हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com
मध्यंतरी कुणाशी तरी बोलत होतो. ते सांगत होते, ‘‘अरे, इतकंच काय! ऋग्वेदापासून पर्यावरणवादाविषयी फारच जागरूकता दिसून येते असं ऐकलं आहे. त्या काळात समाज फारच जागरूक होता रे! तू या विषयातला विद्यार्थी आहेस, तर मला ‘वेदातील पर्यावरणवाद’ या विषयावर काही वाचनासाठी ग्रंथ सुचव नं!’’ या प्रकारचा संवाद भारतविद्या, संस्कृत, प्राचीन भारतीय इतिहास किंवा अभिजात साहित्य इत्यादी विषयांच्या विद्यार्थ्यांना नवा नाही. खरे तर मलाही नवीन नाही. आधुनिक काळात वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापल्या क्षमतेनुरूप काम करणाऱ्या अभ्यासक, कार्यकर्ते, विचारवंत इत्यादी मंडळींनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांचे मूळ किंवा पूर्वपीठिका प्राचीन भारतीय संस्कृतीत.. त्यातही वेगवेगळ्या श्रद्धा, संप्रदायविश्वात ‘शोधण्या’चे काम केले आहे. पर्यावरणवाद हे क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. त्या अनुषंगाने विचार करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे अतिशय गरजेचे ठरते. एक म्हणजे ‘पर्यावरण’ किंवा ‘पर्यावरणवाद’ नामक संकल्पना आधुनिक बाब आहे की प्राचीन काळातही याविषयी जागरूकतेने संशोधन करणारी स्वतंत्र ज्ञानशाखा किंवा कार्यकर्त्यांची मंडळे होती, यावर थोडी चर्चा करणे गरजेचे आहे. इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणेच भारतीय संस्कृती नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली, हे आपण जाणतोच. प्राचीन मानव तंत्रज्ञानाच्या शोधाच्या अनेक सहस्रकं आधीपासून सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणे अगदी स्वाभाविक आहे. त्यातूनच मानवी समाजातील संस्कृती, श्रद्धा, आहार, आचारविषयक रीती या संबंधित देश, काळानुसार वेगवेगळ्या अंगांनी विकसित झाल्या. निसर्गाशी अन्योन्य संबंध असणे किंवा त्याविषयी कृतज्ञता, जवळीक, स्नेह असणे आणि पर्यावरणवाद नामक चर्चा अथवा वैचारिक तत्त्वज्ञानाची शाखा विकसित होणे या स्वतंत्र गोष्टी आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. वास्तवात पर्यावरणवाद नामक विचार किंवा पर्यावरण ही संकल्पना विसाव्या शतकाच्या मध्यात वाढलेले प्रदूषण, त्यातून बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल इत्यादी घटनांच्या अनुषंगाने विकसित झाली. त्या संकल्पनेचा उदय आणि प्राचीन मानवी समूहांमध्ये निसर्ग, नैसर्गिक मूलतत्त्वे (किंवा पंचमहाभूतादी तत्त्वे) यांविषयी असलेले कुतूहल, जवळिकीची भावना, श्रद्धा या दोन स्वतंत्र अंगांनी विकसित झालेल्या गोष्टी आहेत. या धर्तीवर रोझमेरी ऱ्यूथर या अभ्यासकर्तीने म्हटल्यानुसार, ‘‘प्राचीन परंपरांमध्ये किंवा वांशिक इतिहासांमध्ये पर्यावरणविषयक तत्त्वज्ञान या विषयाचे रेडिमेड संदर्भ किंवा माहिती मिळणे शक्य नसते.’’ याचाच एक दुसरा अर्थ आहे.. तो असा की, प्राचीन परंपरांमध्ये किंवा मानवी समूहांत पर्यावरणविषयक जाणिवा वेगवेगळ्या रीतीने अभिव्यक्त होत आल्या आहेत, हे नक्की. मात्र, तरीही पर्यावरणविषयक हानी, प्रदूषणादी समस्या किंवा त्यांचे सजीव सृष्टीसोबतच ऋतुमान किंवा अन्य नैसर्गिक बाबींवर होऊ लागलेले परिणाम या बाबींविषयीची राजकीय, सामाजिक, सामूहिक किंवा जागतिक स्तरावरील जागरूकता जशी आज व्यक्त होत आहे, तशी ती त्यावेळी मोठय़ा प्रादेशिक किंवा जागतिक परिप्रेक्ष्यात चर्चेचा विषय नव्हती. मात्र, याचा अर्थ प्राचीन समाजात आणि पर्यायाने साहित्यात, ज्याला आज आपण पर्यावरण म्हणतो त्या भवतालातील निसर्गाविषयी संवेदनशीलता नव्हती असा मात्र मुळीच नाही. वैदिक समाजांमध्ये विकसित झालेल्या यागादि परंपरा असोत किंवा नैसर्गिक शक्तींना देवतारूपात कल्पिण्याची रीत असो; त्यातून उपखंडातील प्राचीन समुदायांची निसर्गासोबतची जवळीक ठळकपणे दिसून येते. मग ते अथर्ववेदातील ‘भूमी माझी माता आणि मी त्या पृथ्वीचा मुलगा आहे’ (अ. वे. १२.१२) अशी उद्घोषणा करणारे प्रसिद्ध पृथ्वीसूक्त असो किंवा सूर्याला श्रद्धापूर्वक नमन करणारा सुप्रसिद्ध गायत्री मंत्र असो; निसर्गातील शक्तींविषयीची कृतज्ञता वैदिक ग्रंथांत ठायी ठायी दिसून येते. अगदी वेगवेगळ्या विधींसाठी लागणारी फळे, फुले तोडताना संबंधित वृक्षदेवतेला किंवा वनस्पतीगणांच्या देवतेला उद्देशून उच्चारलं जाणारं ‘ओषधे त्रायस्व एनम्’ (हे वनस्पते/ वनस्पतिदेवते, या वृक्षाचे रक्षण कर.) हे मंत्रपर विधान असो; यातून व्यक्त होणाऱ्या प्रामाणिक संवेदना वैदिक समाजातील निसर्गविषयक भावविश्वाचे दर्शन घडवतात. कर्मकांडांची संरचना हा विषय असलेल्या ब्राह्मणग्रंथांतून अभिव्यक्त होणाऱ्या ‘बंधुता’ या तत्त्वानुसार जगात अस्तित्वात असलेली हरेक वस्तू एकमेकांशी नि:बद्ध असून, त्यातूनच सबंध सृष्टीचे संतुलन राखले जाते अशी धारणा समाजात असल्याचं दिसून येतं. याचा चरमोत्कर्ष उपनिषद ग्रंथांतून प्रसिद्ध झालेल्या, सबंध विश्वाला व्यापणाऱ्या, विश्वनिर्मितीचे कारण असलेल्या ब्रह्म, परब्रह्म या संकल्पनेत परिणत झाल्याचं दिसून येतं. याच उपनिषद ग्रंथांचं सार मानलं गेलेल्या भगवद्गीतेमध्ये परमेश्वर अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांनी स्वत:ला या सृष्टीचा निर्माता असल्याचं, सर्व जग स्वत:तच विलीन होत असल्याचं वारंवार सांगितल्याचं दिसून येतं. विभूतियोगात स्वत:च्या वेगवेगळ्या ईश्वरी विभूतींचे प्रकटन करताना हिमालयादी पर्वत, समुद्र, वेगवेगळे सजीव हेदेखील माझी ईश्वरी अभिव्यक्ती आहे, हे सांगताना निसर्ग आणि ईश्वरतत्त्व यांचे वैदिक, पौराणिक समाजातील एकत्वच गीताकारांनी अधोरेखित केले आहे. ‘सर्वभूतहिते रत:’ या गीतेतील वचनातील भूत या कल्पनेच्या कक्षेत चल सजीव सृष्टीसोबतच अचल सृष्टीचाही समावेश होतो हे यातून लक्षात येते. भूमीप्रमाणेच नद्यांना मिळणारे देवत्व आणि त्यांना केंद्रस्थानी ठेवून निर्माण होणारा पवित्र भूगोल याविषयीची चर्चा आपण या लेखमालेत अन्यत्र केली आहे. मातृदेवता, लिंगयोनीपूजांचे वेगवेगळे संदर्भ किंवा प्राणिसृष्टीशी आत्यंतिक जवळीक राखून असलेली वेगवेगळी देवतास्वरूपे अशा अनेक बाबी मानवी भावविश्वाचे निसर्गकेंद्री रूप दाखवून देतात. धर्मशास्त्रीय ग्रंथांचा विचार केला तर त्यातही निसर्गाशी असलेली जवळीक ठळकरीत्या व्यक्त झाल्याचे दिसून येते. राजकीय व्यवस्थांमध्ये राजाला ‘नृ’पती असण्यासोबतच ‘भूपती’ असणेही अभिप्रेत असल्याचं दिसून येतं.
या सर्व धारणांमधून प्राचीन समुदायांमध्ये असलेल्या निसर्गाविषयीच्या संवेदनशीलतेचा फायदा आज पर्यावरणविषयक समस्या सोडवताना होऊ शकतो हे खरे असले तरी यातून ठाम, नियोजनबद्ध कृती घडण्याऐवजी अतिउत्साहात या संवेदनांच्या निष्फळ गौरवीकरणातच अडकून पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे अनेकदा दिसून आले आहे. गंगा, यमुना किंवा अन्य नद्यांविषयी असलेल्या पूज्यभावाचे उदाहरण याविषयी अगदी बोलके आहे. गेल्या अनेक वर्षां-दशकांपासून या नद्यांच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्प योजनांवर खर्च झालेले कोटय़वधी रुपये आणि प्रत्यक्ष या कार्यासाठी संशोधन आणि चळवळी करणाऱ्या मंडळींचे दोन-चार पिढय़ांचे संघर्ष यांतील विसंगती अनेकदा दिसून आली आहे. केली अॅले या अभ्यासकांचे ‘इडियम ऑफ डिजनरसी : अॅसेसिंग गंगाज् प्योरिटी अँड पोल्यूशन’ किंवा ध्रुवसेन सिंह यांचे ‘द इंडियन रिव्हर्स : सायंटिफिक सोशिओ-इकॉनॉमिक आस्पेक्ट्स’ यासारख्या ग्रंथांतून व्यक्त होणाऱ्या भारतीय नद्यांच्या दुरवस्थेचे राजकारण विषण्णकारक आहे. धरणे किंवा खाणकामासारख्या प्रकल्प योजनांमुळे होणाऱ्या मानवी विस्थापनासोबतच त्यातून होणारी पर्यावरणाची हानी हीदेखील मोठी समस्या आपल्याकडे आहे. वर उल्लेख केलेल्या लेखकांनी दाखवून दिल्यानुसार, निसर्गाविषयीची आदिम काळापासून जागती असलेली संवेदनशीलता किंवा श्रद्धाभाव व व्यावहारिक जगाच्या वर्तमान आर्थिक, औद्योगिक विकासादी कामांतून निसर्गाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष या बाबी पराकोटीच्या विसंगत आहेत. विजया नागराजन या अभ्यासकर्तीने दाखवून दिल्यानुसार, भारतीय संदर्भात ‘नैसर्गिक सृष्टी ही देवत्वाने भारलेली आहे आणि म्हणूनच तिच्यात स्वत:ला शुद्ध करून घेण्याची शक्ती उपजतच असते’ ही धारणा आत्यंतिक खोलवर रुजलेली असल्याचं दिसून येतं. याचाच दुष्परिणाम म्हणून या ‘देवत्वा’ला गृहीत धरून निसर्गाची हानी करण्यात समाजाला काहीही चूक वाटत नाही. याचा संबंध नागराजन यांनी देवी समजल्या जाणाऱ्या स्त्री-समाजावर केल्या जाणाऱ्या सामाजिक अन्यायाशी जोडला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात ‘इकोफेमिनिजम’ हा आगळा प्रवाह विकसित झाल्याचं दिसतं. वंदना शिवा यांच्यासारख्या काही कार्यकर्तीनी प्राचीन सांख्य तत्त्वज्ञानातील प्रकृती युवा तत्त्वाचा संबंध आधुनिक ‘नेचर’ या संकल्पनेशी जोडल्याचं दिसून येतं. कपिला वात्स्यायन यांनी संपादित केलेल्या ‘प्रकृती : द इंटिग्रल व्हिजन’ या पंचखंडात्मक ग्रंथांतही अशा रीतीने मांडणी केल्याचं दिसून येतं. चल-अचल सृष्टीतील सर्व तत्त्वे एकमेकांशी संबद्ध असल्याची धारणा परंपरांनी व्यक्त केली असली तरीही सश्रद्ध विश्वात अंतिम लक्ष्य मानल्या गेलेल्या ‘मोक्ष’ या संकल्पनेनुसार मात्र मानवी जन्म हीच या सृष्टीतील सर्वश्रेष्ठ योनी असल्याचे या परंपरा सांगतात. ही धारणा आणि सृष्टीतील स्वत:ला शुद्ध करण्याची धारणा यांची तुलना केल्यास मानवी जन्माविषयीचा श्रेष्ठत्वभाव सृष्टीतील अन्य घटकांना- पर्यायाने सृष्टीलाही नगण्य