– रामकुमार गोरखनाथ शेडगे

सिनेनिर्मितीचे औपचारिक शिक्षण नसताना सातारा जिल्ह्यातील हणबरवाडी येथील एका तरुणाने आधी भरपूर व्यावसायिक लघुपट बनवले. ध्यास मात्र चांगला माहितीपट बनविण्याचा ठेवला. करोनाकाळात त्याचे ते स्वप्न पूर्ण कसे झाले, त्याची ही गोष्ट. मराठीतील व्यावसायिक चित्रपटाचे दिग्दर्शन नावावर असलेल्या या तरुणाच्या नजरेतून ‘डॉक्युमेण्ट्री’ निर्मिती..

balmaifal Jiru giraffe and rain
बालमैफल: जिरू जिराफ आणि पाऊस
short story on potholes on road in monsoon season
विक्रमवेताळ आणि खड्डे पुराण
Iru The Remarkable Life of Irawati Karve
‘इरू’ समजून घेण्यासाठी…
interest and curiosity while making a documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…
Loksatta lokrang article about Painting Ganpati 2024
चित्रास कारण की…: गोलम् स्थूलम् सुंदरम्
padsaad reders reactions on chaturang articles
पडसाद: परखड लेख
narayan dharap horror books
भयकथा म्हणजे…
narayan dharap horror books
भयकथांचा भगीरथ…
Readers reactions, Doctor, Readers,
पडसाद…

आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडतात. काही घडून गेलेल्या असतात. कधी लोकांकडून त्या आपल्याला ऐकायला तर कधी साहित्यातून आपल्याला वाचायला मिळतात. कधी कधी तर काळाच्या प्रवाहाबरोबर साहित्यातील गोष्टी जीर्ण होतात तर काही खऱ्याखुऱ्या घटना दंतकथा म्हणून पुढील पिढीत चर्चिल्या जातात. पूर्वी कित्येक गोष्टी डिजिटल स्वरूपात जतन करता येत नसत. पण आता त्यातील साऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. गेल्या शतकात कुटुंबातील सोहळे, आठवणी, भले-बुरे प्रसंग अनेक लोक छायाचित्रांच्या अल्बम्समधून वर्षांनुवर्षे साठवत. त्याची पुढील पायरी म्हणजे नव्वदीच्या दशकानंतर कौटुंबिक सोहळ्यांचे जतन भल्या मोठ्या कॅमेराद्वारे केले जाऊ लागले. हा खर्च परवडणाऱ्यांपुरती असलेली ही जतन-सुविधा व्हिडीओ कॅमेऱ्याचे सुलभीकरण झाल्यानंतर आणखी वाढली. मोबाइलचे कॅमेरे गेल्या दीड दशकात जसजसे अद्ययावत झाले, तसे सर्वसामान्य व्यक्तीदेखील आपल्या आयुष्याची ‘डॉक्युमेण्ट्री’ बनविण्याइतपत सक्षम झाले. अप्रत्यक्षरीत्या त्यांनाही एक प्रकारे ‘डॉक्युमेण्ट्री मेकर’च म्हणता येईल. पण याहून वेगळा माहितीपट बनवायचा तर संशोधन, अभ्यास, विषयाची आवड आणि ध्यास या गोष्टी अत्यावश्यक.

हेही वाचा – लोकउत्सव

मी सातारा जिल्ह्यातील हणबरवाडी येथील. पण कराड येथील उंब्रज या ठिकाणी प्राथमिक शिक्षणासाठी आजी-आजोबांकडे वाढलो. उंब्रजपासून आजोबांचे गाव साबळवाडी, हे सात किलोमीटर लांब होते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. शिक्षणासाठी रोजची तितकी दुहेरी पायपीट चाले. मात्र कुटुंबीयांनी माझे शिक्षण थांबू दिले नाही. बारावीनंतर शिक्षणासाठी मी काही काळ मुंबईत आणि नंतर पुण्यात स्थिरावलो. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून पुणे विद्यापीठातून एमए केले. नंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर मोडी लिपी वाचन आणि लिखाणाचाही डिप्लोमा केला. पण माझा कल सिनेमानिर्मितीकडे असल्याचे लक्षात आल्यावर मी एका मराठी चित्रपट दिग्दर्शकाकडे सहायक म्हणून काही वर्षे काम केले. कुठल्याही सिनेनिर्मिती शाळेत- महाविद्यालयात मी गेलो नाही. कॅमेरा हाताळणीपासून ते दृश्य चित्रिकरणाशी संबंधित जुजबी आणि जटिल प्रक्रिया मी पाहत, काम करीत समजून घेतल्या. त्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला ‘डॉक्युमेण्ट्री’ किंवा सिनेमा बनविता येईल हा आत्मविश्वास जेव्हा निर्माण झाला, तेव्हा या क्षेत्रात उडी मारली.

ऐंशीच्या दशकाच्या आगे-मागे जन्मलेल्या माझ्या अख्ख्या पिढीचे माहितीपटांमधील प्रेरणास्रोत हे ‘डिस्कव्हरी चॅनल’च आहे. जगाचं दर्शन सर्वच स्तरांवरून करून देणारे ढिगांनी सुंदर डॉक्यु-कार्यक्रम या वाहिनीने दिले. भारतासाठी त्यानंतर आलेल्या नॅशनल जिऑग्राफीने वन्य आणि वन्यप्राणी जीवनावरील अप्रतिम डॉक्युमेण्ट्रीज दाखविल्या. त्या बनविण्यासाठी दिग्दर्शकांनी घेतलेल्या सर्वच श्रमांचे दृश्यरूप मला या क्षेत्राकडे ओढण्यास पुरेसे ठरले.

डॉक्युमेण्ट्री बनविण्यासाठी आर्थिक गरज भागविणे सर्वात महत्त्वाची गोष्ट. ती नसेल तर सुरुवातीलाच तुम्ही कलात्मक उंची गाठणाऱ्या, कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या किंवा सामाजिक प्रश्न- समस्या यांवर माहितीपट बनवूच शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये उत्तम कल्पना असल्या, तरी त्या प्रत्यक्षात येण्यासाठी पैशांचे बळ कुठूनही स्वत:हून उभे राहत नाही. ते मिळविण्यासाठी तुम्हाला झगडावे लागते. दिग्दर्शकाकडे सहायक म्हणून काम केल्यानंतर मी एक लघुपट बनविला- तुटपुंज्या साधनांतच. त्या अनुभवावर आपल्याला व्यावसायिक डॉक्युमेण्ट्री बनवता येतील का, याची मी काही महिने चाचपणी केली. त्यातून पुढे मला माझ्या मनात असलेल्या माहितीपटाची आखणी करता आली. देशातील तसेच परदेशांतील महोत्सवांत पारितोषिकप्राप्त माहितीपटांचा अभ्यास यूट्यूब आणि ओटीटी फलाटावर एका बाजूला सुरू होता. त्यानंतर आपणदेखील या प्रकारे डॉक्युमेण्ट्री बनवायची, हे पक्के होत होते.

‘मेकिंग ऑफ डॉक्युमेण्ट्रीज’ या विषयावर यूट्यूबवर सात मिनिटांपासून ते काही तासांचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. कुणाला त्यातल्या काही अत्यंत बाळबोधही वाटू शकतील. पण या जगात उतरण्यासाठी शेकडो ‘टिप्स’ त्यात आहेत. मी त्यांचे सातत्याने अवलोकन केले. सर्व प्रकारचे कलात्मक, अकलात्मक, तद्दन व्यावसायिक-गल्लाभरू चित्रपटही पाहिले. ‘सुपरमॅन ऑफ मालेगाव’ या डॉक्यु-फिक्शनचा वकुब जग कसाही ठरवोत, मला त्यातही सौंदर्य सापडले. ‘गुलाबी गँग’, ‘एलिफंट विस्पर्स’, ‘द हंट फॉर वीरप्पन’ यांतही सारखीच कलात्मकता दिसली.

भरपूर पाहण्यातून आणि जगभरच्या डॉक्युमेण्ट्रीजच्या अभ्यासातून तयार झालेली ‘मसूरची ऐतिहासिक यशोगाथा’ ही माझी डॉक्युमेण्ट्री. सातारा जिल्ह्यातील मसूर या गावाला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे. या भागाच्या जवळच समर्थानी स्थापन केलेल्या ११ मंदिरांपैकी एक मंदिर आहे. करोनाकाळात सारे जग टाळेबंदीत अडकलेले असताना मी माझ्या गावी हणबरवाडी येथे काही महिने राहिलो. तेव्हा जवळ असलेल्या मसूर गावातील ऐतिहासिक वारशाबद्दलचे किस्से ऐकता ऐकता हा विषय माहितीपटासाठी योग्य असल्याचे मला वाटू लागले. या गावाबद्दल लहानपणापासून मी खूप काही ऐकले होते. पण डॉक्युमेण्ट्री बनवायची तर या गावाची ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व काळाची, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या परिपूर्ण तपशील हवे होते. स्थानिक पत्रकार, वयोवृद्ध नागरिक तसेच मसूर ग्रामपंचायत यांना सोबत घेऊन माहिती संकलन करायला सुरुवात केली. पाहता पाहता तपशिलांचा खजिना माझ्या हाती लागला.

