रघुनंदन गोखले
बुद्धिबळ हा बुद्धिवंतांचा खेळ. चौसष्ट घरांच्या या ‘सोंगटीपटा’ला आत्मसात करणे सोपे, पण त्यात असामान्य कौशल्य प्राप्त करणे भल्याभल्यांना अप्राप्य. हा खेळ मुलांना लहानपणापासून गांभीर्याने शिकविण्याकडे पालकांचा कल जगभरात वाढत चालला आहे. पुढील वर्षभर माजी बुद्धिबळपटू आणि प्रसिद्ध प्रशिक्षक रघुनंदन गोखले या नव्या सदरातून या खेळामधील आपल्या अनुभवांसह अनेक किश्शांना सादर करणार आहेत. पहिला मासला दिग्गज बुद्धिबळपटूंच्या प्रतिभाक्षमतांविषयीचा..
‘‘तुम्ही काय बुवा, बुद्धिमान!’’ असं ऐकायला मिळालं की आम्हा बुद्धिबळपटूंचा अहंकार जरा नाही म्हटलं तरी खुलतोच! आणि आमच्यातले काही लोक तर स्वत:ला खरोखरच बुद्धिमान समजायला लागतात. सतत बुद्धीचा आणि स्मरणशक्तीचा वापर करून आमची बुद्धिमत्ता जरा खेळात तीक्ष्ण होते, पण घरून बाजारात जाताना दिलेल्या यादीतील ५ पैकी ३ गोष्टी आठवत नाहीत हेच खरं!
काही बुद्धिबळ खेळाडू (विशेषत: जगज्जेते) उदाहरणार्थ, मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, गॅरी कास्पारोव्ह यांच्या प्रखर बुद्धिमत्तेविषयी दुमत नाही. त्यांची स्मरणशक्ती, त्यांची कोणताही विषय लगेच आत्मसात करण्याची हातोटी यांच्या सुरस, पण सत्यकथा सगळय़ा जगभर प्रसिद्ध आहेत.
उदाहरणार्थ, सध्याचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन अगदी लहान असताना त्याच्या पालकांनी त्याला बुद्धिबळपटू बनवण्याचं का ठरवलं माहिती आहे का? मॅग्नसनं वयाच्या ७-८ व्या वर्षी वेळ घालवण्यासाठी त्याच्या ओस्लो शहराची टेलिफोन पुस्तिका पाठ करून टाकली होती. ओस्लो ही नॉर्वे देशाची राजधानी आणि तिची लोकसंख्या आज १७ लाख आहे. अशी दैवी स्मरणशक्ती असणारा मॅग्नस जगज्जेता नाही झाला तरच नवल.
पण थांबा! सर्व बुद्धिबळपटूंना एकाच तागडीत तोलू नका. प्रसिद्ध बुद्धिबळ लेखक इरविंग चेरनेव यानं एक गंमत आपल्या पुस्तकात लिहिली आहे; जेणेकरून स्वत:ला जगातील सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालय समजणाऱ्या केम्ब्रिजचा तिळपापड झाला. १८८३-८५ च्या दरम्यान पत्राद्वारे एक सामना खेळला गेला होता. दोन संघ होते- केम्ब्रिज विद्यापीठ विरुद्ध बेडलॅम येथील वेडय़ांचं प्रसिद्ध इस्पितळ! पोस्ट कार्डवर दोन्ही संघ आपल्या चाली पाठवत होते. असं तब्बल दीड वर्ष चाललं आणि अखेर २५ चालींनंतर केम्ब्रिज संघानं आपला पराभव मान्य केला. याचा अर्थ सर्व चांगले बुद्धिबळपटू वेडे असतात किंवा वेडेच चांगले बुद्धिबळपटू असतात असा निष्कर्ष कृपया काढू नये.
बुद्धिबळपटूची स्मरणशक्ती यावर आजपर्यंत अनेक खऱ्या-खोटय़ा आख्यायिका प्रसिद्ध आहेत. भारताचा जगज्जेता विश्वनाथन आनंद असाच एक महान खेळाडू आहे, ज्याला देवदत्त (की दैवदत्त) स्मरणशक्तीचं वरदान आहे आणि त्या अनेक गोष्टींना मी साक्षी होतो. महाराष्ट्राचा माजी खेळाडू हेमंत देशमुख आनंद बरोबर मुंबई आय.आय.टी. येथे १९८३ साली झालेल्या राष्ट्रीय सांघिक स्पर्धेत हरला होता. ती होती आनंदची पहिलीवहिली राष्ट्रीय पुरुषांची स्पर्धा. त्यानंतर आम्ही तिघे एकत्र आलो ते पुण्यात झालेल्या राष्ट्रीय जलदगती बुद्धिबळ सामन्यासाठी. ते वर्ष होतं १९८९. मध्यंतरीच्या काळात आनंद ग्रँडमास्टर झाला होता. त्याची आणि हेमंतची भेट झाली त्या वेळी मी म्हटलं की, तुम्ही दोघं खेळला आहात. आनंदनं प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडं पहिलं आणि विचारलं, ‘‘कधी?’’
मी म्हणालो, ‘‘१९८३ साली मुंबई मध्ये.’’ आनंद लगेच म्हणाला, ‘‘ओह, बेनोनी बचाव, उंटानं घोडा मारून मी जिंकलो होतो.’’ त्याला हेमंतचा चेहरा आठवत नव्हता, पण त्यानं खेळलेला डाव मात्र पूर्ण लक्षात होता.
हॅरी नेल्सन पिल्सबरी हे १९व्या शतकातील एक अफलातून व्यक्तिमत्त्व होतं. त्याच्या स्मरणशक्तीच्या कथा आपल्याला स्तिमित करून सोडतात. एकदा पिल्सबरीनं आपल्या स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचं प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं. ४ जणांमध्ये व्हाइस्ट नावाचा पत्त्यांमधील एक कठीण डाव खेळताना एकीकडे पटाकडे न बघता त्यानं १० जणांशी बुद्धिबळ सामने खेळायला सुरुवात केली. व्हाइस्टमध्ये तर तोच जिंकला, पण १० बुद्धिबळाच्या सामन्यांपैकी त्यानं तब्बल ९ जिंकले आणि एका डावात त्यानं बरोबरी घेतली.
अमेरिकन मानस शास्त्रज्ञांनी पिल्सबरीला अतिशय कठीण परीक्षेतून जायला भाग पाडलं होतं. लिहाय विश्व विद्यालयाच्या प्रोफेसर मेरियम आणि बेथेलहॅम विश्व विद्यालयाच्या डॉक्टर एडवर्डस यांनी त्याला एक कागद दिला. अट होती- पिल्सबरीनं तो एकदाच वाचायचा. त्यावर विज्ञान विषयातील अतिशय कठीण ३० शब्द लिहिले होते. मी इथं यामधले फक्त पाच शब्द देतो आणि त्यावरून तुम्हाला एकूण कल्पना येईल. ANTIPHLOGISTLAN , STEPHALOCOCCUS , TAKADIASTNSE , OOMSILLECOOSTNI , BANGVOMMVATTO.हुश्श्श!
पिल्सबरीनं तोच कागद एकदा वाचला आणि ते सगळे कठीण शब्द १ ते ३० म्हणून दाखवले. नंतर त्यानं तेच शब्द उलट-सुलट म्हणूनही दाखवले. टाळय़ांचा कडकडाट झाला. पण परीक्षा इथंच संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी पिल्सबरी झोपून उठला तर प्रोफेसर जोडी हजर होती. त्यांनी पिल्सबरीला ते शब्द पुन्हा म्हणायची आठवण केली. महाशय झोपून उठले होते. शास्त्रज्ञांची ब्याद कटवण्यासाठी पिल्सबरीनं तेच ३० शब्द उलटसुलट म्हणून दाखवले.
हल्ली यू टय़ूबचा जमाना आहे. शोध काढला तर तुम्हाला मॅग्नस कार्लसननं तब्बल १० जणांना डोळय़ावर पट्टी बांधून हरवतानाचा व्हीडिओ बघता येईल. ब्लाइंडफोल्ड प्रकार हाही एक चमत्कार आहे. त्यावर पुढे कधीतरी सावकाश लिहिता येईल. स्मरणशक्ती जेवढी वाढवाल तेवढी वाढवता येते असे मानतात. कसलेल्या बुद्धिबळपटूचे तर शेकडो डाव लक्षात असतात. आणि त्यावर नवीन नवीन डाव वाढत असतात. परंतु हेच महान बुद्धिबळपटू एककल्लीही असतात. एक गंमत सांगतो, पूर्वीच्या युगोस्लाव्हियाचा ग्रँडमास्टर स्वेतोझर ग्लिगोरीचची! तो एक स्पर्धा खेळत होता आणि डाव ऐन रंगात आला होता. मधेच त्याला कॉफी पिण्याची लहर आली आणि विचार करत करत तोच कॉफीच्या टेबलकडे निघाला. वाटेत एका बाईनं त्याच्याकडे बघून गोड हास्य केलं. ग्लिगोरीच म्हणजे साक्षात विनय आणि सभ्यता! त्यानं आपली हॅट उंचावून त्या महिलेला अभिवादन केलं आणि ‘‘कशा आहात तुम्ही?’’अशी विचारणा केली. कॉफी घेऊन आपल्या टेबलवर येऊन विचार करू लागला. डाव संपल्यावर हॉटेलवरच्या आपल्या खोलीत आल्यावर त्याला जोरदार फायिरगला तोंड द्यावं लागलं, कारण ती महिला म्हणजे त्याची पत्नी होती. भर लोकांमध्ये तिला ओळख न दाखवून त्यानं तिचा अपमान केला होता.
तीच गोष्ट अकिबा रुबीनस्टाइन या महान खेळाडूची. कॉफी घेऊन आपल्या टेबलवर रुबीनस्टाइन आला त्या वेळी त्याचा प्रतिस्पर्धीही जागेवर नव्हता. रुबीनस्टाइन चुकून त्या प्रतिस्पर्ध्याच्या जागेवर बसला आणि विचार करू लागला. पठ्ठयाला एवढंपण लक्षात आलं नाही की, आपण विरुद्ध बाजूनं विचार करत आहोत. तो प्रतिस्पर्ध्याची चाल खेळणार होता तेवढय़ात प्रतिस्पर्धी खेळाडू धावत आला आणि त्यानं रुबीनस्टाइनला थांबवलं.
असे हे महान खेळाडू आणि अशा त्यांच्या रंजक आठवणी..
gokhale.chess@gmail.com