‘बज्जूभाई’ म्हटलं की आपल्या कॉलनीतला एखादा खेळकर म्हातारा, किंवा गल्लीच्या नाक्यावर अनेक पिढय़ांची तोंडं लाल करणारा पानवाला, किंवा किराणा मालाच्या पुरातन दुकानात गल्ल्यामागून नोकरांवर खेकसणारा आणि पाचशेची नोट दिल्यावर त्यातून बिलाचे एकशे सत्तावीस रुपये तोंडी वजा करून तीन क्षणात उरलेली मोड तुमच्यासमोर टेकवणारा वाणी डोळ्यासमोर उभा राहतो. आमचे बज्जूभाई खेळकर असले तरी मनानं म्हातारे व्हायला तयार नाहीत. पानाशी त्यांचा कितपत संबंध आहे, मला ठाऊक नाही. आणि जरी अनेकांना ते वाणी-वृत्तीचे वाटत असले तरी ते हिशेबांपेक्षा कवितांमध्ये जास्त रमणारे आहेत. आमचे बज्जूभाई संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित आहेत. आमचे बज्जूभाई ‘पद्मश्री’ आहेत. पद्मश्री रामगोपाल बजाज!

२००० साली मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात दाखल झालो तेव्हा बज्जूभाई त्या संस्थेचे प्रमुख होते. ते त्यांचं शेवटचं वर्ष होतं. पुढे एक्स्टेंशन मिळून आणखी र्अध वर्ष बज्जूभाई एन. एस. डी.च्या डायरेक्टरपदी राहिले. सुरुवातीला त्यांच्याबद्दल किंचित आदरयुक्त भीती असे. कुठल्याही शाळेतल्या इयत्ता पहिलीतल्या मुलाला शाळेच्या प्रिन्सिपलबद्दल असते तशी. कधी कॉरिडॉरमध्ये समोरून बज्जूभाई येताना दिसलेच- आणि त्यांनी आपल्याकडे पाहून आपली विचारपूस केलीच, तर सिनेमाच्या दिग्दर्शकानं सहज स्पॉटबॉयच्या खांद्यावर हात ठेवल्यावर त्याला जे वाटतं, तसं वाटायचं. बज्जूभाई आम्हाला शिकवत नसत. पण दुसऱ्या टर्ममध्ये जेव्हा नवं टाइमटेबल लागलं तेव्हा त्यात आठवडय़ातला एक वर्ग ‘अ‍ॅिक्टग : रामगोपाल बजाज’ असं लिहिलेलं दिसलं. वर्गाच्या वेळी आम्ही सगळेच त्यांची वाट पाहत वर्गात बसलो होतो. इतक्यात एक प्यून आला आणि त्यानं सांगितलं, ‘‘सर ने सबको चाय की दुकान पर बुलाया है.’’ एन. एस. डी.चा डायरेक्टर आपल्याला चहाच्या टपरीवर का बोलवतोय, कळेना. हे म्हणजे मुकेश अंबानीनं आपली बोर्ड मीटिंग हाजीअलीच्या ज्यूस सेंटरवर घेण्यापैकी होतं. चहाच्या टपरीवर सुहास्यवदन बज्जूभाई  उभे होते. ‘‘सुरेश, छोरों से पूछ ले किसको क्या चाहिये.’’ आम्ही आपापले कप घेऊन समोरच्या हिरवळीवर बसलो. तिथेच वर्ग सुरू झाला. बज्जूभाई जवळजवळ दीड तास बोलले. त्याचा अभिनयाशी किती संबंध होता आणि अध्यात्माशी किती, मला कळेना. ‘स्थूल, सूक्ष्म, विराट और बिंदू..’ असं बरंच काही डोक्यावरून जाणारं आपल्या मऊ मुलायम अस्खलित हिंदीत बज्जूभाई बोलत राहिले. चहा पिऊनही मला झोप अनावर होत होती. वर्ग संपला. उठताना बज्जूभाई आपला कुर्ता झटकत म्हणाले, ‘‘बहुत बोअर किया तुम लोगों को. सोचता हूं तुम्हारी बॅच के साथ कोई सीनवर्क करूं.’ मग क्षणभर क्षितिजाकडे नजर लावून विचार केला आणि एकदम माझ्याकडे बघत म्हणाले, ‘‘ए मांडलेकर!  झोप येते काय?’’ ‘झोपे’तल्या ‘झ’चा उच्चार ‘झारखंड’च्या ‘झ’चा होता. ‘‘वो सर मैं..’’ मी कोर्टात उभ्या असलेल्या पाकिटमारासारखी वाक्याची जुळणी करायला लागलो. पण तोवर बज्जूभाई निघून गेले होते. पुढच्या आठवडय़ात वर्गात बसताना आधीच तोंडावर पाणी मारून बसलो. आता आजही जर हे आध्यात्मिक अरण्यात भरकटले तर आपल्याला जागं राहायला कष्ट पडतील हे मी ओळखून होतो. पण वर्गात येताना बज्जूभाई हातात एक बारीकसं पुस्तक घेऊन आले. ते राष्ट्रकवी नामधारीसिंह ‘दिनकरां’चं ‘रश्मीरथी’ हे महाकाव्य होतं. त्या वर्गात बज्जूभाईंनी ‘रश्मीरथी’ वाचलं आणि आम्ही वेड लागल्यासारखे ऐकत राहिलो. त्याच्या पुढच्या आठवडय़ात सरांनी ‘दिनकरां’चंच ‘कुरुक्षेत्र’ वाचलं. आणि या दोन्हीचं मिळून एक दीड तासाचं छोटेखानी नाटक करायचं ठरलं. ‘रश्मीरथी’ हे कर्णावरचं महाकाव्य, तर ‘कुरुक्षेत्र’मधला भीष्म-युधिष्ठिर संवाद हा बधीर करणारा. नाटकाची तालीम सुरू झाली. पण त्या दीडएक महिन्यात कुठेच आपण ‘नाटकाची तालीम’ करतोय असं वाटलं नाही. चहाच्या दुकानासमोर हिरवळीवर बसून स्वैर विचारमंथन करणारे बज्जूभाईच तालमीच्या हॉलमध्येही दिसायचे. कंटाळा आला की त्यांच्या आवडीच्या कविता वाचून दाखवायचे. वाचून काय- म्हणून दाखवायचे. त्यांना शेकडो कविता तोंडपाठ आहेत. आमच्या एका सीनियरनं आम्हाला सांगितलं, ‘‘बज्जू मूड

में है तो एक बार उससे ‘अंधायुग’ पढवा लो. फट जायेगी तुम लोगों की.’’ त्याच्या या  प्रेमळ सल्ल्यावर आम्ही लगेच अंमल केला. ‘‘सर एक बार ‘अंधायुग’ पढिये ना.’’ लाडिक हट्ट करण्याची जबाबदारी आम्ही वर्गभगिनींवर सोपवली. आम्ही विनंती केली तरी जीवे मारण्याची धमकी वाटावी अशी तोंडं आमची! पण स्त्रीस्वरातून आलेल्या मागणीला बज्जूभाईंना ‘नाही’ म्हणता आलं नाही. ‘‘कल क्लास के बाद अलग से दो घंटे निकाल लेना. तब पढेंगे.’’

दुसऱ्या दिवशी नेमका पाऊस. एका छोटय़ा वर्गात आम्ही दाटीवाटीनं जमलो. काही जण उभेच होते. ‘‘मूड है अभी भी सुनने का?’’ बज्जूभाईंनी राग आळवायला घेण्यापूर्वी गायक घसा साफ करून घेतो तसं करत विचारलं. आम्ही होकार दिला. आमच्या बॅचसमोर बज्जूभाईंनी धर्मवीर भारतींचं ‘अंधायुग’ हे महान नाटक वाचलं तो प्रसंग फोटो काढून, त्याची फ्रेम करून भिंतीवरच्या खिळ्याला लावावी तसा माझ्या मनावर कायमचा फिक्स झाला आहे. अश्वत्थाम्याचा विलाप, गांधारीचा शाप आणि कृष्णाची शांत स्वीकृती बज्जूभाईंच्या तोंडून ऐकताना मन काचेचं झालं.

