स्वानंद किरकिरे

त्यांच्या अभिनयाने माझ्या आयुष्याला दिशा दिली, माझे सगळे न्यूनगंड दूर केले, मला काय करायचंय अन् कुठल्या विश्वात जगायचंय हे स्वप्न त्यानंतर माझ्या मनात आकार घेऊ लागलं.. मी पुन्हा नाटकांच्या तालमीला जाऊन बसायला लागलो. भरकटलेल्या मला एक दिशा सापडली होती.

ondc launches digital credit services
‘ओएनडीसी’वरून आता खेळत्या भांडवलासाठी डिजिटल कर्ज
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
loksatta kutuhal efficient and intelligent humanoid robots of future
कुतूहल : भविष्यातील कार्यक्षम आणि बुद्धिमान ह्यूमनॉइड
argument in the relationship between brothers and sisters
भावा बहिणीचं नातंही ताणलं जातंय?
kolkata rape case
Kolkata Rape Case : पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी विद्यार्थिनीला अटक; ममता बॅनर्जींविरोधातही आक्षेपार्ह टीप्पणी!
Woman Collapsed While Singing Due to Heart Attack
Heart Attack : देशभक्तीचं गाणं म्हणणारी महिला खुर्चीवरुन कोसळली, हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू
ti phulrani dramatization by P L deshpande
‘ती’च्या भोवती : आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग!
Documentary, future, struggle,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उद्यासाठीचा आटापिटा…

तो इन्दौरचा नव्हता, पण तो मला इन्दौरमध्येच भेटला. त्याला मी पहिल्यांदा पाहिलं अन् त्यानं कधी माझ्या मनाचा ताबा घेतला ते कळलंच नाही. सुरुवातीच्या दिवसांत मी स्वामी दयानंद शाळेत शिकत होतो. अतिशय शिस्तीची शाळा. सकाळी ६.५५ ला प्रार्थना सुरू होत असे. ७ नाही ६.५५. रोज आम्हाला ५२ सेकंदांत राष्ट्रगीत म्हणावं लागे. आमचे जैन सर स्टॉप वॉच घेऊन उभे राहात. ५२ चे ५३ सेकंद झाले वा ५१ सेकंद झाले की ‘पुन्हा म्हणा..’ त्या शाळेत अशी काही कडक शिस्त होती की आम्ही घडयाळाच्या काटयावर सगळी कामं करत असू. जरा काही चुकलं की कडक शिक्षा. मला ती शाळा आवडायला लागली होती, शिस्तीची एक मजा असते. आपण शिस्त पाळली की दुसऱ्याहून जरा जास्त मोठे होतो, आपल्याला लोकांना बोलता येतं.. असो, मुद्दा तो नाहीच, आईने माझी शाळा बदलली अन् मी शासनाच्या एका ‘को-एड’ शाळेत आलो. कारण फक्त एकच- आई आणि बाबांचं ऑफिस असायचं दुपारचं आणि मी पूर्ण दुपारी घरी, त्यामुळे माझ्याकडे बघायला कुणीच नव्हतं. तर ही नवी दुपारची शाळा अतिशय वेगळया प्रकारची होती. नाव होतं ‘शासकीय बाल विनय मंदिर’. ही शाळा गुरुदेव रविन्द्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनच्या संकल्पनेवर आधारित होती. मोठमोठी मैदानं अन् त्यात उघडया आकाशाखाली भरणारे वर्ग, झाडं-झुडुपं, खूप उन्मुक्त असं वातावरण.

मला सुरुवातीला ती शाळा थोडी बेशिस्तीची वाटायची. राग यायचा. मुलं-मुली एकत्र मजा करायचे, विविध खेळ खेळायचे अन् मला त्यांच्यात मिसळायला त्रास व्हायचा. आपण कसे दिसतो, कसे वागतो अशा प्रकारचे नवे नवे न्यूनगंड तोंड वर काढायला लागले होते. काय चांगलं होतं, काय वाईट यात मी पडत नाही; पण हो, ही दोन वेगळी वेगळी विश्वं होती. आता आधीच्या शाळेत शिस्तीच्या नावाखाली एक वेगळया प्रकारचा माणूस म्हणून आम्हाला घडवत होते का? किंवा नव्या शाळेत सरकारी शिक्षक स्वातंत्र्याच्या नावाखाली आम्हाला वाऱ्यावर सोडत होते? माहीत नाही. पण माझ्या बालमनाची मोठी तारांबाळ उडाली होती. अन् या तारांबळीतच माझी त्याच्याशी भेट झाली..

