प्रसिद्ध कथा-कादंबरीकार श्याम मनोहर यांची ओळख ती ‘हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव’, ‘कळ’, ‘खूप लोक आहेत’, ‘शंभर मी’ या त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या आणि काहीशा ब्रेन टीझर कादंबऱ्यांसाठी! त्यांना नुकताच महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांचे मुक्तचिंतन..
श्याम मनोहर
माणसाच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. स्वत:चे कल असतात. माणसात कुटुंबाबद्दलचे काहीतरी असते. माणसात समाजघटकाचे वा जातीचे असते. शैक्षणिकतेवरूनचे, व्यावसायिकतेवरूनचे असते. भाषेचे असते. देशाचे असते. हे सगळे होत माणसाच्या माणूसपणापर्यंत जायचे असते. इतका पल्ला फिक्शनमध्ये घ्यायचा असतो आणि माणूस म्हणजे काय याचा शोध घ्यायचा असतो. त्या माणूसपात्राने त्याचे वर उल्लेखलेले सर्व बाळगत, त्यातील काही दुरुस्त करत, त्यातील काहींना प्रश्न करत, काहींचे विनोद करत, काही लपवत जीवनाचा त्याचा स्वत:चा अर्थ शोधायचा असतो. हे माणसाचे कर्तव्य आहे. माणूस हे करत नसेल तर हे फिक्शनने करायचे असते, किंवा फिक्शनने नागरिक वाचकांना त्याची जाणीव करून द्यायची असते.
जीवनाचे अर्थ धर्म, तत्त्वज्ञाने, वेगवेगळ्या विचारसरण्या, विज्ञाने, कला यांनी दिलेले असतात, देत असतात. तरीही कोणताही माणूस जगत असताना सबंध हयातीत चार-पाच प्रसंगी तो स्वत:शी म्हणतो, ‘काय माझ्या जीवनाचा अर्थ?’ माणसाच्या जीवनातील हे चार-पाच प्रसंग विज्ञान, कला, तत्त्वज्ञाने- आधीचे बाजूला सारून निर्माण होत राहतात. भूतकाळात सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली गेली आहेत असे म्हटले तरी जीवनाचा अर्थ काय, हा प्रश्न ताजाच राहतो. त्यामुळे नवनिर्मिती अटळ आहे.
सभ्यता अशी हवी की माणसाला त्याच्या जीवनाचा अर्थ शोधण्याची मोकळीक मिळेल. या दृष्टीने कलावंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, धर्मज्ञ यांनी सभ्यतेत माणसाला हवी असणारी मोकळीक राहील असे व्यवहार करावेत. म्हणजे रहदारी कशी असावी याचे कायदे जरूर करावेत, पण जीवनाचा अर्थ अमुकच असावा अशी सक्ती करता कामा नये.
माणूस सुष्ट आहे तसा दुष्टही आहे. माणसातला दुष्टपणा पूर्णत: घालवणे याची पद्धती अजूनपर्यंत मानवजातीला सापडलेली नाही. सुष्ट आणि दुष्ट या द्वंद्वात माणसाची स्थिती अजूनही अशीच आहे. म्हणून दुष्टांचा बंदोबस्त करण्याच्या पद्धती सभ्यतेत शोधल्या जात आहेत, निर्माण केल्या जात आहेत. दुष्टपणा घालवण्याची थेट पद्धत सापडलेली नाही याचे जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक माणसाला भान देऊन मग दुष्टांचा बंदोबस्त करण्याची पद्धत वापरायची असते, हे तत्त्व अंगीकारले पाहिजे.
मानवी स्वभाव आणि जीवनाचा अर्थ हे संस्कृतीचे मुख्य मुद्दे आहेत. या वैश्विक गोष्टी आहेत. भारतात किंवा कोणत्याही देशात किंवा कोणत्याही समाजघटकात या सांस्कृतिक प्रश्नांचा शोध घ्यावाच लागणार आहे. शिवाय प्रत्येक देशात त्यांचे-त्यांचे सभ्यतेचे प्रश्न आहेत. त्यांचाही त्या- त्या देशांना (किंवा इतर देशांनासुद्धा) शोध घ्यावा लागणार आहे. थोडक्यात, शोध घेणे हे अटळ आहे. भारतातला समाज असा शोध घेत आहे काय? जगाच्या पाठीवरचे अनेक देश अनेक गोष्टींबाबत शोध घेत नाहीत, तर प्रगत राष्ट्रांतील गोष्टींचे आदर्श नमुने म्हणून अनुकरण करत आहेत. खरे तर अनुकरण करण्याच्या सापळ्यात न अडकलेली नवीन शोध घेऊ शकणारी माणसे जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात असणार. अशा माणसांनी तात्कालिकामध्ये जागा नसली तरी शोध घेण्याचे त्यांच्याजवळ असलेले कसब स्वत:च विकसित केले पाहिजे.
सभ्यता माणसातली शोध घेण्याची वृत्ती क्षीण करू शकते. अशाने माणूस ढोबळ होतो. उदाहरणार्थ, भारतीय अध्यात्माचे प्रमुख सूत्र अहंकार गेला पाहिजे हे आहे. हे सूत्र समाजात इतक्या स्पष्टपणे आले पाहिजे, की अध्यात्माबाबतचा ढोबळपणा संपून जाईल. पण प्रत्यक्षात अहंकार कसा घालवायचा हे क्षीणपणे मांडून कर्मकांड तीव्रपणे केले जाते. अहंकार कसा घालवायचा, हे प्रत्येक व्यक्ती शोधायचा प्रयत्न करीत राहील तर अध्यात्मातला ढोबळपणा आणि ढोंग आपोआपच खंडित होईल. आणि हा शोध घेण्यात प्रत्येक व्यक्तीला एक वैयक्तिक धैर्य प्राप्त होईल आणि हे धैर्य नम्रतेचा कहर असेल.
आणखी एक म्हणजे हिंदू धर्मातील अहंकार कसा घालवायचा, हे प्रमुख तत्त्व इतर धर्मीयांना थेटपणे समजले जाईल असे सभ्यतेत मांडले गेले पाहिजे. तसेच हिंदू धर्मातील मुख्य सूत्रे इतर धर्मातील एकमेकांना कळतील अशा प्रकारे सभ्यतेत मांडली पाहिजेत. होते मात्र उलट, की दुय्यम तत्त्वेच एकमेकांना कळताहेत किंवा प्रासंगिक कर्मकांडं कळतात किंवा त्यात सहभागी होणे घडते.
प्रत्येकाने अध्यात्म करायचे आहे असे एक तत्त्व हिंदू समाजात आहे. वस्तुस्थिती काय आहे? काही हिंदू लोकांना नक्की सुख उपभोगायचे आहे. काही लोकांना नक्की सत्तास्थानी जायचे आहे. काही लोकांना नक्की कर्तृत्व करायचे आहे. खरे तर त्यांनी आध्यात्मिकतेचा ताण घेऊ नये. रिलॅक्स्ड राहावे. ज्यांना गणित उत्तम येते त्याने अहंकार घालवायचा कसा, याचा शोध घेणे खरे तर साधणार नाही. ज्याला नृत्य येते त्याला अहंकार कसा घालवायचा या प्रश्नासाठी ऊर्जाच राहणार नाही. अध्यात्म अगदी सार्वत्रिक आहे असे नाही, हे वास्तव आहे. आणि प्रत्येकाने अध्यात्म करायचे आहे याचा ताणही घेऊ नये.
प्रत्येक नागरिक इतका सुशिक्षित असेल आणि कायदे इतके सुरेखित असतील, की नागरिकांना वकिलाची गरज पडणार नाही. तसेच धर्मचर्चा इतक्या स्पष्ट आणि सरळ होतील की सुशिक्षित नागरिकाला धर्मगुरूची गरज पडणार नाही.
