‘या सत्तेत जीव रमत नाही,’ असं म्हणणारा नामदेव ढसाळ नुकताच गेला! अनेक दलित कवी, लेखक, विचारवंत, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांशी माझी ओळख, मैत्री, संबंध आहेत; पण नामदेवशी माझं कधी फारसं जमलं नाही. महाराष्ट्र शासनात अगदी सुरुवातीला मी गृहराज्यमंत्री होतो, तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. कदाचित ‘ओळखून’ होतो. त्यामुळे मी त्याच्या वाटेला गेलो नाही, आणि तोही माझ्या नादी लागला नाही. परवा तो गेल्यावर मृत्युलेखांतून त्याच्या पुस्तकांची नावं वाचली. त्यातल्या ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या नावाने मला धरून ठेवलं आणि यासंबंधानं विचार करताना माझ्या लक्षात जी गोष्ट आली, ती ही की, त्याच्या एकदम उलट आपली परिस्थिती आहे. आपला या ‘सत्तेशिवाय’ जीव रमत नाही!
सांगायचंच झालं तर अगदी तरुण वयात राजकारणात आलो तिथपर्यंत मागे जाऊन पाहिलं तर चित्र असं दिसतं- आई लोकल बोर्डात निवडून गेलेली.. सगळं घर शेतकरी कामगार पक्षाचं.. पण मी काँग्रेसची निवड केली. शेकापची विचारधारा विचारांची मशागत करेल, पण सत्तेचं बियाणं काँग्रेसमध्येच मिळू शकतं, हा माझा अंदाज बरोबर ठरला. आणि आमदारापासून आज केंद्रीय कृषिमंत्र्यापर्यंतचा प्रवास व्हाया महाराष्ट्राचा मुख्यमंत्री- हा ‘सत्तेचाच’ प्रवास ठरला. जी काय पाच-सात र्वष विरोधात काढली, तेव्हाही ‘विरोधी पक्षनेता’ या पदाने कॅबिनेट दर्जाच मिळाला. एकही निवडणूक हरलो नाही. दोन मतदारसंघ, सुरक्षित मतदारसंघ या भानगडींतून जावं लागलं नाही. कुठल्याही गोष्टीतली रिस्क, थ्रिल संपलं की मला त्यात रस राहत नाही. म्हणून यंदा राज्यसभेत जातोय. निवृत्ती नाही; कारण सत्तेशिवाय जीव रमत नाही.
‘साहेब राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत,’ असं म्हणून गोपीनाथ, उद्धव, राज, आणखी कुणी काहीबाही बोलत असतात. अशांना उत्तर काय द्यावं, यापेक्षा का द्यावं, असा प्रश्न पडतो. त्यांची वयं जेवढी, तेवढी र्वष माझी सत्तेच्या राजकारणात.. ‘सत्तेत’ गेलीत. बाळासाहेब, मृणालताई, एसेम, प्रधानमास्तर, काळदाते होते तेव्हा प्रकरण बरोबरीचं वाटायचं. आता आमचे एनडी, पानसरे असे दोघं-तिघं सोडले तर कोण आहेत? बरं, मी काय नातवात रमणारा आजोबा नाही. त्यामुळे नाही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात स्पर्धक नाही, हे चित्र फारसं बरं नाही. त्यामुळे हल्ली दिल्लीच बरी वाटते. तिथे निदान सीनियर सिटिझन क्लब तरी आहे. पण तिथेही लोक बिचकून असतात! ‘हे साहेब ‘अनप्रेडिक्टेबल’ आहेत,’ असं कुणी जाहीर, कुणी खासगीत बोलत असतात. त्यात तो प्रसिद्ध ‘खंजीर’पण आहेच! पण सुरुवातीपासून मी पथ्य पाळलंय.. कमी बोलायचं, नेमकं बोलायचं, नि शक्यतो त्याच्या उलटच करायचं. आपली दिशा, रोख, अंदाज येऊ द्यायचा नाही. पुण्यात आयुष्य गेल्याने ‘कात्रजचा घाट’ प्रकार बरा वाटत आलेला आहे. २४ तास डोक्यात असणारं सत्तेचं राजकारण दाढेतल्या चिमूटभर तंबाखूच्या बारपेक्षा जास्त ‘किक्’ देतं!