आणखी वाचा-आठवणींचा सराफा: किरणदा.. आमचा मेन्टॉर

नव्या शाळेत पद्धत होती ती गेम्स पीरियड्सची. म्हणजे कुठल्याही विषयाचे शिक्षक मुलांना त्यांच्या मागणीवर खेळायला मैदानात पाठवून देत असत. कधी कधी लागोपाठ ३-३ पीरियड गेम्सचे असायचे. शाळेला कुंपण नव्हतं. अन् माझ्यासारखाच इतरांमध्ये न मिसळू शकणारा माझा एक मित्र आणि मी कुंपणाबाहेर पडायला लागलो. शाळेला लागून सिनेमाची दोन थिएटर्स होती. इन्दौरमध्ये त्यांना टॉकीज म्हणत. उजवीकडे रीगल अन् डावीकडे स्टारलिट. या दोन थिएटर्सनीच माझ्यासाठी जगाची दारं उघडली. दोन किंवा तीन गेम्स पीरियड्स एकत्र मिळाले की आम्ही सटकायचो अन् सिनेमा बघायला बसायचो. सिनेमा कुठलाही असो, गुपचुप बघायचा. एक पीरियड गेम्स असेल तर अर्धा बघायचा, दोन असतील तर पूर्ण. आमचा असा ‘चॉइस’ नव्हता. इंग्लिश, हिंदी, कमर्शियल, आर्ट चित्रपट असं काहीही बघायचो. आणि असाच एकेदिवशी टॉकिजच्या काळोखात तो मला भेटला. तो मला भेटला अनंत वेलणकरच्या रूपात.. होय, त्याचं नाव ओम पुरी. मी ‘अर्धसत्य’ हा सिनेमा बघितला अन् झपाटला गेलो! तो काळ अमिताभ बच्चन यांच्या ‘अॅंचग्री यंग मॅन’ सिनेमाचा होता.

काही दिवसांपूर्वी ‘जंजीर’ नावाचा सिनेमा रीगलमध्ये बघितला होता. अमिताभ बच्चननेही नैसर्गिकरित्या एक पोलीस ऑफिसर साकारला होता; पण ‘अर्धसत्य’ आला अन् ओम पुरींचा अभिनय पाहून वाटलं, आपण खरोखच पोलीस इन्स्पेक्टरलाच बघत आहोत. एक अत्यंत साधारण दिसणारा नट फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर एक अत्यंत कॉम्प्लेक्स सिनेमा आपल्या खांद्यावर उचलून धरतो. काही विशेष न बोलता फक्त डोळयांतून माणसाच्या मनातल्या असंख्य वेदना, राग, लोभ, प्रेमाची आसक्ती अभिनीत करतो. कधी तत्वावर ठाम असणारा एक पूर्ण पुरुष, तर कधी लहानपणी आपल्या आईबरोबरच्या वडिलांच्या वर्तणुकीमुळे हादरलेल्या लहान मुलासारखा दिसतो. नाचत नाही, गात नाही. टाळया घेणारे संवाद म्हणत नाही. अनंत वेलणकर म्हणून वावरणारा हा नट फक्त आपल्या अभिनयाच्या ताकदीवर आपल्याला वास्तवाच्या इतक्या जवळ घेऊन जातो की, वास्तव अन् अवास्तव यातला फरकच संपून जातो.

आज कळतं की, विजय तेंडुलकरांची कथा व पटकथा, गोविंद निहलानी यांचं प्रगल्भ दिग्दर्शन, तेंडुलकर अन् वसंत देव यांचे संवाद हे सगळंच अनंत वेलणकर घडवण्यामागे कारणीभूत होतं, पण तरीही.. ओम पुरी यांनी आपल्या उत्कट अभिनयानं तेंडुलकर आणि निहलानी यांचं संपूर्ण मनोगत या दोघांपेक्षाही अधिक प्रभावीपणे जिवंत करून प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं. त्यानंतर मी किती गेम्स पीरियडमध्ये ‘अर्धसत्य गेम’ खेळला असेन ते मला आता आठवतसुद्धा नाही. तोवर भारताला दारूडयाची अॅरिक्टग कशी करायची ते अमिताभ बच्चन यांनी शिकवलं होतं. आजही कुणी दारूडयाची अॅक्टिंग केली की कुठेतरी अमिताभ बच्चननं साकारलेला दारूडया त्यात डोकावतो. खरे दारू पिऊन तर्राट झालेले लोकसुद्धा अमिताभ बच्चन सारखेच वागतात, पण ओम पुरींचा अनंत वेलणकर जेव्हा दारू पिऊन नशेत उभा राहतो तेव्हा धडकी भरते. अगदी बारीक- सारीक हालचालींतून तोल सुटल्याचा आभास.. वाढत जाणारा राग अन् दारूच्या नशेत जिचा विसर पडतो ती सुटत जाणारी विवेकबुद्धी..

