‘सा हेब, काही लोकांनी ह्य़ा दुष्काळाचं संधीत रूपांतर केलंय. खरं सांगायचं तर वेगवेगळ्या माफियांकडून दुष्काळ मुद्दाम पोसला जातोय. दुष्काळ पडणंच ह्य़ांच्या फायद्याचं असंल तर तो कशापायी हटवतील?’
.. दुष्काळी माण तालुक्यातील गोंदवले गावचे धनाजी पाटील इतरांपेक्षा वेगळं बोलत होते. नाशिकपासून नगर, पुणे, सातारा मार्गे सांगली जिल्ह्य़ापर्यंतच्या दुष्काळी टापूतील प्रवासात ते भेटले. त्यांची मांडणी स्वीकारली तर काही प्रश्न अनुत्तरीत राहत होते. पण बहुतांश उत्तरंही मिळत होती. पाटील मूळचे समाजशास्त्रज्ञ. पुण्यात शिकलेले. देशभर प्रवास करणारे; तरीही गावात राहणारे. त्यांची दुष्काळासंबंधातील मांडणी रंजक आहे. दुष्काळाशी संबंधित माफियांमध्ये पुढारी, टँकर लॉबी, चारा छावण्या चालवणारे, दुष्काळी कामांसाठी मशिनरी पुरवणारे, ठेकेदार अशा अनेकांचा समावेश होतो. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी नेतृत्व करणारी आहेत. ही मंडळी वेगवेगळ्या पक्षांची, गटांची असली तरी तालुक्याची दिशा ठरवतात. त्यांनीच दुष्काळाचे रूपांतर संधीत केले आहे. कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत दुष्काळात जास्त फायदा असेल तर दुष्काळ टिकून राहणेच त्यांच्या फायद्याचे नाही का? सातारा जिल्ह्य़ाच्या माण तालुक्यातील जनावरांच्या छावण्यांची यादी केली तर त्यात असेच लोक ‘लाभधारक’ असल्याचे पाटील यांनी नावांनिशी दाखवून दिले. इतर दुष्काळी भागांतही मोजके अपवाद वगळता हेच चित्र आहे.
राज्यात दुष्काळ यापूर्वीही पडले होते. पण यावर्षीच्या दुष्काळाचे वेगळेपण आता जाणवू लागले आहे. कोकण आणि विदर्भ ही राज्याची दोन टोकं सोडली तर मधला मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात त्याची तीव्रता भीषण आहे. विशेष म्हणजे गेली तीन वर्षे इथं पावसाची उतरती कमान आहे. गेली दोन वर्षे तर तो नसल्यासारखाच, असं लोक सांगतात. भागाभागानुसार काही फरक असेलही; पण एकूण परिस्थिती सारखीच आहे. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. नगर तालुक्यातील वाळकी हे बोलकं उदाहरण. हा परिसर जिल्ह्य़ाला संत्र्याची रोपं पुरवतो. आता पाण्याअभावी इथल्या बागा तरी जगतील का, ही चिंता आहे. टँकरने पाणी आणून बागा जगवण्याची कसरत केली जात आहे. काहींनी मात्र तो नाद सोडून दिलाय. तीच अवस्था ज्वारी-बाजरीची. एरवी या दिवसांत इथं शेतं मोकळी दिसत नाहीत. सर्वत्र रब्बीची पिकं दिसतात. पण आता नजर जाईल तिथवर जमिनी पडीक आहेत. पाणीच नाही, तर करायचं काय? काहींनी पहिल्या पावसावर पेरणी केली, पण पुढं पाणी नसल्याने कणसांत दाणे भरलेच नाहीत. असं ‘बाटूक’ पीक जागोजागी शेतात पडून आहे. वाळकी आणि देऊळगाव-सिद्धी या गावांदरम्यान ते प्रकर्षांने दिसतं. तिथं एक शेत तर गाळाची माती टाकून कांद्यासाठी तयार केलेलं दिसलं. पण पाऊसच आला नाही. त्यामुळे कुठं ज्वारी-बाजरी नाही. कुठं मूग- तूर- मटकी नाही. तर कुठं इतर काही.. मग तो नगर तालुका असो, साताऱ्याचा खटाव-माण तालुके असोत, नाहीतर सांगलीचे आटपाडी-जत तालुके!
पाण्याअभावी जनावरांची परवड होतेय. छावण्या चालवणाऱ्यांची धन होतेय हे खरं असलं तरी या छावण्यांनी जनावरांना आसरा दिलाय, हेही वास्तव आहे. पण काहींवर जनावरं कमी करायची वेळ आलीय. बऱ्याच कुटुंबांना कामासाठी स्थलांतर करावं लागलंय. माण तालुक्यात बिजवडी परिसरात अशा कहाण्या ऐकायला मिळतात. तिथले बापूराव गुंजवटे जवळच्याच जाधववाडीतलं उदाहरण देतात. काही कुटुंबं  इतरांकडे जनावरं सांभाळायला देऊन आणि लहान मुलांना वयस्कर मंडळींसोबत ठेवून शहराकडे स्थलांतरित झाली आहेत. पुढं पाऊस पडेल आणि सगळं पहिल्यासारखं होईल, या आशेवर लोक जगत आहेत.
