रामदास भटकळ
‘पॉप्युलर प्रकाशन’चा पाया भरभक्कम करणारे आणि संपूर्ण भारतीय प्रकाशकांना जगभरातील ग्रंथव्यवहाराशी जोडणारे सदानंद गणेश भटकळ यांची जन्मशताब्दी येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यांच्या योगदानाचा आढावा..
ते दिवस दुसऱ्या महायुद्धाचे, त्याचप्रमाणे गांधीजींच्या १९४२ च्या भारत छोडो चळवळीचे. सदानंददादा कॉलेजमध्ये असताना निरनिराळय़ा चळवळींत भाग घेत होते. विजापूर जिल्ह्यतील दुष्काळग्रस्त भागात जाऊन स्वयंसेवक म्हणून त्यांनी कामही केले.त्या काळात त्यांनी बरेच लेखन इंग्रजीतून केले. त्यांतील ‘दी फ्युचर ऑफ दी इंडियन युथ’ आणि त्यांच्या इंग्रजी कवितांचे पुस्तक ‘निर्मल अॅण्ड अदर पोएम्स’ प्रसिद्ध झाले होते. त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारख्या अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांशी संपर्क साधून ‘होरायझन’ नावाचा छोटेखानी ग्रंथ तयार केला. मुख्य म्हणजे गांधी विचारांचे संस्कार घेतच त्यांनी एमए, एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
मातब्बर कुटुंब, घरचा वाढता व्यवसाय आणि सुशिक्षित तरुण, तेव्हा मुली सांगून येणे साहजिकच होते. सदानंद यांचा आंतरजातीय लग्नाचा आग्रह होता. घरातला पहिला मुलगा म्हणून त्यांच्यावर काही विशेष जबाबदाऱ्या होत्या. आमच्या आईने मुलगी निवडली ती स्वातंत्र्यलढय़ात भाग घेऊन तुरुंगात जाऊन आलेली विमला गुलवाडी. तिचे हितचिंतक काळजी करायचे की, तुरुंगात जाऊन आलेल्या मुलीशी कोण लग्न करणार. कदाचित त्याच कारणासाठी सदानंदांनी जातीत लग्न करण्याची तडजोड मान्य केली असेल. त्यानंतर अखेपर्यंत त्यांचे सहजीवन आदर्शवत झाले.
ते ‘पॉप्युलर’मध्येच गुंतत गेले. ‘पॉप्युलर’चे व्यापक स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या. त्यांनी ‘नेशन्स कम्पलीट बुकशॉप’असे पॉप्युलरच्या लेटरहेडवर छापायला सुरुवात केली. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’असे बोधचिन्ह करून घेतले. वडिलांनी वैद्यकीय शास्त्राच्या पुस्तकांचे प्रकाशन यशस्वीरीत्या केले होते. सदानंदांनी त्यात सामाजिक शास्त्रातील पुस्तकांची भर घातली. प्रा. जी. एस. घुर्ये, प्रा. ए. आर. देसाई, प्रा. दामोदर कोसंबी, प्रा. पंढरीनाथ प्रभू यांच्या पुस्तकांमुळे प्रकाशन विभागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
देशा-परदेशांतील सारेच पुस्तकप्रेमी पॉप्युलर बुक डेपोत येत. हळूहळू गिरगावात बॉम्बे बुक डेपो, मुंबईच्या ‘आयआयटी’मध्ये स्टॉल, पुणे, बेंगळूरू, नागपूर येथे शाखा, असा व्याप वाढू लागला. खरे तर त्यांच्याकडे वारशाने आलेल्या सार्वजनिक वृत्तीमुळे ते ग्रंथविक्रेत्या संस्थांच्या कामात गुंतू लागले. आधी ‘बॉम्बे बुकसेलर्स असोसिएशन’च्या वतीने त्यांनी ‘दी बुक ट्रेडर्स बुलेटिन’ या व्यावसायिक मासिकाची सुरुवात केली. पुढे अशा देशभरातल्या संस्थांना एकत्रित बांधणाऱ्या ‘दी फेडरेशन ऑफ पब्लिशर्स अॅण्ड बुकसेलर्स असोसिएशन्स इन इंडिया’ या संस्थेच्या स्थापनेपासून तिच्या दिल्लीतल्या बस्तानापर्यंत त्यांनी खूप कष्ट घेतले. या मासिकाचे नावही ‘दी इंडियन पब्लिशर अॅण्ड बुकसेलर’ असे बदलले. तब्बल पस्तीस वर्षे हे काम त्यांनी स्वत:च्या हिमतीवर सुरू ठेवले. ‘१९५० ते १९८५ या काळातील भारतीय ग्रंथव्यवहाराचा मागोवा या फायलींमधून घेता येतो’ असे फिलिप आल्टबाख या अमेरिकन लेखकाने लिहिले आहे.
