चेतन माझा मित्र नव्हता. गुरूही नव्हता. पण ज्या वळणावर मला चेतन भेटला, तिथे भेटला नसता तर कदाचित माझं गलबत वेगळ्याच धक्क्याला लागलं असतं. ५ डिसेंबर २००५ ला माझ्या वडिलांचं अकस्मात निधन झालं. त्यानंतरचे अनेक महिने कौटुंबिक जबाबदाऱ्या वाहण्यात गेले. त्यामुळे २००६ च्या मध्यावर येईपर्यंत माझ्याकडे काहीच काम नव्हतं. आता घरचा कर्ता पुरुष असल्यानं पैसे कमावणं हा ऑप्शनला टाकायचा प्रश्न उरला नव्हता. अभिनयाची किंवा लिखाणाची कामं मिळवण्याचं स्ट्रगल सोडून सरळ कुठेतरी नोकरी धरावी असा विचार मी फार गांभीर्यानं करू लागलो. त्यावेळी मला एकाच दिवशी दोन फोन आले. पहिला माझ्या मित्राचा होता. एक अ‍ॅड एजन्सीत  कॉपीरायटर हवा होता. माझी भाषेशी सलगी पाहता माझ्या मित्रानं तिथं माझं नाव सुचवलं होतं. मला जाहिरात क्षेत्राची काहीच पाश्र्वभूमी नसल्याने सुरुवातीचे काही महिने ट्रेनी म्हणून राहावं लागणार होतं. पण नंतर पगार उत्तम होता.  दुसरा फोन आला चेतनचा. ‘‘आविष्कार’साठी ‘वाडा’ ट्रायोलॉजी करतोय मी एडिट करून. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ एडिट करून मी एक नाटक केलंय.. दोन- सव्वादोन तासाचं.  ‘वाडा’ नावानंच करतोय. मोठय़ा परागचं काम करशील का?’’

मी विचारात पडलो. एकीकडे नितांत गरज असलेल्या नोकरीचा दरवाजा होता. हा दरवाजा उघडल्यावर महिन्याच्या महिन्याला  पैसे येणार होते. दुसरा दरवाजा जुना, ओळखीचा, किंचित गंजलेला, करकरणारा होता. प्रायोगिक नाटकाचा. दोन-तीन महिने तालमी. मिळकत अर्थातच शून्य. प्रयोगसंख्या माहीत नाही. ‘मला रात्री झोप लागली नाही..’ असं मला फार कमी वेळा बोलायची संधी मिळते. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या दिवसांतही मी सहा महिन्याच्या बाळाच्या बिनधास्तपणानं झोपत असे. पण त्या रात्री मला खरंच झोप लागली नाही. दुसरा दिवस शुक्रवार होता. पहाटे उठून जुहू बीचवर धावायला गेलो. परत आल्यावर मित्राला फोन केला- ‘‘मी सोमवारी भेटायला येतो.’’ दुसरा फोन चेतनला केला. ‘‘आज किती वाजता येऊ?’’ ‘‘सहा वाजता. माहीमच्या शाळेत..’’ एवढंच बोलून चेतननं फोन ठेवला.

‘वाडा’ या नाटकाच्या तालमींच्या वेळी माहीम शाळेला जवळजवळ सर्कसच्या तंबूची कळा आली होती. चेतननं प्रत्येक रोलसाठी डबल आणि काही ठिकाणी ट्रिपल कास्टिंग केलं होतं. त्यामुळे तालमीला जवळजवळ वीस ते पंचवीस जण जमत असत. नाटक बसणं सुरू झालं. माझी अवस्था मात्र स्टार्टर उडालेल्या टय़ूबलाईटसारखी झाली होती. वर्ष- दीड वर्ष मी काहीच काम केलं नव्हतं. गंज चढला होता. शिवाय मुळातच आपण अभिनय करायचा की नाही, याबद्दल मी दुविधेत असल्यामुळे माझ्याच्यानं काहीच नीट होईना. चेतनबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो. सुरुवातीचे काही दिवस चेतन काहीच बोलला नाही. नंतर त्यानं अपमान करायला सुरुवात केली. हे चेतनच्या भात्यातलं एक विखारी अस्त्र होतं. नट त्याला अपेक्षित पातळी गाठू शकले नाहीत की चेतन एखाद्या धूर्त बाईच्या विखारीपणानं अपमान करायला घेई. त्याला प्रत्येकाच्या चिलखतातल्या पोकळ जागा ठाऊक असायच्या. त्यामुळे ज्याला जिथे लागतं तिथे नेमका घाव घालण्याची हातोटी चेतनकडे होती. ‘‘काही लोकं तीन वर्ष नॅशनल स्कॉलर म्हणून मिरवतात आणि मग फुटकळ मालिका करून टॅलेंट वाया घालवतात. अरे, मला इथे ऐकू येईल असं बोल जरा मोठय़ानं. तुझ्या सीरियलला लावतात तसा माईक लावायचा का आता तुला?’’ चेतनची वाक्यं कुणीतरी चेहऱ्यावर थुंकल्यासारखी अपमानास्पद वाटायची. मित्राचं ऐकून सोमवारी त्या कॉपीरायटरच्या इंटरव्ह्य़ूला जायला हवं होतं असं वाटायला लागलं. त्याच दिवशी तालमीनंतर चेतननं खांद्यावर हात टाकला. ‘‘अंधेरीला राहतोस ना तू? मला बॅन्ड्राला सोड.’’ आम्ही निघालो. बाईकवर पुढे-मागे बसूनही मनसोक्त गप्पा मारता येतात खरं तर. पण मी चेतनशी काहीच बोललो नाही. बॅन्ड्राला तो उतरला. ‘‘उद्या येतोयस ना तालमीला?’’ मी चमकलो. ‘‘असं का विचारतोयस? येणारच आहे.’’ अचानक चेतनच्या डोळ्यात वेगळंच मार्दव दिसलं. ‘‘अ‍ॅक्टिंग सोडायच्या व्हर्जवर आहेस तू. कारण मला माहीत नाही. अंदाज आहे. पण माहीत नाही. नको सोडूस. चांगला नट आहेस. कोषातून बाहेर ये. मी डिवचत राहणारचआहे. पण बाहेर तुलाच यायचंय.’’ चेतन गेला. हा सगळा संवाद वांद्य््रााच्या पुलाखाली जंक्शनवर झाला. मी बराच वेळ त्या दुथडी भरून वाहणाऱ्या ट्रॅफिकच्या कडेला तसाच उभा राहिलो. अंधारात चाचपडणाऱ्याला कुणीतरी सहज मशाल दिल्यासारखं झालं होतं.

‘वाडा’चे खूप प्रयोग झाले. मुंबई, पुण्याव्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता, चेन्नई इथेही झाले. भारत रंगमहोत्सव, नांदिकार फेस्टिवल असे अनेक थिएटर फेस्टिवल्स या नाटकानं गाजवले. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुठलाही इतर नोकरी-धंदा करण्याचे सगळे विचार सोडून पुन्हा अभिनयाकडे वळलो.

चेतन दातारशी पहिली भेट झाली होती १९९७ साली. एन. एस. डी.च्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मी रोज एन. सी. पी. ए.च्या लायब्ररीत जात असे. तिथे खांद्यापर्यंत केस वाढलेला एक उमदा तरुण कुठलं पुस्तक वाच, कुठलं वाचू नको याबद्दल मार्गदर्शन करत असे. तो चेतन होता. तेव्हा अर्थात तो ‘चेतन सर’ होता. त्यानंतर चेतननं दिग्दर्शित केलेली अनेक नाटकं पाहिली. काही आवडली. काही नाही आवडली. त्याला एका मालिकेत ‘डॉन’ची भूमिका करताना पाहून हसूही आलं होतं.

