भारतातील समाजवादी विचारसरणीचे प्रमुख नेते, राजकारणातील सत्शील व्यक्तिमत्त्व, कोकण रेल्वेचे शिवधनुष्य प्रत्यक्षात आणण्यात मोलाचा वाटा असलेले प्रा. मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या मुलाने रेखाटलेले त्यांच्यातील संवेदनशील माणसाचे शब्दचित्र..
उदय दंडवते आठवतोय तो दिवस हाजी अलीच्या दग्र्यात क्षितिजाकडे टक लावून हळुवार क्षितिजाकडे झुकणाऱ्या सूर्यास्ताकडे पहात होतो एक सात वर्षांचा मी आठवतेय ती बोचरी थंडी अन् समुद्राचा खारट सुवास आठवतोय नानांनी घट्ट धरलेला हात आठवतायत हळूच ढगांमागून डोकावणाऱ्या चंद्राकडे बोट दाखवत नानांनी उद्गारलेले ते मौलिक शब्द ‘दिवस असो वा रात्र नेहमीच जाणवेल तुला प्रकाशाचं अस्तित्व शोधलास तर सापडेल आशेचा किरण काळय़ाकुट्ट अंधारात सर्व काही संपलं असं वाटत असलं तरी’आज आठवतोय तो क्षण सूर्याने जेव्हा दडी मारली तेव्हा अनुभवलेली शांतता आणि लाटांचा आवाज आणि अंतर्मनात कोरली गेलेली जाणीव: प्रत्येक क्षितिजापलीकडे असते एक विश्व प्रत्येक रात्रीपलीकडे असते एक पहाट वाट पहात माझं स्वागत करायला मला प्रेरणा द्यावयाला तयार असते नवी चेतना नवं कुतूहल नवा शोध त्या दिवसापासून अथांग सागराची धीरगंभीर कंपनं जागृत करतात संवेदना कुतूहल आणि आशावाद.
या कवितेद्वारेमी अनुभवलेले नाना व्यक्त केले आहेत. वर्षभरात नानांबद्दल बरंच काही लिहिलं जाईल. त्यांच्या वेगळेपणाबद्दल बोललं जाईल. पण इथे मी त्यांच्या थोरवीबद्दल बोलण्याऐवजी त्यांच्या सहवासात मला जाणवलेल्या संवेदनांबद्दल लिहिणार आहे. याचं कारण एकच- मला नानांना उत्तुंग शिखरावर बसवून ‘असा माणूस होणे नाही’ अशी समजूत वाचकांमध्ये निर्माण करायची नाही. नानांसारखं बनणं प्रत्येकाला शक्य आहे. प्रत्येक माणसात असलेली माणुसकी, संवेदना, आशावाद, करुणा, सौंदर्यदृष्टी आणि सर्जनशीलता याचा आपण जर वापर करू शकलो, तर अर्थपूर्ण आणि आनंदी जीवन जगू शकू, ही जाणीव मला नानांच्या सहवासात झाली.
नानांच्या मृत्यूसमयी त्यांच्या बाजूला बसून या सुप्त जाणिवेची मला अनुभूती झाली. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात नानांवर कर्करोगावर उपचार सुरू होते. १२ नोव्हेंबर २००५ च्या सकाळी मला डॉक्टरांनी बाजूला घेऊन सांगितलं, ‘‘संध्याकाळी ७ वाजेपर्यंत नाना अखेरचा श्वास घेतील. त्या वेळी वैद्यकीय शास्त्राप्रमाणं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवणं आमचं कर्तव्य आहे; परंतु त्यांचा मुलगा म्हणून तुला व्हेंटिलेटर नाकारायचा कायदेशीर अधिकार आहे. तर तू जे काही ठरवशील त्याप्रमाणं आम्ही पुढील तयारी करू.’’ मी त्यांना डॉक्टरांशी झालेल्या बोलण्याविषयी सांगितलं. त्यांनी मला सक्त ताकीद दिली, ‘जाणाऱ्या माणसाला कृत्रिमरीत्या जीवित ठेवण्यापेक्षा, ज्यांना वाचवता येईल त्यांच्यासाठी वैद्यकीय साधनं वापरात आणणं अधिक योग्य आहे. मला जाऊ दे. माझं शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दे आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून मला मिळालेलं सरकारी घर दोन आठवडय़ांत रिकामं करून परत दे.’’ त्यानंतर त्यांनी मला मराठी नाटय़संगीत लावायला सांगितलं. ‘झाले युवती मना’ या त्यांच्या आवडत्या गाण्यात ते रमून गेले. काही वेळानं मी त्यांना विचारलं, ‘‘नाना, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का?’’ त्यांनी हातानं खुणावलं. सर्व ठीकठाक आहे. नंतर नाटय़संगीत बंद करून नाना भारत व पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहू लागले. भारत जिंकल्यावर आनंद व्यक्त केला. मला शांत राहा म्हणून खूण केली आणि दहा मिनिटांत कायमचे डोळे मिटले. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर अनुभवलेल्या हाजी अलीच्या समुद्राचा धीरगंभीर आवाज मी त्या वेळी पुन्हा मनातल्या मनात अनुभवला.
नाना समाजवादी होते, कारण त्यांच्या संवेदना मानवतावादी होत्या. ते समाजातील विषमतेनं व्याकूळ होत. कारण त्यांचं मन हे कविमन होतं, तासन् तास ते त्यांचे मित्र कवी वसंत बापट यांच्याबरोबर गप्पा मारत. २० वर्षे ते दररोजच्या घटनांवर २ू१ंस्र्ु‘ मध्ये एखादं चित्र चिकटवून त्यावर दोन-तीन ओळींचं टिपण लिहीत. अत्यंत निराशाजनक परिस्थितीतही ते आशावादी होते, कारण त्यांना संगीताची आवड होती आणि संगीतातून त्यांनी मानसिक संतुलन कसं साधायचं ते जाणलं होतं. ते ध्येयवादी होते तरी व्यावहारिक होते. त्यांचा ध्येयवाद त्यांनी विरोधकांची हेटाळणी करण्यासाठी वापरला नाही. स्वत:ची मूल्यं जपताना दुसऱ्यांना त्यांच्या कमतरतांबद्दल हिणवलं नाही. त्यांना मनुष्यातील चांगुलपणावर विश्वास होता म्हणूनच लोकांचं उणं दाखवण्यापेक्षा त्यांना सामावून घेऊन, प्रोत्साहन देऊन, त्यांना रास्त मार्ग दाखवण्यावर त्यांनी जास्त भर दिला. ते नास्तिक होते, पण त्यांनी लोकांच्या भक्तिभावाचा आदर केला. त्यांचा सेक्युलॅरिझम सर्वधर्मसमभावावर आधारित होता. त्यांच्या अनेक साथीदारांनी त्यांची साथ सोडली, पण त्यांनी मैत्री तोडली नाही. स्वत: बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये २५ वर्षे पदार्थविज्ञान शिकवलं, पण कधी तयारीशिवाय वर्गात पाय ठेवला नाही. त्यांच्या एक विद्यार्थिनी देविका पटेल मला नेहमी सांगत, ‘‘जर कधी प्रोफेसर दंडवते वर्गात आले नाहीत तर आम्ही समजत असू की, त्यांना अटक झाली असेल; आणि तरीही चुकलेल्या अभ्यासाची भरपाई ते नक्की करणार.’’
नानांच्या संवेदनशीलतेचा आणखी एक अनुभव मला गेल्या आठवडय़ात आला. मी डॉक्टर जी. जी. परीख यांच्या ९९व्या वाढदिवसाच्या समारंभासाठी ताडदेवच्या जनता केंद्रात आलो होतो. समारंभ संपल्यावर बाहेर पडताना कानावर आवाज पडला, ‘‘उदय, नमस्कार. मी प्रदीप हिरवे; हिरवे गुरुजींचा मुलगा.’’ मी झटकन वळून नमस्कार केला. लहानपणापासून मी हिरवे गुरुजींची कहाणी ऐकली होती. गोवा सत्याग्रहाच्या वेळी नानांची तुकडी वेळेवर पोहोचू शकली नाही म्हणून हिरवे गुरुजींनी नानांच्या जागी सत्याग्रह केला आणि पोर्तुगीज पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडले. त्यांच्या जागी नाना असते तर? हा प्रश्न मला नेहमीच भेडसावतो. ‘‘नानांचे आमच्यावरचे उपकार मी कधीच विसरणार नाही.’’ प्रदीप हिरवे मला सांगू लागले, ‘‘त्यांनी अपार मेहनत करून माझ्या आईला पेन्शन मिळवून दिलं. आम्हाला राहतं घर मिळवण्यासाठी पैसे मिळवून दिले. एकदा भर सभेत माझ्या आईकडे पाहून ते म्हणाले, ‘‘जर मी गोवा सत्याग्रहाला वेळेवर गेलो असतो तर तुमच्या जागी प्रमिला येथे विधवा म्हणून बसलेली दिसली असती.’’ ही कहाणी मी कधीच ऐकली नव्हती, कारण राजकारण करताना स्वत:च्या कामगिरीबद्दल मतं मागतानादेखील मर्यादा न ओलांडण्याचं त्यांना भान होतं.
नाना आणि आई हे एक जोडी म्हणून ज्याप्रमाणे जीवन जगले त्यातूनही मी बरेच काही शिकलो. सर्वप्रथम, एकाच ध्येयाशी बांधिलकी, वाटचालीत एकमेकांना सतत साथ देणं आणि साध्या राहणीचा मार्ग पत्करून मोहमायांपासून दूर राहणं त्यांना जमू शकलं. यामुळे त्यांना तत्त्वांशी कधीच तडजोड करावी लागली नाही. ‘न मोह बंधने पदास बांधिती’ या विचारांनी त्यांनी स्वत: काही त्याग केला असं स्वत:लाच कधी वाटूच दिलं नाही. उलट ध्येयधुंद मस्तीत, सामाजिक न्याय व स्त्रीमुक्ती आंदोलनांतील मित्रमंडळींच्या गोतावळय़ाबरोबर त्यांनी जीवनाचा निर्भेळ आनंद अनुभवला.
बाप म्हणून हक्क असून नानांनी मला कधीच उपदेश केला नाही. परंतु दोन गोष्टी गप्पा मारताना कधी तरी सहज बोलून गेले- जे मला बरेच काही शिकवून गेलं.
‘‘तू मोठा होऊन काय बनावं याबद्दल आमच्या काही अपेक्षा नाहीत. स्वत:ची क्षमता पाहून ज्या काही क्षेत्रात तुझा कल आहे त्या क्षेत्रात स्वत:चं जीवन फुलव. आमची समाजातील मान्यता वापरून तुझं भविष्य घडवू नकोस. आम्ही तुला किती दिवस पुरणार?’’
‘‘तुझ्या बौद्धिक वा शारीरिक श्रमातून जी कमाई करशील तीच खरी तुझी संपत्ती. अन्य मार्गानं कमावलेल्या संपत्तीवर तुझा हक्क नाही.’’
आजच्या परिस्थितीत नानांसारख्या व्यक्तिमत्त्वाला स्थान आहे का, याबद्दल मी अनेकदा विचार करतो. काळ बदलला आहे, राजकारण बदललं आहे, तरुणांच्या आकांक्षा व जीवनमूल्यं बदलली आहेत. ज्या माणसाने कधी मोबाइल फोन, कॉम्प्युटर, ट्विटर, इन्स्टाग्राम वापरला नाही, ज्याची सोशल मीडियावर उपस्थिती नाही, ज्याच्याबद्दल टीव्हीवर फारसं बोललं जात नाही,
त्याउप्पर- ज्या साधनशुचिता, बुद्धिप्रामाण्यवाद, मानवतावाद, सामाजिक न्याय, अंधश्रद्धा निर्मूलन, जातिवाद निर्मूलन, स्त्रीमुक्ती, समाजवाद, सेक्युलॅरिझम, अशा नव्या राज्यकर्त्यांनी कालबा ठरवलेल्या कल्पना उराशी धरून ज्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी जीवन घालवलं, त्यांच्याबद्दल नव्या युगाच्या तरुणांच्या मनामध्ये का बरं कुतूहल असावं, असाही विचार मनात येतो.
मी नानांकडे एक व्यक्ती म्हणून न पाहता, एक समाधानकारक जीवन जगण्यासाठी लागणारी मनोवृत्ती म्हणून जेव्हा पाहतो; तेव्हा अशा प्रश्नांचं, शंकाकुशंकांचं निराकरण होतं.
आज पैसा कमावण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पुढारलेल्या तंत्रज्ञानामुळे नवनव्या सुखसोयी आपल्याला उपलब्ध आहेत. जीवनावश्यक माहिती फारसं डोक्याला त्रास न देता ऑनलाइन मिळवता येते. मित्रमंडळींचा गोतावळा मैत्री जपण्यासाठी फारसा वेळ न घालवता गोळा करता येतो. तरीही जनमानसात एक पोकळी असल्याचं मला जाणवतं.
गेली तीस वर्ष मी लोकांच्या जीवनमानाचा व मनोवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी जगभर प्रवास करतो आहे. या अभ्यासातून मला अशी जाणीव झाली आहे की, आज उदरनिर्वाहासाठी भरधाव धावणाऱ्या जीवांना समाधान नाही. समाजातल्या विविध घटकांमधल्या संवादाचं रूपांतर संघर्षांमध्ये झालं आहे, प्रसारमाध्यमं प्रचारमाध्यमं झाली आहेत. सोशल मीडियावर सत्य काय व असत्य काय हे कळणं अशक्य झालं आहे. मुक्त व गहन विचार करणं आणि सर्वधर्मसमभाव अशा मूलभूत जीवनमूल्यांची आज खिल्ली उडवली जाते. चंगळवाद निखळ आनंदापासून आपल्याला दूर नेतो आहे का असं वाटू लागलं आहे. समाजातील दुर्बल घटकांबद्दलची आपली करुणा संपुष्टात आली आहे काय, असा प्रश्नदेखील मनात येतो. अशा वातावरणात नानांची जीवनगाथा ही मला मन:शांती, संतुलन आणि समाधान साधण्यासाठी आवश्यक अशी एक पर्यायी मनोवृत्ती म्हणून प्रेरणा देते.
या लेखाचा शेवट करताना लियोनार्दो द विंची यांचं एक विधान आठवलं. नानांच्या जीवनाचं महत्त्व या ओळींमधून सुरेख व्यक्त होतं. ‘‘ज्याप्रमाणे एखादा दिवस चांगला घालवला की शांत झोप येते, त्याप्रमाणेच, जीवन चांगलं जगलं की मृत्यूलादेखील आनंदाने सामोरे जाता येते.’’
आजच्या नवतरुणांनी मधु दंडवते कोण याचा अभ्यास करावा. समाधान आणि संतुलन साधण्याची किल्ली कदाचित त्यातून तुम्हाला सापडेल.
uday@sonicrim.com