अलीकडे आमच्या मित्रपक्षाचा तरुण नेता म्हणाला की, ‘आई म्हणाली- सत्ता हे विष आहे.’ हे म्हणजे छान टबमध्ये रोज डुंबणाऱ्याने ‘पाण्यात बुडून मृत्यू होऊ शकतो,’ असं म्हणण्यासारखं झालं. सत्ता हे विष आहे, तर यांच्या कुटुंबाने आयुष्यभर पिढय़ान् पिढय़ा पाण्यासारखं तेच प्यायलंय. मला अशा बोलण्याचा ना राग येत, ना खेद, ना खंत, ना आश्चर्य. असेच काही लोक ‘मला यात राजकारण करायचे नाही,’ असं म्हणतात, त्यांचंही हसू येतं. विचारावंसं वाटतं, तुमची दुसरी काही पात्रता आहे का? उभी हयात ज्यात घालवली, घालवतोय, तिथेच ‘मी राजकारण करत नाही’ म्हणायचं? कधी कधी मला वाटतं, शिक्षणात ‘राज्यशास्त्र’ विषय असतो; पण ‘राजकारण’ हा विषय कार्यानुभव पातळीवर नसतो. त्यामुळे राजकारणाकडे मध्यमवर्गीय तुच्छतेने, ‘एलिट क्लास’च्या संधिसाधूपणाने किंवा गरीबांच्या लाचार, दबाव, दहशतीच्या भीतीच्या नजरेनंच पाहिलं जातं; बुद्धिबळ म्हणून पाहिलं जात नाही. राजकारण म्हणजे सत्ता, पैसा- एवढंच नाही. त्याच्याही पलीकडे खूप काही असतं. एक मोठा मेंदू आणि एक लहान मेंदू या सर्वाकडेच असणाऱ्या आयुधांसह ही बसल्या जागी खेळायची गोष्ट असते. ग्रॅण्डमास्टर पाणी भरतील अशा चाली खेळाव्या लागतात, प्यादी हलवावी लागतात. १२० कोटींच्या देशात, १२ कोटींच्या राज्यात २४ तास या खेळात राहणं म्हणजे बाहेरून ‘कोमात’ असल्याचं दाखवत, आतमधून पेशीपेशीवर लक्ष ठेवण्यासारखं असतं!
म्हणूनच मी रमतो या सत्तेच्या खेळात. आणि म्हणूनच मी कार्यरत आहे, चर्चेत आहे. इथली जमीन एस्केलेटरसारखी वर नेत असतानाच पायाखालून सरकत असते. त्यामुळे तरुण असताना ज्येष्ठांना आपण त्यांचा ‘ब्लू आय बॉय’ वाटला पाहिजे आणि आपण ज्येष्ठ झाल्यावर तरुण नेत्यांना आपला थांग न लागता धाक वाटला पाहिजे; नाही तर मग आपला अडवाणी किंवा मनोहरपंत होतो. गांधी घराण्याकडून हे घेण्यासारखं आहे. कुणाच्या हाताखाली काम न करता आपल्या हाताखाली सगळं ठेवावं. विशेषत: जेव्हा अपात्र, अल्पवयीन अथवा निव्वळ ज्येष्ठ यांच्या हाताखाली काम करावं लागतं तेव्हा! निर्दयता-सहजता, स्वार्थ-परमार्थ, निष्ठा-बंडखोरी अशा परस्परविरोधी शक्ती एकाच शरीरात सांभाळाव्या लागतात. नाही तर आदल्या रात्री दादांना ‘मी तुमच्याच सोबत..’ असं सहजतेने सांगत दुसऱ्या दिवशी निर्दयतेने त्यांचं सरकार अल्पमतात आणता आलं असतं का? पक्षाची निष्ठा गुंडाळून बंडखोरी केल्यानेच मुख्यमंत्रीपद मिळालं. याला खंजीर खुपसणे म्हणणे म्हणजे खेळाचे नियम माहीत नसलेल्यांनी त्यावर मत देण्यासारखंच! हीच गोष्ट ‘विदेशीपणाचा’ मुद्दा काढून, निलंबित होऊन वेगळा पक्ष काढण्याची आणि निवडणुकीनंतर त्यांच्याच सोबत सरकार स्थापण्याची! आत्म्यासारखा राजकारणात ‘मुद्दा’ अमर नसतो! राज आणि उद्धवला हे कळलं असतं तर भाजपशिवाय ते महाराष्ट्रावर राज्य करू शकले असते. वेगवेगळे लढूनही! पण सत्ताधाऱ्यांना शिव्या दिल्यावर वाजणाऱ्या टाळ्यांची नशा काहींना बीयरही चढते तशी चढते! कळ्यांची फुले होतात, तशी टाळ्यांची मतं होत नाहीत, हे कळायला राजकारण कळायला लागतं.