९८ साली मी हृषिकेश जोशीच्या ‘लिटील प्रिन्स’ या नाटकात काम केलं होतं. ते नाटक एकाच प्रयोगात बंद पडलं. पण माझ्या सुदैवानं तो प्रयोग चेतननं पाहिला होता. ‘‘तुझं ते काम पाहूनच मी तुला ‘वाडा’साठी फोन केला.’’ चेतननं मला नंतर सांगितलं. हे म्हणजे गल्लीतल्या मॅचमध्ये सिक्स मारलेली पाहून थेट राष्ट्रीय संघात सिलेक्शन होण्यासारखं होतं.

‘वाडा’नंतर वर्षभरातच चेतननं डॉ. चंद्रशेखर फणसळकरांचं ‘खेळीमेळी’ हे नाटक दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा रिपर्टरी कंपनी’साठी केलं. मला फोन आला. ‘‘भेटतोस का जरा?’’ आम्ही भेटलो. ‘‘तुमच्या एन. एस. डी.ला चाललोय नाटक करायला!!’’ स्वर चहात साखरेचं प्रमाण बिनसलेल्या सुनेशी बोलणाऱ्या सासूचा होता. ‘‘हं.’’ मी अत्यंत त्रयस्थ उत्तर दिलं. त्यानं त्याची कास्ट लिस्ट समोर ठेवली. ‘‘यांना ओळखतोस?’’ अचानक तो पोलीस खात्यातला धाडसी इन्स्पेक्टर आणि मी दारूच्या गुत्त्याबाहेर घुटमळणारा खबऱ्या वाटायला लागलो. मी कास्ट लिस्टवरून नजर फिरवली. ‘‘जवळजवळ सगळेच ओळखीचे आहेत.’’ ‘‘सांग जरा यांच्याबद्दल.’’ ‘‘म्हणजे मी जे सांगेन त्यावरून तू त्यांना टोमणे मारणार.’’ ‘‘ते नाही मारले तर अन्कम्फर्टेबल कसे होतील? आणि नट अन्कम्फर्टेबल नाही झाला, तर तो काम कसं करणार?’’ चेतन फक्त दिग्दर्शक नव्हता; तो एकाच वेळी मित्रही होऊ शकायचा आणि शत्रूही. कधी मानसोपचारतज्ज्ञाच्या निर्विकार नेमकेपणानं बोलायचा, तर कधी जीवलग होऊन भावनेला हात घालायचा. कधी सखा वाटायचा, तर कधी सासू.

कोलकात्याच्या प्रथितयश ‘नांदिकार नाटय़महोत्सवा’मध्ये ‘वाडा’चा प्रयोग होता. माझ्या एका मित्रानं फटफटीवरून मला दादरला स्टेशनला सोडलं. आम्ही ‘हावडा एक्स्प्रेस’ पकडली आणि साधारण कल्याणपर्यंत माझ्या लक्षात आलं, की मुंबई ते कोलकाता हा भरभक्कम प्रवास मी खिशात एक रुपयाही न घेता करायला निघालो होतो! अंधेरीस्थित माझ्या घरच्या टेबलवर ‘काहे छोड गए मोहे सैंय्या’ म्हणत पडलेलं माझं पैशाचं पाकिट मला डोळ्यासमोर दिसू लागलं. ‘वाडा’ हे प्रायोगिक नाटक. त्यामुळे ‘नाईट’ वगैरे मिळण्याचीही शक्यता नव्हती. येण्या-जाण्याचं तिकीट, तिथलं जेवणखाण संस्थेच्या खर्चानं होतं. पण वरखर्चाला खिशात दमडा नव्हता. नांदिकार नाटय़महोत्सवातला ‘वाडा’चा प्रयोग चांगलाच गाजला. प्रयोग झाल्यावर मंडळी खरेदीला बाहेर पडली. मी शांतपणे सामानाच्या टेम्पोजवळ जाऊन बसलो. नाही म्हणायला ‘भत्ता’ म्हणून रुपये तीनशे हातावर पडले होते. पाठीवर थाप पडली. चेतन होता. ‘‘तू नाही गेलास शॉपिंगला?’’ मी चेतनला माझी कर्मकहाणी सांगितली. चेतन खळखळून हसला. ‘‘ब्रिलियंट! ताबडतोब बाहेर पड. तीनशे रुपयात जे अनुभव येतील ते अख्खं बँक अकाऊंट रिकामं करूनही येणार नाहीत. आणि कोलकात्यात तीनशे रुपये म्हणजे तू जवळजवळ राजा आहेस. चालता हो. रात्रीपर्यंत तोंड दाखवू नकोस.’’

चेतनला ‘कम्फर्ट झोन’ मान्य नव्हता. त्याला ही अस्वस्थतेची, अनिश्चिततेची किनार आवडत असावी. त्या एका दिवसात मी जीवाचं कोलकाता केलं. मेट्रोनं उभा-आडवा फिरलो. खूप खाल्लं. खूप पाहिलं. एस्प्लनेडवर स्वत:साठी पासष्ठ रुपयाचा एक शर्ट विकत घेतला!

दुसऱ्या दिवशी गाडी सुटायच्या आधीच चेतन स्टेशनवर भेटला. ‘‘काय केलंस काल?’’ त्यानं मला विचारलं. मी माझ्या सगळ्या साहसकथा त्याला सांगितल्या. ‘‘किती पैसे उरले?’’ त्यानं विचारलं. मी वीसची नोट दाखवली. ‘‘दे..’’ असं म्हणून तो माझ्याकडून ती नोट घेऊन गेला. दहा मिनिटांनी परत आला तेव्हा त्याच्या हातात विवेकानंदांचं ‘भक्तियोग’ होतं. ते माझ्या हातात ठेवलं. आणि बरोबर पाच रुपयाचं नाणं दिलं. ‘‘याचे पंधरा झाले. आणि पाच रुपये तुला मुंबईला उतरलास की घरी जायला.’’

एखादा मोठा माणूस जातो तेव्हा त्याच्या जाण्यानं ‘पोकळी’ निर्माण झाल्याचं सगळेच सांगत राहतात. बहुतांश वेळा बोलायला बरं वाक्य सुचत नाही म्हणून हे बोललं जातं. पण चेतनच्या बाबतीत हे वाक्य पाचशे टक्के लागू पडतं. चेतनचं जायचं वय नव्हतं. ‘आपलं भूतलावरचं काम संपलं की आपलं आयुष्य संपतं..’ वगैरे गोष्टी आध्यात्मिक गुरू आपल्याला सांगतात. पण चेतन अनेक गोष्टी अर्ध्यावर सोडून गेला. त्याचं काम कुठं संपलं होतं? बॉक्स सेट आणि ‘वेल-मेड प्ले’च्या साच्यात अडकलेल्या मराठी रंगभूमीला चेतन बाहेर काढू पाहत होता. त्याची ‘जंगल में मंगल’, ‘माता हिडिंबा’ ही नाटकं या गोष्टीची साक्षीदार होती. ‘नाटक म्हणजे फक्त वाचिक अभिनय नाही. त्यात गायन, नृत्य, इतर कला यांचा मिलाफ व्हायला हवा..’ हे चेतनसाठी फक्त कार्यशाळांमध्ये फेकायचं वाक्य नव्हतं; तो यालाच अनुसरून आपली नाटकं करत होता. पूर्वी एखादा माणूस जेव्हां डोळ्यांत प्रश्नचिन्हं उभी करून विचारायचा, ‘‘सर, मला पण नाटक करायचंय. कुणी शिकवणारं, कुठला ग्रुप असेल तर सांगा ना!’’ तेव्हा छातीठोकपणे सांगता यायचं- ‘‘आविष्कार’मध्ये जा आणि चेतन दातारांना भेट.’’ हे सगळं अर्ध्यावर टाकून चेतन गेला. सर्वार्थानं पोकळी निर्माण करून गेला.

चेतन माझा मित्र नव्हता. माझा गुरू नव्हता. पण चेतन नसता तर आज मी कदाचित कुठल्या तरी ए. सी. ऑफिसमध्ये बसून इंग्रजी जाहिरातींचं मराठी भाषांतर करत बसलो असतो.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com