येत्या ७ जून २०१४ रोजी अभिनेत्री लालन सारंग आणि नाटय़निर्माते व दिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्या  लग्नाचा पन्नासावा वाढदिवस येत आहे. १६ वर्षांपूर्वी कमलाकर सारंग गेले. तरीही त्यांच्या आठवणींची विचित्रवीणा लालनताईंच्या मनात अखंड दिडदा दिडदा करत असते. यानिमित्तानं त्यांनी केलेलं हे मनमुक्त चिंतन..
साधारण १९६० ची घटना. मी ज्युनियर बी. ए. ला होते. सिद्धार्थ कॉलेज- आनंद भवनच्या हॉलमध्ये आम्ही काहीजण इंडियन नॅशनल थिएटरच्या नाटय़स्पर्धेच्या सिलेक्शनसाठी जमलो होतो. तोपर्यंत रंगभूमीशी काहीही संबंध नसलेली, लोकांसमोर येऊन धीटपणे काहीही बोलू न शकणारी मी- तिथे का आले होते? मलाच अजूनही पडलेलं कोडं! ..पण काहीतरी घडायचं होतं, हे नक्की.
हॉलमध्ये सात-आठ मुलं व मी धरून तीन मुली होत्या. समोर नाटकाचे दिग्दर्शक अरविंद देशपांडे बसले होते. अर्थात त्यांचं नाव मी प्रथमच ऐकत होते व त्यांना प्रथमच पाहत होते. त्यांच्या शेजारी एक उंच, काळासावळा, तेजस्वी डोळ्यांचा मुलगा बसला होता. मुलगा कसला? पंचविशीतला तरुणच म्हणा ना! पांढरेशुभ्र कडक इस्त्रीचे कपडे, मनगटावर अधिक वर बांधलेले स्टीलचे घडय़ाळ व डोक्यावर घनदाट कुरळे केस. त्याला बघताक्षणी तो मनात कुठेतरी उतरला खरा. त्याचे भेदक डोळे त्याच्यातला आत्मविश्वास दाखवत होते. कोण असेल हा? कोणाला बरं विचारावं? तिथे तसं कुणीच ओळखीचं नव्हतं. नंतर कळलं- तो कमलाकर सारंग होता. सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून स्पर्धेचं नाटक बसवत होता व इथे तो अरविंद देशपांडेंचा मित्र व सिद्धार्थचा आर्ट्सचा माजी विद्यार्थी म्हणून आला होता.
सरिता पत्कींचं ‘बाधा’ नाटक ते स्पर्धेत उतरवणार होते. त्यामध्ये आई, मोठी व धाकटी मुलगी अशी तीन स्त्रीपात्रं हवी होती. आणि समोर मी धरून तीनच मुली होत्या! त्यातल्या इतर दोघी रंगमंचावर वावरलेल्या होत्या. पण मी मात्र नवखी. घाबरत घाबरत, त्यावेळच्या माझ्या कोत्या आवाजात मी नाटकाचा काही भाग वाचून दाखवला. दिग्दर्शकाच्या चेहऱ्यावर फारसं इम्प्रेशन पडल्याचं दिसत नव्हतं. त्याची शेजारच्या तरुणाबरोबर कुजबूज सुरू झाली. ‘कसली बावळट मुलगी! ही कसं काय काम करणार?,’ असं तो दिग्दर्शकाला म्हणाला असणार. अर्थात त्याचं हे बोलणं मला नंतर कळलं. पण त्यांचाही नाइलाज झाला आणि त्यातली धाकटय़ा बहिणीची भूमिका माझ्या वाटय़ाला आली. ती भूमिका मी निभावली व थोडीशी धीट झाले.
सीनियर बी. ए. ला स्पर्धेसाठी ‘राणीचा बाग’ नाटक ठरलं. मी त्यात होतेच. आणि आता दिग्दर्शक होता स्वत: कमलाकर सारंग. या कालावधीत सारंगशी ओळख झाली, पण त्याच्या शिष्ट वाटण्यामुळे फारसं बोलणं होत नव्हतं. पण त्याच्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये माझा प्रवेश झाला.
