शिक्षण क्षेत्रात काम करणारे नीलेश निमकर यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी बरेच काम केले. या शिक्षण प्रवासातूनच ‘शिकता शिकविता’ हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकाच्या रूपाने शालेय शिक्षणात कार्यरत असणारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक, प्रशासक आणि पालकांसाठी अनुभव आणि चिंतनाचे नवे दालन उघडले आहे. अडीच दशकाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात संवेदनशीलपणे काम करणाऱ्या नीलेश निमकर यांच्या पुस्तकातून कधी आत्मचरित्रात्मक, कधी चिंतनात्मक, कधी शैक्षणिक, ललित तर कधी व्यक्तिचरित्र यांचे विविधांगी दर्शन घडते. तसेच जनजातीय समुदायांची संस्कृती आणि मुख्य प्रवाहातील शिक्षण यांच्यातील तफावतही ठळकपणे जाणवते.
नीलेश निमकर यांनी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी दाभून नावाच्या एका आदिवासी खेडय़ातल्या एका प्रयोगशील शाळेत शिकवायला सुरुवात केली. वारली व कारली कातकरी आदिवासींच्या पाडय़ात शिकवायला गेले. ते काही शिक्षक नव्हते, परंतु त्यांनी आदिवासी मुलांना शिकवण्याचे ठरवले. त्यांच्या कामात त्यांचे आदिवासी समाजातील मित्रसुद्धा सहभागी झाले होते. हे काम करताना त्यांना ज्या अडचणी आल्या त्यावर मार्ग काढत पुढे जात राहिले. या संघर्षांतूनच त्यांना लेखनाची स्फुर्ती मिळाली. या अनुभवांची शिदोरी म्हणजेच हे पुस्तक होय. यात एकूण वीस लेखांचा समावेश आहे.
या सर्व लेखांत लेखकाला आदिवासींच्या शिक्षण प्रवासात ज्या अडीअडचणी आल्या, त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला याविषयी सांगितले आहे. लहान मुलांना शिकवता शिकवता लेखक स्वत: कसा शिकत गेला याचा छान प्रवास उलगडला आहे. कोविडच्या काळात दोन वर्षे बंद असलेल्या शाळा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्यांनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. करोनामुळे मुलांच्या शिक्षणात जो फरक पडला तो दूर करण्यासाठी खूप प्रयत्नही केले.
‘आनंदवाडय़ा’ या लेखांमध्ये त्यांनी या अंगणवाडय़ा आहेत त्या ‘आनंदवाडय़ा’ झाल्या पाहिजेत असे म्हटले आहे. आनंदवाडय़ांमध्ये शिकवणाऱ्या ताईकडे मानाने पाहिले पाहिजे असेही मत व्यक्त केले आहे. करोना काळापासून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले असले तरी ऑफलाईन शिक्षण फार महत्त्वाचे आहे. मुलांना प्रत्यक्ष शिकवताना एखाद्या विषयाचे आकलन जसे सहजपणे होते तसे ऑनलाईन शिक्षणात होत नाही, ही खंत लेखकाने व्यक्त केली आहे. एकूणच हे पुस्तक म्हणजे शिकण्या-शिकवण्याच्या सुंदर प्रवासाची कहाणी आहे.
‘शिकता शिकविता’ – नीलेश निमकर, समकालीन प्रकाशन, पाने – २२३,
किंमत-३०० रुपये.