निरनिराळ्या आजारांमध्ये आहाराचे कोणते पथ्य पाळावे याचे मार्गदर्शन करणारे पाक्षिक सदर..
केबिनमधला रुग्ण बाहेर पडताक्षणी राणे कुटुंबाच्या तीन पिढय़ा घाईघाईने आत शिरल्या. ‘‘या, बसा’’ असं मी म्हणेपर्यंत स्थानापन्नही झाल्या. ‘‘मी निखिलला म्हटलं की आज आपण कुठल्याही परिस्थितीत अथर्वला बाईंकडे घेऊन जाऊ या.’’ ११ महिन्यांच्या अथर्वला माझ्यासमोर बसवत राणे आजी म्हणाल्या, ‘‘तुम्ही एकदा त्याला बघितलं नं की आमचं समाधान होतं.’’
‘‘बरंच झालं की ! मी पण खूप दिवसांनी बघतेय याला. मोठा झाला की! आता काय? हात -पाय -तोंड सगळंच फुटलं असेल ना?’’ मी उत्सुकतेनं विचारलं खरं, पण राण्यांचा मूड वेगळा होता. म्हणून माझ्या प्रश्नावर फक्त हसून निखिल म्हणाला, ‘‘सॉरी हं मॅडम, आम्ही काल प्रवासात असल्यामुळे तुम्हाला फोनवर त्रास दिला.’’
‘‘ते ठीक आहे. पण मग आज बाळराजांची तब्बेत ठीक आहे ना?’’ मी असा प्रश्न टाकताक्षणी राणे सासवा-सुना रडायलाच लागल्या. मला काही कळेचना. अथर्व तर चांगला हसतोय, खेळतोय, दंगा करतोय – मग या दोघी का रडताहेत?
‘‘हे, हे असं चाललंय बघा या दोघींचं सकाळपासून.’’ निखिल संतापून म्हणाला.
‘‘काय झालंय ते कळेल का मला?’’ मी शांतपणे विचारलं.
‘‘काल रात्रीपासून अथर्वने खाणं -पिणं सोडलंय.’’ नाक ओढत आणि हुंदके देत नेहा बोलायला लागली. तिला मध्येच तोडत निखिल तिरसटून म्हणाला, ‘‘अहो, याला अजिबात खायचं नाहीये, तरी या दोघींची बळजबरी. तो कसा ऐकेल? मग रडतायत दोघीजणी सकाळपासून.’’ ‘‘अहो तो काहीच खात नाहीये. मी त्याच्या आवडीचा शिरा केला. तोसुद्धा..’’ नेहा मुसमुसत म्हणाली. ‘‘अगं, तो काय प्रायोपवेशनाला बसलाय का?’’ निखिल चांगलाच वैतागला.
‘‘प्रायोपवेशन म्हणजे काय? मला समजेल असं बोला.’’
‘‘घ्या ! हे medium english!’’ हतबल होऊन निखिलनं माझ्याकडे बघितलं. वातावरण तापलेलं बघून राणे आजी उठल्या. ‘‘तुमचं बोलणं चालू दे नीट. हा दंगा करतोय आणि बोलू देत नाहीये. मी याला बाहेर खेळवते,’’ असं म्हणून त्या अथर्वला घेऊन केबिनच्या बाहेर गेल्या.
‘‘अहो त्यानं काहीच न खाल्ल्यानं, तुम्ही काल फोनवर सांगितलेलं औषधही मी दिलं नाही त्याला. रिकाम्या पोटी कसं देणार औषध?’’ अथर्वच्या आईला गलबलून येत होतं.
‘‘आता तुम्हीच बघा कसले कसले गरसमज जोपासलेत हिनं! हिच्या मते ना, आजाराचे उपचार म्हणजे पहिल्या दिवसापासून ढीगभर तपासण्या, कचाकचा औषधं, त्यासाठी बळजबरीनं करायचं पोटभर जेवण आणि हे सगळं बाधू नये म्हणून आणखी काही औषधं – असं आहे.’’ मानेला एक नापसंतीदर्शक झटका देत निखिल थांबला.