सारंग पाहताक्षणीच मनात ठसला होता. पण त्याची त्याच ग्रुपमध्ये एक मैत्रीण होती व तिच्याबरोबर तो लग्न करणार आहे अशी कुणकुणही लागली होती. त्यामुळे पुढे काही घडण्याची शक्यताच नव्हती! पण नाटकाची थोडीशी वाटचाल सुरू झाली. तसेच त्यावेळी सारंग त्याच्या संस्थेतर्फे इंटर-बँकिंग स्पर्धेच्या एकांकिका बसवीत होता. त्यात काम करत गेले. त्याच्याबरोबर झालेल्या ओळखीत त्याच्या अनेक पैलूंचं दर्शन घडत होतं. तो बर्माशेलमध्ये नोकरीस होता. घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. असं असलं तरी त्याचा हात सढळ होता. सगळे एकत्र चहाला गेलो की पैसे देण्यासाठी त्याचा हात प्रथम खिशात जायचा. मधल्या काळात त्याने एक विलक्षण गोष्ट केली; जी कुणी कधी करेल असं मला वाटत नाही.
एका संध्याकाळी त्याने आम्हा सर्व मित्र-मैत्रिणींना नेहमीच्या ठरलेल्या जागी चहाला बोलावलं. तसे तर आम्ही नेहमी सगळे भेटायचोच; पण आज त्याने अचानक असं का बोलावलं आहे याची कोणालाच काही कल्पना येत नव्हती. संध्याकाळी फ्लोरा फाऊंटनच्या जवळ असलेल्या आमच्या ठराविक इराण्याच्या हॉटेलमध्ये आम्ही जमलो. तो आला, पण त्याची ती खास मैत्रीण मात्र आज त्याच्याबरोबर नव्हती. चहापाणी होईपर्यंत इतर गप्पा झाल्या. पण आजचं हे खास आमंत्रण कशासाठी, हे अजूनही कळत नव्हतं. त्याने खिशातून सिगरेट काढून शिलगावली आणि शांतपणे झुरके घेत तो बोलता झाला. ‘उद्या तिच्या (त्याच्या खास मैत्रिणीच्या) साखरपुडय़ाची बातमी पेपरात येणार आहे. ती वाचल्यावर तुम्ही मला फोन कराल, माझं सांत्वन करायला याल, असं काही तुम्ही करू नये म्हणून मी स्वत:च, आधीच ही बातमी सगळ्यांना देतो आहे.’
किती शांतपणे सांगत होता तो! आपल्या मनाच्या यातना बाहेर अजिबात दिसणार नाहीत याची खबरदारी त्याने घेतली होती. सगळेच हादरून गेले होते. आणि मी त्याच्यावर जीव टाकणारी.. खूपच भावविवश झाले होते. असं कसं केलं तिने? त्यावेळी खूप राग आला होता मला तिचा. पण सगळेच गप्प होते. त्यानंतर सर्वजण विखुरले. त्याच्या या स्वभावाचे अनेक कंगोरे मी त्याच्याबरोबरच्या सहवासात नंतर अनुभवले.
त्यानंतर आम्ही जवळ आलो ते चार्टर्ड बँकेची एकांकिका बसवताना. तालीम संपल्यावर आम्ही एकत्र बाहेर पडून माझ्या लँमिग्टन रोडवरच्या घरी पोहोचताना नाक्यावर गप्पा मारूनच मी घरी जात होते. यादरम्यान आम्ही एकत्र असायचो.. मित्र-मैत्रिणींपासून वेगळे असे. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आणि एका संध्याकाळी दोघांची ऑफिसेस सुटल्यावर गिरगाव चौपाटीवरील एका हॉटेलात चहा घेत असताना त्याने मला विचारलं- ‘मला तू आवडतेस. तुलाही मी आवडत असणार. तुला जर माझ्याशी लग्न करावेसे वाटत असेल तर त्याला माझी ना नाही.’
लग्नाबद्दल विचारलं तेसुद्धा अशा तिरकस पद्धतीनं. या गोष्टीची मला आतून कल्पना होतीच. पण मी ‘विचार करून सांगते,’ असं उत्तर दिलं. कसला विचार आणि कसलं काय? हे सगळं माझ्या अपेक्षेप्रमाणेच घडत होतं आणि दोन दिवसांतच मी त्याला होकार देऊन मोकळी झाले. आता घरी सांगण्याची वेळ आली होती. दुसऱ्या दिवशी वडील दाढी करत असताना मी बोलती झाले.
