भारतात ध्वनिप्रदूषणाविरुद्धच्यालढय़ाची सुरुवात करणारे डॉ. यशवंत ओक यांचे ‘एक झुंज गोंगाटाशी’ हे पुस्तक आजच्या काळात अधिक महत्त्वाचं ठरतं. कारण एकीकडे आवाजाच्या प्रदूषणाच्या पातळीनं टोक गाठलंय, पण बहुतांश समाज त्याविषयी सजग नाही असं चित्रं आहे. जे याविरोधात आवाज उठवत आहेत त्यांचा आवाज क्षीण आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमण करून बळजबरीने लोकांच्या जमिनी बळकावणारेभूमाफिया, मतलबी राजकारणी, नफेखोर उद्योजक आणि त्यांचे मिंधे नोकरशहा यांची अभद्र युती समाजाला वाळवीप्रमाणे पोखरत असताना हे पुस्तक आले आहे. हे पुस्तक केवळ एका कार्यकर्त्यांचेच नाही, तर भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांसमोर ताकदीने उभ्या ठाकलेल्या, त्यांना समर्थपणे लढा देणाऱ्या व्यक्तीचे आहे- जे सामान्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. या पुस्तकात लेखकाने आजवर दिलेल्या अनेक कायदेशीर लढय़ांची माहिती दिली आहे. एका प्रकरणात ध्वनी आणि त्याच्या प्रदूषणाचे ऐतिहासिक पैलू विशद केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : आदले । आत्ताचे : अधोविश्वाची ऊर्ध्वगामी दास्तान

भारतातील ध्वनिप्रदूषणावर विवेचन करतानाच त्याच्या मानवी आरोग्यावरील परिणामांचीही माहिती दिली आहे. ध्वनिप्रदूषणाविरुद्ध कायदेशीर लढायांची सुरुवात कशी झाली, त्यातील चढउतार, ध्वनिप्रदूषणाविरुद्धच्या भारतातील कायद्यांची ओळख, मानवेतर सृष्टीवर ध्वनिप्रदूषणाचा होणारा विपरीत परिणाम.. अशा अनेक गोष्टींची माहिती लेखकाने सोप्या शब्दांमध्ये दिली आहे. यातील दोन प्रकरणे इंग्रजीत आहेत. या पुस्तकाचा विशेष म्हणजे हे पुस्तक लिहिताना कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. त्यामुळे लेखक हाडाचा लढवय्या कार्यकर्ता आहे याची साक्ष पटते. एका लढय़ाचा तपशीलवार वृत्तांत असेच या पुस्तकाविषयी म्हणावे लागेल. हे पुस्तक वाचकालाही आपल्या कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याला अधिक सजग करेल हे निश्चित.

‘एक झुंज गोंगाटाशी’, डॉ. यशवंत ओक, राजहंस प्रकाशन, पाने- १७२,
किंमत- ३०० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ek zunj gongatashi book review css