या राजकारणामुळेच माझ्याविषयीच्या कथा, दंतकथा प्रचलित आहेत. माझ्या संपत्तीच्या आकडय़ांवर पैजा लागतात. कुठल्याही मालमत्तेकडे बोट दाखवून ‘हे साहेबांचं!’ असं कुणीही बिनदिक्कत सांगतो आणि समोरचाही विश्वास ठेवतो. मी या सगळ्याचा अर्थ एवढाच घेतो, की लोक आपल्याला ‘केपेबल’ समजतात, आणि हाच समज आपल्याला सत्तेत राहण्याच्या कामी येतो!
आता काहीजण म्हणतात, की मीच हायकमांडला पटवून दिलं- विदेशीपणाचा मुद्दा मी काढतो, तुम्ही निलंबित करा, मी नवीन पार्टी काढतो. दोघांनी स्वतंत्र लढू. एकत्रित काँग्रेसला जर ८०-९० जागा मिळणार असतील, तर दोन पक्षांना मिळून १२०-१४० मिळतील! एकाच रस्त्यावर नाही का एकच मालक दोन झेरॉक्सची दुकानं टाकतो. लोक दोघं वेगळे आहेत हे समजून ‘हा फार माजलाय, तिकडे काढू!’ असं म्हणून दोन्हीकडे जाऊन एका दुकानात झाला नसता, त्याच्या दुप्पट धंदा देतात! राजकारण म्हणजे नुस्त्या सभा, मेळावे, जबरदस्त वक्तृत्व एवढंच नव्हे. अजिबात संवादकौशल्य नसलेलं काँग्रेस नेतृत्व ४० वर्षांहून जास्त काळ सत्तेत राहिलं. तर जबरदस्त मोहिनी पाडणारे वक्तृत्व असलेले वाजपेयी फक्त पाच वर्षेच सत्तेत राहिले. तीच गोष्ट बाळासाहेबांची! उक्तीपेक्षा छोटीशी कृती नि त्याची योग्य जागी वाच्यता याला फार महत्त्व असते. आता उदाहरणार्थ, मोदींची भेट! किती छोटी गोष्ट! वाक्य पण किती छोटे- ‘साहेब मोदींना भेटले!’ पण गदारोळ केवढा! आणि परिणाम..?
लगेच राजू शेट्टी हडबडला. मुंडेंना आता बोलायचं कुणावर, हा प्रश्न पडला आणि दिल्लीत असून दिल्ली आपल्याला खलबतखान्यापासून लांब ठेवते, हा संशय. म्हणजे भाजपात अंतर्गत संशय. सेनेत नीलम गोऱ्हेसारख्यांना पुन्हा यांच्यासोबत काम करावं लागलं, तर हे उद्धवजींना नेमकं काय सांगतील, म्हणून त्यांच्या पोटात गोळा. तर रामदासला मान खाली घालून बसायचं, की पटकन् शेजारी येऊन बसायचं, हा प्रश्न पडणार.
पक्षात वेगळीच गंमत! भुजबळ, नाईक, परांजपे यांना ‘पुन्हा तिकडेच?’ असं वाटणार. तर जितेंद्र आव्हाडला ‘डावखरे परवडले, या प्रतापला कसा सोसायचा?’ याचा दहिकाला डोक्यात खेळवावा लागणार. शिवाय, मोदींना महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्यापेक्षा ‘आदर्श’ घोटाळ्यावर बोलावे लागेल. दिल्लीत काँग्रेस हायकमांड प्लँचेटकडे जसे लोक रोखून बघतात तसे या खेळीकडे रोखून बघणार. आणि भाजप पुन्हा यांच्याशीच युती करणार म्हणून सच्छिल मतदार भांबावणार. ढोल, ताशे, नगारे, शंभर फुटी व्यासपीठ, फटाके यापेक्षा हा लवंगी बार आरडीएक्सचं काम करून गेला! या सगळ्यावर माझी सहजता.. ‘भेटलो तर गैर काय?’ तर मोदी चिडीचूप्प! त्यांनाही जरा राजकारण कळणं जरुरी आहे!
हे असे खेळ सत्तेच्या राजकारणात बसल्या जागी खेळता येतात, म्हणून सत्तेशिवाय माझा जीव कुठे रमत नाही. ते क्रिकेट वगैरे जाता जाता पाडापाडी करायचे खेळ.
