प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
एका चित्रकाराने केवळ जाहिरातीपोटी एखादे नियतकालिक सुरू करणे व पुढे त्याला वाङ्मयीन दर्जा देऊन त्याचे एक अभिरुचीपूर्ण नियतकालिकात रूपांतर होणे हा मराठी साहित्यसृष्टीतील एक चमत्कारच मानला पाहिजे. हे मासिक होते ‘किर्लोस्कर’ व त्याचे संपादक होते शंकरराव वासुदेव किर्लोस्कर तथा महाराष्ट्राचे लाडके चित्रकार ‘शं. वा. कि.’!
‘किर्लोस्कर’चे आद्य प्रवर्तक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे बेळगाव जिल्ह्यातील गुर्लहोसूरचे. लहानपणापासून त्यांना दोन गोष्टींची आवड होती.. पेंटिंग्ज करणे व निरनिराळ्या वस्तू निर्माण करणे. त्यांना दोन वडीलबंधू- वासुदेवराव व रामूअण्णा. रामूअण्णांच्या पाठिंब्याने लक्ष्मणरावांनी पेंटिंग शिकण्यासाठी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १८८५ साली प्रवेश घेतला. मात्र रंगअंधत्वामुळे त्यांना पेंटिंग सोडावे लागले. पण त्यांनी तेथूनच मेकॅनिकल ड्रॉइंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला व ते व्ही. जे. टी. आय.मध्ये असिस्टंट टीचर म्हणून लागले. त्यांनी आपले वडीलबंधू रामूअण्णा यांच्यासोबत सायकलची डिलरशिप सुरू केली. मुंबईहून सायकली विकत घेऊन त्या बेळगावी विक्रीसाठी ते पाठवत. या सायकली ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ या नावाखाली विकल्या जाऊ लागल्या. ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ या उद्योगाची ही मुहूर्तमेढ! आजच्या विशाल अशा किर्लोस्कर समूहाचा तो उगम होता.
लक्ष्मणरावांचे दुसरे वडीलबंधू वासुदेवराव हे सोलापुरातील पहिले डॉक्टर. पण ते केवळ डॉक्टरी करीत नसत. ते समाजसेवक आणि लेखकही होते. अनेक मासिके व वृत्तपत्रांतून त्यांचे लेख प्रसिद्ध होत. शिवाय त्यांना मशीन व यंत्रकलेची अफाट आवड होती. त्यांनी सोलापूरला ‘मेसर्स शिवाजी वर्क्स’ हा कारखानाही सुरू केला होता. अशा वासुदेवरावांच्या पोटी ८ ऑक्टोबर १८९१ साली शंकररावांचा जन्म झाला. पुढे मुंबईतील प्लेगमुळे लक्ष्मणरावांनी मुंबई सोडली व ते बेळगावी आले. शंकरही तिथे माध्यमिक शाळेत जाऊ लागला. लहानपणापासूनच शंकरचा ओढा चित्रकलेकडे होता. १९१० साली बेळगावच्या म्युनिसिपालटीने किर्लोस्करांना कारखान्याची जागा खाली करण्याची नोटीस दिली. लक्ष्मणरावांपुढे मोठी समस्याच उभी राहिली. अशावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते औंधचे महाराज. त्यांनी औंधबाहेरील कुंडल येथे सुमारे ३२ एकरांची जागा त्यांना कारखान्यासाठी दिलीच; शिवाय दहा हजार रुपये कर्जाऊ देऊन तेथे किर्लोस्कर कारखाना उभारण्यास मदत केली. त्यावेळी किर्लोस्करांची लोखंडी नांगर, कडबा कापण्याचे यंत्र अशी शेतीउपयुक्त उत्पादने सुरू होती. पुढे याच कुंडल गावाचे नाव किर्लोस्करांच्या कारखान्यामुळे ‘किर्लोस्करवाडी’ असे झाले. येथील कुंडल रोड रेल्वे स्टेशनही याच नावाने ओळखले जाऊ लागले.