‘‘पपा, मी लग्न करायचं ठरवलं आहे.’’
‘‘सारंगशी ना?’’ हा प्रश्न विचारून वडलांनी मला चकित केलं.
यांना कसं कळलं? मांजर जरी दूध चोरून पीत असलं तरी सगळ्यांनी ते पाहिलेलं असतंच. तसं आमचं नाक्यावरचं भेटणं वडलांच्या लक्षात आलेलं होतं. घरून विरोध झाला नाही. त्यानेही त्याच्या घरी सांगितलं. जातीबाहेरची मुलगी- हा प्रश्न तिथे आलाच. पण मोठा, कमावता मुलगा.. त्याच्या मनाविरुद्ध जाता येणार नाही म्हणून ती मंडळीही गप्प बसली.
सहा भावंडांमध्ये वावरलेली मी- त्याच्या कुटुंबाची त्याच्या बोलण्यातून कल्पना आली होती. एकत्र राहण्यास मी तयार होते. तो त्याच्या भायखळ्याच्या घरी मला घेऊन गेला आणि मी हादरले. चाळीतली दहा बाय दहाची एक खोली. त्यात त्याचे आई-वडील, त्याच्या दोन बहिणी व दोन भाऊ. ते सहा आणि आम्ही दोघे.. त्यात कसे सामावणार होतो?
लग्न ठरवलं खरं; पण राहणार कुठे, हा मोठाच प्रश्न होता. दुसरं घर घेण्याची सारंगची ऐपत नव्हती. आणि आहे ते घर विकून दुसरीकडे मोठय़ा घरात राहण्याची त्याच्या आई-वडिलांची इच्छा नव्हती. म्हणजे वेगळं घर शोधणं आलंच. आता आमच्या संध्याकाळच्या भेटी या प्रश्नाने सुरू व्हायच्या आणि उत्तर न सापडताच संपायच्या. त्यासाठी लग्नाची तारीख एक वर्ष पुढची ठरवली. रोज ऑफिस सुटल्यावर गेटवे ऑफ इंडियापर्यंत जायचं आणि तिथे बसून ‘पुढे काय?’ हा प्रश्न सोडवायचा. सारंगकडे महिन्याचा पगार सोडून काहीही शिल्लक नव्हती. त्यात घरची एवढी जबाबदारी! कोणाकोणाला सांगून घर बघत होतो; पण साधं डिपॉझिट देण्याएवढे पाच हजार रुपये कुठून आणायचे? कोण देणार? आता ही रक्कम फालतू वाटेल, पण त्या काळात- बापरे! एवढे पैसे? पार्ले पूर्वेला एक जागा मिळाली व मोठय़ा मिनतवारीने सारस्वत बँकेकडून लोन घेऊन पैसे भरले. सहा महिन्यांनी जागा ताब्यात मिळणार. आणि लग्नाची तारीख तर जवळ आली होती.
लग्नपत्रिका वाटणं सुरू झालं आणि आठवडा असताना सुरेश खरे आमचा मित्र- त्याच्या घरी आमंत्रणाला गेलो. त्याने मला घर सुचवलं. त्याच्याबरोबर लगेच मालकाच्या घरी गेलो. त्याची फॉर्जेट हिल, गवालिया टँकजवळची रस्त्यावरच मुख्य दरवाजा उघडणारी एक खोली मिळाली. भाडं साठ रुपये. काही का असेना, पण लग्नानंतर आमचं घर होईपर्यंत सुरेश खरेच्या मदतीने डोक्यावर एक छप्पर आलं होतं. आवश्यक सामान घेतलं आणि ७ जून १९६४ रोजी लालन पैंगणकरची ‘लालन सारंग’ झाले.
एका वर्षांतच ६ जूनला राकेशचा.. आमच्या एकुलत्या एक मुलाचा जन्म झाला. मी नऊ महिन्यांची गरोदर असताना सारंगने मला विचारलं, ‘लालन, मी बर्माशेलची नोकरी सोडतोय. तुला चालेल?’ मी क्षणभर अवाक् झाले. आता माझी एकटीची नोकरी.. त्यात माझी ही अवस्था! एवढी मोठी दोन संसारांची जबाबदारी कशी पेलणार मी? यावेळेपर्यंत त्याच्याकडून मिळालेला हा दुसरा धक्का होता. आता वाटतं, एकतर मी मोठय़ा धीराची होते, किंवा माझा त्याच्यावरचा विश्वास असेल.
