मातृदिनाइतका नाही, तरी पितृदिनही अमेरिकेत आता बऱ्यापकी रुजला आहे. ५ जुल १९०७ रोजी वेस्ट व्हर्जिनियामधल्या कोळशाच्या खाणीमध्ये ३६२ कामगारांचा मृत्यू झाला. बहुतेक कामगार वडील होते. त्यांच्याकरता झालेल्या मेमोरिअल सíव्हसने ‘फादर्स डे’ची सुरुवात झाली असं म्हणतात. पण ही सíव्हस फक्त एकच वर्ष झाली. आधुनिक ‘फादर्स डे’चा प्रारंभ नंतर बऱ्याच उशिरा झाला. अमेरिकेत मातृदिनाप्रमाणेच पितृदिनाची सुरुवातही एका मुलीच्या अथक प्रयत्नांमुळे झाली. सोनोरा स्मार्ट (हिला ‘पितृदिनाची जननी’ म्हणतात.. मदर ऑफ फादर्स डे!) ही आर्केन्सॉला जन्मलेली एका शेतकऱ्याची मुलगी. वडील विल्यम स्मार्ट सिव्हिल वॉरमध्ये लढले होते. सोनोराची आई सहाव्या अपत्याला जन्म देऊन मरण पावली. सोनोराला पाच भाऊ. तिनं वडिलांना सगळ्या भावंडांना वाढवायला मदत केली. लवकरच सगळं कुटुंब स्पोकेन (वॉशिंग्टन) येथे राहायला गेलं. सोनोराला वडिलांबद्दल खूप जिव्हाळा होता. १९०९ साली मातृदिनाच्या दिवशी तिने चर्चमधलं ‘सरमन’ ऐकलं तेव्हा तिला मनापासून वाटलं की अशी सíव्हस प्रत्येकाच्या वडिलांकरताही व्हायला हवी. मातृदिनासारखाच पितृदिनही साजरा करायला हवा. आपल्या गावातल्या चर्चला आणि वाय. एम. सी. ए.ला तिनं आपल्या वडिलांच्या जन्मदिनी (५ जूनला) चर्चमध्ये ‘सरमन’ ठेवण्याची विनंती केली. ‘सरमन’ तयार करून बोलायला जास्त वेळाची जरुरी होती, म्हणून पुढे दोन आठवडय़ांनी (१९ जूनला) ते झालं. मदर्स डेप्रमाणेच फादर्स डेची सुरुवातही चर्चच्या मदतीनेच झाली. मदर डेसारखेच या दिवशी वडिलांना गुलाब दिले गेले. नंतर मात्र गुलाबाऐवजी दुसरी फुलं देणं सुरू झालं. आता फुलं देण्याची ही प्रथा मागे पडलेली दिसते. जुल १९१० मध्ये वॉिशग्टनच्या गव्हर्नरनी १९ जून हा दिवस फादर्स डे म्हणून जाहीर केला. मुळात फादर्स डे साजरा करण्याची कल्पना पुष्कळ पुरुषांनाच पसंत पडली नाही. ‘हे म्हणजे पुरुषांना अगदी बायकांसारखं घरगुती करून टाकायचं आणि वडिलांना खूश करायला त्यांच्याच पशांनी त्यांना प्रेझेंट द्यायचं. त्यापेक्षा तो दिवस फििशग डे म्हणून जाहीर करा,’ असं बरेच पुरुष म्हणत. फुलं देऊन हा दिवस साजरा करणंही बऱ्याचजणांना पसंत नव्हतं. १९१६ साली अमेरिकेचे अध्यक्ष विल्सन यांनी वॉिशग्टनमधून बटण दाबून टेलिग्राफ सिग्नल्सच्या मदतीनं स्पोकेनमध्ये अमेरिकेचा ध्वज फडकवून फादर्स डे साजरा केला. १९२४ मध्ये प्रेसिडेंट कूलिजनीही फादर्स डे साजरा करण्याचा आग्रह धरला. मध्यंतरी फादर्स डे आणि मदर्स डे एकत्र करून ‘पेरेंट डे’ साजरा करावा असा प्रस्तावही आला. बिझिनेस कम्युनिटीला अर्थातच ते पसंत पडलं नाही. दुसऱ्या महायुद्धात जे सनिक धारातीर्थी पडले, त्यांच्या स्मरणार्थ फादर्स डे साजरा करावा असा प्रस्ताव पुढे आला.
