प्रसिद्ध वास्तूरचनाकार नरेंद्र डेंगळे यांनी संपादित केलेला ‘महाराष्ट्रातील वास्तूकला परंपरा आणि वाटचाल’ हा द्विखंडात्मक ग्रंथ १३ एप्रिल रोजी पुण्यात प्रकाशित होत आहे. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या या सुमारे ८०० पानी प्रकल्पात सर्वच महत्त्वाच्या स्थळांची छायाचित्रे, नकाशे आणि वास्तूकलेचा तपशील सादर झाला आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील अंश.
हा ग्रंथ सर्वसामान्य मराठी वाचकासाठी आहे तसेच ज्यांना वास्तुकलेत अधिक रस आहे किंवा आणखी शोध घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा वास्तु-संदर्भ ग्रंथ आहे. विषयाचा आवाका मोठा आहे आणि कालखंडही तेवढाच मोठा. वास्तुकलेच्या इतिहासावर विपुल लेखन झालेले आहे. बहुतांशी हे लेखन पुरातत्त्वशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार यांच्या शोध-निबंधांतून आणि ग्रंथांतून वाचायला मिळते. अनेक दृक-श्राव्य माध्यमातून आणि विकिपीडियावर पर्यटक, वास्तुप्रेमींची वर्णने आणि निरीक्षणे वाचायला मिळतात. भारतातील वास्तुकलेवर बरेच लिखाण इंग्रजी, युरोपीय आणि भारतीय इतिहासकारांनी केलेले आहे.
जागतिक वास्तुकलेच्या ग्रंथांमध्येही भारतातील वास्तुकलेचा उल्लेख किंवा वास्तु-इतिहासावर काही प्रकरणे मिळतात. काही प्रमाणात महाराष्ट्रातील काही वास्तुकारांनी/ कला-इतिहासकारांनी इंग्रजीमधून वास्तु-इतिहासावर लेखन केलेले आहे, परंतु हे लिखाण काही विशिष्ट विभागातील, धर्मनिगडित अथवा शैलीवर विवेचन केलेले आहे. सबंध महाराष्ट्रातील वास्तुकलेवर कोणताही एक ग्रंथ अजून उपलब्ध नाही. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे वास्तुकलेचा इतिहास नव्हे, परंतु वास्तुकारांच्या दृष्टिकोनातून टिपलेले प्राचीन वास्तुकला आणि इतिहासातील महत्त्वाचे सर्व टप्पे, शैक्षणिक आणि स्थानिक संदर्भ, व्यावसायिकता, पुरस्कारित वास्तू व वास्तु-संकुले, तसेच सद्याकालीन वास्तुकला यांवर संकलित आणि काही वैचारिक भूमिकेतून केलेले लिखाण सोदाहरण वाचकाला उपलब्ध व्हावे हे या ग्रंथाचे उद्दिष्ट आहे.
वास्तुकला कशाला म्हणता येईल? बहुतेक लोक वास्तुकलेची व्याख्या कुठल्याही इमारतीच्या बांधकामाशी जोडतात. आणखी अनेक लोक वर्तमानपत्रातील बांधकामविषयी पुरवण्या पाहून त्यामधील प्रतिमा म्हणजेच वास्तुकला असे गृहीत धरतात. इतर काही जगातील सुंदर ऐतिहासिक इमारतींना भेट देऊन प्रभावित झालेले असतात व त्यांची वास्तुसौंदर्याची संकल्पना म्हणजे ‘अशाच नमुनेदार वास्तूंना तशाच सौंदर्य-गुणांसकट आणि अवकाश रचनेसह तसेच आकारबद्ध करणे होय’ अशा पद्धतीची झालेली असते. परंतु वास्तुकलेची व्याख्या जर ‘आकाराला घडवणे’ अशी मनात ठसवली तर त्यामधून विवक्षित दृश्याकाराचे घटक आणि त्यामधील अंतर्गत-संघटनाचे तत्त्व असे तिचे स्वरूप होऊन ती तंत्रामध्येच घोटाळत राहील.
परंतु या पद्धतीची मीमांसा जेव्हा आक्षेपार्ह वाटू लागते व आपण प्राचीन समूहांनी वास्तुकलेकडे कसे पाहिले होते हे तपासू लागतो तेव्हा असे ध्यानात येते की, अशा व्याख्येला अनेक स्तरांवर पाहावे लागेल. पृष्ठभागावरून अधिक खोलवर जीवसृष्टीमधील परस्पर अवलंबित नातेसंबंध ओळखून अधिक सूक्ष्म स्तरावर पाहावे लागेल. प्राचीन संस्कृतींनी समग्र जीवन-प्रक्रियेकडे सूक्ष्मपणे पाहायचा प्रयत्न केला होता. अशा प्रयत्नात ना केवळ मनुष्य आणि समाज यांना समोर ठेवले गेले होते तर त्या दृष्टीमध्ये जीव-सृष्टी व पृथ्वीतलावरील निसर्ग समाविष्ट होते.