‘‘चाललं असतं गं रिकाम्या पोटी औषध.’’ मी म्हणाले.
‘‘असं कसं? माझी आई बळजबरीनं खायला लावायची आम्हाला. मगच औषध!’’ नेहानं अविश्वासदर्शक ठराव मांडला.
‘‘बरोबर. जी औषधं रिकाम्या पोटी घेतल्यावर त्रास होतो त्यांच्या बाबतीत हे पाळावं ना. आम्हीही काही वेळा तशी सूचना देतोच की. पण आयुर्वेदात एकेका लक्षणासाठी बरीच औषधं सांगितली आहेत. त्यातून आपल्याला त्रास न देणारं औषध आपण निवडू शकतो.’’
‘‘व्हॉट डू यू मीन नो साइटइफेक्ट? असं कसं शक्य आहे?’’
‘‘अगं साइटइफेक्ट नेहमी वाईटच असेल असं नाही.’’ जे द्रव्य एक आजार बरा करताना दुसरा आजार किंवा अनारोग्य निर्माण करत नाही, तेच खरं औषध’ अशी मुळी व्याख्याच आहे आयुर्वेदात औषधाची. प्रत्येक वेळी असं योग्य औषध निवडता यावं यासाठीच तर शास्त्राचा अभ्यास करावा लागतो.’’
‘‘पण खाल्लं नाही तर अशक्तपणा नाही का येणार?’’ नेहाच्या शंका संपत नव्हत्या.
‘‘जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत काळजीच नको. अथर्वला कुठे आलाय अशक्तपणा? बघ.’’ नेहानं काचेतून बाहेर बघितलं तर तिचा लेक एका छोटय़ा मुलाबरोबर खेळत होता. बऱ्याच वेळानं तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं. ‘‘खरं तर तापात आपल्याला कुणालाच भूक नसते. किंबहुना पचनशक्ती आणि भूक कमी होणं हे तापाचं मुख्य कारण असतं. तूपण मगाशी म्हणालीस ना की आई बळजबरीनं खायला घालायची. याबाबतीत लहान मुलं खूप प्रामाणिक असतात. ती लगेच दाताला दात लावून बसतात. काहीच खात नाहीत. त्यामुळेच ती आपल्यापेक्षा लवकर बरी होतात. अथर्व जे करतोय ते आयुर्वेद शास्त्राला धरूनच आहे. ’’ माझं बोलणं आत्ता कुठे नेहाला पटायला लागलं असावं. ‘‘निखिल म्हणतो की, आपल्या पोटात अग्नी असतो. आणि अथर्वला अग्निमांद्य झालंय. असं खरंच काही असतं का?’’ नेहाची जिज्ञासा सुरू झाली.
‘‘असं बघ, आपलं शरीर म्हणजे निसर्गाची एक छोटी प्रतिकृती असते. जे जे सृष्टीत आहे ते ते सगळं आपल्या शरीरात आहे. सृष्टीत, एका पदार्थाचं दुसऱ्या पदार्थात रूपांतर करणं हे काम कोण करतं? म्हणजे कणकेचं पोळीत, तांदळाचं भातात, इतकंच काय कच्च्या फळांचं पक्क्या फळात अशी सृष्टीतली सर्व रूपांतरं कशामुळे होतात?’’
‘‘उष्णतेमुळे.’’ नेहानं विचारपूर्वक उत्तर दिलं.
‘‘बरोबर. ही उष्णता म्हणजेच अग्नी! आपल्या शरीरातही असा रूपांतर करणारा एक अग्नी आहे. आपण खातो त्या पोळी, भाजी, भात अशा सगळ्या पदार्थाचं रूपांतर ऊर्जेत किंवा शरीर घटकांमध्ये करण्याची आवश्यकता असते. हे रूपांतराचं काम आपल्या पोटातला अग्नी करतो. बोलीभाषेत आपण या क्रियेला पचन म्हणतो. आपण घेतलेल्या आहाराचं नीट पचन झालं की आपला अग्नी पुन्हा काम मागतो. म्हणजेच आपल्याला भूक लागते. बरोबर?’’ मी नेहाचा अंदाज घेत विचारलं.
‘‘बरोबर.’’
‘‘आयुर्वेद शास्त्राच्या मते, हा अग्नी जोपर्यंत व्यवस्थित काम करत असतो तोपर्यंत आपण निरोगी असतो. पण अग्नीची कार्यक्षमता कमी झाली की आपले आजार सुरू होतात. आयुर्वेदाच्या मते, ‘रोगा: सर्वे अपि मन्दे अग्नौ.’ म्हणजे सर्व रोगांच्या मुळाशी अग्नीची अकार्यक्षमता हे कारण असतं. अगदी तापातही. आजारी असताना अग्नीचं आधीचंच काम पूर्ण झालेलं नसतं. म्हणून आपल्याला भूक लागत नाही.’’
‘‘मग ही भूक वाढवण्यासाठी काहीतरी औषध असेल नं?’’ नेहानं निरागसपणे विचारलं.
‘‘पुन्हा औषध? कसं व्हायचं हिचं?’’ निखिलला तोंड उघडायला संधीच मिळाली.
‘‘समजा, तू खूप दमली आहेस, तुझ्या टेबलवर आधीचीच कामं साचली आहेत आणि त्यात नवीन कामाची भर पडली, तर काय होईल?’’ मी नेहाला विचारलं.
‘‘मागच्या महिन्यात अगदी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मी चक्क दांडी मारली दोन दिवस. मग नव्या उत्साहाने कामाला लागले.’’ नेहा हसत म्हणाली.
‘‘मारलीस ना दांडी? पण आपला अग्नी कितीही दमला तरी तो बिचारा अशी दांडी मारू शकत नाही. त्याने दांडी मारली तर आपली या जगातूनच दांडी गुल होईल की!’’ मी म्हणाले.
‘‘बाप रे ! म्हणजे.. ’’
‘‘तेच ते. आपण मरूनच जाऊ.’’ निखिल म्हणाला.
‘‘मग आपला अग्नी आपल्याला धोक्याचे बावटे दाखवायला लागतो. अरे बाबांनो, भूक नाहीये, खाऊ नका, मी दमलोय, मला थोडी विश्रांती द्या. पण आपण आपल्या बॉसपेक्षाही खडूस असतो!’’
‘‘अच्छा ! म्हणून खायचं नसतं का तापात?’’ नेहाच्या चेहऱ्यावर शोध लागल्याचा आनंद होता .’’
‘‘पेटली बाबा एकदाची टय़ूब’’ निखिल नं सुस्कारा सोडला.
‘‘हं ! म्हणून आपलं शास्त्र सांगतं ‘ज्वरादौ लंघनं कुर्यात.’ म्हणजे तापाच्या सुरुवातीच्या काळात लंघन करावं’’ मी पुस्ती जोडली.
‘‘नुसत्या लंघनाने बरं वाटत असेल तर किती ग्रेट!’’ नेहाला गंमतच वाटत होती.
‘‘तू युवान श्वांग हे नाव ऐकलं आहेस का?’’ मी नेहाला विचारलं.
‘‘हो, तो मध्ययुगातला चिनी प्रवासी ना? त्याचं काय?’’ नेहानं आश्चर्यानं विचारलं.
‘‘त्यानं त्याच्या हिंदुस्थानच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवलंय की, हिंदुस्तानी लोक त्यांचे कितीतरी आजार, सुरुवातीला केवळ लंघन करून आश्चर्यकारकरीत्या बरे करतात.’’ ‘‘इतका जुना आणि हुकमी उपाय आहे हा?’’ नेहाचे डोळे विस्फारले गेले.
‘‘हो. आणि तोही औषधाशिवाय!’’ निखिल विजयी मुद्रेनं म्हणाला.
तापाला चाप
निरनिराळ्या आजारांमध्ये आहाराचे कोणते पथ्य पाळावे याचे मार्गदर्शन करणारे पाक्षिक सदर.. केबिनमधला रुग्ण बाहेर पडताक्षणी राणे कुटुंबाच्या तीन पिढय़ा घाईघाईने आत शिरल्या. ‘‘या, बसा’’ असं मी...
First published on: 19-01-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व Rx=आहार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feaver