फेब्रुवारी महिन्यातल्या एका भल्या सकाळी मी आणि माझी पत्नी जयपूरला पोहोचलो. कुणाच्यातरी घरी राहायचं, या कल्पनेनं नेहा थोडी अस्वस्थ होती. ‘‘हॉटेलमध्ये राहिलो असतो ना आपण!’’ जयपूर एअरपोर्टच्या फिरत्या पट्टय़ावरून बॅगा उचलेपर्यंत ती माझा पिच्छा पुरवत होती. मी मात्र बाजीप्रभूंच्या निर्धारानं खिंड रोखून होतो. ही करामत आमच्या दशकभराच्या वैवाहिक आयुष्यात मला एकदा- किंवा फार फार तर दीड वेळाच जमलीय! एरवी हेड ऑफिस हुकूम काढतं व मी प्रमोशनोत्सुक कर्मचाऱ्याच्या हिरीरीनं त्याची अंमलबजावणी करतो.. हेच माझ्या यशाचं गमक!
एअरपोर्टवरून टॅक्सी करून थेट विशालच्या घरी निघालो. त्याचं घर मुख्य शहरापासून किंचित लांब होतं. रो-हाऊसेसची कॉलनी होती. त्या सर्व गुलाबी रंगांच्या बंगल्यांमधून विशालचं घर शोधताना थोडा त्रासच झाला. बरं, पत्ता विचारायला माणूस काय, उंटही रस्त्यावर दिसेना. फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतातलं एकूणच वातावरण अत्यंत विलोभनीय होऊन जातं. ज्याला खरंच ‘गुलाबी’ म्हणावं अशी थंडी पडते. दुलईतून बाहेर पडणं हा जगातला सगळ्यात मोठा गुन्हा वाटू लागतो. त्यामुळे आम्ही सीतेच्या शोधात निघालेल्या राम-लक्ष्मणासारखे वणवण करत असताना आम्हाला मार्ग दाखवणारा जटायू काही भेटेना. विशालला फोन लावत होतो. तो फोन उचलेना. माझा हा मित्र मला घरी यायचं आमंत्रण देऊन विसरून गेला की काय, असा मला प्रश्न पडला. पण फ्लाइटमध्ये बसताना मी त्याला फोन केला होता. तेव्हाही त्याच्या आवाजातला उत्साह टिकून होता. दोन तासांत असं काय घडलं? या सगळ्यात माझी पत्नी- नवऱ्याचा गाढवपणा उघडकीला आल्यानंतर बायका जे एक हाडं गोठवणारं मौन पत्करतात, ते पत्करून शांतपणे खिडकीबाहेर पाहत बसलेली. ही वादळापूर्वीची शांतता अस होत असतानाच मला अचानक एका घराबाहेर एक माणूस जोरजोरात हात हलवताना दिसला. जुन्या चित्रपटातल्या ठाकूर लोकांच्या हातात जशी एक ‘छडी’ असायची तशी एक छडी त्याच्या हातात होती. मी निरखून पाहिलं- तो विशालच होता. हो! विशालच तो! फक्त पासपोर्ट साइज फोटोला ब्लो-अप करून पोस्टकार्ड साइज फोटो केला तर तो जसा दिसेल तसा तो दिसत होता. नऊ वर्षांनी भेटत होतो आम्ही. नऊ वर्षांत माझ्या मित्राची जाडी-रुंदी बऱ्यापैकी वाढली होती. गळाभेट झाली. विशालच्या आईला नमस्कार-चमत्कार झाले. त्याच्या भल्याथोरल्या गोल्डन रिट्रीवर ‘लड्ड’चे लाड झाले. त्यातही विशालच्या घरासमोरचं अंगण पाहून मला किंचित हसू आलं. मला तेरा वर्षांपूर्वीचा मुंबईच्या एका पावसाळी संध्याकाळी अंधेरीच्या मॅकडोनल्डस्मध्ये माझ्यासमोर बसून रडणारा विशाल आठवला. त्यालाही हे जाणवलं असावं. आत नेता नेता मला म्हणाला, ‘‘ये तो बहुत छोटा है. युनिव्हर्सिटी कॅम्पस में जो हमारा घर था, उसके लॉनपर तेरी शादी हो सकती थी.’’