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात पहिल्या वर्षांचे शेवटचे दोन महिने अभूतपूर्व गेले. आमचं ‘रश्मीरथी- कुरुक्षेत्र’चं सीनवर्क मन समाधानानं तुडुंब भरून टाकणारं झालं. ‘‘हरामी, मराठी होते हुए भी अच्छी हिंदी बोल लेता है तू.’’ प्रयोगानंतर बज्जूभाईंनी गालावर चापट मारत म्हटलं. बज्जूभाईंचा ‘हरामी’ हा ‘बाळा’ या अर्थी घ्यायचा असतो, हे एव्हाना आम्हाला कळलं होतं.

मला नेहमीच या माणसाबद्दल विलक्षण कुतूहल वाटत आलेलं आहे. रा. ना. वि.मध्ये असताना आणि नंतरही त्यांच्याबद्दल इतकी टोकाची विरुद्ध मतं मी ऐकली आहेत, की नेमका हा माणूस कसा आहे याबद्दल आजही संभ्रमच आहे. अनेक समकालीन रंगकर्मीच्या मते, ‘बज्जूनं एन. एस. डी.ची वाट लावली.’ बज्जूभाईंच्या कारकीर्दीत एन. एस. डी.मध्ये अनेक ‘फेस्टिव्हल्स’ सुरू झाले. भारत रंगमहोत्सव, जश्ने बचपन वगैरे. या सगळ्या रंगमंचीय उरुसांमुळे एन. एस. डी.च्या शैक्षणिक कार्यावर परिणाम झाला असं अनेकांचं मत आहे. माझंही आहे. महोत्सव भरवणं हे शिक्षणसंस्थेचं काम नाही, हे मत मी विद्यार्थी असतानाही वारंवार मांडलं. एका ज्येष्ठ मराठी नाटककारानं एकदा मला सांगितलं होतं, ‘‘बज्जूमुळे चांगले लोक एन. एस. डी.ला जायचे बंद झाले.’’ पण हे विधान थोडं फसवं आहे. जेव्हा संस्थेचा प्रमुख बदलतो तेव्हा शिकवायला येणाऱ्या व्हिजिटिंग फॅकल्टीच्या निवडीवर परिणाम होतोच. जसं सरकार बदललं की हाताखालचे अधिकारी बदलतात, तसंच आहे हे. बज्जूभाई मूळ बिहारचे. त्यामुळे अनेकांनी त्यांना थेट बिहारी बुद्धीचा राजकारणी ठरवलं. ते एन. एस. डी. र्पिटरी कंपनीचे प्रमुख असताना त्यांच्याविरुद्ध काही लोकांनी  मोर्चाही काढला होता. मोर्चा कसला, अंत्ययात्राच होती ती! बज्जूभाईंची प्रतिकृती बनवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. आणि त्या अंत्ययात्रेला आवर्जून हजर राहिले स्वत: बज्जूभाई!

बज्जूभाईंचं व्यक्तिगत आयुष्य फार वादळी असलं पाहिजे. मला त्याबद्दल फक्त ऐकीव माहिती आहे. ती इथे सांगायचं काहीच कारण नाही. पण आयुष्यात अनेक दानं उलट पडली होती, हे खरं. त्यामुळे ते साधंसुधं बोलतानाही मधेच तंद्री लागल्यासारखे स्वत:त हरवून बोलतात. अजूनही.

दिग्दर्शक म्हणून बज्जूभाईंची काही नाटकं खूप गाजली. ‘कैद-ए-हयात’, ‘सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक’, वगैरे. एन. एस. डी. रिपर्टरी कंपनीच्या ‘घाशीराम कोतवाल’मध्ये त्यांनी केलेला नाना फडणवीस मी पाहिलेला आहे. एरवी ते फार बरे अभिनेते आहेत असं मला वाटत नाही. पण बज्जूभाईंचा ‘नाना’ भलताच जमला होता. २००१   साली बज्जूभाई एन. एस. डी.च्या डायरेक्टरशिपवरून पायउतार झाले. नंतर ते रा. ना. वि.च्या आवारात कमीच दिसत.

२००३ साली मी मुंबईत आलो. त्यानंतर बज्जूभाईंबद्दल वरवरच्या गोष्टी कळायच्या. ते लोणावळ्याला कुठेतरी राहायला आलेत असंही मध्यंतरी कळलं होतं. पण मी आवर्जून कधी संपर्क साधला नाही. त्यांना आपण लक्षातही असू की नाही, देव जाणे! २०१५ मध्ये मी ‘समुद्र’चा प्रयोग करत असताना मध्यंतरात फोन आला. ‘‘मांडलेकर?’’ मी ताबडतोब आवाज ओळखला. ‘‘सर, कैसे हैं आप?’’ ‘‘तू कैसा है हरामी?’’ पलीकडून विचारणा झाली. त्यानंतर दीनानाथच्या प्रयोगाला बज्जूभाई नाटक पाहायला आले. आजवर मी त्यांना फक्त गुडघ्यापर्यंत कुर्ता आणि सुरवार याच पोशाखात पाहिलं होतं. दीनानाथच्या मेकअप रूममध्ये जीन्स व टी-शर्ट घातलेले बज्जूभाई समोर उभे होते. फ्रेंच बीअर्ड होती. बज्जूभाईंची उलटलेली सत्तरी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बज्जूभाई नाटकाला बसले. नाटक बघण्याची त्यांची एक स्वतंत्र तऱ्हा आहे. ते आपल्या खुर्चीत तिरके बसतात. ते फक्त नाटक बघत नाहीत, ते नाटक बघताना इतर प्रेक्षकांनाही बघतात आणि चेहऱ्यावर साधारण ‘काय कमाल चाललीय बघा तिथे रंगमंचावर!’ असे भाव असतात. जणू यांनी दाखवलं नाही तर प्रेक्षक फक्त बटाटेवडे खाऊन घरी जातील.. नाटक बघायचं राहूनच जाईल त्यांचं! प्रयोग संपल्यावर बज्जूभाई आत आले. डोक्यावर कळशी रिकामी केल्यासारखा चेहऱ्यावर आनंद होता. आता गुरुजी आपलं कौतुक करतील म्हणून मी उगीचच मनातल्या मनात खूश होत असताना ते स्पृहा जोशीकडे वळून तिच्याशीच भरभरून बोलले. जाताना तिच्याच गाडीनं गेले. आपण आपल्या घरी एखाद्याला गणपतीला बोलवावं आणि त्यानं शेजाऱ्याच्याच डेकोरेशनचं कौतुक करावं, तसं झालं हे काहीसं. दुसऱ्या दिवशी फोन आला. ‘‘बोलिये सर.’’ मी किंचित तुटकपणे बोललो. ‘‘आय अ‍ॅम प्राऊड ऑफ यू.’’ ‘‘ये आप कल मेरे मूंह पर भी कह सकते थे.’’ मी नवऱ्यानं चुकीच्या रंगाची साडी आणली म्हणून रुसणाऱ्या बायकोसारखा बोललो. ‘‘हं..’’ एक पॉज गेला. ‘‘छोरी से बात करते करते देर हो गई. फिर सोचा और लोग भी तुम्हारे प्रशंसा करने के कायल हैं. सो आय लेफ्ट यू टू युवर ग्लोरी.’’ ‘‘मेरा काम कैसा लगा आपको?’’ चुकीच्या रंगाच्या साडीबरोबर नवऱ्यानं आवडता परफ्यूमही आणलाय हे कळल्यावर बायकोचा स्वर होतो तसा माझा झाला. ‘‘छोरी का काम अच्छा था..’’ उत्तर आलं. ‘‘मैं अपने बारे में पूछ रहा हूं सर.’’ नवऱ्यानं आणलेला आवडता परफ्यूम आपल्या हातात देता देता जर बाटली त्याच्या हातून निसटून फुटली तर बायकोच्या स्वराचं जे होईल ते आता माझं झालं. ‘‘हरामी.. छोरी का काम अच्छा था, क्यूं कि तेरा काम अच्छा था.. अ‍ॅज अ डायरेक्टर. दुनिया के सारे अच्छे नाटक स्त्री के अंतर्द्वद्व से उभरते हैं. मेन आर जस्ट बाऊंसिंग बोर्डस्. ये बात तुझे समझ में आ गई. दॅट वॉज द बेस्ट पार्ट.’’

मला अजूनही हा माणूस खरंच कळलेला नाही.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com