दुष्काळ हा त्या वर्षांपुरताच सीमित नसतो, तर तो आपल्या खुणा मागे ठेवून जातो. या दुष्काळाचे परिणामही दीर्घकालीन असतील. ते या दुष्काळी पट्टय़ांत पाहायला मिळतात. आज अनेक शेतकऱ्यांचे स्वत:कडचे परंपरागत बियाणे जवळजवळ संपले आहे. दुसरा दीर्घकालीन परिणाम म्हणजे या दुष्काळातून पुन्हा नव्याने उभे राहायला शेतकऱ्यांना बराच काळ जाईल. यंदा दुष्काळाची तीव्रता वाढायला प्रमुख कारण ठरलंय- भूजलाचा अर्निबध उपसा! दुष्काळही त्यात भर घालतोय. कारण जमिनीतलं आहे-नाही ते सर्व पाणी उपसलं जातंय. त्याचे परिणाम येती किमान चार-सहा वर्षे तरी भोगावे लागतील.
आज निकड म्हणून दुष्काळाच्या नावाखाली वाट्टेल ती कामं काढली जाताहेत. सातारा जिल्ह्य़ात दहिवडी-म्हसवड रस्त्यावर पळशी फाटय़ाजवळ ३० मीटर बाय ३० मीटर आकाराचा खड्डा खणून कडेने मातीचे ढिगारे लावलेले दिसतात. माहिती घेतल्यावर समजले की, ते ‘शेततळं’ आहे. पण हे तळं उंचवटय़ावर आहे. पावसाचं वाहणारं पाणी त्यात जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे ते शंभर र्वष तसंच राहिलं तरी भरण्याची शक्यता नाही. अशा कामांना मुळात कृषी विभागाकडून मंजुरी मिळतेच कशी? उत्तराचा शोध घेतल्यावर गुपित कळतं ते असं : ते मंजूर करणाऱ्यांना पाणी साठण्याशी देणं-घेणं नसतं, तर आपल्या जवळच्यांकडून ते काम करून घेण्याशी मतलब असतो. लोकसुद्धा फुकटात होतंय म्हणून करून घेतात. अशा अनेक अव्यवहार्य योजनांचे डोलारे पेलण्याचा बोजा पुढची काही दशकं तरी आपल्या माथ्यावर असणार आहे.
दुष्काळाची हाकाटी करण्यात काहींचा फायदा असतो. त्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनाही जोडीला घेतले जाते. त्याचे सामाजिक परिणामही इथल्या लोकांना भोगावे लागत आहेत. ‘तुम्ही लोकांनी दुष्काळी भागाची इतकी ओरड केल्यामुळे आता आमच्या मुलांना मुली मिळणंही अवघड झालंय,’ असं काहीजण म्हणतात.
असे खोलवर परिणाम करणाऱ्या या दुष्काळाचे भवितव्य काय? तो कायमचा संपवता येईल का? किमान पुढील वर्षी चांगला पाऊस झाला तर त्यातून मार्ग निघेल का? त्यावर कायमचे उत्तर शोधले जातेय का? असे प्रश्न स्वाभाविकपणेच मनात येतात. पण दुष्काळ असणे ज्यांना सोयीचे आहे ते दुष्काळ घालविण्यासाठी का म्हणून प्रयत्न करतील? दुष्काळातील कामे मिळवणारे, छावण्या चालवणारे त्याचे लाभधारक आहेतच. शिवाय दुष्काळ आहे म्हणून ताकारी, म्हैसाळ, टेंभू यांसारख्या उपसा सिंचन योजनांची पाणीपट्टी ‘टंचाई निधी’तून भरली जात आहे. या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ बागायती करणाऱ्यांनाच होत आहे. दुष्काळ व टंचाई नसेल तर त्यांना पाणीपट्टी भरावी लागेल ना! मग या ‘अन्याया’मुळे या लोकांचा रोष पुढाऱ्यांनाही पत्करावा लागेल. त्यापेक्षा दुष्काळ असलेलाच बरा! दुष्काळ हटवण्याचा मार्ग खरंच आपल्या नेतृत्वाला माहीत नाही का? याच पट्टय़ात पाण्याबाबत स्वयंपूर्ण असलेल्या हिवरे बाजार (नगर तालुका), लोधावडे (माण तालुका) अशा गावांची उदाहरणे आहेतच की! खरंच उपाय करायचा असता तर या गावांप्रमाणे इतर गावेही पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न नेतृत्वाकडून झाला असता.
या भागात उपाय म्हणून काय करता येऊ शकतं, याचा दाखला याच भागात पाहायला मिळतो. फलटण आणि दहिवडी यांच्या दरम्यान असलेल्या मोगराळे गावात. इथं अतिशय उत्तम बारव आहे. इतिहासात पाण्याच्या व्यवस्थेसाठी गावात किती प्रयत्न केले गेले होते, याची साक्ष ही बारव देते. तेच गाव आता टँकरवर अवलंबून आहे. पण याच तालुक्यात लोधावडे गावाने मात्र या बारवेचा वारसा सांगावा असं उत्तम जलनियोजन केलं आहे. म्हणूनच पिण्याच्या पाण्याची चिंता सोडाच; पण शेतीलाही इथले लोक पाणी देऊ शकतात. गावच्या शिवारातील हिरवीगार पिकं त्याचा पुरावा आहेत. उन्हाळा येईल तसं शेतीचं पाणी बंद करून हे पाणी तालुक्याला पिण्यासाठी पुरवण्याचा निर्णय गावाने घेतला आहे. दुष्काळ हटवण्यासाठी साधे, मूलभूत उपाय गरजेचे आहेत हेच यावरून सिद्ध होते. शिस्त, सामंजस्य, एकजूट याच्या बळावर मूलभूत उपाय झाले तर दुष्काळ हद्दपार करणे शक्य आहे. पण दुष्काळाकडे ‘संधी’ म्हणून पाहणाऱ्यांची सरशी झाली तर मात्र पुढचा प्रलंयकारी दुष्काळ आपली वाटच पाहत असेल!   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा