फक्त हिंदी साहित्यातीलच नव्हे, तर अनुवादामुळे भारतातील सर्वदूर भाषांत आपलेसे ठरलेले सामान्य माणसांचे लेखक विनोद कुमार शुक्ल यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या काव्य आणि कथन साहित्यातील कारकीर्दीवर दृष्टिक्षेप…
समकालीन हिंदी कवितेत गजानन माधव मुक्तिबोधांनंतरचे श्रेष्ठ कवी म्हणून निर्विवादपणे विनोद कुमार शुक्ल यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मुक्तिबोधांचं नाव त्यांच्या कवितेशी आणि कादंबरीलेखनाशीही एका अर्थानं जोडलं गेलं आहे. त्यांच्या कवितांचं वेगळेपण मुक्तिबोधांनी .पहिल्यांदा ओळखलं आणि त्यांच्यामुळेच त्या पहिल्यांदा प्रकाशित झाल्या. त्यांनी पहिली कादंबरी लिहिली ती मध्य प्रदेश सरकारच्या गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिपसाठी. तिच्या पहिल्या वाचनापासून सगळ्यांना कादंबरी अतिशय आवडली होती.
कधी तरी मुक्तिबोधांचा आपल्यावर प्रभाव आहे असं विनोद कुमार म्हणतात, पण त्यात कृतज्ञतेची भावना अधिक असावी. साठच्या दशकातच त्यांना स्वत:ची भाषा, शैली आणि आपण सांगू पाहतोय तो आशय सापडला असावा असं वाटतं. त्यांची भाषा सर्वस्वी त्यांची आहे. स्वत:ला मूलत: ते कवी मानतात. कवितेची भाषा त्यांच्या गद्यातही दिसते. हिंदी साहित्य परंपरेत ज्यांनी भाषेला, रूपाला आणि आशयाला बदलून टाकलेलं आहे अशा फार थोड्या लेखकांपैकी विनोद कुमार एक लेखक आहेत. वास्तवाकडे पाहण्याची त्यांची नजर खास आणि अनोखी आहे. वास्तवाचे अनेक स्तर ते तिरकसपणे पाहू शकतात. त्यात त्यांना विसंगती, उपरोध, करुणा आणि विनोदही सापडतो. त्यांची भाषा क्लिष्ट नाही; पण त्यात असंगतता, व्याजबोधाचे प्रयोग खेळकरपणे केल्याचं दिसतं. त्यांची भाषा त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखी साधी वाटते, पण आपल्या अलाहिदा सर्जनशीलतेनं आणि नजरेनं वास्तवाची वेगळीच रूपं ते वाचकाला दाखवतात. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘लगभग जयहिन्द’ १९७१ साली प्रसिद्ध झाला आणि दहा वर्षांनी दुसरा संग्रह ‘वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचारों की तरह’ असं लांबलचक शीर्षक असलेला होता. त्यानंतरही त्यांचे कवितासंग्रह आले. त्यांच्या कादंबऱ्यांची निशिकांत ठकार यांनी मराठीत भाषांतरं केली, तर ‘अतिरिक्त नहीं’ हा कवितासंग्रह प्रफुल्ल शिलेदारांनी मराठीत आणला.
लोठार लुत्झं या जर्मन विद्वान आणि लेखकाचं विनोद कुमारांवर एक व्याख्यान ऐकलं होतं. त्यानंतर गप्पांमध्ये त्यांच्या भाषेतला साधेपणाचा मुद्दा आल्यावर ते म्हणाल्याचं आठवतं की, ‘तो साधेपणा तुम्हाला त्यांच्या आशयात प्रवेश करू देतो, पण तो तितका साधा नाही, तिर्यक आणि सखोल आहे.’ ते खरं आहे. भाषेचं ते करत असलेलं उपयोजन सवयीचं नाही. विचित्र, चमत्कृतीपूर्ण, अतिवास्तवी वाटेल अशी, पण जगण्यातलीच अभिनिवेशी अशी ही भाषा आहे.
जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं, आदिवासींचं, समाजात खिजगणतीत नसलेल्यांच्या जगण्यातलं वास्तव ते त्यांच्या आतून दाखवत आहेत असं वाटतं. या लोकांचं जगणं, त्यांचं शोषण, विषमता, अन्याय, अभाव हे सगळं त्यांनी खोलातून, करुणेनं आणि सहानुभावानं भाषेत आणलेलं आहे. जिथं लोकांच्या नजरेचे झोत पडलेले नाहीत अशा तळातल्या-‘लोअर डेप्थ्स’मधल्या लोकांना त्यांनी आपल्या आस्थेच्या कक्षेत आणलेलं आहे.
‘जंगलाच्या दिवसभरातल्या नि:शब्द शांततेत’ या शीर्षकाच्या त्यांच्या एका कवितेतले आदिवासी जंगलात निर्भयपणे घरात फिरल्यासारखे फिरतात. तिथं मुलगी वाघाला पाहते, वाघही तिला पाहतो. परत जांभई देत आडवा होतो. नेहमीच्या दृश्याप्रमाणे ते पुन्हा आपापल्या वाटेला लागतात.
कवितेत पुढे-
एका एकट्या आदिवासी मुलीला
घनदाट जंगलात जाताना भीती नाही वाटत
वाघ-सिंहांची भीती नाही वाटत
पण फुलं घेऊन बाजारात जाताना
भीती वाटते.
बाजाराचा दिवस आहे
मोहाच्या फुलांची टोपली डोक्यावर घेऊन
किंवा कावडीत / इकडून तिकडून जंगलातून
डोंगरावरून उतरून
साधेसुधे रानातले लोक
झाडाखाली एकत्र जमा होतात
आणि एकत्रच बाजाराला जातात.
त्यांच्या सुरक्षिततेला विनोद कुमार नागरी, बाजारवादानं बरबटलेल्या संस्कृतीचा धोका आहे, हे सांगतात. सामान्य म्हणून जगताना, स्वत:च्या आपल्या स्थानावरून सूक्ष्मपणे भवताल निरखताना विराट वैश्विक जाणिवेशी सहजपणे त्यांची कविता भिडते. छत्तीसगढमधल्या ज्या भागात ते राहतात, तिथल्या सामान्य लोकांचं खडतर जगणं, शेतकरी, मजूर, कष्टकरी स्त्रिया, कुपोषित मुलं, बेरोजगार तरुण यांचं जगणं व ते जवळून पाहताना, अनुभवताना त्या भौगोलिक वास्तवात ते परंपरा, संस्कृती, इतिहासाला घुसळतात. स्थळ, काळ, अवकाशाची परिमाणं कवितेत किती परीनं आणि कशी एकजीव होतात, याची ही कविता उदाहरण होते. आसपासच्या आदिवासी जीवनाची त्यांची निरीक्षणं नितांत मानवी करुणेनं व्यापलेली आहेत. या त्यांच्या कविता म्हणजे आदिवासी महासंस्कृतीच्या हेळसांडीबद्दलची संयत आणि अतिशय तीव्र आस्थेतून आलेली काव्यात्म निरीक्षणं आहेत. ती निव्वळ निरीक्षणंही उरत नाहीत, तर त्यातील करुणेमुळे ती त्यांच्या चांगल्या अर्थानं विधान बनतात.
दहशतवाद आणि युद्धखोरीबद्दलही त्यांची कविता मानवीपणाला असलेल्या धोक्याच्या जाणिवेनं वाचकाला अस्वस्थ करते. आखाती युद्धानंतरची त्यांची कविता ‘अनोळखी पक्षी’ याच दहशत आणि भयाचं काळं चित्र रेखाटते, त्या कवितेची सुरुवातच अशी होते-
‘एक अनोळखी पक्षी एका पक्ष्याच्या प्रजातीसारखा दिसला
आखाती युद्धाच्या पहिल्या बॉम्बस्फोटाच्या आवाजानं
जो भयभीत होऊन इथं आला असावा’
हे वाचताना आपल्याला त्या युद्धादरम्यानचं पक्ष्याचं ते प्रसिद्ध प्रकाशचित्र आठवतं, हवेतली गुदमरून टाकणारी ती दुर्गंधी आठवते. शब्दांचे कोणतेही विभ्रम आणि चमत्कृती दाखवणारी त्यांची कविता नाही. थेट अनुभव प्रतीका-प्रतिमांशिवायच येतात.
विष्णू खरे यांनी त्यांना ‘नेटिव जीनिअस’ म्हटलं आहे ते पटतं. प्रेमचंद-रेणू-मुक्तिबोधांच्या परंपरेतले ते खरे भारतीय लेखक आहेत. स्थानिकता, सभोवतालचा परिचयातला अवकाश, त्यातले अनुभव हेच त्यांच्या लेखनातलं जग आहे आणि तेच जगातल्या कोणत्याही ठिकाणच्या माणसांशी जोडता येतं.
