मनोहर पारनेरकर

samdhun12@gmail.com

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Singh : केंब्रिजमध्ये शिक्षण, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान! अशी होती मनमोहन सिंग यांची कारकीर्द
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी

२०१६ सालच्या सुरुवातीला सई परांजपे यांच्या आठवणींचं ‘माझा कलाप्रवास’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलं होतं हे तुम्हाला आठवत असेलच. (लोक  प्रेमानं त्यांना ‘सई’ असं संबोधतात. त्यामुळे यापुढे त्यांचा उल्लेख त्यांच्या या एकेरी नावानंच करणार आहे.) अलीकडच्या काळातली एक वैशिष्टय़पूर्ण भारतीय चित्रपटकर्ती म्हणून सईची ओळख असून, साऱ्या देशभरात तिची कीर्ती पसरली आहे. लवकरच तिच्या आत्मकथनाचं इंग्रजी भाषांतर (जे ती स्वत:च करीत आहे!) तिच्या अमराठी चाहत्यांना वाचायला मिळेल अशी आशा आहे. (जाता जाता.. नसिरुद्दीन शाह यांच्या ‘And Then One DayX’ या आत्मकथनाचं उत्तम मराठी भाषांतर सईनं केलं आहे.)

हा लेख सईच्या ‘माझा कलाप्रवास’ या पुस्तकाबद्दल नाही. तो चित्रपटकर्ती आणि रंगकर्मी म्हणून नावाजल्या गेलेल्या तिच्या कारकीर्दीबद्दलही नाही. (वाचकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘स्पर्श’, ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘दिशा’ आणि ‘साझ’ ही तिच्या काही महत्त्वाच्या चित्रपटांची नावं आहेत. हे चित्रपट १९७० आणि १९८० च्या दशकांतील समांतर चित्रपटांचे उत्तम नमुने होते. ‘स्पर्श’मध्ये नसिरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिकासहित इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.) तर हा लेख सईच्या असामान्य आणि मजेशीर कुटुंबत्रयीबद्दल आहे. प्रकांड पंडित आजोबा- सर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (१८७६-१९६६), त्यांची प्रखर स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्ती आई शकुंतला परांजपे (१९०६-२०००) आणि प्रतिभावान, शॅम्पेनसारखी उसळणारी सई परांजपे- ही ती कुटुंबत्रयी.

सर्वात प्रथम कुटुंबप्रमुख सर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्याबद्दल.. केंब्रिज विद्यापीठाने अत्यंत मानाची समजली जाणारी ‘सीनियर रँग्लर’ ही पदवी त्यांना १८९९ साली दिली होती. ही पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. आश्चर्यकारक योगायोग असा की, जगद्विख्यात अर्थतज्ज्ञ ए. सी. पिगू हे त्यांचे केंब्रिजमधले सहाध्यायी होते. आपल्या वैशिष्टय़पूर्ण आणि दीर्घ कारकीर्दीत रॅंग्लर परांजपे हे पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. पुढे त्यांनी मुंबई आणि लखनौ विद्यापीठांचं कुलगुरूपदही भूषवलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते ब्रिटिश इंडियाचे कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) येथे उच्चायुक्त होते. मद्रासशीदेखील त्यांचं घट्ट नातं होतं. १९४९ साली मद्रासला (आजचं चेन्नई!) ‘इंडियन रॅशनॅलिस्ट सोसायटी’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि नंतर काही वषर्ं ते तिचे अध्यक्ष होते. जर्मन युनिव्हर्सटिीची उत्कृष्ट गुणवत्ता रँग्लर परांजपे यांना नेहमीच प्रभावित करत आली होती. म्हणूनच पुण्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर्मन भाषा शिकली पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्यासाठी त्यांनी शहरातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जर्मन भाषेचे वर्ग सुरू केले. तेही १०० वर्षांपूर्वी! ते काही असो, पण जनमानसातली त्यांची प्रतिमा जरी एखाद्या प्रखर राष्ट्रवादी नेत्याची नसली तरी त्यांच्या अस्सल राष्ट्रप्रेमाबद्दल कधीच कोणी शंका घेतली नाही.

एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधान नेहरूंच्या काळातले अमेरिकेचे भारतातील राजदूत जे. के. गॅलब्रेथ  हे रॅंग्लर परांजपे यांना पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात एकदा भेटले होते. ‘An outstanding Mathematician and of most wonderful appearance and vigour’ असं परांजपेंबद्दलचं निरीक्षण त्यांनी त्यांच्या ‘अ‍ॅम्बॅसडर्स जर्नल’ या प्रसिद्ध ग्रंथात नोंदवलं आहे. तुम्ही जर गॅलब्रेथ यांच्या खटय़ाळ लेखनशैलीशी परिचित असाल तर त्यांना या ठिकाणी ‘विनोदी’ हे विशेषण अभिप्रेत असणार. एक ऐंशी-पंच्याऐंशीची, पुणेरी पगडी घातलेली, अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या बेल्जियन डिटेक्टिव्ह हक्र्युल पॉयरोसारख्या मिशा ठेवलेली वृद्ध व्यक्ती नजरेसमोर आणा. (जाता जाता.. लहानग्या सईला त्यांच्या या मिशा खूप आवडत.) हार्वर्डच्या या प्रोफेसरला रँग्लर परांजप्यांची ती मूर्ती नक्कीच जराशी विनोदी भासली असणार.

सईच्या आईचं नाव शकुंतला परांजपे. मध्यमवर्गीय पाश्र्वभूमी असलेल्या त्यांच्यासारख्या मुली जेव्हा शिक्षण अर्धवट सोडून द्यायच्या किंवा फार तर फार मॅट्रिक व्हायच्या, त्या काळात त्या केंब्रिज विद्यापीठात शिकल्या. त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांनीदेखील गणित या विषयात प्रावीण्य मिळवलं. पण त्यांना त्या विषयातल्या ‘ट्रायपोस’ या डिग्रीवरच समाधान मानावं लागलं. लंडनमधल्या वास्तव्यात ‘ट्रायपोस’ या केंब्रिजच्या पदवीबरोबरच त्यांनी लंडन युनिव्हर्सटिीची ‘डिप्लोमा इन एज्युकेशन’ ही पदविकादेखील मिळवली. १९३० च्या दशकाच्या मध्यावर ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या जिनिव्हा येथील कार्यालयात त्या काम करत होत्या. तिथे त्यांची यौरा स्लेप्त्झॉफ नावाच्या जलरंगात चित्रं काढणाऱ्या एका रशियन चित्रकाराशी ओळख झाली. (रशियन लोकांनादेखील हे नाव उच्चारणं जवळजवळ अशक्यप्राय वाटेल.) हा स्लेप्त्झॉफ रशियन सन्यातील एका जनरलचा मुलगा होता. मग काही काळ परीकथेतल्यासारखा रोमान्स झाला आणि नंतर लग्न. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर लवकरच त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्यातली एकमेव सामायिक गोष्ट काय असेल, तर ती म्हणजे मांजरप्रेम. आणि या एकमेव धाग्यावर काही त्यांचा संसार टिकू शकला नसता. १९३८ साली त्यांच्या एकुलत्या एका अपत्याचा- सईचा जन्म झाल्यानंतर लगेचच त्या दोघांनी घटस्फोट घेतला. भारतात परतल्यावर शकुंतला परांजप्यांनी अनेक नाटकं, व्यक्तिचित्रणं आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी सुमारे डझनभर हिंदी आणि मराठी चित्रपटांतून भूमिकादेखील केल्या. (व्ही. शांताराम यांचा ‘दुनिया ना माने’ हा सामाजिक चित्रपट त्यापैकी लक्षात राहणारा एक  चित्रपट.) त्यानंतर सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्यांचं राष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९६४ ते १९७० या काळात राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

सई परांजपे हीदेखील आईसारखीच विलक्षण अष्टपलू स्त्री. अनेक कलामाध्यमांवर (उदाहरणार्थ- लेखन, रंगभूमी, रेडियो, टेलिव्हिजन आणि अर्थातच चित्रपट!) लीलया स्वार होऊन ती उन्मुक्त संचार करत आलेली आहे. त्यातही विशेषत्वानं बालचित्रपटांसाठीच जणू काही तिचा जन्म झाला असावा. या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या परिचित असल्याने इथे बोलायला आवडेल ते सईच्या व्यक्तिमत्त्वातील तीन खासियतींबद्दल. यातली पहिली खासियत म्हणजे सईची सूक्ष्म आणि चमकदार विनोदबुद्धी. पी. जी. वुडहाऊस ब्रँडच्या नर्मविनोदापासून ते खोडकर, खटय़ाळपणापर्यंत तिच्या विनोदबुद्धीची व्याप्ती आहे. कधी कधी स्वत:ची खिल्ली उडवायलाही ती कमी करत नाही. अतिशय आत्मकेंद्री अशा समाजात तिने आपल्या आयुष्याचा बराच मोठा हिस्सा व्यतीत केला, हे लक्षात घेतलं तर हा पलू जास्तच लक्षणीय वाटतो. (बोचऱ्या आणि खोचक पुणे ब्रँड विनोदापासून ती कशी बचावली याचं नेहमीच आश्चर्य वाटतं.) तर अशा तिच्या विनोदाची ही दोन उदाहरणं.. पहिलं स्वत:ची खिल्ली उडवणारं आणि दुसरं खोडकर, खटय़ाळपणाचं. घाऱ्या डोळ्यांची, पिंगट केसांची सई आपल्या दिसण्याबद्दल म्हणते, ‘‘माझे फोटो प्रेमानं काढले नाहीत तर एक तर मी ठीकठाक दिसेन, नाही तर ‘मॅक्बेथ’मधल्या चेटकिणीसारखी.’’

फारूख शेख हा नट सईचा अतिशय आवडता होता. त्याचं अकाली निधन झालं. या तिच्या मित्राला आणि सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहताना ती एके ठिकाणी म्हणाली होती, ‘तुझे काय उद्योग चालू आहेत हे बघायला तुझी आई नाही म्हणून तू माझ्याबरोबर फ्लर्ट करतोयस आणि माझ्या मुलीबरोबरदेखील? फारुख, कुछ तो शरम कीजिये.’’

सईची आवडणारी दुसरी खासियत म्हणजे तिची निर्भयता.. जी तिच्या आत्मकथनात स्पष्टपणे दिसून येते. ‘स्पर्श’ या चित्रपटाचे निर्माते बासू भट्टाचार्य आणि ‘चष्मेबद्दूर’चे निर्माते गुल आनंद यांनी तिची फसवणूक केली, असं तिने आपल्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलंय. तसंच तिने जावेद अख्तर(‘साझ’)च्या दुटप्पीपणाबद्दलही लिहिलं आहे. नाना पाटेकरचं वर्तन आक्रस्ताळं, आक्रमक आणि आक्षेपार्ह होतं आणि त्याबद्दल त्याला जराही खंत वाटत नसे असंही तिने स्पष्टपणे म्हटलं आहे.

सईची भावलेली तिसरी गोष्ट म्हणजे कठोर टीका करताना ती स्वत:लाही त्यातून वगळत नाही. तिच्या सुरुवातीच्या काळात तिने ‘हॅम्लेट’ नाटकाची निर्मिती केली होती. त्याच्या मराठी रंगावृत्तीत शेक्सपिअरचा आत्माच हरवला होता, अशी स्पष्ट कबुली तिने जाहीररीत्या दिली आहे. ‘मी प्रथम दर्जाची लेखिका आहे, पण दिग्दर्शक म्हणून मी दुय्यम दर्जाची आहे,’ असं ती स्वत:चं परखड मूल्यमापन करू धजते.

शकुंतला आणि सई परांजपे यांच्यात इतकं साम्य होतं की कधी कधी वाटतं, ते केवळ आनुवांशिक नसून त्यापेक्षाही बरंच काही जास्त होतं. (गमतीची गोष्ट म्हणजे ती एकदा म्हणाली होती, की ती तिच्या वडिलांसारखी आहे. तिचे वडील कलाकार होते आणि आई बुद्धिवादी!) त्या दोघीही उदारमतवादी आणि मुक्त होत्या/आहेत. दोघींकडे पोलादी निर्धार होता. स्वत:ला जे काही वाटलं ते करण्यात त्या आयुष्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाल्या. (त्यावेळच्या मापदंडाप्रमाणे शकुंतला परांजपे या जरमेन ग्रीअरची (ऑस्ट्रेलियन लेखिका) फिकट भारतीय आवृत्ती वाटतात. ग्रीअर सईपेक्षा एक वर्ष लहान आहे.) दोघींनीही आपल्या पालकांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि जेव्हा स्वत:ला वाटलं तेव्हा घटस्फोटही घेतला. दोघीही भारतीय सिनेसृष्टीशी निगडित होत्या. सईचा त्यातला सहभाग १००% होता, तर तिच्या आईचा अंशत:! दोघीही यशस्वी लेखिका. दोघींचं लेखन छाप पाडणारं. लेखक म्हणून शकुंतला परांजपे या जास्त यशस्वी होत्या. दोघींनीही इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांत प्रभावी लेखन केलं. दोघींनाही ‘पद्मभूषण’ या किताबानं सन्मानित केलं गेलं. शकुंतला परांजपेंना कुटुंब नियोजनातील प्रथम कार्यकर्ती म्हणून, तर सईला कला क्षेत्रातील अष्टपलू कामगिरीबद्दल!

आणि जाता जाता एक फुटकळ साम्य : दोघीही सिगारेट्स ओढत.. फक्त वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या!

शब्दांकन : आनंद थत्ते

Story img Loader