२४ एप्रिलला महाराष्ट्रातले मतदान संपले आणि महाराष्ट्रापुरता तरी निवडणुकांचा हंगाम थंडावला. त्यानंतर आठवडाभरताच १ मे रोजी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा झाला. महाराष्ट्र दिनाच्या आगेमागेच दोन घटना घडल्या. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावी नितीन आगे या दलित मुलाची क्रूर हत्या करून त्याला मारणाऱ्यांनीच मरणोत्तर फाशी दिले. या पाश्र्वभूमीवरच दिल्लीत नागनाथ मंजुळे या तरुण दिग्दर्शकाने त्याच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटासाठी प्रथम पदार्पणातला सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि चित्रपटाचाही पुरस्कार स्वीकारला!
या दोन घटनांना महत्त्व अशासाठी, की ज्या गोष्टीसाठी नितीन आगेला आपला जीव गमावावा लागला, त्याच पौगंडावस्थेतील प्रेमाच्या विफल कहाणीचा ‘फॅन्ड्री’चा नायक जब्या हासुद्धा नितीनप्रमाणं समाजाने बहिष्कृत केलेल्या, मागास ठरवलेल्या आणि आजही शूद्र कामं करणाऱ्या दलित जातीतला मुलगा. जब्या पडद्यावर जिवंतपणीच मरण भोगतो; नितीनने खरं मरण भोगलं.
‘मराठी चित्रपटांनी ‘श्वास’नंतर कात टाकली!’ या वाक्यानंही कात टाकावी अशी वेळ आली आहे. आपल्या मराठी लोकांना एखादं यशही शतकानुशतकं पुरतं. अटकेपार झेंडे हे त्याचंच उदाहरण! आमची आजची सर्वोत्तम झेप ही आम्ही अटकेपार झेंडे म्हणून साजरी करतो.
तर या दोन वर्षांत ‘दुनियादारी’, ‘बालक पालक’, ‘शाळा’, ‘टाइमपास’, ‘फॅन्ड्री’ असे प्रेमाचे आणि मुख्यत: पौगंडावस्थेतील लैंगिक बदल, आकर्षण, उत्सुकता आणि प्रेम यावर भाष्य करणारे चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांनी घवघवीत यश मिळवलं. यातील ‘दुनियादारी’ हा सत्तर-ऐंशीच्या दशकातील सुहास शिरवळकर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर बेतलेला चित्रपट. ‘दुनियादारी’वर याआधीही एक चित्रपट बनवला गेलाय. एक मालिकाही बनलीय. (अजून नाटक यायचंय! ‘बालक पालक’वर नाटक येतंय, तसं ‘दुनियादारी’वरही करण्याचं धाडस कुणीतरी करू शकतं!) पण संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ने विक्रम रचला. ‘दुनियादारी’ प्रेमात पडायच्या वयातलाच सिनेमा होता; त्यामुळे तो या इतर चित्रपटांच्या तुलनेत येऊ शकत नाही.
मात्र, ‘दुनियादारी’तली प्रेमाची भाषा ‘बीपी’, ‘टाइमपास’, ‘शाळा’ यांच्याशी एकाच नाळेने बांधली गेलेली आहे. ‘दुनियादारी’मधली पात्रं वास्तव जगातली असूनही हिंदी चित्रपटासारखी व्यक्तिरेखांची सामाजिक-कौटुंबिक पाश्र्वभूमी, राहण्याच्या जागा आणि काही ठिकाणी वेशभूषेमुळे ती वरवरच्या पातळीवरच राहतात.
‘शाळा’, ‘बीपी’ आणि ‘टाइमपास’मधून गावातली/ शहरातील मध्यम व उच्च जातींची भाषिक प्रतिमा उभी केली जाते. अर्थात ती जाणीवपूर्वक नाही, तर कथानकाच्या ओघात येते. ‘शाळा’, ‘बीपी’ आणि ‘टाइमपास’ या तिन्ही चित्रपटांतील वेगळय़ा भाषेत बोलणारी पात्रं ही त्यांच्या पात्रनिवडीतूनच कुठल्या जाती-वर्गातील असतील हे कळतं. साधारण रासवट, व्याकरणाचे धिंडवडे उडवणारी, आक्रमक, तर काही वेळा द. मा. मिरासदारांच्या कथांमधून भेटणाऱ्या पात्रांसारखी ‘इनोसन्ट’ वाटणारी ही पात्रं! या प्रतिमा अशा का उभ्या राहतात, याचं उत्तर आपल्याला ‘फॅन्ड्री’त मिळतं! कारण आपण कितीही समानतेच्या गोष्टी केल्या, कायदे केले तरीही आपली मानसिकता नाव, आडनाव, रंग, रूप, भाषा यांतून जातीचा शोध घेतच राहते. वरकरणी बदल असे दिसतात की वाटावं, कोण म्हणतं हा समाज जातीयवादी आहे? आजही २०१४ साली विवाहविषयक जाहिरातीत ‘जातीची अट नाही (SC/ ST. EXCUSE!) अशी जाहिरात छापून येते. ‘SC/ ST. EXCUSE’ असं इंग्रजीत म्हटल्याने जातीयवादाची तीव्रता कमी होते? पुन्हा ते ‘इनटू ब्रॅकेट’ टाकून आम्ही काय सुचवतो? धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आला की मुस्लिमांच्या नावाने गळे काढणाऱ्यांना हे ‘जातवास्तव’ दिसत नाही? या अशा जाहिराती हा प्रामाणिकपणा म्हणून धरायच्या की जातीयवादी म्हणून?
तर मुद्दा पुन्हा सिनेमा, प्रेम आणि सामाजिक वास्तव याकडे आणूया. ‘बीपी’ प्रदर्शित झाल्यावर ‘शालेय मुलांना लैंगिक शिक्षण द्यावं का? नवीन तंत्रज्ञान मुलांना न कळत्या वयात लैंगिक चेतना जागृत करायला प्रोत्साहित करताहेत का?’ आणि त्यातून उद्भवणारे छोटे-मोठे गुन्हे यावर चर्चा सुरू झाल्या. चित्रपटात या प्रश्नाची उत्तरं नाहीतच; परंतु यातून उद्भवणारे प्रश्नही न मांडता केवळ वस्तुस्थिती मांडलीय. प्रश्नांची चर्चा चित्रपट संपल्यावर अपेक्षित आहे; जी थोडय़ाफार प्रमाणात झाली. तरीही ‘बीपी’ या नावाचा ‘बालक पालक’ असा विस्तार करून मुख्यत: मनोरंजनावरच भर दिला गेला होता.
‘शाळा’ हा चित्रपट मिलिंद बोकील यांच्या याच नावाने गाजलेल्या साधारण साठ-सत्तरच्या दशकातल्या पौगंडावस्थेतल्या मुलांच्या लैंगिक, प्रेम, आसक्ती, आकर्षण या भावनांचे चित्रण करणाऱ्या कादंबरीवरून तयार केला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके परदेशातून चित्रपटाचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊन आलेला आहे. पण भारतीय खेडय़ाच्या.. त्यातही ६० च्या दशकातल्या समाजवास्तवाचा त्याला परिचय नसल्याने स्लिव्हलेस ब्लाऊज आणि मोठं फूल माळून शिकवणारी शिक्षिका या प्रशिक्षित दिग्दर्शकाच्या चित्रपटात दिसते. परदेशात चित्रपटाचं प्रशिक्षण देताना कथेच्या सामाजिक अंगाचा अभ्यास करावा हे शिकवतात की नाही, असा प्रश्न अशा व्यक्तिरेखा पाहून पडतो. यातही आधी म्हटल्याप्रमाणे उच्च, मध्यम, कनिष्ठ जातिवर्गाचे चित्रण पात्रनिवड, भाषा आणि वर्तन यातूनच घडवले जाते. अशा पात्रनिवडीला डॉ. जब्बार पटेल यांनी ‘मुक्ता’मध्ये अविनाश नारकरला घेऊन छेद दिला होता.
अशीच परिस्थिती ‘टाइमपास’मधल्या दगडू आणि प्राजक्ताची. रिक्षावाला आणि उच्चवर्णीय (हे आडनावावरून आपण धरून चालायचे.) ज्युनियर क्लार्क बाप असणाऱ्या मुला-मुलीची ही शहरी लव्हस्टोरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत निव्वळ ‘टाइमपास’च करत राहते. यातला दगडू हा नावापासूनच अतिरिक्त रासवटपणा, अनावश्यक भाषिक रांगडेपणा मिरवत राहतो. याउलट प्राजक्ता! दोन भिन्न वर्गाचे ठोकळेबाज व्यक्तिरेखांकन आणि ‘फू बाई फू’चा दोन तासांचा एपिसोड केल्यासारखा हा चित्रपट शीर्षकाशी सर्वागाने इमान राखतो. एरवी ‘बोल्ला, चाल्ला, गळपटला’ असं बोलणारा नायक गाण्यात मात्र ‘मला वेड लागले प्रेमाचे..’ वगैरे असं पाडगावकरी शैलीतलं गाणं म्हणताना किंवा व्यक्त होताना दिसतो! आणि गंमत म्हणजे प्राजक्ता दगडूच्या भाषेत बोलायला लागल्यावर पालकांना धक्का बसतो आणि प्रेक्षकांना ‘मज्जा’ येते. पण दगडू प्रमाण मराठीत व्याकरणशुद्ध तालास्वरात गाणं म्हणतो तेव्हा कुणालाच त्याचं काही वाटत नाही.
या सगळय़ा पाश्र्वभूमीवर ‘फॅन्ड्री’ जगण्याच्या जवळ जातो. तो स्वप्नही माफक बघतो. तो गाणं म्हणत नाही. चित्रपटांच्या वितरकांनी प्रमोशनल साँग म्हणून ‘पिरतीचा इंचू’ असं शहरी-ग्रामीण ढंगातल्या गाण्याचं शेपूट लावायचा केलेला प्रयत्न म्हणजे उद्या ‘उपरा’वर सिनेमा केला तर गाढवांच्या तांडय़ाला घेऊन जाणाऱ्या नायकानं ‘चल रं माज्या सर्जा’ वगैरे गाणं ललकारी देत म्हणण्यासारखाच ‘उपरा’ ठरलाय.
‘दुनियादारी’ आणि ‘टाइमपास’ विकणाऱ्या लोकांनी ‘फॅन्ड्री’ची खरेदी केल्यावर त्यावर ‘पिरतीचा इंचू’ थोपवणं म्हणजे बाजारपेठीय संस्कृतीनं इथल्या जातवास्तवाच्या अस्सल कलाकृतीवर ‘बाजारू कलात्मक’ पांघरूण घालण्याचा केलेला हा प्रयत्न म्हणजे एक प्रकारचा अश्लाघ्य व्यापारच!
‘दुनियादारी’, ‘बीपी’, ‘शाळा’, ‘टाइमपास’च्या किती प्रेक्षकांनी ‘फॅन्ड्री’ बघितला असेल, हा अभ्यासाचा विषय आहे. कारण ‘फॅन्ड्री’तल्या जब्याच्या दुनियादारीत गावखेडय़ातलं जातिधिष्ठित जगणं आहे. त्याच्या मूक प्रेमाला शहरी दगडूचं धाडस नाही. त्याचं प्रेमपात्र प्राजक्तासारखं ‘मोठा हो..’ असा आशीर्वादवजा आदेश देत नाही. उलट, मूकपणेच त्याला आपल्या प्रेमपात्रासमोर ‘जाती’सह उघडं होण्याची नामुष्की येते. त्याच्या वाटय़ाला मूळ दाक्षिणात्य चित्रपटातील सही सही उचललेलं ‘टिक टिक वाजते’सारखं धडकन् वाढवणारं गाणं येत नाही, की त्याची शालू त्याला नाचता नाचता ‘आय लव्ह यू’ म्हणत नाही. कारण याच जगात, याच देशात, राज्यात, प्रदेशात असूनही जब्याचं जग वेगळं आहे. तो दगडूसारखा पुढे आला, किंवा ‘शाळा’मधल्या मुलासारखा फाटक ओलांडून आत गेला, किंवा ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला’ म्हणत गावच्या रस्त्यावरून धूर काढत निघाला तर त्याची गत नितीन आगेसारखी होईल! आजच्या ‘सेल्फी’ पिढीसाठी ‘फॅन्ड्री’ म्हणजे ‘हाऊ सॅड ना!’ किंवा ‘हाऊ क्रुएल!’ एवढेच उसासे असू शकतात. पुढे एखादा रडणारा स्माइली!!
खर्डाच्या घटनेने खरलांजीच्या घटनेला उजाळा दिला. पण या दोन्ही गोष्टी मुंबई किंवा दिल्लीत नसल्याने रस्त्यावर कुणी उतरणार नाही, मेणबत्त्या जाळणार नाही, की फुलं वाहणार नाहीत. संसदेत तातडीने नवा कायदा संमत होणार नाही. आणखी एका दलित अत्याचाराची केस म्हणून मानवी हक्क आयोगाकडे याची नोंद होईल; जशी ‘फॅन्ड्री’ची राष्ट्रीय पुरस्कारांत झाली.
‘फॅन्ड्री’त जब्याला काळय़ा चिमणीची गरज असते. कारण त्याच्याकडे दगडूसारखा गुलाब नसतो. कदाचित असं असेल- जगण्याशी समांतर अशा कलाकृतींच्या नायकांना आता काळय़ा चिमणीसारखाच काळय़ा गुलाबाचा शोध घ्यावा लागेल!
शेवटची सरळ रेघ : ‘नासा’ला सापडलेल्या नव्या ‘पृथ्वी’वरून एक विनोद लगेच सर्वत्र पसरला. तो असा : नव्या पृथ्वीवरच्या जमिनीचे सात-बाराचे उतारे शरद पवारांच्या नावे आहेत! पण हा विनोद इथेच संपत नाही. त्याचा पुढचा भाग असा की, प्रत्यक्ष हे सात-बाराचे उतारे चौकशी यंत्रणांनी तपासले तेव्हा ते सारे सुनील तटकरेंच्या मुलाच्या नावावर असल्याचे आढळले!
चित्र – संजय पवार 

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
Maharashtra News Updates in Marathi
Maharashtra News Updates : हिंजवडी आयटी पार्कची कोंडी, महायुती सरकारमधील ‘हे’ मंत्री ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!
Story img Loader