‘‘तुला दुसरी नोकरी मिळेल?’’
‘‘हो. नक्की मिळवेन.’’
‘‘मग हरकत नाही. नोकरी सोड.’’
त्यानं ती नोकरी सोडली व महिन्याभराच्या आत रेमिंग्टन रॅण्डची नोकरी धरून तो ट्रेनिंगसाठी कलकत्त्याला गेला आणि इथं मुंबईत राकेशचा जन्म झाला. राकेशला आईकडे सोपवून मी पुन्हा कामावर रुजू झाले. आता सगळं छान चाललं होतं. थोडे पैसे घरात जास्तीचे येऊ लागले होते आणि टाटामधली चांगली नोकरी सोडून देण्याचं खूळ माझ्या डोक्यात शिरलं. अन् माझी नोकरी मी सोडलीही. वर्षभर पूर्ण संसाराकडे लक्ष दिल्यावर १९६८ साली मी पूर्णपणे व्यावसायिक नाटकांकडे वळले.
आणखी एक मोठा धक्का पचवायचा होता. १९७२ ला ‘सखाराम बाईण्डर’ हे नाटक आम्ही रंगमंचावर आणलं. सारंगचं व्यावसायिकदृष्टय़ा दिग्दर्शन केलेलं पहिलं नाटक. तेरा प्रयोगानंतर त्यावर आलेली सेन्सॉरशिप, कोर्टातला खटला, नाटकावर आलेले अनेक प्रवाद.. या सगळ्याला तोंड देत आम्ही ती केस जिंकलो. त्यानंतर पुन्हा शिवसेनेकडून बंदी. त्यावरचे आक्षेप दूर करत पुन्हा सुरू झालेले प्रयोग व या सगळ्यावर ताण म्हणून सारंगने त्या काळात नोकरीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंपनीकडून सारंगकडे झालेली राजीनाम्याची मागणी. सगळ्याच गोष्टी वेगानं अंगावर धावून येत होत्या. आणि पुन्हा एक धक्का!
‘‘मी नोकरी सोडतोय.’’
‘‘पण मग दुसरी नोकरी करणार? मिळेल?’’
‘‘हो. नक्की मिळेल.’’
‘‘ठीक आहे, सोड नोकरी.’’ (पुन्हा एकदा माझा त्याच्यावरचा विश्वास!)
सारंगने नोकरी सोडली आणि दुसरी नोकरी न शोधता तो व्यावसायिक रंगमंचावर निर्माता-दिग्दर्शक म्हणून कार्यरत झाला. मग मी माझी दुसरी संस्था ‘कलारंग’ स्थापन केली आणि ‘अभिषेक’ व ‘कलारंग’ या आमच्या दोन संस्थांतर्फे अनेक नाटकांची आम्ही निर्मिती केली. आमचं खासगी व व्यावसायिक जीवन एकमेकांच्या हातात हात घालून मोठय़ा दिमाखात सुरू राहिलं.
१९९३-९४ पर्यंत नाटकांचा वेग मंदावला. मी आमच्या दोन संस्थांमधून पूर्णपणे निवृत्त होऊन प्रभादेवीला माझं बुटीक सुरू केलं.
१९९५ च्या दरम्यान आणखी एक मोठा धक्का बसणार आहे याची आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती. पण नियतीचा खेळ! सारंगला पार्किनसन्सने झपाटलं. आम्ही दोघेही पूर्णपणे हादरून गेलो. सारंगने पुण्यात येऊन ट्रीटमेंटला सुरुवात केली व नंतर त्याला पुण्यात बरं वाटेल म्हणून त्याच्या हट्टापायी आम्ही दोघं पुण्यात कायमचे वास्तव्याला आलो. त्याही परिस्थितीत पुण्याचं घर सजवलं आणि पुणेकर झालो. तो दिवस होता- ‘दसरा’ १९९६.