लोक चक्रावले की मला बरं वाटतं. आता त्या भास्करच्या मुलाच्या लग्नाचा थाटमाट पाहून माझी झोप उडाली म्हणालो. भास्करसकट सगळे खजील झाले. त्याचं मंत्रिपद काढून घेतलं. लोकांना वेगळं वाटलं. पण मी त्याला प्रदेशाध्यक्ष केला. कारण आता निवडणुकांसाठी निधी लागणार. आणि मुलाच्या लग्नात नेत्रदीपक कामगिरी करणारा पक्षासाठी नक्कीच अधिक करणार. अल्पावधीतल्या त्याच्या प्रगतीने माझी झोप उडवून लख्ख दाखवून दिलं- अरे, असा हिरा आपल्याकडे आहे! तो निधी जमवणार; मग कारभार कोण बघणार? म्हणून जितेंद्र कार्याध्यक्ष! हे तराजूपेक्षा भयंकर काम असते. पण त्यातच खरी गंमत असते. तीच गोष्ट लवासाची! तिथलं रान उठवलं म्हणून पर्यावरणवाद्यांनी रान उठवलं. मग नोटिसा, स्टे, यॅवं नि त्याव. पत्रकारांनी अंगावर येऊन विचारलं. मी शांतपणे म्हटलं, नियमानुसार नसेल ते पाडा, दंड घ्या, नियमित करा. सगळंच का थांबवताय? तरीही ते आदिवासी, छोटा भूधारक वगैरे करत आंदोलने करत राहिले. मग मी लक्ष्मण मानेला म्हटलं, आपण काही गैर करतोय? तो ‘हो’ म्हणणं शक्य नव्हतं. मग त्याला म्हटलं, त्या मेधाची लोकं येणार, त्यांना सामोरं जाऊन सांग. गेला तो! समाजवादी चळवळीत कधीकाळी एकत्र काम केलेली माणसंच एकमेकांना नीट समजावून सांगणार. आता आमच्या त्या अजित गुलाबचंदसोबत काम करून आपला तो जुना समाजवादी निळू दामले छान टी-शर्ट नि वूडलँडचं जाकीट घालून ‘संपत्तीनिर्माण हे पाप नाही..’ हे किती छान सांगतो, बोलतो. पुस्तकही लिहिलंय त्याने. आणि प्रख्यात ‘मौजे’नं ती सत्यकथा छापलीय. साहित्य, समाज, नाटक यांच्याशी संबंध ठेवण्याचा हा फायदा असतो.
या कलावंत, साहित्यिक मंडळींचं एक बरं असतं. कधीतरी रेस्ट हाऊसवर यांना बोलावलं आणि नुस्तं म्हटलं की, ‘नवीन काय लिहिलंय?’ की संग्रह भेट मिळतो. तिथेच कवीसंमेलन होतं. सकाळी मी आपल्या कामात गढून जातो. पुढे ते २०-३० वर्षे ‘त्या दिवशी रेस्ट हाऊसवर साहेबांनी मला ती कविता खास ऐकवायला लावली,’ असं आवर्जून सांगत राहतात. लोकांना अशा छोटय़ा गोष्टीतही किती आनंद, अभिमान असतो!
खरं तर सत्तेत राहायला किती छोटय़ा छोटय़ा गोष्टी कराव्या लागतात. एखादं जिगसॉ पझल लावत बसावं तसं. म्हणून तर माझा जीव इथेच रमतो. बिचारा नामदेव! पण त्याच्या निमित्ताने वेळ बरा गेला आठवणींत!
शेवटची सरळ रेघ : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पूर्वी ‘चहा’ विकत, म्हणून भाजप आता ‘चहा क्लब’ काढून विनामूल्य चहा चर्चकांना पाजणार आहे भारतभर. यावर एखादा पुणेरी ‘दक्ष’ भाजपवाला हळूच कुणालातरी म्हणाला असणार- ‘बरं झालं, नरेंद्रभाई पूर्वी ‘खाणावळ’ चालवत नव्हते!’
चित्र – संजय पवार

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Navneet Ranas controversial statement says people who are bothered by Jai Shri Ram send them to Pakistan
अमरावती : ज्‍यांना ‘जय श्रीराम’ नाऱ्याचा त्रास होतो, त्‍यांना पाकिस्‍तानात रवाना करा; नवनीत राणा यांचे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
Story img Loader