१९९४ सालापासून मी प्रायोगिक नाटकं सातत्यानं करत असलो तरी २००८ सालापर्यंत मी व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो नव्हतो. २००८ मध्ये एके दिवशी विजय केंकरे सरांचा फोन आला, ‘‘मोहन वाघांना तुला भेटायचंय.’’ साक्षात् वाघानं बोलावणं धाडलंय म्हटल्यावर दुसऱ्याच दिवशी मी ‘मकरंद सोसायटी, दादर’स्थित वाघाच्या गुहेत हजर झालो! शं. ना. नवरे लिखित, दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित आणि ‘चंद्रलेखा’ निर्मित ‘प्रेमगंध’ हे माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक. नाटक सो-सोच होतं; पण ‘चंद्रलेखा’सारखी मातब्बर संस्था आपल्यासाठी आपणहून दरवाजे उघडतेय या कल्पनेनं अंगावर चढलेल्या मूठभर मांसासकटच मी हे नाटक केलं. डिसेंबर महिन्यात तालमी झाल्या आणि ३१ डिसेंबर या मोहनकाकांच्या अत्यंत लाडक्या तारखेला नाटक ओपन झालं.

माझं हे पहिलंच व्यावसायिक नाटक. तशात व्यावसायिक रंगभूमीची पंढरी मानल्या जाणाऱ्या शिवाजी मंदिरला पहिला प्रयोग! दुपारी साडेतीनला पहिला प्रयोग होता आणि लागूनच साडेसातला दुसरा. मी शिवाजी मंदिरच्या मेकअप रूमला लागून असलेल्या गच्चीत शून्यात पाहत उभा होतो. आजूबाजूला खूप धावपळ सुरू होती. पण माझी उगीच कुठेतरी तंद्री लागली होती. अचानक एक सानुनासिक आवाज कानावर पडला, ‘‘तीन वीस झालेले आहेत. बरोब्बर साडेतीनला एक पाकळी इथे आणि एक पाकळी तिथे.’’ सिग्रेट पिणाऱ्या माणसाच्या ओठाजवळ आलेली सिग्रेट खसकन् कुणीतरी ओढून काढल्यावर त्याची जी चिडचिड होईल तशी माझी झाली. मी आवाजाच्या दिशेनं वळलो. आवाजाचा मालक माझ्यापासून काही फुटांवरच उभा होता. पांढरा शर्ट, ढगळ राखाडी पँट, एका हातात इस्त्री केल्यासारखी वाटावी अशी प्लास्टिकची पिशवी, डोळ्याला चष्मा, नाकाखाली चार्ली चॅप्लिनसारखी मिशी, केसाचा नेटका भांग आणि लुकलुकणारे डोळे या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेनं पहिल्या फटक्यात स्कॅन केल्या. ‘बरोब्बर साडेतीन!’ अशी जवळजवळ धमकी देऊन तो माणूस बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे रंगमंचाच्या दिशेनं नाहीसा झाला. ‘एक पाकळी इथे आणि एक पाकळी तिथे’ म्हणजे नेमकं काय, याबद्दल अचंबा करावा, की हा माणूस नेमका कोण याचा शोध घ्यावा, या विचारांत मी पडलो.

पुढल्या पाच मिनिटांतच मला दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली. मेकअप करणाऱ्या केळकर काकांनी ती दिली. सदरहू इसम ‘चंद्रलेखा’च्या दोन मॅनेजर्सपैकी एक असून त्यांचं नाव सुरेंद्र दातार आहे, ही माहिती मिळाली; आणि ‘एक पाकळी इथे आणि एक पाकळी तिथे’चा अर्थ ‘बरोब्बर साडेतीन वाजता पडदा उघडणार’ असा होता. पुढे दातारकाकांशी ओळख आणि दोस्ती वाढल्यावर त्यांच्या शब्दकोशातल्या अशा अनेक वाक् प्रचारांचा अर्थ मला न विचारताच कळू लागला.