सारंगची ट्रीटमेंट सुरू झाली. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा न होता ती आणखीनच खालावत गेली. त्याचा भरदार, सुंदर आवाज कमी होत जाऊन, तो काय बोलतो आहे, हे लक्ष देऊन ऐकल्याशिवाय कळेनासं झालं. हाताची थरथर होऊ लागली आणि त्याचं कित्ता गिरवावा असं देखणं लेखन बंद झालं. मग तो कॉम्प्युटरचा उपयोग करून मराठीमध्ये लेखन करण्याचा प्रयत्न करत असे. काही नवीन, तर काही पूर्वीचंच लेखन तो करत राहिला. मी ते सर्व बघण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. जाऊ दे, काहीतरी लिहिण्यात त्याचं मन रमतंय म्हणून त्याला प्रोत्साहन देत राहिले.
आशावाद आणि जिद्द हा त्याचा स्थायीभाव. मग ती ‘सखाराम बाईंडर’ची केस असो, की स्वत:चं जगणं.. ही जिद्द त्याने शेवटपर्यंत सोडली नाही.
तो चालताना सारखा पडत असे. त्याला तोल सावरता येत नव्हता. त्याला चालताना आधार म्हणून घरात सगळीकडे बार बसवून घेतले. तरीही त्याचं पडणं थांबलं नाही. मग हॉस्पिटल, पुन्हा घर. त्यात त्याचं नळीनं खाणं सुरू झालं. लघवीचा त्रास सुरू झाला. बेडवर पडून पडून बेड- सोअर्स झाले. शेवटचा उपाय म्हणून मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. पण हातात काही उरलं नाही याची डॉक्टरांनी जाणीव करून दिली. त्याचे शारीरिक हाल बघून माझे भयंकर मानसिक हाल होत होते. यातून त्याची सुटका व्हावी असं वाटत होतं; पण मी त्याच्याशिवाय कशी जगणार होते?
२५ सप्टेंबर १९९८ हा त्याचा शेवटचा दिवस. आत्तापर्यंत तो होता, पण आता कधीच दिसणार नाही, या कल्पनेने त्याला नेताना आक्रोश करीत मी सैरभैर झाले होते. एकच समाधान, की त्याची शुश्रुषा करायला मी- त्याची बायको त्याच्या सोबतीला होते.
आज मागे वळून बघताना वाटतं- किती त्रास, धडपड, अनेक वाईट प्रसंग आम्ही दोघांनी मिळून झेलले. खूप कष्ट केले. पण या पैशाच्या दुनियेत आम्ही फार काही जमवू शकलो नाही. पण तरीही आम्ही खूप समाधानी जीवन जगलो.
दोघांच्या स्वभावात जमीन-अस्मानचा फरक. मी शीघ्रकोपी, तर तो शांत, समजूतदार व संयमी. मी भरभरून प्रेम देणार; पण राग आला तर त्या माणसाकडे बघणारसुद्धा नाही. माझ्या या स्वभावाला त्याने खूप सांभाळलं. त्यामुळे आमची छोटी-मोठी भांडणे झाली तरी त्याच्या स्वभावामुळे संसाराला तडा जाण्याचा प्रसंग त्याने येऊ दिला नाही. मी त्याचा संसार नीट सांभाळला आणि त्याने माझा हा स्वभाव संयमाने सांभाळला.
७ जून २०१४ ला आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. तो दिवस जवळ येतोय. पण गेली सोळा वर्षे तो कुठे आहे? त्याच्याशिवाय तो वाढदिवस कसा साजरा करायचा? पण या सोळा वर्षांत तो नाही असं कसं म्हणू मी? तो शरीराने माझ्यासमोर नसेल, पण मनाने तो पूर्वीपेक्षा जास्त जवळ आहे. माझ्या या एकटेपणात तो सातत्याने साथ देतो आहे. मी त्याच्याशी खूप बोलते. माझा शारीरिक-मानसिक त्रास, मला झालेला आनंद आणि माझ्यासमोर उभी असलेली एकटेपणाची पोकळी.. सगळं सगळं त्याला सांगत असते. त्याच्या शेवटच्या काळात माझी सोबत त्याला होती, पण तो बोलू शकत नव्हता. आणि आता मी त्याच्याशी सातत्याने बोलते; पण शरीराने तो माझ्याजवळ नाही. नाही रे सारंगा, मी तुला शेवटपर्यंत माझ्यापासून वेगळं करूच शकत नाही. म्हणूनच ‘५० – १६ = ५०’ हे कठीण गणित मी सोडवते आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा