सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही नियमित मानधन देण्याची कल्पना पंचवीस वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम लागू-निळू फुले यांच्या पुढाकाराने राबवण्यात आली. त्यासाठी त्यांनी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करून ‘सांस्कृतिक कृतज्ञता निधी’ची उभारणी केली. या निधीच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने हा विशेष लेख..
१९ ८५ सालची गोष्ट. ‘संपूर्ण क्रांती’ची धग व जनता दलाची जादू दोन्ही ओसरली होती. मात्र प्रश्न तसेच होते. अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणी आपापल्या पद्धतीने त्या समस्यांना भिडत, लढत होते. १९७० पासूनच ही प्रक्रिया चालू झाली होती. भटके विमुक्त, आदिवासी, दलित, शेतमजूर, वेठबिगार, धरणग्रस्त, देवदासी, वेश्या अशा अनेक वंचित समाज घटकात पाय रोवून कार्यकर्ते काम करत होते. त्याबरोबरच पर्यावरण, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, अंधश्रद्धा निर्मूलन अशा क्षेत्रातही काही आग्रही मांडणी व मागणी चालू झाली होती. ही सर्व स्फुल्लिंगे होती. १९७६ पासून दरवर्षी यातील बहुतेक मंडळी विषमता निर्मूलन शिबिराच्या निमित्ताने तीन दिवस एकत्र येत. तो खरे तर परिवर्तनवादी तरुणाईचा उत्सवच असे.
दहा वर्षांमध्ये ही प्रक्रिया चांगलीच स्थिरावली होती. कार्यकर्त्यांना उभारी देणारी वाटत होती. कार्यकर्ते रगीचे होते, हे खरे, पण संसाधनांचे फाटकेपणही फार होते. प्रवास खर्च मिळवणे अनेकदा अडचणीचे जात होते. कार्यकर्त्यांची कार्यप्रवणता टिकावी, याच्यासाठी त्यातील आत्यंतिक गरजूंना तरी नियमितपणे काही आर्थिक मदत देणे आवश्यक होते. विषमता निर्मूलन शिबिराचे निमंत्रक डॉ. बाबा आढाव यांनी अशी कल्पना मांडली, की या कार्यकर्त्यांना नियमित मानधन देण्यासाठी निधी उभारू या. त्यांनी १० लाख रुपये जमा करण्याचा संकल्प सोडला. शिबिराच्या समारोपाचे अध्यक्ष लेखक शंकर पाटील यांनी स्वत: १०० रुपये देऊन आरंभ केला. त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू व निळूभाऊ फुले हे देखील कार्यकर्त्यांची आश्रयस्थाने होती. त्यांच्या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर होत असत. आणि तेथे त्यांना भेटलेल्या व अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी ते आपला खिसा मोकळा करत असत.
या सर्वातून ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या न्यासाची स्थापना झाली. सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाच्या प्रती समाजाची कृतज्ञता म्हणून नियमित स्वरूपात निधी देणे हे त्याचे उद्दिष्ट ठरले. विश्वस्त मंडळात डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, डॉ. बाबा आढाव, विजय तेंडुलकर, ना. धों. महानोर यांचा समावेश होता. त्या बरोबरच अनिल अवचट, गजानन खातू, रूपा कुलकर्णी, लक्ष्मण माने, मी अशा त्या वेळी तरुणांच्या फळीत असलेल्यांचाही सहभाग होता. १९८७ साली न्यासाचे काम चालू झाले.
मुख्य प्रश्न होता निधी संकलनाचा. निधीचे अध्यक्ष असलेल्या डॉ. लागूंनी मोठय़ा उत्साहाने कलाकारांकडे देणग्या मागण्यास सुरुवात केली. त्या वेळी जयाप्रदा, धर्मेद्र.. आणखी कोणी कोणी यांचे प्रत्येकी रुपये पाच हजाराचे धनादेश निधीचा कार्यवाह म्हणून डॉक्टरांनी माझ्याकडे पाठवल्याचे मला आठवते. लवकरच डॉक्टरांच्या लक्षात आले की, निधीच्या प्रयोजनाचा काहीही संबंध न समजता हे नुसतेच पैसा जमा करणे होते आहे. एक नामी कल्पना त्यांना सुचली – नामवंत नाटय़ कलावंतांना एकत्र घेऊन एक नाटक करावयाचे. त्याच्या तिकीटविक्रीतून निधी उभारावयाचा. तनुजा, रीमा, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, भारती आचरेकर, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, सुधीर जोशी असे तगडे नाटय़ कलावंत जमवले गेले. अनेक कलावंतांना सामावून घेऊ शकणारे ‘लग्नाची बेडी’ हे नाटक बसवले गेले. त्यासाठी प्रयोग असणाऱ्या सर्व शहरांत कृतज्ञता निधी मित्रमंडळे स्थापन करण्यासाठी आढाव व मी पायाला भिंगरी लावून बेळगाव ते चंद्रपूर बस वा रेल्वेने हिंडलो. नाटकाच्या मध्यांतरात प्रेक्षकांना कृतज्ञता निधीची कल्पना समजावून सांगितली जात असे. स्थानिक संयोजकांनी जमवलेला निधी सुपूर्द होत असे. त्यानंतर सर्व आवरणे, हिशोब पुरे करणे आणि पुढील गावी पूर्वतयारीसाठी रवाना होणे असे सलग तीन आठवडे चालले.
दौरा सुरू झाल्यावर तीन दिवसांनी नाटक संपल्यावर दारात झोळी घेऊन उभे राहण्याचा नवा फंडा सुरू केला. त्यात जमलेली रक्कम एक लाख रुपये होती. २५ वर्षांपूर्वीचा हा आकडा आहे. ‘कोणतेही चांगले काम पैशावाचून कधी अडत नाही,’ असा महात्मा गांधींचा विश्वास होता. त्याचा जिताजागता प्रत्यय आम्ही घेतला. १० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवून बाहेर पडलेल्या आमच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेने खर्चवेच वजा जाता २१ लाख रुपये टाकले. यानंतर कॅनडा, अमेरिकेमध्ये मराठी नाटकातील गाजलेले प्रवेश व इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले तेंडुलकरांचे ‘कमला’ हे नाटक याचे कार्यक्रम करून आणखी १५ लाख रुपये उभे केले.
निधी वाढवण्यासाठी आणखी एक कल्पना मला १० वर्षांनी सुचली. ती अशी की, विद्यार्थ्यांना एक वेळ उपवास करण्यास सांगावयाचे आणि त्यातून वाचलेले फक्त पाच रुपये त्यांनी शाळेत आणून द्यावयाचे. उपक्रमाचे नाव ठेवले ‘एक उपवास कृतज्ञतेचा’. मुलांना असे आवाहन पोहोचेल आणि निधी जमा होईल, असे एकाही विश्वस्ताला वाटत नव्हते. पहिला प्रयोग सातारा जिल्ह्य़ात केला. तिथे ४८ हजार विद्यार्थ्यांनी उपवास केला आणि दोन लाख २० हजार रुपये जमले. पुढे हाच उपक्रम आम्ही महाराष्ट्राच्या आणखी काही जिल्ह्य़ांत केला आणि एकूण २५ लाख रुपये जमा केले. इतरही छोटय़ा-मोठय़ा माध्यमातून संकलन चालू राहिले. आज निधीकडे जमा असलेले एक कोटी रुपये हे छोटय़ा छोटय़ा देणग्यांतूनच उभे राहिलेले आहेत.
निधीमधून आज नामवंत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मानधन देण्यात आले आहे. मेधा पाटकर, उल्का महाजन, सुरेखा दळवी, प्रतिभा शिंदे, अविनाश पाटील, शिवाजी कागणीकर, रामकुमार रायवाडीकर आणि आणखी अशी अनेक नावे देता येतील. निधीप्राप्त कार्यकर्त्यांच्या आजारपणाला मदत देणे, त्यांना प्रशिक्षण देणे हे देखील ‘साकृनि’करते. या मानधनासाठी कार्यकर्त्यांनी अर्ज करावा अशी अजिबात अपेक्षा नसते. दर दोन महिन्याला त्याच्या बँकेच्या खात्यात रक्कम परस्पर जमा होते. निकष एवढेच आहेत की, या कार्यकर्त्यांने राजकीय पक्षाचे पदाधिकारी नसावे तसेच संसदीय निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून उभे राहू नये. लोकशाहीमध्ये वरील बाबींचे महत्त्व आम्ही पूर्णपणे मानतो. मात्र अशा कार्यकर्त्यांची तरतूद करणे ही त्या त्या राजकीय पक्षांची जबाबदारी आहे, असे आम्हाला वाटते. कार्यकर्त्यांचा भारतीय संविधानावर व शांततामय सनदशीर परिवर्तनाच्या मार्गावर विश्वास असावा, एवढीच अपेक्षा असते. एका कार्यकर्त्यांला जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत निधी दिला जातो; तोपर्यंत काही अन्य पर्यायी सोय त्याने उभी करावी, अशी कल्पना असते. कार्यकर्त्यांने स्वत:च्या संघटनेच्या मान्यतेनेच निधी स्वीकारावयाचा असतो. तसेच अन्य पर्यायी मार्गाने त्याला मानधन मिळू लागल्यास त्याने आपणहून निधीला कळवावे, अशी अपेक्षा असते. या बाबतीतला अनुभव अतिशय चांगला आहे.
आता कळीचा मुद्दा. आज साकृनि सुमारे ५० कार्यकर्त्यांना दरवर्षी अवघे १५ हजार रुपये देते. साकृनिच्या घटनेप्रमाणे सर्व रक्कम मुदत ठेवीतच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे व्याजातून येणाऱ्या रकमेवर आम्ही एवढेच पैसे देऊ शकतो. एकंदरीत आर्थिक स्थिती बघता आम्ही देतो ते मानधन अपुरे नव्हे तर फार म्हणजे फारच कमी आहे, याची खंत; खरे तर लाज विश्वस्त मंडळाला वाटत आली आहे. यावर्षी आम्ही निधीप्राप्त सर्व कार्यकर्त्यांशी यासाठी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलेल्या स्वानुभवातून आम्हाला याबाबतच्या दुसऱ्या बाजूचे दर्शन झाले.
एकजात सर्व कार्यकर्त्यांचे असे मत होते, की ही रक्कम त्यांना अनेक कारणाने अर्थपूर्ण वाटते. पहिली गोष्ट म्हणजे डॉ. लागू, डॉ. बाबा आढाव अशा नामांकित व्यक्ती दरमहा कार्यकर्त्यांला मानधन देतात. यामुळे त्या कार्यकर्त्यांचे समाजातील इतरांच्या नजरेत स्थान उंचावते. घरी कधी मुलांची पुस्तके, आजारी व्यक्तीचा उपचार, ऐनवेळी निघालेला खर्च यासाठी दोन महिन्यांनी हातात हुकमी अडीच हजार रुपये येणार आहेत, याचा त्यांना खूप आधार वाटतो. तिसरे म्हणजे पूर्णवेळ कार्यकर्ता हा पत्नीच्या लेखीही बिनपगारी फुकट फौजदारी असाच असतो. पत्नीच्या नाराजीचे ते प्रमुख कारण असते. कार्यकर्त्यांची काम करण्याची अनावर ओढ त्याला कामापासून रोखू शकत नाही. आणि ज्या समाजघटकात ज्या स्वरूपाचे काम तो करतो, त्यामध्ये त्याला काही अर्थार्जन होणे ही बाब अशक्यप्राय असते. अशा वेळी नियमितपणे त्याच्या खात्यावर जमा होणारे पैसे कार्यकर्त्यांच्या भाषेतच सांगायचे तर पत्नीच्या नजरेत त्याची पत वाढवतात.
मेणबत्तीवर पेटलेली दुसरी मेणबत्ती असे ‘साकृनि’चे बोधचिन्ह आहे. रौप्य महोत्सवी वर्षी त्याचा एक सुखद प्रत्यय मिळाला. अभय जोशी हे भारतीय विमानदलातील वैमानिक. त्यांनी स्वत:च्या कमाईतून एक कोटी रुपये बाजूला काढले. आणि दरवर्षी त्याचे व्याज रुपये आठ लाख गरजू कार्यकर्त्यांचे आजारपण व गरीब मुलांचे शिक्षण यासाठी वाटण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर शक्य होताच ही रक्कम वाढवण्याचा मनोदय व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये आवर्जून २५ टक्के मुसलमान विद्यार्थी निवडण्यात आले.
सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. पहिला पुरस्कार मुस्लीम प्रबोधनाचे काम आयुष्यभर करणाऱ्या ८९ वर्षांच्या बाबूमियाँ बँॅडवाले यांना देण्यात आला. पाहुणे ऐनवेळी आले नाहीत. प्रेक्षकांत पु. ल. देशपांडे व सुनीताबाई होत्या. मी पु.लंना पुरस्कार वितरणाची विनंती केली. काहीही बोलणार नाही, या अटीवर त्यांनी मान्य केले. मात्र पु.लं.नी स्वत:चा शब्द बदलला. स्वत: बोलावयास उठले. म्हणाले, ‘खरे आहे, की मी काही बोलणार नव्हतो; परंतु ८९ वर्षांचे बाबूमियाँ बँडवाले या वयात मुस्लीम समाजासाठी तळमळत आहेत आणि मी जर त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली नाही तर माझ्यासारखा करंटा मीच ठरेन. कृतज्ञता व्यक्त करणे हा मानवी संस्कृतीमधील सर्वात सुंदर आविष्कार आहे, असे मी मानतो.’ सामाजिक कृतज्ञता निधीचा रौप्य महोत्सव हा असा आविष्कार अधिकाधिक समर्थपणे समाजजीवनात व्यक्त व्हावा, यासाठीचा प्रयत्न आहे.
कृतज्ञतेचा रौप्यमहोत्सव!
सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही नियमित मानधन देण्याची कल्पना पंचवीस वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम लागू-निळू फुले यांच्या पुढाकाराने राबवण्यात आली. त्यासाठी त्यांनी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करून ‘सांस्कृतिक कृतज्ञता निधी’ची उभारणी केली. या निधीच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने हा विशेष लेख..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-01-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial help for social organisations