विशालच्या घरात आम्ही स्थिरावलो. नेहाला विशालचं घर, त्याची आई, त्याचं कुत्रं आणि स्वत: विशाल मनापासून आवडल्याचं पाहून मला हुश्श झालं. विशालचा पाय काही दिवसांपूर्वी मुरगळला होता. त्यामुळे चालताना काठीचा आधार लागत होता. आंघोळपांघोळ होईपर्यंत नाश्ता आला. मग ‘एक चाय पीते हैं’चा आग्रह सुरू झाला. मग गप्पा, जुन्या आठवणी. विशीत असताना तुझ्या नवऱ्यानं काय काय माती खाल्ली होती, हे नव्यानं भेटलेल्या वहिनींना सांगण्याचा मित्रांना जो हुरूप येतो त्याला विशाल अपवाद नव्हता. मग माझ्या सगळ्या पराक्रमांची उजळणी झाली. मग ‘एक और चाय’! असं करत करत एक वाजला आणि चहाच्या जवळजवळ पाच राऊंड झाल्या. ‘अब खाना खाकरही उठो..’ असा हुकूम विशालच्या आईनं सोडला. त्यामुळे सकाळी नऊ ते जवळजवळ दोन वाजेपर्यंत आम्ही फक्त खाण्यासाठी व बोलण्यासाठी तोंड हलवत त्या डायनिंग टेबललाच चिकटून होतो.
पण खरं सांगू का? मला अशाच सुट्टय़ा आवडतात. बाहेर गेलं की ड्रिल केल्यासारखं प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत सुटायचं.. आणि तिथे अडाण्यासारखे सेल्फी काढून ते फेसबुकवर अपलोड करून जगाला वात आणायचा- यावर माझी तरी फारशी श्रद्धा नाही. पण हे सगळं सुरू असताना मी विशालकडे बघत होतो. माझा चेहरा त्याच्या विनोदांवर, नकलांवर हसत होता; पण डोकं प्रश्न विचारण्यात आणि त्यांची उत्तरं शोधण्यात गुंतलं होतं. गेली नऊ वर्ष हा माणूस इथे करतोय काय? वडील रिटायर झाल्यावर युनिव्हर्सिटी कॅम्पसमधला बंगला सोडून ही मंडळी जवळजवळ शहराबाहेर या घरात शिफ्ट झाली. घर मोठं होतं, पण आजूबाजूची वस्ती तशी एकाकी होती. शहरापासून लांब होती. जो माणूस मुंबईत रोज नवनवीन निर्मात्यांना भेटत होता, ज्याच्या फोनमध्ये त्यावेळी हृतिक रोशनचा पर्सनल नंबर स्टोअर्ड होता, जो मुंबईच्या गर्दीत रुळला होता, तो गेली नऊ वर्ष इथे स्वत:भोवती शेवाळं साचवत बसला होता! विशालनं जयपूरमध्ये स्वत:चा एक हौशी ग्रुप तयार केला होता. त्या मुलांसाठी तो नाटकंदिग्दर्शित करत होता. पण यात उत्पन्नाचा भाग किती? या नाटकांसाठी लागणारी ग्रॅन्ट मिळवण्यासाठीचं लांगुलचालन त्याच्या स्वभावात नव्हतं. उत्तर भारतात नाटय़कर्म करण्यासाठी दिल्ली दरबारची हांजी हांजी करण्याची एक महत्त्वाची कला अंगी असावी लागते. ती माझ्या या मित्राच्या अंगी होती का? एन. एस. डी.त असताना आम्ही याच ‘सरकारी’ रंगकर्मीकडे तुच्छतेनं पाहत होतो. सरकारी संस्थांनी फेकलेले ग्रँट्सचे, वर्कशॉप्सचे तुकडे तोंडात झेलून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना आम्ही हीन मानत होतो. आज तेच करण्याची वेळ माझ्या या मित्रावर आली आहे का? एका पॉइंटनंतर या प्रश्नांच्या गोंगाटासमोर मला विशालचे विनोद ऐकू येईनासे झाले.
जयपूरपमधले चार दिवस खूपच मजेत गेले. विशालची आणि नेहाची घट्ट मैत्री जमली. मोडक्या पायानंही विशाल आमच्याबरोबर सगळे गड-किल्ले फिरला. लग्नखरेदीला निघालेल्या वधूच्या उत्साहानं आम्हाला जयपूरमधले बाजार हिंडवले. कचोरी- समोशांपासून फालुदा-आईस्क्रीमपर्यंत विविध ‘स्पेशल्स’ खायला घालून आमची पोटं सकाळी नऊच्या विरार फास्ट लोकलसारखी गच्च भरून टाकली.
तिसऱ्या दिवशी मी सकाळी डोळे चोळत खाली उतरलो तेव्हा विशाल बाहेर कुठेतरी जाण्यासाठी तयार दिसला. ‘‘मॅक्स! जरा एक छोटासा काम है. करके आता हूं. आय विल बी बॅक बाय इलेवन. फिर चलेंगे. तब तक तुम लोग तयार हो लो..’’ वाक्य बोलत मंचावरून एक्झिट घेणाऱ्या पात्रासारखा हे बोलतच तो घराबाहेर पडला. अकराच्या आधीच परत आला. त्या दिवशी आम्ही आमेर फोर्ट बघायला गेलो होतो. नेहा तिचे फोटो काढण्यात गुंतली होती. आणि विशाल सारखा कुणाला तरी फोन करण्यात. खरं तर विशाल हा अजिबातच ‘फोन पर्सन’ नाहीये. त्यावेळी त्याच्याकडे स्मार्टफोनही नव्हता. अगदी पुरातन काळातला नोकियाचा फोन- ज्यावर फक्त आणि फक्त फोन आणि एस.एम.एस. येतात किंवा केले जाऊ शकतात. पण आज त्याचं फोनसत्र काही थांबेना. शेवटी दुपारी मी न राहवून त्याला विचारलं,
‘‘एनी प्रॉब्लेम?’’