वास्तुकलेत ही मूल्ये अंतर्भूत ठरतात. या मूल्यांना सामोरे ठेवून जेव्हा वास्तुकला साकार होऊ लागते तेव्हा अशी प्रक्रिया, स्व-प्रेषक- त्यामधील वावर करणारी व्यक्ती- तेथील निसर्ग-कामगार व त्याचबरोबर आपल्या जीवसृष्टीचे स्वरूप या सर्वांसाठी परिवर्तनीय ठरते. वास्तुकलेतील क्रिया सर्वप्रथम आत्मिक असून अनेक दैनंदिन अडचणींतून मार्ग काढत ती स्वत:चे आकार-रूप शोधण्यात गुंतलेली असते. वास्तु-व्याख्या जेवढी उपचार व तपशिलात शिरेल तेवढी ती आत्मिक-प्रकाशाला वंचित ठरणार. अनुभवाच्या सूक्ष्म स्तरावर भाष्य करताना निसर्गदत्त महाराज सांगतात, ‘‘सत्य हे शोधप्रक्रियेत असते, शोध-सिद्ध वस्तूत नव्हे.’’
वास्तुकला आजतागायत सर्वसामान्य लोकांपर्यंत पुरेशी न पोहोचलेली कला आहे. जगभर फिरणारे प्रवासी प्रामुख्याने वास्तुकला बघत फिरून येतात. अशा पर्यटनातून ते नक्कीच काही बरे-वाईट संस्कार घेऊन मायदेशात परततात. तरीही वास्तुकलेला मिळणारा विचक्षण प्रणेता विरळाच असतो. जगाच्या पाठीवर अनेक इमारती बांधून झाल्या आहेत, नवी शहरे वसत आहेत, प्राचीन आणि जुन्या इमारती पडून तेथे नवे प्रकल्प घडून येत आहेत, तर काहींचे संवर्धन जोमाने चालू आहे. वास्तु-नगररचना-निसर्गरचना ही एक उतरंड म्हणून ओळखायला हवी. त्यामध्ये आंतरिक दुवा असतो आणि या सर्वांच्या द्वारे मनुष्याच्या वसाहतींचे आलेखन करण्याचा प्रयत्न घडत असतो.
भारतात किमान गेले एक शतक वास्तुकलेतील व्यवहार इंग्रजीतूनच होत आलेला आहे. त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. स्थानिक भाषांचा वापर मर्यादितरीत्या आणि बहुतेक ठेकेदार, कामगार, कारागीर यांच्याशी होणाऱ्या प्रक्रियेत केला जातो. जरी अनेक प्रणेते स्थानिक भाषेतच कल्पना मांडत असले तरीही विचारविनिमय, कल्पना आणि संकल्पना आराखडे, बांधकाम-नकाशे बनवायची पद्धत इत्यादी सर्व महत्त्वाची प्रक्रिया इंग्रजीतूनच होत असते.
या क्षेत्रात कोणते कार्य श्रेष्ठ- असामान्य म्हणायचे, सामान्य आणि असामान्य यामध्ये फरक तो नेमका कोणता, यामधील शोधकार्य कसे चालते, त्यापुढे कोणते विषय व प्रश्न असतात वगैरे चर्चा वास्तुकलेच्या क्षेत्रातच घुटमळलेली आहे. ती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. स्थानिक भाषांमध्ये त्याबद्दल पुरेसे लिहिले गेलेले नाही आणि जे लिहिले गेले आहे ते लेखन वाचकांपर्यंत पोहोचले आहे असेही ठामपणे म्हणता येणार नाही. म्हणून या ग्रंथाद्वारे सर्व सामान्य मराठी वाचक, तसेच मराठीतील इतर शाखांमध्ये काम करणारे विद्वान आणि बुद्धिजीवी यांच्यासमोर वास्तुकलेचे समग्र रूप मांडायचा हा प्रयत्न आहे. याचबरोबर याचीच इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित करण्याला महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाने मान्यता दिल्यामुळे दोनही भाग इंग्रजीतही उपलब्ध होतील.
वास्तुकलेला लोकाभिमुख व्यासपीठ निर्माण करण्याच्या हेतूने काही प्रयत्न झालेलेही आहेत. त्यामध्ये गेल्या तीन दशकांत समकालीन वास्तुकारांनी भारतातील वास्तुकलेवर आजपर्यंत किमान तीन महत्त्वाची प्रदर्शने आयोजित केलेली आढळतात. पहिले महत्त्वाचे प्रदर्शन १९८६ साली ‘ India Festival, Paris’च्या निमित्ताने पद्माविभूषण चार्ल्स कोरिया यांच्या पुढाकाराने ‘विस्तार’ या शीर्षकाखाली आयोजित झाले होते. ते प्रदर्शन इतरही युरोपीय देशांमध्ये घडवून आणले गेले होते.
‘विस्तार’चा वैचारिक आराखडा : १. आधुनिकता- भविष्यकाल यांचा शोध, २. वास्तुकलेची ‘पाळे-मुळे’- संस्कृतीचा अंतर्गत सांगाडा, आणि ३. भविष्याकडे बघताना- नव्या विस्ताराची सुरुवात- अशा शीर्षकांखाली आखण्यात आला होता. चार्ल्स कोरिया त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘‘आपण एका मूर्त जगात जगत असतो. तरीही अनादी कालापासून मनुष्याला त्याच्या प्रातीभ-ज्ञानातून दुसऱ्या जगाची- अजूनही आकारबद्ध न झालेल्या जगाची- जाणीव होत आलेली आहे.
या जगाची जाणीव आपले दैनंदिन जीवन अधोरेखित करत असते आणि त्यातूनच आपण हे जीवन पेलू शकत असतो. धर्म, दर्शने आणि कला यांच्याद्वारे आपण आपल्या अमूर्त जगाच्या संकल्पनेच्या शोधार्थ असतो आणि त्याच माध्यमातून संवाद साधत असतो. वास्तुकलाही अशाच मिथकांवर आधारित असते, आणि वास्तव जगात साकारताना ती त्याहूनही अधिक सखोल, गहन अशा वास्तवाचे अस्तित्व व्यक्त करत असते.’’
त्यानंतर २०१५-१७ मध्ये दिल्ली येथील NGMA मध्ये वास्तुकार पद्माश्री राज रेवाल आणि वास्तुकार पद्माश्री बाळकृष्ण दोशी यांच्या योगदानावर एकामागून एक घडून आलेली, प्रत्येकी महिनाभर चाललेली, दोन प्रदर्शनेही महत्त्वाची. त्यानंतरचे २०१६-१७ मधील प्रदर्शन म्हणजे- वास्तुकार राहुल मेहरोत्रा, कवी रणजीत होसकोटे आणि वास्तुकार कैवान मेहता यांनी घडवून आणलेले- ‘ State of Architecturel. त्यामागील वैचारिक भूमिका काहीशी निराळी होती.
त्यात व्यावसायिकता, स्वातंत्र्यपूर्व आणि पश्चात काळातील राजकीय घडामोडी, आणीबाणी अशा चौकटीतून वास्तुकलेची सद्या:स्थिती काय आहे, वास्तुकला कोणासाठी, त्यातील समीक्षेचे स्थान किती मजबूत आहे, इत्यादींची मांडणी केली गेली होती. त्यानिमित्ताने चर्चासत्रे, परिसंवादही मुंबईत आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन आणि चर्चासत्रे तीन महिने मुंबईच्या IGMA मध्ये घडवून आणण्यात आले होते. या तीन प्रदर्शनांतून भारतातील वास्तुकारांची भूमिका, कार्यभाग, कारकीर्द, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिकता आणि शासनाची वास्तुकलेबाबतची भूमिका काहीशी सुस्पष्ट होते. परंतु ही प्रदर्शने सामान्य जनतेने कितपत पाहिली आणि त्यामधील चर्चेत कितपत रस घेतला, हा प्रश्नच आहे.
या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर घडून आलेल्या प्रदर्शनांखेरीज स्थानिक स्तरावर बहुतेक सर्व महाविद्यालये वर्षाअखेरीस त्यांच्या विद्यार्थ्यांनी पाच वर्षे केलेले काम लोकांसमोर प्रदर्शनांद्वारे मांडू लागली आहेत. त्यांतून पालक, शासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांसमोर वास्तुकाराची दृष्टी काय असू शकते, हे काही अंशी समोर येते असे म्हणायला हरकत नाही. अशा प्रदर्शनात नकाशे आणि मॉडेल्स यांखेरीज काही दृक-श्राव्य फितीही असतात, तसेच काही व्याख्याने आणि चर्चाही त्यांच्याअंतर्गत आयोजित केल्या जातात. परंतु अजून वास्तुकाराचे नकाशे सर्वसामान्यांना वाचता येत नाहीत व त्यातून पुरेसा बोध करून घेता येत नाही हे वास्तव आहे.
मराठी वाचकांपर्यंत काही आस्वादात्मक, सामाजिक भूमिकेतून लिहिलेले, स्तुतिपर, वर्णनात्मक लिखाण वृत्तपत्रीय माध्यमातून आणि फुटकळ लेखांतून मांडण्यात आले आहे. परंतु त्यामधून पुरेसा सर्वांगीण विचारव्यूह समोर आला आहे असे म्हणता येत नाही. या ग्रंथाद्वारे वास्तुकलेविषयीचा समग्र दृष्टिकोन समोर यावा, त्यामधील निरनिराळे विचार, पदर, प्रक्रिया आणि त्यांच्या सीमारेषा ओळखता याव्यात असे वाटते.
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाने मला हा ग्रंथ लिहिण्यासाठी फेब्रुवारी २०१८ मध्ये जेव्हा पाचारण केले तेव्हा या प्रकल्पाचा पूर्ण आवाका माझ्या ध्यानात आला होता असे म्हणता येणार नाही! परंतु त्यावर काम करत जाताना अनेक बाबींचा आराखडा समोर तयार होऊ लागला. सह-संपादनासाठी वास्तुकार-अध्यापक सर्वश्री मीनल सगरे, चेतन सहस्राबुद्धे आणि पुष्कर सोहोनी यांना मी आमंत्रित केले. त्यांनीही उत्साहाने आणि तेवढ्याच क्षमतेने त्यात योगदान दिले आहे.
किंबहुना त्यांच्या योगदानाशिवाय हा ग्रंथ मला संकलित करता येणे अशक्यच होते! कोल्हापूर, पुणे-मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहरांना तसेच कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश येथील गावांना प्रत्यक्ष निरीक्षणासाठी तसेच काही वास्तुकला महाविद्यालयांनाही आम्ही भेटी दिल्या; तेथील दस्तऐवज तपासले. संकलित वास्तु-नमुन्यांचे पुनर्रेखन करणे आवश्यक होते. अनेक तरुण वास्तुकार आणि विद्यार्थी यांच्या साहाय्याने माझ्या स्टुडिओत हे कार्य करण्यात आले. तसेच पुण्यात जुलै २०१८ मध्ये एक कार्यशाळा घेतली. त्यामध्ये २१ नामवंत अध्यापक आणि व्यावसायिक वास्तुकार सहभागी झाले होते.
या ग्रंथाची मांडणी दोन खंडांत केली आहे. पहिल्या खंडात ‘परंपरा’ हा बीज-निबंध, त्याशिवाय वास्तुकलेच्या विविध अंगांवर व्यवसाय, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रांत कार्यरत असलेल्या काही वास्तुकारांनी लिहिलेले निबंध समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्रातील सहाही भागांतील वास्तु-उदाहरणे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात वास्तुप्रकारावर नोंदी, नगररचना आणि लोकवसाहती यावर टिपा आणि वास्तुकलेचे त्यामधील स्वरूप असे विचार मांडले आहेत.
दुसऱ्या खंडात ‘वाटचाल’ हा बीज-निबंध, विभागीय नकाशे, दृश्य सूची : परंपरेतील उदाहरणे, वाटचालीतील उदाहरणे व त्यावरील टिपा, आराखडे, वास्तुबारकाव्यांसकट समोर मांडले आहेत. याखेरीज शब्दसूची, संदर्भ ग्रंथांची यादी, महाराष्ट्रातील वास्तुकलेवर मराठीतील व इंग्रजीतील प्रकाशित निबंधांची व पुस्तकांची यादी, महत्त्वाची पारितोषिके, शिक्षण संस्था, वास्तुवारसा संपर्क सूची, मराठी-इंग्रजी ग्रंथ सूची यांचा समावेश खंड १ मध्ये केला आहे. या ग्रंथाद्वारे सर्वसामान्य मराठी वाचकाला कला-स्थानिक संदर्भ; राजकीय- सामाजिक- आर्थिक जाणिवा आणि त्याविषयक वास्तुकारांचा दृष्टिकोन, त्यांचा शोध-प्रवास आणि कलाजाणीव, व्यावसायिक धडपड यांची ओळख व्हावी आणि यांचा आलेख लोकांसमोर यावा अशी कल्पना आहे. हा संदर्भग्रंथ वास्तुकलेविषयी अधिक रस आणि कुतूहल जागृत करील आणि त्यामधून पुढेही चर्चा चालूच ठेवली जाईल ही आशा आहे.