दोन वर्षांपूर्वी, विनोद कुमार शुक्ल यांना पेन-नोबोकोव आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ‘‘आज तुम्ही एक आंतरराष्ट्रीय लेखक आहात. एक देश, एक प्रांत किंवा एका भाषेच्या हद्दीत तुम्हाला बांधून ठेवता येणार नाही,’’असं विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘मी माणुसकीशी बांधला गेलेला लेखक आहे. जिथं जिथं माणसं आहेत, ज्या कुठल्या देशांत आहेत, मी त्यांच्याशी माझ्या लेखनानं जोडलेला आहे.’’
शुक्ल यांची ‘नौकर की कमीज’ ही कादंबरी निम्नमध्यमवर्गातल्या लोकांची आहे. नोकरीची काळजी असलेले संतूबाबू एका कचेरीत प्रामाणिक क्लार्क आहेत. आसपासच्या भ्रष्टाचाराचा त्यांना तिटकारा आहे. साहेबांपुढे लाचारी हेच त्या लोकांचं काम. अशा व्यवस्थेत एका आदर्श नोकराची आवश्यकता असल्यानं साहेबांनी त्याच्यासाठी एक सदरा शिवलेला आहे. तो संतूबाबूंना नेमका व्यवस्थित बसतो. दुसरी व्यवस्था होईतो संतूबाबूंना ते काम करायला सांगितलं गेलंय. त्यातून त्यांना सुटायचंय. संतूबाबू हळूहळू सगळ्या शोषित सहकाऱ्यांना एकत्र करू शकतात आणि सदरा जाळला जातो. ही लोकशाही व्यवस्थेत मागे पडलेल्यांविषयीची रूपककथा म्हणता येईल.
‘दीवार में एक खिडकी रहती थी’ ही रघुवरप्रसाद आणि सोनसी या नवं लग्न झालेल्या जोडप्याची गोष्ट. यात अविश्वसनीय, जादूई वाटतील असे तपशील आहेत. त्यांच्या लहानशा घरातल्या भिंतीत छोटी खिडकी आहे. तिच्यातून उडी मारून रघुवरप्रसाद आणि सोनसी बाहेर पडून पलीकडच्या स्वप्नासारख्या जगात जातात. रघुवरप्रसाद कॉलेजात नोकरीसाठी हत्तीवरून जाऊ लागतात. लाकडी बंदूक येते. किंवा ‘खिलेगा तो देखेंगे’मध्येही पिंपळाच्या झाडानं जिवराखनपासून विमुख होणं, मुन्ना-मुन्नी यांनी डोंगर हलवणं… हे कवितेच्या भाषेत साधेपणानं गोष्ट सांगणं आहे. घडणाऱ्या गोष्टींमधल्या अवकाशात लेखकाच्या कल्पना, विचारांच्या जागा असतात. अनुभवांचं आणि शक्यतांचं जग ते तिथं अद्भुततेनं रचतात. समकालातल्या क्रूर वास्तवासमोर नव्या संस्कृतीला उभं करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या कवितांमधल्या-कादंबऱ्यातल्या कित्येक ओळींना उक्तींची श्रेणी प्राप्त झाली आहे. ‘हताशा से…’ ही ‘हाताला हजार बोटं असोत’सारखी ओळ तर सर्वांच्या परिचयाची असतेच. अत्यंत कमी शब्दांत ते मोठी घटना कशी विलक्षण परिणामकारकतेनं सांगतात, ते आदिवासी भागात रेल्वे आल्यानंतरची गोष्ट सांगताना लक्षात येतं.
विवशतेमध्ये असायची ती दु:खं होतीच. त्यात प्रवासाचं दु:ख आलं. स्टेशनात थांबलेल्या गाडीतून कसं कुटुंब उतरायचं, काही सभ्य मवाली निमित्त काढून तरुण मुलींना गाडीतच थांबून घ्यायचे आणि रेल्वे सुटायची. मुली ट्रेनमध्ये आरडाओरडा करायच्या, आई-बाप खाली रडत राहायचे, दिवसाची रात्र व्हायची आणि आई-बाप दिवसा शोधत राहायचे. त्या मुली प्रौढ होऊन बचावून परतायच्या. हे विलक्षण अंगावर येणारं आहे. अतिशय संयत, सहज साध्या शब्दात स्फोटक आशय सांगण्याची ही शैली आहे. त्यांच्या भाषेत रूपकं, अन्योक्ती असेल ती असो, पण जे काही आहे ते विनोद कुमार शुक्ल यांचा चमत्कार आहे. तो सावकाशीनं वाचावा लागतो. कवितेच्याच लयीत…
bhasha.karm@gmail.com
© The Indian Express (P) Ltd