विशाल काही क्षण दिगंताकडे पाहत राहिला.
‘‘आज सुबह जॉब इंटरव्ह्यू के लिये गया था.’’
‘‘जॉब इंटरव्ह्यू?’’ मी चकित झालो.
‘‘युनिव्हर्सिटी के ड्रामा डिपार्टमेंट में लेक्चरर की पोस्ट खुल रही है.’’
‘‘विशाल, तू सरकारी नौकरी करेगा?’’
‘खानदान की इज्जत’ मिट्टीमध्ये मिळवणाऱ्या मुलीकडे नासिर हुसैन छाप बाप ज्या नजरेनं पाहायचे, त्याच नजरेनं मी विशालकडे पाहत होतो.
‘‘अब और क्या करूं?’’
‘‘बॉम्बे चल. गिव्ह इट वन मोअर शॉट.’’
विशालनं मान हलवली. त्याचवेळी नेहा तिथे आली.
‘‘और भाभीजी.. कॅप्चर कर लिया हमारे राजस्थान का कल्चर?’’ असं म्हणत विशाल उठला.
दिवसभर मी अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो. आज रात्री मला तुकडा पाडणं गरजेचं होतं. मधल्या वेळेत मी नेहाशीही बोललो होतो. तीही हेलावली होती. ‘‘तू त्याच्यासाठी कर ना काहीतरी.’’ तिच्याही स्वरात कळवळा होता.
‘‘अगं, पण तो मुंबईला येईल, तेव्हा ना?’’
‘‘का नाही येत? इथे का गाढून घेतलंय त्यानं स्वत:ला?’’
जेवणानंतर मी त्याला खिंडीत गाठून हा प्रश्न टाकला.
‘‘नहीं आ सकता मैं. मॉम इधर अकेली हैं.’’
‘‘पर यार, शी इज नॉट दॅट ओल्ड. तेरा भाई भी तो दिल्ली में है.’’
‘‘वो वहां जॉब करता है. और मैं अगर बॉम्बे आया तो काम ढुंढने आऊंगा.. फर्क है.’’
विशालच्या वडिलांच्या जाण्यानंतर त्याच्या आईनं स्वत:ला ‘बिचारं’ घोषित करून टाकलं होतं.
‘‘वो मुझे कहती तो है.. तुझे अगर तेरे काम के लिये जाना हो तो तू चला जा. पर मुझे समझ में आता है, दॅट शी डजन्ट वॉन्ट मी टू. मॅक्स, पिछले नौ साल में मैं सिर्फ एक बार जयपूर के बाहर गया हूं.. अपनी भाई की शादी पर.’’
‘‘पर तू उनसे बात कर. टेल हर.. तेरा यहां कोई फ्यूचर नहीं है. आय अॅम शुअर- शी विल अंडरस्टॅन्ड. शी लव्हज् यू सो मच.’’
‘‘दॅट इज द प्रॉब्लेम. शी लव्हज् मी सो मच.. कभी कभी लगता है, भगवान ने एक बुरी माँ दी होती तो उससे लड-झगड के मैं निकल जाता. बट माय मॉम इज दी बेस्ट मॉम इन द वर्ल्ड! आय कान्ट ब्रेक हर हार्ट.’’
जयपूरहून निघताना मी विशालला स्मार्टफोन घ्यायला भाग पाडलं. आज तो अत्यंत निरिच्छेनं का होईना, व्हॉटस्अॅपवर आहे. संपर्कात राहणं थोडं जास्त सोपं झालंय. माझे वडील ज्या दिवशी गेले त्या रात्री आणि त्यानंतर अनेक रात्री विशाल माझ्या सोबत बसून राहत असे. माझ्या अनेक सुख-दु:खांच्या क्षणांचा तो साथीदार आहे. पण त्याच्या या प्रेमळ बंदीवासातून मी त्याला बाहेर काढू शकत नाही याचं मला विलक्षण वाईट वाटतं. जयपूरहून परतीच्या प्रवासात नेहा मला म्हणाली, ‘‘पण त्यांनी हे जयपूरमधलं घर विकलं तर मुंबईत एक वन बी.एच.के. तर सहज घेता येईल त्यांना. मग काय प्रॉब्लेम आहे?’’
‘‘प्रॉब्लेम एवढाच आहे, की त्या तुझ्या वन बी. एच. के.समोर लॉन नसेल..’’ असं बोलून मी डोळ्यावर रुमाल ठेवून झोपी गेलो.
चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com