शोध घेणे प्रत्येक व्यक्ती करू शकते का? निर्मिती करणे प्रत्येक व्यक्ती करू शकते का? जी व्यक्ती असे करू शकते ती असामान्य म्हटले जाते. मग सामान्यांचे जगणे व्यर्थ आहे का? केवळ मतदान करून नेत्यांना निवडून देणे एवढाच सामान्यांच्या जीवनाला अर्थ आहे काय? यातून आधुनिक साहित्याचा जन्म झाला. यासंदर्भात माझा एक हायपोथिसिस आहे- एकेकाळी आणि काही प्रमाणात अजूनही असा सिद्धान्त होता, की धार्मिक जगण्याने ज्ञान होते. आणि धार्मिक जगण्यात मन:शुद्धी ही एक धारणा असते- म्हणजे विकार नसतात. धार्मिक जगण्यासाठी या अटी तशा जाचक आहेत. त्या सहजगत्या पूर्ण करता येत नाहीत. तर माणसाला वाटले, मला विकार आहेत, कथित दुर्गुण आहेत, तरी मी काही ज्ञान मिळवू शकणार नाही का? आणि यातून माणसाने विज्ञान, कला इत्यादी ज्ञानशाखांची निर्मिती केली. फिक्शन त्यादृष्टीने ज्ञानशाखाच आहे. म्हणून आधुनिक वाङ्मय सामान्य आणि असामान्य अशांच्या जगण्यातून माणसाचा सुष्टपणा, दुष्टपणा, वेगवेगळ्या भावनिक-बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता यांचा शोध घेते. सरसेनापतीचे धैर्य कळते, किंबहुना त्यातून धैर्य या संकल्पनेचा अर्थ कळतो. सामान्य माणसात काहीच धैर्य नसते का, याचा शोध फिक्शन घेते आणि धैर्य ही संकल्पना किंवा त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होत जातो. सरसेनापतीचे धैर्य याने धैर्याचा अर्थ अधिक सीमित झालेला असतो. सामान्यांचे धैर्य असे असले पाहिजे की धैर्य या अर्थाला आणखी परिमाण निर्माण व्हावे. फिक्शन अशा प्रकारे भाषेला अधिकाधिक नेमकी, अधिकाधिक अचूक करत जाते. फिक्शनमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक-बौद्धिक-भावनिक-वैयक्तिक प्रक्रिया, जागांची, काळांची वर्णने, सभ्यतेची स्थिती, माणसांच्या अनेक स्थित्या यांची वर्णने येतात आणि ही वर्णने जितकी अचूक होतील तितकी भाषा समृद्ध होईल. ही अचूकता फिक्शनमध्ये आणखी वेगळ्या प्रकारे साधता येते, ती म्हणजे फँटसी. फिक्शनमध्ये विकृती हे साधन वापरूनही शोध लावता येतो. मराठी भाषा टिकायची असेल तर शब्दांच्या अर्थाची अनेक परिमाणे शोधणे, प्रक्रिया अचूकपणे शोधणे, स्थित्यांची अचूक वर्णने करणे, विकृतीचा शोध घेण्यासाठी उपयोग करणे, अचूकता निर्माण करण्यासाठी फँटसी निर्माण करणे हे उपाय आहेत असे नमूद करावेसे वाटते. याचाच अर्थ ढोबळपणा जाणे असा आहे.
माझा असाही आणखी एक कच्चा सिद्धान्त आहे की माणसाने भाषेचा शोध लावला ही बौद्धिक क्रिया आहे. भाषेचा वापर करायला सुरुवात केली की बौद्धिक क्रिया सुरू होते. बौद्धिकता वापरूनच भाषेत भावना निर्माण करता येतात. फिक्शन वाचताना वाचकाला बुद्धी वापरावीच लागते आणि त्यातून तो भावनेपर्यंत पोहोचतो. बौद्धिकता वापरून केवळ भावनानिर्मिती करत जगणारे लोक असतात, तसेच लेखन करणारे लेखकही असतात. बौद्धिकता वापरून भावनानिर्मिती व तत्त्वनिर्मिती करीत जगणारे लोक असतात तसेच लेखन करणारे लेखकही असतात. परिचित भावनानिर्मितीत आणि परिचित तत्त्वनिर्मितीत माणूस सहजपणे सामील होऊ शकतो. अपरिचित भावनानिर्मितीत आणि अपरिचित तत्त्वनिर्मितीत माणूस सहजपणे सामील होऊ शकत नाही. आणि म्हणून तर अज्ञातातले अपरिचित शोधणे हा माणसाचा ध्यास आहे. अज्ञातातली अपरिचित भावनानिर्मिती, तत्त्वनिर्मिती ही संस्कृतीतली ग्रेटेस्ट करमणूक आहे.
आजच्या काळात अनेक ज्ञानक्षेत्रे निर्माण झालेली आहेत आणि त्यांचे ग्रंथही निर्माण झालेले आहेत. कुठल्याही ज्ञानग्रंथातले १०० टक्के समजलेले आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. मात्र त्या ज्ञानशाखेच्या गाभ्याचे मर्म नक्की समजलेले असते. एखाद्या ज्ञानशाखेच्या तपशिलांचे त्या शाखेचा तज्ज्ञ आवश्यकतेनुसार संदर्भ घेत असतो. फिक्शनचेही तसेच असते. फिक्शनचे मर्म जाणणे हा फिक्शन वाचण्याचा प्रमुख हेतू असला पाहिजे. कोणतेही फिक्शन १०० टक्के कळले पाहिजे अशी धारणा ठेवण्याची गरज नाही.