त्याच्यासारखे अनेक गानलुब्ध तरुण तेव्हा मायामीत निर्वासित आयुष्याचा संघर्ष करीत होते. विली चिरीनोसारखा पुढे नावारूपाला आलेला संगीतकारदेखील त्यांतलाच. त्यानंही पुढे म्हटलंय की, ‘‘आमच्या बेटांवरच्या सुरांमुळेच तेव्हा आम्ही तगलो. आम्ही नक्की कोण आहोत, याचा विसर आम्हाला त्या सुरांमुळेच पडला नाही.’’ स्मरत असावेत या मंडळींना क्युबामधले ते जुने, प्रफुल्लित सूर. जोरात वाजणारं ट्रम्पेट, मधाळ अॅकॉर्डियन, आफ्रिकन तालाचं अनोखं मिश्रण, क्युबामधल्या मूळच्या आदिवासी जमातींचं संगीत.. आणि हे सारं एकजीव झाल्यानं तयार झालेलं खास क्युबन संगीत.
क्युबामधल्या क्रांतीआधी अमेरिकन ‘टुरिस्ट’ हौसेने क्युबात सुट्टीमध्ये यायचे. तिथली मोकळी हवा, रंगेल वातावरण आणि जोरकस गाणं यांचा आस्वाद घ्यायचे. पुढे जॅझमध्ये क्युबाच्या संगीताचा हलका हात दिसू लागला यात काहीच आश्चर्य नव्हतं. सुरांचं स्थलांतर असं सहज होऊ शकतं. पण पुढे १९५९ च्या क्रांतीनंतर क्युबाचा तोंडवळाच बदलला. तिथलं संगीतही. कॅस्ट्रोच्या राजवटीत या चटकदार ठेक्याच्या संगीताला स्थान नव्हतं. खरं तर संगीतालाच फारसं स्थान नव्हतं. पण जसे कैक क्युबन लोक निर्वासित होऊन अमेरिकेत न्यूयॉर्क आणि मायामीमध्ये त्यासुमारास पळून गेले, तसंच तिथलं संगीतही जणू निर्वासित झालं. त्यानं परक्या संस्कृतीमध्ये प्रवेश केला. शेजारच्या पोतरे रिको देशामध्ये खरं तर अशी राजकीय अशांती नव्हती. तिथल्या नागरिकांना अमेरिकेचं दार सदा उघडं होतं. पण १९४० ते ६० च्या दरम्यान तब्बल सहा लाखाहून जास्त पोतरेरिकन लॅटिनो मंडळी न्यूयॉर्क आणि मायामीमध्ये डेरेदाखल झाली. त्यांच्यासोबत त्यांचं संगीतही. आणि त्यानं अमेरिकेच्या संगीतावर आस्ते आस्ते प्रभाव टाकायला सुरुवात केली. हा-हा म्हणता लॅटिन जॅझनं जन्म घेतला. मग ‘साल्सा’नं. आणि मग रिकी मार्टिन, शकिरा, जेनिफर लोपेझ यांच्या रूपानं ‘लॅटिन पॉप’ची एक सणसणीत उंच लाट १९९० च्या आसपास जगभरातल्या संगीतविश्वावर धडकली.
पण जेव्हा एमिलिओ हॉटेलमध्ये लॅटिनो सूर धरून वाद्य वाजवत होता, तेव्हा हे काहीच नव्हतं. तो परका, स्थलांतरित, निर्वासित होता. आणि त्याचं संगीतही अमेरिकन कानांलेखी तसंच होतं. एमिलिओचा मात्र त्याच्या सुरांवर विश्वास होता. आणि हेही त्याला जाणवलं असावं, की त्याच्या बेटावरचं संगीत इथे नव्या देशात रुजवायचं असेल तर त्यामध्ये बदल करायला हवेत. पहिलं म्हणजे त्या गाण्यांची भाषा इंग्रजी हवी. ती स्पॅनिश असून चालणार नाही. दुसरं म्हणजे त्याचा आत्मा लॅटिनो असला तरी त्याचं अस्तर मात्र अमेरिकन डिस्को, रॉक, इ. सुरांचं हवं! अर्थात् इतक्या तार्किकपणे विचार करून कालांतरानं त्यानं संगीतनिर्मिती केली नसावी. संगीतकाराची प्रतिभा ही तार्किकतेच्या कक्षेत मावणारी नसते. पण ‘मायामी साऊंड मशीन’ या नावानं त्यानं जे काही संगीत निर्मिलं, ते मात्र मी म्हटलं तसंच होतं.. वरून अमेरिकन; आतून क्युबा बेटाचं. वरून सहज, उत्फुल्ल, ढंगदार. पण आतून हळवं, जखमी, धारदार! आणि ग्लोरिया नावाची गायिकाही सुदैवानं एमिलिओला भेटली. वरून इंग्रजीत- अस्खलित इंग्रजीत गाणारी आणि आतून स्पॅनिश गुणगुणणारी! ‘कोंगा’ या ड्रम्सचा ठेका धरून ग्लोरिया गाऊ लागली..
kIt’s the rhythm of the island…l
‘हा तर बेटांवरचा जुना-जाणता ठेका
चला, पावलं हलवा, शरीर वाकवा
चला, नाचा, गा, कोंगाच्या तालावर झुला!’
