काही दिवसांतच केमसे दादरच्या एका हॉटेलमध्ये मला भेटले. आधीच मी स्वसंरक्षणाची जय्यत तयारी केली होती. आपण बेसावध राहिलो तर हा पाच फुटी गनिम आपल्याला मगरमिठीत घेऊन एक बकवास सिनेमा आपल्या गळ्यात मारेल याची मला खात्री होती. केमसेंच्या चेहऱ्यावर मात्र आलोकनाथला लाज आणतील इतके सात्त्विक भाव होते. तेच त्यांचं सगळ्यात मोठं हत्यार होतं. ‘‘तुमच्या सहकार्याशिवाय आमच्यासारख्या छोटय़ा माणसांनी कसं उभं राहायचं सर?’’ हे वाक्य केमसे हातातल्या बटाटावडय़ाकडे खिन्नपणे पाहत म्हणाले. ‘‘तसं नाही केमसे. अहो, पण तुमचं स्क्रिप्टच रेडी नाही म्हटल्यावर कशाच्या जोरावर करायचा आपण सिनेमा?’’ मी माझा गड सोडायला तयार नव्हतो. ‘‘तेच तर म्हणतोय ना सर. तुम्ही लिहा स्क्रिप्ट नवीन. बायकोनं कुठलीही साडी नेसली तरी आपलं तिच्यावरचं प्रेम कमी होतं का?’’ त्यांच्या या वाक्यावर माझ्या हातातला चमचा गळून चटणीच्या वाटीत पडला. त्यांच्या या वाक्याचा मला काही अर्थच लागेना. ‘‘व्हेरी सॉरी, पण मला खरंच जमणार नाही. वेटर, बिल लाना.’’ ही दोन्ही वाक्यं मी जवळजवळ एका दमात म्हटली. मी बिल देतोय म्हटल्यावर केमसे टुणकन् उठले. मग बिल आल्यावर वेटरकडून ते परस्पर हस्तगत करणे, ‘‘बस का सर! हे तरी आम्हाला भरू द्या..’’चा जीवघेणा आग्रह.. हे सारे सोपस्कार पार करून आम्ही हॉटेलसमोरच्या वाहत्या फुटपाथवर आलो. ‘‘चला येतो..’’ मी परतीच्या दोरावरून पोबारा करण्याच्या बेतात होतो. केमसेंनी भर रस्त्यात खस्कन माझा हात धरला. क्षणभर मी बावचळलो. ‘‘आपण करणार एकत्र काम सर, नक्की करणार.’’ केमसेंच्या आवाजात कॉन्फिडन्स होता. त्यानंतर केमसे त्या गर्दीत अंतर्धान पावले.
त्यानंतर पुढची काही वर्ष केमसेंशी काहीच संपर्क आला नाही. २०१३ सालचा माझा वाढदिवस आधल्या दिवशीच झाला होता. आप्तेष्टांच्या शुभेच्छांच्या बेहोशीतून मी पुरता बाहेरही आलो नव्हतो, त्याचवेळी फोन वाजला. फोनवर नाव झळकलं- ‘केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर.’ तिथेच माझं काळीज कुणीतरी थंडगार हातांनी घट्ट पकडून धरल्यासारखं मला वाटलं. मी फोन घेतला. ‘‘पुण्याहून केमसे बोलतो. प्रॉडक्शन मॅनेजर. ओळखलं का?’’ पलीकडून तोच विनम्र आवाज. ‘‘वा वा! ओळखलं तर.’’ मी आल्या प्रसंगाला धैर्यानं सामोरं जात म्हटलं. ‘‘सर्वप्रथम वाढदिवसाच्या बिलेटेड हार्दिक शुभेच्छा सर. खरं तर कालच फोन करणार होतो. पण कामाच्या धावपळीत राहिलं. तुमच्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आहे सर! एक नवीन चित्रपट करतोय आपण. यावेळी सगळं एकदम अप टू डेट आहे सर. आता फक्त तुमचं सहकार्य पाहिजे.’’ केमसेंनी हल्ला चढवला. दुसऱ्याच दिवशी केमसे बगलेत स्क्रिप्टचं बाड दाबून माझ्या दारात हजर. ‘‘मी स्क्रिप्ट वाचून कळवतो.’’ पुन्हा एकदा तोच ओशाळवाणा बचाव. ‘‘यावेळी तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही.’’ केमसेंचा पुन्हा एकदा तोच आत्मविश्वास. आणि खरंच! चक्क बरं स्क्रिप्ट घेऊन आले होते केमसे. गोष्ट बरी होती, रोल भावखाऊ होता. ‘‘मी म्हटलं होतं ना तुम्हाला- यावेळी जय्यत तयारीनं आलो होतो सर.’’ मी फोन केला तेव्हा केमसे आपला पाच फुटी देह घेऊन ट्रॅम्पोलिनवर उडय़ा मारत बोलतायत असा मला भास झाला.