किर्लोस्कर कंपनीच्या कडबा कापण्याच्या यंत्राची जाहिरात बनवण्याचे काम शंकररावांना देण्यात आले. दोन बैलांचे संभाषण, त्यामध्ये एक बैल आपणास या यंत्राने कापलेला कडबा किती स्वच्छ असतो, हे दुसऱ्या बैलाला सांगताना त्या जाहिरातीत दाखवले होते. या जाहिरातीचे बक्षीस म्हणून शंकररावांना एक बॉक्स कॅमेरा मिळाला आणि मग शंकररावांनी छायाचित्रणाचे धडेही गिरवण्यास प्रारंभ केला. १९०९ साली शंकररावांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. पण अभ्यासापेक्षा त्यांना चित्रांचीच आवड जास्त होती. स्मरणशक्तीही इतकी तल्लख, की एखादा देखावा पाहिला की त्यांच्या मेंदूवर तो कायमचा ठसून बसे व तो ते चित्रित करीत. पुढे हैदराबाद येथे गेल्यावर त्यांची चित्रकार पंडित सोनबा (श्रीपाद दामोदर) सातवळेकर यांचे समकालीन चित्रकार रामकृष्ण वामन देऊसकर यांच्याशी गाठ पडली. देऊसकर हे इटली व फ्रांसमधून चित्रकलेचे शिक्षण घेऊन आले होते. ते जातिवंत चित्रकार होते. ऑइल पेंटमध्ये पेंटिंग्ज करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी शंकररावांची चित्रकलेची आवड जाणून त्यांना इटलीला जाऊन चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. शंकररावांनी आपल्या वडिलांना पत्ररूपाने आपली इच्छा कळवली. त्या शांत वृत्तीच्या विचारी पित्याने मुलाला सल्ला दिला की, कलेपासून जो खराखुरा आनंद मिळवायचा तो कलेची सेवा करणाऱ्यालाच मिळतो. मात्र, सुरुवातीलाच इटलीचा विचार करू नकोस. आधी हिंदूस्थानात शिक्षण घे, मग पुढे इटलीचे पाहता येईल. त्यावेळी पंडित सातवळेकरांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. ‘किर्लोस्कर’साठी ते चित्रे काढीत असत. ती घेऊन ते आले की शंकरराव त्यांच्याबरोबर असत. मग निरनिराळ्या ठिकाणी सातवळेकरांचे निसर्गदृश्ये काढणे सुरू असे. एकदा त्यांनी मुंबईला नेऊन त्यांना जे. जे. स्कूलही दाखवले होते. त्यावेळी त्यांचे काका लक्ष्मणराव हे व्ही. जे. टी. आय.मध्ये विभागप्रमुख होते.
पुढे शंकररावांना वासुदेवरावांनी लाहोरला पंडित सातवळेकरांकडे शिक्षण घेण्यास पाठवले. तेथे त्यांचे रीतसर कलाशिक्षण सुरू झाले. जोडीला इतरही तीन-चार विद्यार्थी असत. या शिक्षणात ते एका गोष्टीवर विशेष भर देत असत. ती म्हणजे पेन्सिल स्केचिंगची सवय! सातवळेकरांकडे शंकररावांना केवळ चित्रकलाच नव्हे, तर वैदिक धर्मतत्त्वांचीही ओळख होऊ लागली. कारण सातवळेकर नुसते चित्रकार नव्हते, तर वैदिक वाङ्मयाचे गाढे अभ्यासक होते. रोज रात्री जेवण झाल्यानंतर ते शंकररावांना कठोपनिषद व ईशावास्योपनिषद यांतील सूत्रे समजावून सांगत. याच्या जोडीला शंकररावांच्या छायाचित्रणाचा अभ्यासही सुरू होता. त्यातही पं. सातवळेकर वाक्बगार होते. पुढे मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शंकररावांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला;. पण तेथे शंकररावांच्या ध्यानात आले की, जे दिसते ते काढणे म्हणजे उत्तम चित्रकार नव्हे. तर त्यात कल्पनाशक्तीची भर घालणे महत्त्वाचे आहे. या भावनेतून शंकररावांनी संस्कृत व इंग्रजीचा अभ्यास केला, वाचन वाढवले, जागतिक घडामोडींवर लक्ष केंद्रित केले आणि आपल्यातील कलावंत परिपूर्ण बनवला. नंतर शंकरराव किर्लोस्करवाडीला आले. दर मंगळवारी ‘केसरी’मध्ये किर्लोस्कर नांगराची जाहिरात येत असे.
शंकररावांनी जाहिरातीची सूत्रे हातात घेतली. हळूहळू कंपनीचा बोलबाला वाढला, उत्पादनेही वाढली व किर्लोस्करला आपल्या उत्पादनांच्या ओळखीसाठी चिन्हाची गरज भासू लागली. त्यातून आज सर्वपरिचित झालेले विशिष्ट वळणाचे असे ‘किर्लोस्कर’ हे नाव हाताने लिहून ते रजिस्टर करण्यात आले. ‘किर्लोस्कर’ हे उद्योगसमूहाचे अधिकृत नाव झाले.
लक्ष्मणराव सतत जागतिक औद्योगिक घडामोडींकडे लक्ष ठेवून असत. अशात त्यांच्या हातात फोर्ड कंपनीचा एक कॅटलॉग आला. त्यामध्ये कंपनीचे कामगार व त्यांच्या कामाबद्दल माहिती होती. आपणही असेच एक माहितीपत्रक किंवा समाचार पत्रिका का काढू नये; ज्यामध्ये आपल्या कारखान्यातील कामगारांची कामे, तसेच आपल्या उत्पादनांविषयी उपयुक्त माहिती असेल! त्याकरता लक्ष्मणरावांनी एक छोटा हॅंडप्रेस घेऊन त्यावर आपले पहिले समाचार पत्रक छापले. त्याचे नाव होते ‘किर्लोस्कर खबर’! तारीख होती- १ जानेवारी १९२०. ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला अन् मराठी साहित्यजगतात लहानशी खळबळ उठली. ‘किर्लोस्कर खबर’मध्ये उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडी, गावातील लोकांच्या कथा-कविता असे एकंदर त्याचे स्वरूप होते. १९२९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किर्लोस्कर कारखान्याला भेट दिली. त्यांच्या पाहण्यात ‘किर्लोस्कर खबर’ आला व त्यातील ‘खबर’ हा फारसी शब्द त्यांना खटकला. सावरकरांनी शंकररावांना तसे सुचवताच त्यांनी त्यातून ‘खबर’ हा शब्द गाळला व मासिकाला केवळ ‘किर्लोस्कर’ हे नाव ठेवले. पुढे शंकररावांनी त्यात ललित, वैचारिक लेख समाविष्ट केले. या मासिकाला वि. दा. सावरकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, अ. वा. वर्टी, चिं. वि. जोशी, ना. धों. ताम्हणकर, बाळूताई खरे (मालतीबाई बेडेकर) अशा चतुरस्र व नामवंत लेखकांचे लेखन साहाय्य मिळाले व ‘किर्लोस्कर’चा दर्जा वाढत गेला. पुढे स्त्रियांनी सामाजिक बदलांना सामोरे जावे यासाठी स्त्रियांची प्रगती दर्शविणारे ‘स्त्री’ हे मासिक १९३० मध्ये सुरू करण्यात आले. तसेच युवकांना उत्तेजन देण्यासाठी १९३४ मध्ये ‘मनोहर’ या मासिकाची स्थापना करण्यात आली व मराठी वाङ्मयाच्या क्षितिजावर ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ हे तीन तारे चमकू लागले.
या नियतकालिकांचा वाङ्मयीन दर्जा शंकररावांनी उत्तम ठेवलाच; पण स्वत: चित्रकार असल्याने मासिकाची सजावट, विनोदी व्यंगचित्रे यांनीही ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’च्या पूर्णतेत भर घातली. व्ही. एस. गुर्जर, ग. ना. जाधव, बसवन्त महामुनी, प्र. ग. शिरूर असे खंदे चित्रकार त्यांच्या दिमतीला होते. बरीचशी मुखपृष्ठे स्वत: शंकरराव काढत असत. शंकररावांची व्यंगचित्रे हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. वास्तववादी चित्रकार म्हणून ते यशस्वी होतेच; तशीच व्यंगचित्रकाराला साजेशी शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती, तीक्ष्ण नजर, निर्भेळ विनोदक्षमता या गोष्टीही त्यांच्याकडे होत्या. जोडीला त्यांचे रेखाटन कौशल्यदेखील तोडीस तोड होते. साधे साधे विषय घेऊन समाजाला प्रगतीशील विचारसरणी देणारी त्यांची व्यंगात्मक रेखाचित्रे हे ‘किर्लोस्कर’चे खास वैशिष्टय़ होते. यात आधुनिकतेकडे जाणारा तरुणवर्ग, लग्नातील हुंडय़ाची अनिष्ट प्रथा अशा विषयांवर त्यांनी व्यंगचित्रांद्वारे समाजजागृती केली. ‘लग्न मंडपातील विनोद’ ही त्यांची चित्रमालिका ‘स्त्री’ मासिकातून प्रकाशित होत असे. पुढे त्याचे पुस्तकही प्रकाशित झाले. तसेच त्यांच्या निवडक व्यंगचित्रांवर प्रा. ना. सी. फडके यांनी स्फुट लिहून ‘टाकांच्या फेकी’ हे त्यांचे स्वतंत्र पुस्तक प्रकाशित केले. शंकररावांनी ‘किर्लोस्कर’साठी विनोदी, कौटुंबिक, गंभीर अशा सर्वच विषयांवर कथाचित्रे काढली. ‘शं. वा. कि.’नी आपल्या व्यंगचित्रांतून कधीही कोणाची टिंगलटवाळी केली नाही की कुणाला झोंबेल अशी टीका केली नाही. त्यांच्या व्यंगचित्रांचा हेतू समाजाला अधोगतीला नेणाऱ्या अनिष्ट प्रथा, वृत्ती यांकडे अंगुलिनिर्देश करून समाजाची उन्नती व समाजप्रबोधन करण्याकडे होता. कोल्हापूरचे चित्रकार श्री. ना. कुलकर्णी यांची ‘रेखाचित्रे’ ही चित्रकला कशी शिकावी याचे सुबोध धडे देणारी चित्रमालिका ‘किर्लोस्कर’मधून प्रसिद्ध करून त्यांनी चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपकृत केले. पुढे ‘किर्लोस्कर’ मासिक व छापखान्याचा विस्तार वाढला. किर्लोस्करवाडीचे क्षेत्र त्यांना अपुरे पडू लागले. तेव्हा ‘किर्लोस्कर’चे स्थलांतर पुण्यात १९५९ च्या जूनमध्ये झाले. शंकररावांच्या निवृत्तीनंतर त्यांचे पुत्र मुकुंदराव यांनी ‘किर्लोस्कर’ची धुरा सांभाळली. पुढे या तिन्ही मासिकांचे एकत्रीकरण करून त्याचे ‘किस्त्रीम’ असे नामकरण करण्यात आले.
लक्ष्मणरावांनी ‘किर्लोस्कर खबर’चे लावलेले रोपटे शंकररावांनी जोपासले, त्याची निगा राखली, ते वाढीला लावले आणि ते फोफावले. शं. वा. कि. यांच्या रक्तातील चित्रकार अखेपर्यंत सक्रिय राहिला. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या नियतकालिकांसाठी ते निवृत्त होईपर्यंत चित्रे आणि व्यंगचित्रांचे योगदान देत राहिले. ‘किर्लोस्कर’ हे नाव केवळ उद्योगजगतापुरते मर्यादित न ठेवता त्याला साहित्याच्या प्रांगणात मिरवण्याचे कार्य शं. वा. कि.नी केले. किर्लोस्करांच्या औद्योगिक साम्राज्यास सांस्कृतिक व साहित्यिक साज चढवण्याचे कार्य शंकररावांनी कुंचल्याच्या जोरावर केले.
१ जानेवारी १९७५ साली शंकररावांचे निधन झाले. आणि एक अभिजात कलाकार, आद्य व्यंगचित्रकार, चतुरस्र लेखक, मार्मिक भाष्यकार, द्रष्टा संपादक, समाजकारणी आणि महाराष्ट्राचे लाडके ‘शं. वा. कि.’ यांना आपण मुकलो!
rajapost@gmail.com