१९२० पासून पुढची आठ-दहा वष्रे सोनोरा शिकागोमध्ये अभ्यास करण्यासाठी राहिली होती. १९३० मध्ये स्पोकेनला परत आल्यावर तिनं परत फादर्स डेच्या प्रयत्नांना जोमानं सुरुवात केली. आर्थिक मंदीच्या काळात अमेरिकेत मंदीची लाट थोपवण्याचा निकराचा प्रयत्न करताना फादर्स डेची आठवण व्यावसायिकांना प्रकर्षांनं झाली. पुरुषांचे नेक-टाइज आणि तंबाखूचे पाइप्स तयार करणाऱ्या कंपन्यांनी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सोनाराला मदत केली. १९३८ पर्यंत
न्यूयॉर्कच्या पुरुषांचे तयार कपडे विकणाऱ्या दुकानदारांचाही तिला चांगलाच पाठिंबा मिळाला. मदर्स डेसारखा फादर्स डेही सगळ्या व्यावसायिकांनी उचलून धरला. हॉलमार्क या भेटकरड बनवणाऱ्या कंपनीवर कधी न ऐकलेले वेगवेगळे ‘डे’ (त्यांची करड छापून विकण्यासाठी) लोकप्रिय केल्याचा आरोप नेहमी केला जातो. व्यापाऱ्यांनी स्वत:चं उखळ पांढरं करायला फादर्स डेचं फॅड काढलं आहे, अशी टीका सुरुवातीला लोकांनी व वर्तमानपत्रांनी केली. पण व्यापाऱ्यांनी आपले प्रयत्न जारीच ठेवले. हळूहळू फादर्स डे लोकप्रिय होऊ लागला. १९८० पर्यंत फादर्स डे पुरुषांसाठी दुसरा ख्रिसमस झाला होता. अजूनही तो तसाच आहे. फादर्स डे जरी राष्ट्रीय सुटीचा दिवस नसला तरीही त्याला नॅशनल इन्स्टिटय़ूटचा दर्जा आला. हा दिवस िलडन जॉन्सन यांनी १९६६ मध्ये फादर्स डे म्हणून साजरा करावा असं सांगितलं. परंतु शेवटी प्रेसिडेंट निक्सन यांनी जून महिन्याचा तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून जाहीर केला तेव्हाच त्याला राष्ट्रीय सुट्टीचा दर्जा मिळाला. सगळ्या सरकारी इमारतींवर या दिवशी अमेरिकेचा झेंडा फडकत असतो.
आता फादर्स डे चर्चमधून बाहेर पडला आहे. इतर सुटय़ांसारखाच हाही दिवस अमेरिकेत सगळे लोक साजरा करतात. फक्त जन्मदाते वडीलच नाहीत, तर वडिलांच्या ठिकाणी असलेले सावत्र वडील किंवा वडिलांसारखं डोक्यावर छत्र धरलेले आजोबा, काका, मामा, शेजारी- कोणीही या दिवशी दिल्या जाणाऱ्या सन्मानाला पात्र असतात. हा दिवस समस्त बाबालोकांना अगदी आनंदाचा वाटावा असा प्रयत्न त्यांची मुलं करतात. नेक-टाय, पायमोजे, हॅट्स, गॉल्फ क्लब्स, तंबाखूचा पाइप (हा आता मागे पडलाय!), एखादं उत्तम पुस्तक, सी. डी., घरातल्या लहान-मोठय़ा दुरुस्त्यांना उपयोगी पडेल असा टूल सेट, शर्ट अशा गोष्टी बाबालोकांना भेट म्हणून दिल्या जातात. वडिलांना जेवायला बाहेर घेऊन जाणं किंवा त्यांच्यासाठी घरी पार्टी देणं हेही पुष्कळजण करतात. आज फादर्स डेला महत्त्व मिळायला लागलं असलं तरी मदर्स डेची सर त्याला नाही. याला बऱ्याच अंशी अमेरिकेत मोडकळीला येत चाललेल्या विवाह व कुटुंबसंस्था आहेत असं वाटतं. मुलं अगदी लहान असतानाच बऱ्याचदा त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला असतो. मुलांना ठरलेल्या दिवशीच वडिलांना भेटायची परवानगी असते. वडील आणि मुलांमधलं नातं फुलायला बहुतेक वेळा पुरेसा अवधी दिला जात नाही. त्यामुळे जन्मदात्या वडिलांशी मुलांचं नातं जुळतंच असं नाही. सावत्र वडिलांशी नातं जुळायला तर जास्तच कठीण जातं. कधी कधी वडिलांची जागा आजोबा, काका, मामा हे घेतात; पण नेहमीच नाही. भारतातून अमेरिकेत आलेल्या कुटुंबांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे. मदर्स डे, फादर्स डे, ग्रॅंडपेरेंट्स डे यांसारखे जवळच्या नात्याचा सत्कार करणारे सण अशा कुटुंबांमध्ये जास्त आनंदात साजरे केले जातात आणि ही नाती अधिक दृढ होतात.
शशिकला लेले, फ्लोरिडा – naupada@yahoo.com
पितृदिन
मातृदिनाइतका नाही, तरी पितृदिनही अमेरिकेत आता बऱ्यापकी रुजला आहे. ५ जुल १९०७ रोजी वेस्ट व्हर्जिनियामधल्या कोळशाच्या खाणीमध्ये ३६२ कामगारांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
First published on: 21-06-2015 at 12:18 IST
मराठीतील सर्व देशोदेशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers day