असं म्हणतात की, प्रत्येक शहरात एक गाव लपलेले असते. काही गावे काळानुसार इतकी महत्त्वाची होतात की, त्यांचे विशाल शहरांत रूपांतर होते. लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस ही केवळ शहरे नसून त्या-त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि परिणामी, जगाच्या अर्थ आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी महत्त्वाचा ठसा उमटवला आहे. या शहरांचे जागतिक पातळीवर असामान्य महत्त्व असूनही येथील लोकांची सामाजिक बांधीलकी आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात नष्ट झालेली नाही. उदाहरणार्थ, गेल्या महिन्यात पॅरिसमध्ये चार्ली हेब्डो या साप्ताहिकावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शेकडो लोकांनी उत्स्फूर्तपणे लंडनमध्ये ठिकठिकाणी जमा होऊन, मेणबत्त्या पेटवून, पेन्सिल हाती धरून आपले ‘मत’ प्रकट केले. सर्वसाधारणपणे इंग्लिश माणूस समाजात फारसा गुंतून जात नाही. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, त्याला समाज आवडत नाही. अगदीच साध्या शब्दांत सांगायचे तर त्याच्या अमेरिकन बंधूप्रमाणे इंग्लिश माणूस स्वत:हून ‘हाय’ असे म्हणून आपली ओळख करून घेत गप्पा मारणार नाही. किंबहुना, आपली ओळख करून न देताच एक-दोन शब्द बोलून तो निघून जाईल.
समाजाची आणि सामाजिक बांधीलकीची आवड आणि जपणूक करण्याच्या हेतूपायी इथे पब, कॅफे आणि बागबगिचे यांना पुरेपूर प्रोत्साहन दिले जाते. पब हे केवळ ड्रिंक्स पिण्याचे ठिकाण नसून इथे लोक दिवसाचा शिणवटा दूर करण्यासाठी,थोडय़ाशा गप्पागोष्टी करण्यासाठी आपल्या मित्रांबरोबर जमतात. ‘पब क्विझ’ तर फार लोकप्रिय असते. प्रत्येक ‘पब क्विझ’ची खासियत असते. गेली तीन-चार वर्षे दर गुरुवारी कॅमडेन रोडवरील ‘ओल्ड ईगल’ या पबमध्ये आम्ही ऑफिसमधले काहीजण जात आहोत. माझा कार्यालयीन सहकारी निक आणि मायकेल, यांच्याव्यतिरिक्त नायजेल, टॉम, तर कधी कधी जॉर्जसुद्धा आमच्या टीममध्ये सामील होतो. कधी गुगली, तर कधी गमतीशीर प्रश्न विचारून जेम्स क्विझमास्टर पब क्विझमध्ये रंगत आणतो. या पबच्या भिंतीवर अनेक चित्रे टांगलेली आहेत. जवळपासच्या कलाकारांनी चितारलेली ही चित्रे इथे विकायला ठेवली आहेत. सर्वानाच आपली चित्रे महागडय़ा गॅलरीत प्रदशिर्त करता येत नाहीत. या पबद्वारे अशा नवोदित कलाकारांना संधी दिली जाते. कधी कधी या पबमध्ये स्थानिक कलाकारांना वाव देण्यासाठी संगीताचा (जाझ्, रॉक, पॉप इत्यादी) कार्यक्रमही आयोजित केला जातो. बिटल्ससारखे जगप्रसिद्ध संगीतकार या प्रकारच्या स्थानिक ‘पब-प्रदर्शनातून’च पुढे आले आहेत.
वाइन टेस्टिंग, काव्यवाचन, कथावाचन, वादचर्चा अशा अनेक कार्यक्रमांद्वारे हे पब रसिकांना आकर्षित करतात. मध्यंतरी आर्थिक मंदीच्या काळात इंग्लंडमधील या ‘ऐतिहासिक’ वास्तूचे अस्तित्व धोक्यात आले होते. नवनवी रेस्टॉरंट्स, नवनवे खाद्यपदार्थ आणि पेय यांमुळे लोकांनी या पबमध्ये जाणे थोडे कमी केले होते.
पण सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या या जुन्या वास्तूचे जतन करण्यासाठी मदतीला आली ती आणखी एक असामान्य गोष्ट. ती म्हणजे आठवडी बाजार. आठवडी बाजार म्हटला की गावचा- खेडेगावचा बाजार आठवतो. पण लंडनसारख्या विश्वव्यापी शहरात ठिकठिकाणी अजूनही आठवडी बाजार भरतात. काही ठिकाणी तर भल्यामोठय़ा सुपरमार्केटच्या बाहेरच हे भाजीवाले आपले बस्तान मांडतात. या आठवडी बाजाराचे महत्त्व लक्षात घेऊनच माझ्या जवळच्या पबने दर शनिवारी आठवडी बाजाराचा बेत आखला. जेणेकरून लोक भाजीपाला खरेदी करतील आणि नंतर त्यांच्या पबमध्ये चायपाणीसुद्धा!
लंडनमध्ये बॉरोमार्केट, सदर्क मार्केट, साऊथबँक, नॉटिंगहिल, कॅमडेन, हायगेट, हॅमस्टेड, ग्रिनिच आणि इसलिंग्टन या ठिकाणच्या बाजारपेठा तर जगप्रसिद्ध आहेत. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी स्थानिक बाजारपेठसुद्धा आयोजित केली जाते. उदाहरणार्थ फ्रुम-फॉम्र्युला वनचा चॅम्पियन जेनसन बटन याच्या जन्मगावी आयोजित करण्यात येणाऱ्या आठवडी बाजाराला कधी कधी येथील राजघराण्यातील व्यक्तींचीसुद्धा उपस्थिती असते. या आठवडी बाजारात स्थानिक उत्पादनांना फार उत्तेजन दिले जाते. या बाजारात अत्यावश्यक असणारी दुकाने म्हणजे चीज विक्रेता, खाटीक आणि ब्रेड! या जोडीला भाजीपाला आणि फळे विकणारी दुकानेही असतात. काही वेळेस स्थानिक कलाकुसरीची, विणकामाची आणि कपडय़ांची दुकानेसुद्धा असतात. बाथसारख्या ऐतिहासिक शहरांमध्ये लोक जुन्या मौल्यवान वस्तूसुद्धा अशा बाजारात विक्रीसाठी ठेवतात. अर्थात हे आठवडी बाजार आयकिया, टेस्को आणि मार्क्स अॅण्ड स्पेन्सर यांसारख्या डिपार्टमेंटल स्टोअर्सशी स्पर्धा करू शकणार नाहीत. किंबहुना, या सुपरमार्केटशी स्पर्धा करण्याचा त्यांचा हेतूही नसतो. फळे, दूध, भाज्या, मटण यासारख्या ताज्या गोष्टींची उपलब्धता या खुल्या बाजारामध्ये केली जाते. त्याचबरोबर स्थानिक व्यावसायिकांना उत्तेजनही मिळते. लोकांनी स्थानिक उत्पादकांना आपलेसे करावे म्हणून फ्रुमसारख्या ठिकाणी स्थानिक चलन वापरात आणले आहे. ‘ग्लोकल’ अर्थव्यवस्था ही केवळ व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात नसून इंग्लंडच्या बऱ्याचशा शहरांत अवलंबिली जात आहे. आधुनिकतेच्या वाटेवर चालताना सर्वानाच बरोबर घेऊन जायचे, हा विचार या आठवडी बाजारांतून अधोरेखित केला जातो.
प्रशांत सावंत, लंडन – wizprashant@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा