. बिटकॉइन म्हणजे पैशाच्या तंत्रज्ञानाचे एक आमूलाग्र स्थित्यंतर आहे..’’ बिटकॉइन आणि एकूणच कूटचलनाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून जगभर व्याख्याने, शिबिरे घेत हिंडणाऱ्या आंद्रेस अँटनॉपोलस यांच्या ‘इंटरनेट ऑफ मनी’ या पुस्तकातील हे विधान. क्रिप्टोकरन्सी अर्थात कूटचलन म्हणजे काय, बिटकॉइन काय आहे, ते कसे काम करते, त्याची व्याप्ती किती आहे, किती देशांनी ते स्वीकारलं आहे, कितींनी नाकारलं आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे माहीत करून घेण्याआधीच भारतातील एक मोठा वर्ग असंख्य छोटय़ा छोटय़ा अ‍ॅप्सच्या माध्यमातून बिटकॉइन आणि तत्सम कूटचलनामध्ये गुंतवणूक करू लागला आहे. मध्यंतरी आपल्याकडे क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीकडे आकर्षित करणाऱ्या जाहिरातींचा भडिमार होत होता. ते या गुंतवणुकीचे कारण असावे. कूटचलनातील गुंतवणुकीतून झटपट आणि भरमसाठ आर्थिक परतावा मिळतो, एवढय़ाच माहितीच्या आधारे त्यात गुंतवणूक करणाऱ्यांची यादी खूप मोठी निघेल. आर्थिक परताव्याबद्दलचा हा विश्वास कूटचलनाने आतापर्यंत अविश्वसनीयरीत्या सार्थ करून दाखवला आहे. पण वरच्या विधानात आंद्रेस यांनी म्हटल्याप्रमाणे, बिटकॉइन हे काही चलन नाही किंवा बँकिंग व्यवस्था नाही, तर ते एक अर्थतंत्रज्ञानाचे स्थित्यंतर आहे. ब्लॉकचेन नामक तंत्रज्ञानाच्या साखळीला धरून हे स्थित्यंतर घडू पाहत आहे. येत्या काळात प्रत्येकालाच या स्थित्यंतरात सामील व्हावे लागणार आहे. त्यासाठी कूटचलन आणि त्याचे साखळी तंत्रज्ञान यांची माहिती असणे आवश्यक आहे. गौरव सोमवंशी यांचे ‘साखळीचे स्वातंत्र्य’ हे पुस्तक जिज्ञासू वाचकांची ती गरज पूर्ण करते.

ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, टोकन, बिटकॉइन, मायिनग अशा असंख्य कठीण शब्द आणि संकल्पना कूटचलनाच्या विश्वात सामावल्या आहेत. या क्लिष्ट विषयाला उलगडून दाखवणारी अनेक इंग्रजी पुस्तके, लेख, निबंध उपलब्ध आहेत. पण या संकल्पनांचा उलगडा करून या होऊ घातलेल्या अर्थक्रांतीची महती मराठी भाषेत मांडण्याचे काम अद्यापि फारच कमी झाले आहे. ‘लोकसत्ता’ने दोन वर्षांपूर्वी ही जबाबदारी घेतली आणि ‘साखळीचे स्वातंत्र्य’ ही लेखमाला सुरू केली. गौरव सोमवंशी यांनी त्या लेखमालेत लिहिलेल्या लेखांचा विस्तार करून त्यात अद्ययावत बदलांचा, संदर्भाचा अंतर्भाव करून ‘साखळीचे स्वातंत्र्य’ हे पुस्तक साकारले आहे.