आणि मग तुफानी दौरे सुरू झाले. आणि पुरी अमेरिका कोंगाच्या तालावर नाचू लागली! तिथल्या लॅटिनो स्थलांतरितांना तर ते संगीत रुचलंच; पण अमेरिकन मंडळींनाही त्या तालानं भुरळ घातली. यथावकाश ग्लोरिया एमिलिओची सहधर्मचारिणी झाली. पण मला वाटतं, या लग्नाआधीही ते एकच नवसंगीताचा धर्म आचरीत होते. त्यांच्या गाण्यात रॉक होतं, ‘फंक्’ होतं, थोडंसं ‘ब्ल्यूज’ होतं. आणि या अमेरिकन धाग्यांमुळे त्यांचं स्थलांतरित झालेलं मूळचं बेटावरचं गाणं अमेरिकेच्या रसिकांना तितकंसं परकं भासलं नव्हतं. जगभर त्यांचे दौरे होऊ लागले. हॉलंडमध्ये पहिल्यांदा गाताना ग्लोरियाच्या छातीत धडकी भरली होती. आपले बेटांवरचे सूर इथे रुचतील का, अशी तिला शंका येणं साहजिकच होतं. पण त्या सुरांनी तिथेही रसिकांना जिंकलं. आणि पुढे पार जपानमध्येही ते सूर नमले नाहीत. मी ग्लोरियाचा तो व्हिडीओ पाहतो आहे. कुठे जपान, कुठे ही बेटं! पण सच्चे सूर हे सर्वदूर पसरतात आणि तालाचं बंधन हे सीमेच्या बंधनांना जुमानत नाही!
एमिलिओ पुढे निर्माता झाला. लॅटिन गायकांची पुढची पिढीच्या पिढी त्यानं घडवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिकी मार्टिनपासून सारे लॅटिनो गायक त्याच्या मांडवाखालून गेलेले आहेत. ग्लोरिया आणि एमिलिओचं संगीत आज ऐकताना त्याच्या मर्यादा जाणवतात : ते संकरित गाणं आज ऐकताना कच्चं वाटतं. पण तेव्हा ते तसं वाटलं नाही, हे एक.. आणि दुसरं म्हणजे त्यानं या तऱ्हेच्या स्थलांतरित संगीताचा राजमार्ग आखून दिला, हीच केवढी मोठी गोष्ट आहे! त्या गाण्याचे पडसाद कुठवर उमटावेत? ‘त्रिदेव’ चित्रपटामधलं ते ‘ओये.. ओये’ गाणं आठवतंय? त्यातलं ते ‘ओये.. ओये’ हे मूळचं ग्लोरियाचं! (त्या हिंदी गाण्यात तेवढंच बरं होतं!)
मी एम. ए.- इंग्रजी करत असताना स्थलांतरित साहित्याविषयी बोलताना आमच्या मुक्तजा मठकरी मॅडम त्यांच्या नेटक्या, सुस्पष्ट वाणीत म्हणाल्या होत्या, ‘‘निर्वासित पात्रानं किती का नव्या भूमीत ‘अॅसिमिलेट’ केलं, तरी पुष्कळदा त्याचा गाभा आहे तसाच राहतो. आपण तो शोधायचा असतो.’’ ग्लोरिया आणि एमिलिओचं गाणं वरून अमेरिकन होतं, उडतं होतं, नाचणारं, खिदळणारं होतं. पण मला तिचं ‘‘ट्र ळ्री११ं ’’ (मातृभूमी) हे गाणं सर्वाधिक आवडतं. ती पॉप गाणारी चतुर लॅटिनो मुलगी मग अंतर्धान पावते.. आणि समोर उभी राहते ती केवळ तडफड, केवळ आर्तता.
शिकण्यासारखी गोष्ट
लहान मूल विश्वासानं आईच्या हातात बोट सारून झोपून जातं तसं कित्येक नागरिक आपापल्या देशात निर्धास्तपणे रात्री निजतात. पण साऱ्यांच्याच नशिबात असं भाग्य नसतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लयपश्चिमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emilio estefan