मसूर या ठिकाणी भुईकोट किल्ला होता. आता त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. अफजलखानाचा वध केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा मुक्काम या भुईकोटात होता. त्याचबरोबर भारतातील पहिला ‘श्री राम जन्मोत्सव’ समर्थ रामदासांनी मसूरमध्ये सुरू केला. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मसूर हे क्रांतिकारक चळवळीचे मुख्य केंद्र होते.

करोनाकाळातच मला इथल्या अनेक गोष्टींचा, येथील स्थळांचा शोध घेता आला. ऐतिहासिक दस्तावेज आणि माहितीचे संकलन करता आले. काही दिवसांनी टाळेबंदी उठल्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळातून नंतर माहिती मी मिळवायला सुरुवात केली. पुणे विद्यापीठातून मसूरविषयी मोडी लिपीत असलेली जुनी कागदपत्रे मिळविली. पुण्यातील फोटो झिंक प्रिंटिंगप्रेस येथून मी सातारा गॅझेट मिळवले. मसूर येथील दैनिकातील अनेक कात्रणे माझ्या कामी आली. मसूरमधील वयोवृद्ध नागरिक तेथील शिक्षक आणि इतिहास अभ्यासक यांनादेखील मी वेळोवेळी भेटत राहिलो. पानिपतच्या युद्धामध्ये शौर्य गाजवलेले येथील जगदाळे घराणे आहे, त्यांच्या वारसदारांनाही भेटून माहिती गोळा केली. देशाच्या आणि गोवा मुक्ती स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात इथल्या ज्या क्रांतिवीरांनी योगदान दिले, त्यातील कुटुंबांचीदेखील भेट घेतली. त्यांच्याकडून कागदपत्रे आणि छायाचित्रे मिळविली.

हेही वाचा – व्रणभरला ऋतू…

पुन्हा काही दिवसांसाठी टाळेबंदी लागली तेव्हा प्रत्यक्ष कामासाठी शहरातून चमू आणणे अवघड झाले. मग मसूर ग्रामपंचायत परिसरात चित्रीकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला. तेथूनच मला श्रीकांत वारे नावाचा कॅमेरामन भेटला, तसेच बाळकृष्ण गुरव आणि हणमंत कुंभार यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर एक पूर्ण टीम उभी राहिली आणि चित्रीकरण निर्विघ्नपणे पार पडले.

‘द वल्र्ड लास्ट ब्रेथ’ या दुसऱ्या डॉक्युमेण्ट्रीचे काम सध्या सुरू झाले आहे. वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. हा प्रश्न त्या डॉक्युमेण्ट्रीमधून मांडायचा आहे. त्याचबरोबर ‘पत्री सरकार’ या नावाचा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरचा माहितीपट नियोजित आहे.

वर्तमानकाळ हा दृश्यमाध्यमाने किती काबीज केला आहे याची उदाहरणे जागोजागी सापडू शकतात. लोक वाचतात कमी, पण मोबाइलमधील दृश्य आणि ध्वनी असलेल्या रील्स पाहण्यात पूर्णपणे अडकून जातात. भविष्यात हे आणखी वाढणारच. तसेच वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवरही डॉक्युमेण्ट्री बनविण्याचे प्रमाण आता आहे त्यापेक्षा कैक पटीने विस्तारेल. जतन-सुविधेच्या सध्याच्या सर्वात सोप्या झालेल्या काळात तुम्ही या सुविधेचा वापर कसा करता, ते महत्त्वाचे.

व्यावसायिक डॉक्युमेण्ट्रीज करून या क्षेत्रात स्थिर झाल्याशिवाय कलात्मक किंवा आपल्याला हव्या त्या विषयाचा माग घेता येत नाही, हे यात काम करू इच्छिणाऱ्या सिनेमाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे. या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी एके काळी मी चित्रपटांच्या रिळांचे डबे महाराष्ट्रभर डोक्यावरून घेऊन फिरलो. काही वर्षांनी डॉक्युमेण्ट्री आणि चित्रपटासाठी राज्यभरात फिरताना त्याचा उपयोगच झाला. शेकडो अनोळखी लोकांकडून शिकायला मिळाले. आता व्यावसायिक चित्रपट, लघुपट असा अनुभव माझ्या गाठीशी आहे. अनेक चांगल्या गोष्टी डॉक्युमेण्ट्रीच्या माध्यमातून जगासमोर आणायच्या आहेत. त्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणार आहे.

व्यावसायिक लघुपट आणि माहितीपटांचे दिग्दर्शक ही एक ओळख. ‘अ.ब.क.’ या मराठीतील गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन. विविध महोत्सवांत ‘मसूरची ऐतिहासिक यशोगाथा’चे प्रदर्शन.

ramkumarshedge@gmail.com