शिवतीर्थावर मुंगीला शिरायलाही जागा नाही. नजर जाईल तिकडे गर्दीच गर्दी. कार्यकर्त्यांची, नेत्यांची, कष्टकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, कास्तकारांची, उद्योगपतींची, अधिकाऱ्यांची, सामान्यांची, विविध जातींची, जमातींची, साधार
आनंदी गर्दी. जल्लोषी गर्दी.
समोर भव्य व्यासपीठ. तेथे दोनच सिंहासने.
एकावर आपण. एकावर महामहीम राज्यपाल.
बस्स.. आता आणखी काही क्षण.. मा. राज्यपाल महोदय आपल्याला शपथ देणार.
त्यांनी बोलावताच आपण असे उठू. धीरगंभीरपणे पावले टाकत पुढे जाऊ..
समोर बसलेल्या जनताजनार्दनास, मायबाप मतदार बंधू-भगिनींना असे हात उंचावून अभिवादन करू..
पण हे काय, आपला पाय कोण खेचतंय?
‘सोडा.. सोडा.. नाथाभाऊ, नितीनभौ.. पडून राहिलो ना मी.. सोडा.. सोडा..’ असे म्हणत देवेंद्रजी फडणवीस यांनी आपली लाथ अशी जोरात झटकली.
आणि तत्क्षणी त्यांच्या तोंडून ‘आई गं..’ अशी किंकाळी फुटली.
..खाटेची दांडी पायाला जोरात लागते!
घोटा चोळतच देवेंद्रजी उठले तेव्हा पहाटेचे साडेचार वाजले होते.
पण आता कसली झोप येणार?
त्यांनी दोन्ही हाताचे तळवे डोळ्यांपुढे धरले. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हटले. मग सगळी प्रात:स्मरणीय नावे घेतली. मग सगळी नित्यस्मरणीय (म्हणजे नरेंद्रजी, मोदीजी, एवम् नमोजी) नावे घेतली.
आणि मग ‘कुठे नेऊन ठेवलाय टुवाल माझा?,’ असे म्हणत ते बाथरूमात शिरले..
आणखी दीड-दोन तासात मतमोजणीला सुरुवात होणार होती..
***
देवेंद्रजी महास्नानास निघाले, नेमकी त्याचवेळी मातोश्रीमध्ये उद्धवजींनी कूस बदलली.
रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा नव्हता.
खरे तर तसे काळजीचे काहीच कारण नव्हते.
आपण फक्त ‘उठा’ असा आवाज दिला आणि आपल्या रणझुंजार वाघांनी स्वत:स शेषनाग म्हणविणारी गांडुळे सफैचट केली. अवघा महाराष्ट्र साप आणि गांडुळमुक्त झाला. मतदानाच्या पेटय़ांतच अफझुल्याच्या फौजांची थडगी बांधली.
आता राहिले ते एकच काम..
खास या वक्तासाठी आपण नवाकोरा सफारी सूट शिवून घेतला होता. पंधरा वरीसे झाली त्याला. तेव्हापासून तो अंत:पुरातील कपाटी हँगरवर असाच लटकत आहे. या वेळी तो अंगावर चढवायचा आणि थेट शपथविधीला जायचे..अशी शपथ घ्यायची की अजिबात किरकिर करायची नाही! खणखणीत आवाजात म्हणायचे- ‘मी शिवसेना, आई भवानी, छत्रपती शिवराय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना स्मरून शपथ घेतो की, कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा..’ आजवर इतक्या वेळा ही शपथ घोकली आहे की काना-मात्रेचा फरक पडणार नाही. पण पडला तर..?
छे छे, तो विचारही नको!
आतापर्यंत सगळे कसे ‘सामन्या’तल्या अग्रलेखांत लिहिल्याप्रमाणे घडते आहे. जणू सटवाईचे लेखच ते! राऊतांनी लिहिले असले म्हणून काय झाले?