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: सामाजिक चळवळींच्या निमित्ताने..

आमची रीगल टॉकिजच्या गेटकिपरशी दोस्ती होती. तो आमच्या रामबागेच्या मागेच राहायचा. तो आम्हाला कधीही आत सोडायचा. मी ‘अर्धसत्य’चा क्लायमॅक्स वेगळयानं बरेचदा पाहिला होता. आम्हा मित्रांच्या चर्चेत तेव्हा कमर्शियल अन् आर्ट सिनेमा आला होता, ज्याला आम्ही फास्ट अन् स्लो असं म्हणत असू. आर्ट सिनेमा बऱ्याच मित्रांना अतिशय बोअरिंग वाटायचा, पण ‘अर्धसत्य’चा अपवाद होता. तो सगळयांना तितकाच आवडला होता. ‘अर्धसत्य’मध्ये स्मिता पाटील यांचा अतिशय प्रगल्भ अभिनय होता. सदाशिव अमरापूरकर यांचा भीषण रामा शेट्टी, नासिरउद्दीन शाह यांचा मनाला भिडणारा कॅमिओ माईक लोबो, ओम पुरी अन् त्यांच्या आवाजातली दिलीप चित्रे याची कविता.

‘‘एक पलडम् में नपुंसकता
दूसरे में पौरुष,
और ठीक तराजू के कांटेपर
अर्ध सत्य?’’

ही कविता आजही कानात घुमते आहे; जशी किशोर कुमारची गाणी आपण वारंवार ऐकतो. मी पुष्कळदा इंटरनेटवर जाऊन ही कवितासुद्धा ऐकतो. पुढे आमचे कारनामे घरी कळले अन् आमचे गेम्स पीरियड बंद पडले. पण ओम पुरी यांच्या अभिनयाने माझ्या आयुष्याला दिशा दिली. माझे सगळे न्यूनगंड दूर केले. मला काय करायचंय अन् कुठल्या विश्वात जगायचंय हे स्वप्न त्यानंतर माझ्या मनात आकार घेऊ लागलं. मी पुन्हा नाटकांच्या तालमीला जाऊन बसायला लागलो. भरकटलेल्या मला एक दिशा सापडली होती. त्यानंतर ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांचे चित्रपट शोधून शोधून बघायला लागलो. ‘आक्रोश’ मधला मूकनायक, ‘जाने भी दो यारो’ मधला दारूडा बिल्डर अहुजा, ‘मंडी’मध्ये वेश्यांच्या एक न्यूड फोटोसाठी तडफडणारा अत्यंत मॅन्यूपिलेटिव्ह न्यूड फोटोग्राफर. धारावीमध्ये स्वप्न रंगवणारा एक टॅक्सी ड्रायव्हर- जो माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडतो. किती किती विविध भूमिका सहजतेने साकारायचा हा नट. शरीर, हावभाव, भाषा वगैरे वरवरच्या गोष्टी न पकडता तो सरळ एखाद्या चरित्राचा आत्मा व्हायचा. मुलं मला हसायचे.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: बौद्धिक कसरत..

त्या काळात ओम पुरीचा दीवाना असलेला मी अवघ्या इन्दौरमध्ये एकटाच असेन. एकदा इन्दौरच्या अभ्यास मंडळात ओम पुरी आले होते. मी मित्रांसोबत धावत गेलो. अगदी साधा माणूस! सगळयांशी व्यवस्थित बोलत होता, लोक त्याच्या मागे लागले होते – ‘‘सर, एक संवाद म्हणा- ‘अर्धसत्य’चा किंवा कुठल्याही सिनेमाचा वगैरे.’’ – त्यांनी हसून नम्रपणे नकार दिला आणि ते अभिनयाबद्दल जे काही बोलले ते मी कधीच विसरू शकत नाही. ते म्हणाले की, ‘भारतातल्या सगळया मोठया नटांच्या स्टाइल्स आहेत. ते कुठलाही सिनेमा करो, ते एकाच स्टाइलमध्ये करतात म्हणून त्यांचे संवाद लोकप्रिय होतात. मिमिक्री करता येते, पण मी माझी स्टाइल कधी निर्माण होऊ दिली नाही. जसं नदीचं पाणी आपल्या पात्राचा आकार घेतं, मीपण मला मिळालेल्या पात्राचा आकार घेतो. मी आपली स्टाइल त्या पात्राला देत नाही, तर त्या पात्राची स्टाइल स्वत:त घेतो, म्हणून मी संवाद म्हणून दाखवत नाही.’ – लोक हिरमुसले होते, पण मी खूश झालो होतो. मला गुरुमंत्र मिळाला होता. काही दिवसांनी बोर्डाची परीक्षा आली. आमच्या लोअर इंग्लिशच्या पेपरमध्ये एक प्रश्न आला होता. आम्हाला ‘माय हिरो’ या विषयावर निबंध लिहायचा होता. माझ्या मनात दुसरा विचारही आला नाही अन् मी धाडधाड लिहीत सुटलो. मी माझा निबंध ‘माझा हिरो’ ओम पुरी यांच्यावर लिहिला होता. खूश होऊन मी बाहेर पडलो. मित्रांना सांगितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव उमटले. त्या सगळयांनी महात्मा गांधी, नेहरू, सुभाषचंद्र यांच्यावर निबंध लिहले होते. त्या सगळयांचंच मत होतं की, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. आता मी पास होणार नाही, पण देव भलं करो त्या पेपर तपासणाऱ्या शिक्षकांचं- त्यांनी मला उत्तम गुण दिले.

पुढे मी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिकायला गेलो. ओम पुरी जिथे शिकले तीच नाटयशाळा, ‘एनएसडी’च्या लायब्ररीमध्ये आम्ही गमतीशीर पुस्तकं शोधायचो. त्या पुस्तकाच्या इश्यू कार्डमध्ये हे पुस्तक पूर्वी कोणी वाचायला घेतलं आहे त्यांची नावं असायची. मी ओम पुरी साहेबांनी घेतलेली पुस्तकं वाचायला घेऊ लागलो अन् आमच्यात एक समान धागा गुंफायचा प्रयत्न करू लागलो. बऱ्याच वर्षांनी जेव्हा मी मुंबईत आलो आणि उमेदीच्या काळात जेव्हा काम शोधत होतो; तेव्हा अतुल कुलकर्णीनी माझी गाठ प्रसिद्ध अभिनेत्री सारिकाजींशी घालून दिली. त्या प्रख्यात दिग्दर्शक बासू भट्टाचार्याच्या एका पुस्तकावर काम करत होत्या. त्यांचा असिस्टंट म्हणून लागलो. त्या पुस्तकावर काम करत असताना मी त्यांना ओम पुरी यांच्यावर लिहिलेल्या माझ्या निबंधाची गोष्ट सांगितली. त्यांनी तेव्हा काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवसांनी माझा वाढदिवस होता, मला सारिकाजींचा फोन आला की, काही काम नसेल तर संध्याकाळी घरी ये. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी माझ्या वाढदिवसानिमत्त केक वगैरे मागवून ठेवला होता. त्यांची लहान मुलगी श्रुती अन् अक्षरानंसुद्धा ग्रीटिंग कार्डस् दिली. थोडयाच वेळानं दार उघडलं अन् साक्षात ओम पुरी समोर उभे! मला ओम पुरी इतके आवडतात, हे ऐकून सारिकाजींनी त्यांना घरी बोलावून घेतलं होतं- खास माझ्या वाढदिवसासाठी. माझा आनंद गगनात मावेना. सारिकांजींनी मी लिहिलेल्या निबंधाविषयी त्यांना सांगितलं तर ते खो खो हसले होते. पुरीसाहेबांनी मला प्रेमानं मिठी मारली. खूप कमी लोकांना माहीत असेल, ‘बावरा मन’ हे गाणं चित्रपटात येण्यापूर्वी मी त्या रात्री ओम पुरी साहेबांसमोर गायलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते, ‘ये गाना फिल्म मे आना चाहिए.’

ओम पुरी साहेब आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी साकारलेल्या असंख्य भारतीय अन् आंतरराष्ट्रीय चित्रपटांतील भूमिकांमधून ते आहेत यात वाद नाही. पुरी साहब किसे पता था आप इतनी जल्दी चले जाओगे.. अन् मी पुन्हा आपल्यावर एक निबंध लिहीन..

swanandkirkire04@gmail.com