मूळच्या मराठवाडय़ातील असलेल्या गौरव सोमवंशी यांनी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणकशास्त्राची पदवी घेतली. लखनौ आयआयएममधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१७ पासून ते पूर्णवेळ ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१७ मध्ये विकीपीडियावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती वाचल्यानंतर त्यांची उत्कंठा चाळवली गेली. मात्र, त्यावेळी या तंत्रज्ञानाशी संबंधित साहित्य अभावानेच उपलब्ध होते. तरीही मिळेल त्या माध्यमातून गौरव यांनी त्याबाबतची माहिती आत्मसात केली. त्या क्षेत्रातच कार्यरत असल्याने होणाऱ्या नवनवीन बदलांशीही ते परिचित आहेत. अभ्यास व अनुभवाला खुसखुशीत मांडणी आणि शैलीदार लेखनाची जोड देत त्यांनी ब्लॉकचेनचे अंतरंग वाचकांसमोर खुले केले आहे. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. मात्र, त्यात गौरव यांनी अधिकची भर घातली आहे. शिवाय विषयाचे वर्गीकरण ठसठशीतपणे मांडण्यासाठी या पुस्तकाची आठ भागांत विभागणी करण्यात आली आहे. ब्लॉकचेनचा परिचय, बँकिंग आणि बिटकॉइन, ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील विविध संकल्पना, त्याचे प्रकार, बिटकॉइन या भागांतून लेखक मूळ विषयाची पायापासून शिखरापर्यंत मांडणी करतो. त्यासोबतच त्यामागची पार्श्वभूमी वाचकांच्या मनात रुजावी याकरिता लेखकाने पैशाचा उगम, स्मृती, बँकिंग याविषयीच्या लेखांतून इतिहासही मांडला आहे. हे करताना सरळसोट मांडणी न करता लेखक विषयाशी संबंधित घटना, प्रसंग यांचा आधार तर घेतोच; शिवाय छोटय़ा छोटय़ा रंजक गोष्टी किंवा उदाहरणांच्या माध्यमातून या संकल्पनांतील बारकावेही सांगतो. त्यामुळे आर्थिक- त्यातही कूटचलनासारख्या क्लिष्ट विषयावरील हे पुस्तक मनोरंजकही झाले आहे.

ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान अजूनही अनेकांना इंटरनेटच्या काळ्या बाजूचे (डार्कर साइड) वाटते. बिटकॉइन म्हणजे एका प्रकारची फसवी गुंतवणूक योजना वाटते. मात्र, या तंत्रज्ञानाची निर्मितीच मुळात पारदर्शकतेच्या ध्येयातून झाल्याचे लेखकाने सुरुवातीपासूनच मांडले आहे. सरकार किंवा बँका यांच्यासारख्या ठरावीक यंत्रणांच्या हाती सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या दोऱ्या असल्यामुळे सर्वसामान्यांना त्यात निर्णायक स्थान नाही. शिवाय बँका किंवा सत्ताधारी यंत्रणा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी काम करत असल्याचा विचार या तंत्रज्ञानाच्या मुळाशी आहे. इंटरनेट या समस्येतून आपली सोडवणूक करू शकेल हे लक्षात आल्यानंतर जगभरातील अनेक ज्ञात-अज्ञात तज्ज्ञांनी एकत्रितपणे, स्वतंत्रपणे त्यावर काम केले. ब्लॉकचेन किंवा कूटचलन हे त्याचेच फळ असल्याचे आपल्याला या पुस्तकातून उमगते. भूतकाळापासून भविष्यापर्यंतच्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वेध घेताना लेखकाने त्यातून  निर्माण होऊ शकणाऱ्या विकेंद्रित, विश्वासार्ह आणि पारदर्शक जगाचे संकल्पचित्रही सादर केले आहे.

या तंत्रज्ञानातील अनेक संदर्भ लेखकाने वेगवेगळ्या प्रकरणांत वारंवार मांडले आहेत. मात्र, ती पुनरुक्ती न वाटता त्यामुळे विषय सुटसुटीत होण्यास मदतच होते. अशा अनेक संदर्भामुळे आठ भागांत आणि ५६ लेखांत विभागलेल्या या विषयाची एक साखळीच आपल्याला वाचायला मिळते. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाच्या साखळीचा गुंता ही लेखांची साखळी अलगदपणे सोडवते.