चिंता फक्त एकाच गोष्टीची..
‘सामना’तला तो मजकूर पेड न्यूज तर नसेल?
उद्धवजींनी ‘जगदंब जगदंब’ म्हणत पुन्हा कूस बदलली आणि तोंडावर चादर घेऊन ते उजाडण्याची वाट पाहू लागले..
त्याचवेळी तिकडे पृथ्वीराजबाबा यांनी डोळे किलकिले करून घडय़ाळात पाहिले.
खरे तर त्यांना घडय़ाळात पाहणे नको नको वाटते. घडय़ाळाबरहुकूम चालणे हे दुर्बलाचे लक्षण! पण वेळेचा तकाजा असतो. पाहावेच लागते.
यापुढे मात्र घडय़ाळ नाही की काही नाही. सगळा आरामच आराम. फायलींवर बसा, नाहीतर झोपा. कोणी काही बोंबलणार नाही. या विचारानेच त्यांना अगदी सिंचन अहवालात न्हाल्यासारखे अंतर्बाह्य़ स्वच्छ स्वच्छ वाटू लागले.
आता आपले सरकार आले की पहिल्यांदा एक जीआर काढून मंत्रालयाच्या भिंतीवरची सगळी घडय़ाळे काढून टाकायची. वेळ पडल्यास त्यावर श्वेतपत्रिका काढू. पण काहीही झाले तरी राज्य डिजिटल करायचेच. त्यांनी मनातल्या मनात या निर्णयावर सहीही करून टाकली!
मग समाधानाने पापण्या मिटून घेतल्या.
अजून निकाल लागायला मोप वेळ होता. तेवढय़ात त्यांची एक झोप पूर्ण होणार होती..
***
राजगडाला तर झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण तो तसाही रात्री जागाच असतो!
पहाटे साडेचारच्या सुमारास तिसरा चित्रपट संपला आणि राजसाहेबांनी भलीमोठी जांभई दिली.
आता काय पाहावे? पुन्हा एकदा तेच चित्रपट लावावेत की ब्लू प्रिंट पाहावी?
पण ब्लू प्रिंट नको!
हातात सत्ता आली की पाच वर्षे तेच पाहायचे आहे. तेच बोलायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून, जाहीर सभांतून, टीव्हीवरच्या मुलाखतींतून, आकाशवाणीवरच्या भाषणांतून.. तेच ते बोलायचे आहे!
सगळ्या राज्याला सुतासारखे सरळ करायचे आहे. फक्त हातात सत्ता पाहिजे.
ती काय आता येईलच! निकालाला अजून वेळ आहे. तोवर आणखी एक चित्रपट पाहून होईल.
राज यांनी रिमोटची कळ दाबली आणि टीव्हीच्या पडद्यावर त्यांचा आवडता डिस्नेचा चित्रपट झळकला.
पाहता पाहता त्यांचे मन अभिमानाने भरून आले. याला म्हणतात अॅस्थेटिक्स!
हा चित्रपट महाराष्ट्रात सक्तीचाच केला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात तरळून गेला.
पण त्यांच्या हे लक्षातच आले नाही, की महाराष्ट्र गेल्या काही वर्षांपासून हाच चित्रपट तर पाहत आहे.. ‘टॉम अॅण्ड जेरी’!
राज तो पाहण्यात अगदी तल्लीन झाले होते.
पहिला निकाल यायला अजून पुष्कळ अवकाश होता..
निकालाआधीचे काही तास..
शिवतीर्थावर मुंगीला शिरायलाही जागा नाही. नजर जाईल तिकडे गर्दीच गर्दी. कार्यकर्त्यांची, नेत्यांची, कष्टकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, कास्तकारांची, उद्योगपतींची, अधिकाऱ्यांची, सामान्यांची, विविध जातींची, जमातींची, साधारणत: एकाच धर्माची.. ही २२२ गर्दी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-10-2014 at 12:38 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Few hours before election results