समजण्यामध्ये परिणत होताना वारंवार दिसतो. याची प्रचीती प्राचीन, मध्ययुगीन काळातील शिकारीचे छंद जोपासणाऱ्या राजांच्या गोष्टी, यज्ञीय हिंसा व तद्नुषंगिक तपशील, मानवी जन्माचे श्रेष्ठत्व सांगणारे सिद्धान्त यांतून मिळत राहते. आधुनिक काळात गांधीजींनी मांडलेल्या पर्यावरणविषयक संकल्पना किंवा विनोबा, जयप्रकाश नारायण, सुंदरलाल बहुगुणा, मेधाताई पाटकर इत्यादी मंडळींनी गांधीवादी सत्याग्रहाच्या चौकटीत केलेल्या त्यांच्या पर्यावरणविषयक आंदोलनांतून व्यक्त होणारा मानवी व्यवहारांचा निसर्गपूरक अशा रीतीचा आग्रह यासंदर्भात लक्षणीय वेगळेपण दाखवतो. अर्थात हे सारे तत्त्वज्ञान प्रवाह किंवा आंदोलने वेगवेगळ्या राजकीय, पक्षीय, वैचारिक तत्त्वज्ञाने, धार्मिक अधिसत्ता किंवा तत्सम हेतूंशी जोडली गेल्याचे आरोप-संदर्भ वारंवार पुढे केले जातात. भारतासारख्या वैचारिक ध्रुवीकरणाचा सातत्याने बळी ठरत असलेल्या आणि नाजूक झालेल्या राजकीय संवेदनशीलता जपणाऱ्या समाजात या चळवळी किंवा आंदोलनांचे अस्तित्व या प्रत्यक्ष किंवा कथित वैचारिक, पक्षीय बांधिलकीतून साधल्या जाणाऱ्या हितसंबंधांना बळी पडल्याची उदाहरणेदेखील अनेकदा दिसून येतात. ही सारी आंदोलने भारतातील पर्यावरणविषयक संवेदनशीलतांचे प्रतिनिधित्व करत असली, त्यांना गांधीजींसारख्या समर्थ नेत्याच्या वारशाची जोड मिळालेली असली तरी त्यांचे मूळ तत्त्वज्ञान व त्यांचे आचरण हे शासकीय स्तरावर होणारा भ्रष्टाचार, प्रशासकीय स्तरावर विकल आणि विस्कळित झालेली यंत्रणा आणि समाजाला विभागणाऱ्या धर्मकेंद्री राजकारणाच्या गलिच्छ उपद्व्यापांनी ग्रासून गेले असल्याचे पॅट्रिक पेरिटोअर यांनी दाखवून दिले आहे. इथल्या निसर्गाविषयीच्या पारंपरिक धारणा त्यातून विकसित झालेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संगोपनाच्या पद्धतींचा समन्वय आधुनिक विद्याविभूषित, शहरी, उच्चभ्रू पर्यावरणवादाशी घालून अनोख्या पद्धती शोधून विकसित करणे हा मार्ग आकर्षक व उचित वाटत असला, तरीही पारंपरिक किंवा आधुनिक यांपैकी एकाच घटकाचा अत्याग्रह हा इथल्या पर्यावरणविषयक समस्यांना उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात मोठा अडसर ठरणार असल्याचा धोका एमा टॉमलिन, एमा मॉडस्ले यांसारख्या अभ्यासकांनी दाखवून दिला आहे. शासकीय स्तरावरील आर्थिक व नैतिक गैरव्यवहार, राजकीय स्वार्थ, सामाजिक जागृती, परंपरेतून आलेल्या धारणांचे औचित्यानौचित्य या सगळ्यामध्ये भारतीय पर्यावरणवाद अडकल्याचे दिसून येते.
पर्यावरण, राजकारण, धर्मकारण व इतर अनेक संवेदनशील विषयांकडे इतिहासाच्या चष्म्यांच्या फ्रेम्स लावून, वेगवेगळ्या काचांमधून बघणे हा आपल्या समाजाचा आवडता छंद आहे. हा छंद जोपासताना उदात्तीकरण किंवा तुच्छताजनक चिकित्सा इत्यादी संभाषितांच्या पल्याड जाऊन ऐतिहासिक, धार्मिक, पारंपरिक धारणांचे आजच्या संदर्भातले रूप आणि त्यांची आजच्या संदर्भातील अभिव्यक्ती यांचे तौलनिक अध्ययन याच दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
(लेखक ‘ऑब्झव्र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)