शुभारंभाच्या प्रयोगानंतर दातारकाकांशी फारसा संबंध आला नाही. तो ‘चंद्रलेखा’चा घसरणीचा काळ असला तरी तेव्हाही संस्थेची तीन ते चार नाटकं सुरू होती. पण पश्चिम महाराष्ट्राचा पहिला दौरा लागला आणि तिथून दातारकाका ही काय चीज आहे हे कळत गेलं. दौऱ्यावर दातारकाका असले की घडय़ाळही स्वत:ला त्यांच्याप्रमाणे सेट करायचं. सगळं एकदम टाइम टू टाइम! ‘‘बरोब्बर अकराला गाडी सुटणार,’’ असं सांगितलं गेल्यानंतर अकराचे अकरा पाच झाले तरी दातारकाका गाडीच्या दाराशी एक हात पाठी ठेवून दुसऱ्या हातावरचं घडय़ाळ पाहत उभे असलेले दिसायचे. या नाटकाच्या निमित्तानं आणि नंतरही मी दातारकाकांबरोबर महाराष्ट्रभर अनेक दौरे केले. पण एकदाही मी दातारकाकांना चालत्या गाडीत झोपलेलं पाहिलं नाही. बस सुटताना ते ड्रायव्हरच्या शेजारी जितक्या ताठपणे बसून असायचे तसेच ते अर्धा महाराष्ट्र पालथा घालून प्रयोगाच्या गावी पोहोचल्यावरही असायचे. जागता पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यासारखे दातारकाका टक्क जागे! उलटून गेलेली साठीही याबाबतीत त्यांना थकवू शकलेली नाहीये.

२५ डिसेंबर २०१० ही माझ्यासाठी मोठी विलक्षण तारीख आहे. त्या दिवशी सकाळी माझ्या मुलीचा जन्म झाला. आणि त्याच दिवशी मोहन वाघ गेल्याची बातमी आली. ‘चंद्रलेखा’ नावाचं एक भलंमोठं जहाज फुटलं. सगळे बिनीचे शिलेदार इतस्तत: विखुरले गेले. पुढे दोन-तीन र्वष दातारकाकांशी काहीच भेट झाली नाही.

२०१३ मध्ये मी ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ नाटकाच्या तालमी करत होतो. आमची रंगीत तालीम सुरू होती. तालीम संपल्यावर माझं लक्ष सहज प्रेक्षागृहात गेलं. शेवटच्या रांगेत तसाच हाफ शर्ट घालून आणि तशीच प्लास्टिकची पिशवी सावरत दातारकाका बसले होते. ‘‘तसा घरी बसून असतो निवांत. अभिजीतचा (निर्माता अभिजीत साटम) फोन आला. म्हणाला, वेगळा प्रकार आहे जरा. म्हटलं, आता काय डोंबलाचं वेगळं करतोय हा? म्हणून आलो बघायला.’’ ‘‘मग काय वाटतंय तुम्हाला?’’ मी विचारलं. ‘‘हे असं काहीतरी घडत नव्हतं म्हणूनच बसलो होतो घरी इतके दिवस.’’ ही नाटकाची तारीफ आहे हे कळायला मला काही क्षण लागले. २१ डिसेंबर २०१३ ला ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’चा पहिला प्रयोग कल्याणच्या अत्रे नाटय़गृहात झाला. गर्दी अपेक्षेपेक्षा कमीच होती. प्रयोगानंतर कल्याणहून ठाण्याला निघताना काका माझ्याच गाडीत होते. ‘‘काका, बुकिंग फार बरं नव्हतं,’’ मी प्रस्तावना केली. ‘‘छे छे! अहो, हाऊसफुल प्रयोग!’’ तडक सानुनासिक उत्तर आलं. ‘‘अहो, काय म्हणताय काका? जेमतेम चाळीस हजार झालं बुकिंग.’’ मी किंचित त्रासिकपणे म्हटलं. तर काकांचं उत्तर- ‘‘आजच्या दिवशी हे हाऊसफुलच आहे. संकष्टी चतुर्थी आहे आज. ७ : ४२ चा चंद्रोदय. लोकांना उपवास सोडायचे असतात. नाटकाला कसले येतायत? तरीही एवढं बुकिंग झालं. हे नाटक धावणार!’’

..आणि काकांची भविष्यवाणी खरी ठरली. पुढल्या वर्षभरात ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ दणकावून चाललं. नाटय़व्यवसाय कोळून प्यायलेल्या या माणसानं रंगभूमीच्या वैभवाचा काळ आणि त्यानंतरचा बदलत जाणारा व काही अंशी आटत जाणारा प्रवाह गेली चार दशकं आपल्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी पाहिलाय, आणि आपल्या कुशाग्र बुद्धीनं त्याचं मोजमाप केलंय. नाटकाचं वेड दातारकाकांना त्यांच्या तीर्थरूपांकडून मिळालंय. सत्तरच्या दशकात एकदा वडिलांचा हात धरून कोकणातून मुंबईला येऊन डॉ. काशिनाथ घाणेकरांचं ‘गारंबीचा बापू’ हे नाटक त्यांनी पाहिलं आणि नुकत्याच मॅट्रिक झालेल्या या मुलाला नाटय़पिशाच्चानं पछाडलं. पण नंदनवनात जायची वाट ठाऊक नव्हती. कुठल्यातरी मासिकात शं. ना. नवरेंचा पत्ता मिळाला. दातारकाकांनी शन्नांना पत्र लिहिलं. आपली नाटय़व्यवसायात येण्याची इच्छा प्रकट केली, मार्गदर्शनाची विनंती केली. शन्नांनी उत्तर पाठवलं- ‘‘मराठी मध्यमवर्गीय माणसानं पोटापाण्याचा दुसरा व्यवसाय करून मगच नाटय़व्यवसायाचा विचार करावा.’’ नुकत्याच भगभगू लागलेल्या आगीवर कुणीतरी चर्रकन् पाणी ओतल्यासारखं झालं. दुसरं काहीही करण्याची दातारांची अजिबात इच्छा नव्हती. नाइलाज म्हणून त्यांनी वडिलांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये काही काळ घालवला. पण मखमली पडद्यामागचं मायाजाल त्यांना खुणावत होतं.

अशात एके दिवशी त्यांच्या गावी श्रीकांत मोघे आले. बारीकशा विश्रांतीसाठी ते दातारकाकांच्या घरी आले होते. दातारकाकांनी शन्नांना पाठवलेल्या पत्राबद्दल आणि त्यांच्या आलेल्या उत्तराबद्दल मोघेंना सांगितलं. मोघेकाकांनी शन्नांचा तो सावध सल्ला धुडकावून लावला. ‘‘तुला उडी मारावीशी वाटतेय ना, मग मार उडी. ये मुंबईला.’’ कॅरमच्या स्ट्रायकरवर टिचकी बसल्यानंतर तो ज्या वेगानं सुटतो त्या वेगानं दातारकाका मुंबईच्या दिशेनं सुटले. अनेक वर्षे मोघेंकडेच उमेदवारी केली. स्वत: मोघे, अभिषेकीबुवा, मो. ग. रांगणेकर अशा अनेक दिग्गजांना जवळून पाहिलं. मग काही वर्षे ते उदय धुरतांच्या ‘माऊली प्रॉडक्शन्स’मध्ये नाटकाची प्रॉपर्टी सांभाळण्याचं काम करीत होते. या सगळ्यात आर्थिक मिळकत तुटपुंजीच; पण कुठेतरी मन मारून खर्डेघाशी करण्यापेक्षा आपल्याला जे करायचं होतं तेच आपण करतोय याची नशाच खूप होती. त्यानंतर मच्छिंद्र कांबळींच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’मध्ये प्रवेश मिळाला. बाबूजींच्या हाताखालीच आपण नाटकधंद्यातले बारकावे शिकलो, असं दातारकाका स्वत:च सांगतात.

मग स्वत:च्या जीवावर कोकणात नाटकांचे प्रयोग लावणे, वपुंचे कथाकथनाचे कार्यक्रम करणे असे उद्योगही सुरू झाले. कथाकथनाला मिळणारा प्रतिसाद पाहून वपुंच्याच ‘पार्टनर’ या कादंबरीवर आधारित नाटकाची निर्मिती करण्याचंही धाडस त्यांनी केलं. पण ते सपशेल आपटलं. आर्थिक नुकसान झालं. मात्र, नाटकाचं वेड काही कमी झालं नाही. तेरा-चौदा वर्षे असे धक्के खाल्ल्यानंतर १९९२ साली मोहन वाघांनी त्यांना समोरून ‘चंद्रलेखा’मध्ये बोलावून घेतलं. खुद्द मच्छिंद्र कांबळींनी ‘‘बाकीच्यांना बाजूला करून वाघ तुला बोलावतायत, हा खूप मोठा मान आहे. ‘चंद्रलेखा’ सोडू नकोस,’’ असा आशीर्वाद दिला. पुढे २०१० साली ‘चंद्रलेखा’ खालसा होईपर्यंत दातारकाका या संस्थेत होते.