चित्रपट रसिकांचं नशीब बलवत्तर, म्हणून अनेक सिनेमॅटिक मास्टर पिसेसच्या कळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या जातात. केमसेंच्या आग्रहाला बळी पडून मी केलेला तो चित्रपटही त्यापैकीच एक. आजही तो चित्रपट अपूर्णावस्थेत आहे. एक बरी कथा वाया गेली. कुणाचे तरी काही लाख मातीमोल झाले याचा मला भयंकर खेद आहे. आधी तर कास्टिंगवरूनच प्रचंड घोळ घालण्यात आले. नायिका ठरता ठरेना. आणि शेवटी ज्या मुलीला नायिका म्हणून घेण्यात आलं ती ‘आपल्या सरांच्या इन्स्टिटय़ूटमधीलच आहे,’ असं मला सांगण्यात आलं. आमच्या निर्माता महोदयांच्या अनेक ठिकाणी इन्स्टिटय़ूटस् होत्या. प्रकरण गडगंज होतं. ‘‘एक साँग सीक्वेन्स आपण ब्राझीलमध्येच उडवू. तिथे आपले खूप बिझनेस पार्टनर आहेत.’’ पहिल्या भेटीत निर्मात्यांनी मला ही मौलिक माहिती दिली होती. खरं तर मी तिथेच सावध व्हायला हवं होतं. प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी तर सकाळच्या पारी विरार लोकलच्या डब्यात माजावा तसा गोंधळ माजलेला असायचा. आणि त्या गोंधळाचे सगळ्यात मोठे मानकरी म्हणजे केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर आणि त्यांचं दिव्य प्रॉडक्शन डिपार्टमेंट! सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या वेळी उपलब्ध करून न देणे, अभिनेत्यांचे कॉल टाइम चुकवणे, मग आपण कसे चुकलो नाही हे दाखवण्यासाठी धादांत खोटं बोलणं, हे सगळे उद्योग म्हणजे केमसे आणि पार्टीच्या डाव्या हातचा मळ होते. माझी त्यात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका होती. स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं. ‘जय त्याच्या जीपमधून उतरतो.’ एन्ट्रीचा सीन शूट होत होता. आधीच डोक्यावरच्या उन्हामुळे सगळे कावले होते. बराच वेळ सेटवर काहीच घडेना. मी सहज कुणाला तरी विचारलं तेव्हा कळलं की ‘रिक्वायरमेंट दिली होती ती आली नाहीये.’ ‘‘काय नाही आलंय?’’ माझ्या भोचकपणाची ही हद्द आहे! ‘‘जीप.’’ उत्तर मिळालं. दुपार्परत ती उगवलीच नाही. दिग्दर्शक संतापानं फणफणला होता. वेळ घालवण्यासाठी पुढचे-मागचे शॉटस् घेऊनही लंचच्या बरंच आधी करायला काहीच काम उरलं नाही. ‘‘आता काहीच नाही करायला, तर निदान गिळून घ्या,’’ असं म्हणत दिग्दर्शकानं ब्रेक केला. मी माझं जेवण संपवून हातावर पाणी घेत असतानाच घामाघुम झालेले केमसे माझ्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसले. ‘‘कसं होतं जेवण सर? काही प्रॉब्लेम नाही ना?’’ केमसेंनी विचारलं. ‘‘अहो केमसे, जीप का नाही आली अजून?’’ माझ्या आवाजातला वैताग लपून राहिला नाही. ‘‘आली सर. कधीच आली. मी स्वत: जाऊन घेऊन आलो.’’ – केमसे. ‘‘अहो, पण आत्ता. सकाळपासून खोळंबलंय सगळं.’’ मी म्हणालो. ‘‘कव्हर अप करू सर. तुमचं सहकार्य असल्यावर काय अशक्य आहे?’’ एवढं करून जेव्हा त्या बहुप्रतीक्षित जीपमधून उतरण्याचा शॉट द्यायला जेव्हा मी सेटवर पोहोचलो तेव्हा दिग्दर्शक स्टेशनवर उतरल्या उतरल्या सामान चोरीला गेलेल्या प्रवाशासारखा चेहरा करून बसला होता. ‘‘काय झालं सर?’’ मी काळजीनं विचारलं. ‘‘जीप..’’ त्यानं समोर बोट दाखवलं. त्याला पुढे काहीच बोलवेना. मी समोर पाहिलं आणि दचकलोच. पोलीस जीप म्हणून जी जीप आली होती ती लाल रंगाची बोलेरो होती. ती काल रात्रीच गावातल्या कुणाच्या तरी लग्नाच्या वरातीत वापरली गेल्याच्या खुणा तिच्या अंगावर स्पष्ट दिसत होत्या. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ‘‘अहो पण..’’ मी दिग्दर्शकाकडे वळलो, पण त्याच्या चेहऱ्यावरचे हताश भाव पाहून माझे शब्द दातांमागेच गोठले. त्याच वेळी ‘‘चला, ब्रेक ओवर! चला चला. आज काम संपवायचंय. कम्मऑन. बकाप!’’ असे हाकारे घालत आणि हातांनी टाळ्या वाजवत केमसे आले. इथे दिग्दर्शकाचा स्फोट झाला. त्यानंतर आसमंतात काही काळ फक्त शिव्यांचा धुरळा उडाला. या सगळ्यात केमसे मात्र वादळाकडे शांतपणे पाहत उभे असलेल्या खलाशासारखे हाताची घडी घालून निश्चल उभे होते. शेवटी दमून दिग्दर्शक शांत झाला. तेव्हा बर्फासारख्या थंड आवाजात केमसे म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणले सर, जीप पाहिजे. पोलीस जीप पाहिजे अशी रिक्वायरमेंट कुठेच दिलेली नाहीये. स्पेशल रिक्वायरमेंट असेल तर तसं सांगायला हवं ना सर? आम्ही म्हटलं लाल रंग उठून दिसेल म्हणून ही आणली.’’ ‘‘अहो, पण केमसे आपण आज पोलीस ऑफिसरच्या एंट्रीचा सीन शूट करतोय ना?’’ दिग्दर्शक आता केविलवाणा झाला होता. ‘‘पोलीसवाला लाल गाडी चालवू शकत नाही असा नियम कुठे आहे? ही त्याची पर्सनल गाडी असू शकते. नाही का सर?’’ टाळी मागायला हात पुढे करतात तसं केमसेंनी माझ्याकडे पाहिलं. ‘‘ऐका ना सर. शेवटी काय आहे? सीन होणं महत्त्वाचं. आधीच सकाळपासून खूप वेळ गेलाय. प्रोडय़ूसरचा पैसा लागलाय. गाडी आणलेली आहे. तुम्ही सीन घेऊन टाका. आपण एकमेकांना सहकार्य नाही केलं तर कसा बनायचा पिक्चर?’’
इन्स्पेक्टर जय पूर्ण पोलीस पोशाखात दाणदाण पावलं टाकत कॉरिडोअरमधून चालत आत येतात.. असा एंट्रीचा सीन त्या दिवशी शूट झाला. ती लाल जीप उपेक्षित वधूप्रमाणे कोपऱ्यातच उभी राहिली.
‘केमसे के कारनामे’ संपलेले नाहीत. पुढल्या आठवडय़ात शेवटचा भाग.
– चिन्मय मांडलेकर
aquarian2279@gmail.com