फेडरेशनचे ऑफिस दिल्लीला गेल्यावर सदानंदांच्या दिल्ली वाऱ्या वाढू लागल्या. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. बी. व्ही. केसकर त्यांच्या कामसू वृत्तीने प्रभावित झाल्यामुळे त्यांना ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे विश्वस्त नेमले गेले. त्यानंतर केंद्र सरकारच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले. सदानंद पुस्तक प्रकाशन क्षेत्रातील एक अधिकारी व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. बहुतेक सर्व राष्ट्रीय संस्थांनी नाते जोडले ते ‘पॉप्युलर’शीच. पॉप्युलर बुक डेपो हे बरीच वर्षे मुंबईतील एक दुकान होते. त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला तो सदानंदांच्या दिल्लीतील प्रभावामुळे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सदानंदांच्या कामांपैकी निदान काहींचा उल्लेख केला पाहिजे.
ते १९५२ साली इंग्लंडमध्ये अनेकांना भेटले. त्यांपैकी ‘नॅशनल बुक लीग’ आणि ‘दी पब्लिशर्स असोसिएशन’चे पदाधिकारी यांच्याशी त्यांची भेट महत्त्वाची होती. सदानंद फ्रँकफर्टला आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. त्या प्रदर्शनाचे महत्त्व लक्षात आल्यावर त्यांनी १९५५ साली देशाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन तेथे नेले. फ्रँकफर्ट प्रदर्शनाचे संचालक डॉ. सिग्फ्रेड टॉबर्ट हे त्यांच्या प्रेमातच पडले आणि पुढे एका वर्षी जगभरातून सदानंदांची विशेष अतिथी म्हणून निवड झाली. तेव्हापासून अनेक भारतीय प्रकाशक या प्रदर्शनात भाग घेऊ लागले. डॉ. टॉबर्ट यांनी ‘दी इंडियन पब्लिकेशन अॅण्ड बुकसेलर’चा एक विशेषांक संपादित केला. त्यांच्या जगभरातील ग्रंथव्यवहारसंबंधीच्या ‘बिब्लियोपोला’ या त्यांच्या पुस्तकातील भारतीय विभाग सदानंदांना लिहायला सांगितला. युनेस्कोतही सदानंदांना विशेष मान होता. या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने सदानंदांनी विशेषत: श्रीलंकेत ग्रंथकर्मीसाठी प्रशिक्षण शिबिरे घेतली.
१९७५ साली जूनमध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली. काही दिवस आपण सगळे सुन्न झालो. दुर्गा भागवत यांनी दुसऱ्या स्वातंत्र्यलढय़ाला चालना दिली आणि या कामात १९७७ च्या निवडणुकांपर्यंत सदानंद दुर्गाबाईंबरोबर होते. त्यांच्या सर्व कार्याचा नुसता परिचय करून द्यायचा तरी अनेक गोष्टी सांगाव्या लागतील. त्यांचा मुलगा मनमोहन व्यवसायात आल्याने त्यांनी आपले आवडते काम हातात घ्यायचे ठरवले. यापूर्वी त्यांनी प्रभाकर पाध्ये यांच्या सहकार्याने ‘इंडियन रायटिंग टुडे’ या नियतकालिकाचे अठरा अंक प्रसिद्ध केले होते. देशी भाषांतील साहित्याविषयीच्या लेखांसाठी आणि काही साहित्यकृतींच्या भाषांतराची व्यवस्था करण्यासाठी त्या दोघांनी बरेच परिश्रम घेतले. हे अठरा अंक हा एक मौल्यवान खजिना आहे. स्थगित झालेले हे काम त्यांनी परत हातात घ्यावे, अशी माझी सूचना होती. परंतु त्यांच्या मनात वेगळेच काही होते.
ग्रंथव्यवसायात शिरताना मी प्रकाशक आणि सदानंद ग्रंथविक्रेता असे त्याच्याकडून मी ठरवून घेतले होते. विशेषत: मराठी प्रकाशनासंबंधी त्यांच्या विशेष काही योजना होत्या. त्यांतील एक त्याने हातात घेतली. तोवर पॉप्युलर बुक डेपोचे स्थलांतर एका लहान जागेत झाले होते. ‘पॉप्युलर’ प्रकाशन आपल्या कामात गर्क होते. तेव्हा सदानंदांना स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागली. त्यांनी अनेक विद्वानांशी चर्चा करून आपला संपादकीय संच तयार केला. हे काम यापूर्वी शासन पुरस्कृत अनेकांनी हातात घेतले होते, पण ते अपुरे राहिले होते. सदानंद वयस्क तर होतेच त्यातून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्यांना कॅथेटर बाळगावा लागत असे, तरी केवळ जिद्द आणि वात्सल्य यांच्या जोरावर आणि निर्मलावहिनींच्या साथीने महाराष्ट्रभर फिरून स्वत: मराठी साहित्याचे पैलू समजावून घेत हे ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशा’चे प्रचंड काम तीन खंडांत पुरे केले. आज तरी मराठी साहित्याविषयीचा हा एकच संदर्भकोश आहे. सदानंदांनी त्या वयात एक उत्तम संपादकीय संच गोळा करून स्वत:च्या आजारावर मात करत जे महत्त्वाचे काम पूर्ण केले, ते लक्षात घेता मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांचे नाव कृतज्ञतेने आणि मानाने घेतले जाईल.
ramdasbhatkal@gmail.com