नाटय़सृष्टीचा इतिहास लिहिताना आपण दिग्गज नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते आणि निर्मिती संस्थांचा उल्लेख करतो. त्यांची जडणघडण, त्यांची वाटचाल हाच आपल्यासाठी इतिहास असतो. पण आयुष्यभर ‘मॅनेजर’ म्हणून वावरलेल्या या माणसानं ज्या ठिकाणी उभं राहून ही नाटय़सृष्टी पाहिलीय त्या ‘वॅन्टेज पॉइंट’वर जाऊन या झगमगत्या दुनियेकडे पाहणं खूप मनोरंजक आहे. दातारकाकांनी अनेक धडपडणाऱ्या कलाकारांना पुढे ‘लिजंडस्’ होताना पाहिलंय. आणि अनेक लिजंडस्ना मोडून पडतानाही पाहिलंय. त्यांनी वसंत कानेटकरही पाहिलेत, अन् प्रियदर्शन जाधवही पाहिलाय. त्यांनी ‘ऑल द बेस्ट’ नावाचं धुमशानही पाहिलंय आणि ‘भावसरगम’ची अभिजातताही अनुभवलीय. जादूगारानं हातचलाखी करून नाणं अदृश्य करावं तसे निर्मात्याच्या नाकाखालून पैसे गायब करणारे बुकिंगवालेही पाहिलेत आणि स्वत: नुकसानीत जाऊनही आपल्या गावात नाटय़प्रयोग लावून निर्मात्याला चोख पैसे देणारे कॉन्ट्रॅक्टर्सही पाहिलेत.

दातारकाकांचं नाटक या गोष्टीवर अफाट प्रेम आहे. त्या प्रेमापोटी त्यांनी आयुष्यभर दुसरी कुठलीही नोकरी न करता या मयसभेत गोवऱ्या वेचल्या. एरवी घडय़ाळाच्या काटय़ासारखा काटेकोर आणि रुक्ष वाटणारा हा माणूस कधी मूड लागला की कानेटकर-कोल्हटकरांच्या नाटकांतले उतारेच्या उतारे आपल्या सुस्पष्ट, सानुनासिक आवाजात घडाघडा म्हणू लागतो. अशावेळी या ‘मॅनेजर’च्या हिशेबी मेंदूत कुठेतरी हाडाचा कलाकारही दडलेला आहे याची प्रचीती येते. माझ्या एका मित्राला नाटकधंद्यात पैसे टाकायचेत असं एकदा मी त्यांना सांगितलं. तर ‘‘त्यापेक्षा पनवेलच्या बाजूला कुठेतरी जमीन विकत घे म्हणावं. झाला खरंच एअरपोर्ट, तर दामदुप्पट! इथे येऊन कशाला लाखाचे बारा हजार करतोय तो?’’ असा हिशेबी सल्ला देणाऱ्या दातारकाकांनी गेल्या वर्षी ‘चंद्रलेखा’च्या सर्व जुन्या सोबत्यांना घेऊन, पदरमोड करत स्वत: एक नाटक केलं.

काही दिवसांपूर्वी मी सहज त्यांना फोन केला. ‘‘कसे आहात काका?’’ या प्रश्नाला नेहमीप्रमाणे ‘‘अप्रतिम!’’ असं उत्तर आलं. ‘‘काय चाललंय सध्या?’’ ‘‘काही नाही. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’चे प्रयोग सुरू आहेत सध्या!’’ मिश्किल उत्तर आलं. बोलण्यातला कोकणी तिरकसपणा आणि नाटकाचं वेड दातारकाकांच्या सिस्टममधून कधीच जाणार नाही. त्यामुळे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’चे प्रयोग बंद होऊन ‘रायगडाला जेव्हा जाग येते’चे प्रयोग नक्कीच सुरू होणार. आणि पुन्हा कुठल्यातरी नाटकाला ‘‘बरोब्बर साडेआठला एक पाकळी इकडे आणि एक पाकळी तिकडे!’’ असा हाकारा ऐकू येणार याची मला पुरेपूर खात्री आहे!

aquarian2279@gmail.com

(समाप्त)