‘अरे कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर?’ ‘विश्वासाने सांगतोय, खरं माना.’ ‘तो विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नाही,’ ‘जो त्याच्यावरी विसंबिला, त्याचा कार्यभाग बुडाला.’ ‘भरवशाचं कुळं नाही ते..’ अशा अर्थाची वाक्ये रोजच्या व्यवहारात क्षणाक्षणाला कानी पडतात आणि आपल्या आयुष्यातील ‘विश्वासा’चे स्थान अधोरेखित करतात.
विश्वास म्हणजे खात्री; विश्वास म्हणजे हवाला; विश्वास म्हणजे भिस्त; विश्वास म्हणजे जबाबदारीचे भान.. म्हटले तर जाणीव; मानले तर जोखड; विश्वास म्हणजे दोन व्यक्तीमधलं अव्यक्त; अलिखित नातं; विश्वास म्हणजे रेशमाचा धागा; विश्वास म्हणजे दोरखंड. विश्वास म्हणजे घट्ट कातळ पकडणारी घोरपड.. विश्वास म्हणजे काळ्या दगडावरची रेघ.. अन् कधी कधी विश्वास म्हणजे येणाऱ्या भरतीच्या प्रत्येक नव्या-नव्या लाटेबरोबर पुसली जाणारी वाळूतली क्षणभंगुर पावले.
विश्वास हा असा सर्वत्र भरून राहिलेला असतो. त्याचे अस्तित्व डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, पण त्याच्याशिवाय पान हलत नाही. अगदी कांदा-बटाटय़ाच्या बयाणा खरेदी-विक्रीपासून ते वैश्विक अस्तित्व असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत हा साऱ्या व्यवहारांना भरून आणि भारून टाकतो. जेथे विश्वास कमी होतो तेथे नियमावली वाढतात; कायद्याचे कुंपण फोफावते; करार-मदार लेखी रूप धारण करू लागतात. ‘जबान दी है’मधली आर्तता आणि सच्चेपणा वाळलेल्या शाईच्या अक्षरांत येत नाही हेच खरे आहे.
लोकांच्या परस्पर विश्वासामधून सशक्त समाजाची जडणघडण होते. दिलेला शब्द आणि पित्याचे वचन निभावण्यासाठी श्रीराम वनवासात जातो; ययाती पित्याचे जरत्व स्वीकारतो. रामराज्य म्हणतात ते याच विश्वासाला. मग घरची दारे उघडी राहतात. त्यांना कडे-कोयंडे लागत नाहीत; कुलपे अडगळीत गंजून पडतात. शनिशिंगणापूरच्या सताड उघडय़ा दरवाजाच्या घरांची मग आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. पण मग हाच विश्वास समाजात सर्वदूर का पसरत नाही. जगाच्या खानेसुमारीत सच्चेपणाच्या बाबतीत डेन्मार्कचा अव्वल नंबर लागतो. आपला शेजारी सिंगापूरही मानाचे स्थान पटकावतो पण आपण मात्र या शिडीवर खालच्या पायरीवर ढकलले जातो. हा प्रचंड लोकसंख्येचा परिणाम आहे का? हा समाजातील विषमतेच्या दरीचे द्योतक आहे का? हा फक्त गरिबीचा अन् दारिद्रय़ाचाच शाप आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या मते नकारार्थी आहेत. गरिबी पोट जाळते; प्रामाणिकपणा नाही. श्रीमंतीने वैभवाची झूल पांघरता येते; सच्चेपणाची शाल नाही. उलट गरिबांवरच अधिक विश्वास टाकता येतो याचा प्रत्यय आपल्याला ठायी ठायी येतो.
विश्वास असतो म्हणून तर आपण ठेवी ठेवतो.. विश्वास असतो म्हणून आपण विवाह करतो; विश्वास हा भागीदारीचा प्राण ठरतो आणि विश्वास हा वैद्यकाचा अव्यक्त आवाज ठरतो. रोज सकाळी कोणीतरी अनामिक; ना नात्याचे ना गोत्याचे असलेले आई-वडील त्यांच्या पोटचा गोळा माझ्या हाती शस्त्र चालविण्यासाठी हवाली करतात तो माझ्या शल्यकौशल्यामुळे नव्हे तर माझ्यावरच्या विश्वासाने, ही भावना मला नम्र करते. विश्वास विकासाच्या बरोबर विकसित व्हायला हवा. तंत्र वाढले म्हणून मनीचे मंत्र विसरू नये. स्कॅनर्स, एक्स-रेज् हे अपरिहार्य आहेत, पण त्याहीपेक्षा आवश्यक आहे दुसऱ्या व्यक्तीवर टाकलेला विश्वास.
विश्वास म्हणजे फसवणूक तर नाही ना? आपत्तीला आमंत्रण तर नाही ना? अंधविश्वास आणि अतिविश्वास या दोन टोकांमध्ये आपल्याला डोळस विश्वासाचा मध्यबिंदू गवसायला हवा. तो शोधणे हेच तर व्यवस्थापनाचे मर्म. तेव्हा विश्वास हवाच पण किती, कोणावर आणि कोठवर याचे तारतम्यही हवे.
विश्वास हा माझ्या मते दोरीवर चालणाऱ्या डोंबाऱ्याच्या कन्येसारखा; डोळे मिटून चाकू फेकीच्या चक्राला बांधून घेणाऱ्या खेळियासारखा असावा. तो वाढता वाढता वाढतो आणि सूर्यमंडळालाही भेदतो, पण वाढण्यासाठी तो आधी ठेवावा मात्र लागतो.