शिल्पा पाठक

पन्नाशी हा वयाचा टप्पा पौगंडावस्थेइतकाच नाजूक असतो; आपल्याला न पेलवणारा प्रौढत्वाचा भार डोक्यावर आला की स्मरणरंजनात बुडून जाण्याची प्रथा आहे, पण त्याचबरोबर आपण कसे घडलो याचं सिंहावलोकन की काय तेही केलं जातं. आपण स्वतःला कितीही निराळं समजलो तरी यातून आपली सुटका नाही. माझ्यासारखे लोक जे सज्ञान होता-होताच परदेशी स्थलांतरीत झाले त्यांच्यासाठी ही घडण फारच मजेशीर वळणांनी गेलेली असते. बालपण जिथे गेलं, जिथली भाषा आणि संस्कृती पदरी आली, स्वतंत्र व्यक्ती म्हणून जिथं मतं तयार व्हायला लागली, जिथं पोटापाण्याच्या व्यवसायाचं शिक्षण झालं; थोडक्यात जिथं मडक्याला आकार आला, तिथं भट्टीत तावून सुलाखून निघता आलं नाही. पण पुढचं सगळं आयुष्य पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागांत तावून सुलाखण्यात गेलं तरी पहिल्या वीस-पंचवीस वर्षांत तयार झालेला साचा काही मोडता येत नाही.

How to relieve discomfort in generation
अस्वस्थता रिचवायची आहे…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
जगणं आकलनाच्या दिशेनं…
Loksatta Lokrang Republic Day 2025 Emergency Tihar Jail Irshad Kamil
‘एकता का वृक्ष’ वठला काय?
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Almost ten years of Mumbai Shanghai sister city relationship have been completed
शांघायकडून मुंबई काय शिकू शकते?
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो

दिवसाच्या सुरवातीला जगात काय चाललं आहे हे पाहण्याआधी आणि सोशल मिडियारूपी राक्षसाच्या स्वाधीन होण्याआधी भारतीय वर्तमानपत्रांवर नजर टाकली जाते आणि आपण देश सोडल्यानंतरच्या पंचवीस वर्षांत झालेल्या प्रचंड सामाजिक बदलांनी बावचळून जायला होतं. मूल्यव्यवस्थेची घसरण वगैरे उमाळे सगळ्याच पिढ्यांतल्या डाव्या-उजव्या विचारसरणीच्या सगळ्याच प्रौढ व्यक्तींना येत असतात. हे गृहीत धरलं तरी गेल्या पंचवीस वर्षांत झालेले बदल समाजाला अगदी मुळापासून बदलवणारे आहेत हे नाकारता येत नाही.

माझा जन्म झाला आणि लगोलग अणिबाणी जाहीर झाली, त्यामुळे भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासातल्या एका मोठ्या घटनेपासूनच आयुष्याची सुरवात झाली. अर्थात त्याचे पडसाद बालपणावर पडावेत अशी काही परिस्थिती नव्हती. पण एक होतं, की काँग्रेसविरोधी असलेल्या डाव्या विचारसरणीच्या पक्षांना लोकशाहीत मोठी जागा होती. माझं लहानपण गारगोटी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका खेड्यात गेलं. पण या खेड्याला जे. पी. नाइकांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या ग्रामीण विद्यापीठाचा वारसा होता, त्यांच्या धेयवादाने प्रभावित झालेल्या विचारी शिक्षक-प्राध्यापकांचा सहवास होता. खेड्यात असूनही एक जुनं आणि बरीच चांगली पुस्तकं असलेलं वाचनालय होतं. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, जटामुक्ती चळवळ, ग्रामीण साहित्य संमेलनं, इतर सांस्कृतिक कार्यक्रम, निरनिराळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांची व्याख्यानं यांसारख्या कोणत्या ना कोणत्या तरी प्रकल्पात सहभाग घेणारी माणसं आजूबाजूला होती. सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमात काही ना काही सहभाग असणं हे प्रत्येक सुशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून गृहीतच धरलेलं असायचं, त्यामुळे प्रकल्पाशी फार जवळीक नसलेली माणसंही स्वयंसेवक म्हणून त्यात सहभागी होत.

खेड्यापाड्यात अंधश्रद्धा पाळल्या जात असल्या तरी दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळायचा. त्यांच्या कामासाठी एक दिवस त्यांना आपले प्राण गमवावे लागतील असा विचारही मला तेव्हा करता आला नसता. घरात अगदी देव-धर्म-शिवाशिव पाळणारेही घराबाहेर उदारमतवादी असत, कारण उदारमतवादाला राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा होती. माझे सख्खे शेजारी जटामुक्ती चळवळीचे सक्रिय प्रणेते होते, सुटीच्या दिवशी त्यांच्या व्हरांड्यात हातात कात्री घेऊन एखाद्या महिलेला जटमुक्त करताना ते आमच्याशी सहज शेजारीपणाच्या गप्पा करायचे, हा माझ्यासाठी एक सर्वसाधारण अनुभव होता. आजूबाजूला सुधारक विचारांची माणसं आणि कट्टर नास्तिक वडील असल्याने मला फार निरागसपणे वाटायचं की पंचवीसेक वर्षांत धार्मिकता फक्त सांस्कृतिक उत्सवांपुरती उरेल! आता नव्याने तरारलेली कर्मकांडं, अंधश्रद्धा, बुवाबाजी वगैरे पाहिलं की चक्रं उलट्या दिशेने फिरायला लागली आहेत याची जाणीव होते.

जातवास्तव मात्र अतिशय सरळ आणि भेदक होतं; आंतरधर्मीय तर सोडाच, पण आंतरजातीय लग्नदेखील प्रचंड खळबळजनक असत. राजघराण्यांशी जोडलेल्या घराण्यांना प्रचंड प्रतिष्ठा असे, जणू समाजाने त्यांना एक अलिखित अधिकार दिलेला असे. माझ्या पांढरपेश्या घरातल्या वातावरणामुळे मला या सामाजिक उतरंडीचं फार नवल वाटत असे. शाळेत सगळ्या जातीधर्मांच्या मुली आपल्या मैत्रिणी असल्या, तरी काही मैत्रिणींच्या घरी येताना मोलमजूरच नव्हे तर सामान्य माणसंदेखील मुजरा करून येतात, पाठ न दाखवता मागे पावलं टाकत निघतात वगैरे गोष्टी अचंबित करायच्या. आपलं कुटुंब हे सामाजिक नियम का पाळत नाही, त्यामागे आपलं जातवास्तव आहे की शिक्षणानं मिळालेली प्रतिष्ठा, की दोन्ही असा प्रश्न अगदी लहान वयात पडलेला असे.

जातवास्तवापलीकडे असलेला शेजारधर्म मात्र व्यवस्थित शाबूत होता. घरांचे दरवाजे कायम उघडे असत, आईवडलांच्या अनुपस्थितीत शेजारीपाजारी आपली काळजी घेणार हे गृहीत धरलेलं असे, स्वयंपाकाचे डबे रोज एकमेकांच्या घरांतून दिले-घेतले जात असत, प्रसंगाला सगळे धावून येत, कोणत्याही वेळी कोणाच्याही घरी बिनदिक्कत येण्याजाण्याची मुभा होती, प्रायव्हसी वगैरे ‘परदेशी’ संकल्पना आमच्या आयुष्यात शिरल्या नव्हत्या. गावात दोन-चार कुटुंबांकडे चारचाकी गाडी होती आणि हातावर मोजता येईल अशांकडे टेलिफोन! प्राथमिक शाळेत असताना शहरांतून टीव्हीचं आगमन झालं आणि त्याला बरीच वर्षं झाल्यावर मग घरोघरी टीव्ही आले. माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि देशानं आर्थिक उदारीकरण स्वीकारलं, पण त्याचे दूरगामी परिणाम लक्ष्यात येण्याआधीच मी भारताबाहेर स्थलांतरित झाले. त्यामुळेच कदाचित हे बदल मला अधिक तीव्रपणे जाणवत असावेत.

मला आठवतंय, मी प्राथमिक शाळेत असताना शाळेत ‘जागतिकीकरणाचे धोके’ या विषयावर एक व्याख्यान आयोजित केलं गेलं होतं आणि व्याख्याते म्हणाले होते की पुढच्या काही दशकांत बहुराष्ट्रीय कंपन्या भारतावर राज्य करतील. त्या वेळी माझ्या बालबुद्धीला टूथपेस्ट, साबण आणि तत्सम गोष्टी विकणाऱ्या या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतावर राज्य करतील वगैरे संकल्पना म्हणजे कसला तरी बागुलबुवा वाटला होता. ‘आर्थिक विषमता वाढेल’ असं एक नेहमी म्हटलं जायचं. पण तेव्हाही आजूबाजूला प्रचंड गरिबी दिसायची. हातातोंडाशी गाठ असलेल्या घरांतली मुलं शाळा सोडून जाताना दिसायची, त्यांच्या गणवेशांना असलेली ठिगळं दिसायची, घरकामासाठी लहान मुलं ठेवणं सर्वमान्य होतं आणि उलट आपण त्यांच्या कुटुंबाला आधार देतो आहोत असा विचार असायचा. कामवाल्यांना उरलेलं शिळं अन्न, जुने फाटके कपडे देणं वगैरे औदार्याचं समजलं जायचं. त्यामुळे आर्थिक विषमता वाढेल म्हणजे नेमकं अजून काय होईल ते काही समजायचं नाही. आता पावलापावलावर उभे राहिलेले मॉल्स, त्यातला झगमगाट, आणि त्याबाहेर उभे असलेले मळके उपाशी जीव पाहिले की जाणवतं की चित्र तेच राहिलं आहे फक्त आता ते आपल्याला अधिक भयाण दिसतं आहे.

माझ्या जन्मानंतर आतापर्यंत भारताची लोकसंख्या दुप्पट झाली असेल. माझ्या लहानपणी सगळ्या समस्यांचं मूळ ‘लोकसंख्येचा विस्फोट’ असायचं, पण आता ती जगातली सर्वात मोठी बाजारपेठ झाल्यानं लोकसंख्या हेच भारताचं सामर्थ्य वगैरे झालं आहे असं ऐकू येतं आणि मला हडबडायला होतं. बाजारपेठ झाली आहे हे खरंच. पण या बाजाराचे लाभार्थी नक्की कोण हे मात्र गुलदस्त्यात राहतं. या बाजारपेठेच्या फायद्यासाठी निसर्गाला ओरबाडून झालेला ऱ्हास हतबुद्ध करतो. भारतभेटींमधली अंतरं दर वेळेस वाढत जातात, पण प्रत्येक वेळेस इथे पाऊल टाकलं की शहरांतलं असह्य होत चाललेलं हवा-पाणी-आवाज प्रदूषण प्रकर्षानं जाणवतं. फक्त त्याबद्दल ‘ब्र’ काढणं म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यानं घरच्या लोकांवर टीका करण्यासारखंच अप्रस्तुत असल्याने गप्प राहिलं जातं. मग लक्ष्यात येतं की हे गरम पाण्यातल्या बेडकासारखंच आहे, थोडंथोडं वाढत गेलं की लोकांच्या लक्षातच येत नसावं. शिवाय आपल्या सोसायट्यांच्या आतल्या हिरवळीपलीकडे आणि वातानुकूलित घरांच्या भिंतीपलीकडे काय होतं आहे याच्याशी कोणाला काही फार देणंघेणंही उरलेलं नाहीय.

भारत सोडल्यानंतर माझा प्रवास सिंगापूर ते आयर्लन्ड ते आता कॅनडा असा झाला. त्या काळात ज्या वेगाने भारतात हे सामाजिक बदल झाले तितके इतर ठिकाणी झालेले दिसत नाहीत. प्रगत देश, विशेषतः युरोपीय देश आता हे प्रगतीचं चक्र ओलांडून पुढच्या टप्प्यावर पोहोचले आहेत आणि आता त्यांच्या भूभागातला निसर्गाचा ऱ्हास थांबवून समृद्धीसाठी तो ऱ्हास प्रगतीशील देशांकडून करवून घेणं सुरू झालं आहे.

हल्ली भारतीय समाजात दिसणारा घाऊक मुस्लिमद्वेषही मी पाहिलाच नव्हता. अमुक एक पक्ष मुस्लिमांचं लांगूलचालन (हा शब्द मात्र तस्साच राहिला आहे!) करतो वगैरे टिप्पण्या ठरावीक घरांतून तेव्हाही होत असत, पण त्यांच्याच पंक्तीला बसणारे इतर लोक विरुद्ध बाजूला झुकलेले असू शकत. त्यामुळे हे मतभेद फार जहरी पातळीवर येत नसत. मुस्लिमांना विशेष सवलती देऊ नयेत असं म्हणणारेही त्यांच्या व्यवसायांवर बहिष्कार टाका किंवा त्यांना घरं विकू नका वगैरे म्हणू धजत नसत. सोशल मीडियाच्या उदयाआधी मतभेद व्यक्त करतानाही सभ्यतेच्या मर्यादा क्वचितच ओलांडल्या जात असत.

स्थलांतरित लोकांची पहिली पिढी भारतात घडणाऱ्या या सामाजिक बदलांचा आरसा असते. भारतात राममंदिराचा जयघोष सुरू झाला की अनिवासी भारतीयांना रामभक्तीचा कढ येतो आणि वेगवेगळ्या भाषिक संघटना हिरिरीने हिंदू एकीकरण करायला सज्ज होतात. भारतातल्या शैक्षणिक माध्यमात हिंदू संस्कृतीला महत्त्व द्यायला हवं अशी आरोळी आली की अनिवासी भारतीयांना त्यांच्या इथल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात हिंदू संस्कृतीला मानाचं स्थान मिळावं अशी ओढ लागते. अनिवासी भारतीयांना गेल्या दोन दशकांत भारतात झालेल्या ‘विकासा’चा प्रचंड अभिमान असतो, शासकीय भ्रष्टाचार कमी झाला आहे याची खात्री असते, घरपोच मिळणाऱ्या सेवांबद्दल फार ममत्व असतं. पण तरी कायमस्वरूपी भारतात परतण्याकडे कल मात्र नसतो. इथे अनिवासी नागरिकांकडे फार उपरोधाने पाहण्याचा उद्देश नाही. कारण शेवटी जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार!

मला या टप्प्यावर भारतातल्या आणि भारताबाहेरच्याही समूहांमध्ये उपरं असल्याची बोच लागते. बालपणीच्या आदर्शवादी खेड्यापासून आपण तुटलेले आहोत, अक्राळविक्राळ पसरलेल्या निसर्गाशी नाळ तुटलेल्या शहरांशी जुळवून घेता येत नाही. जागतिकीकरणाचा फायदा मिळूनही त्यासाठी मोजलेली निसर्गाच्या ऱ्हासाची किंमत परवडत नाही. कौटुंबिक आणि सांस्कृतिक समुदायांची जवळीक, स्नेह हवासा वाटतो. पण त्यांच्या आणि आपल्या मूल्यांमध्ये इतकं अंतर पडलेलं असताना ते कसं साध्य होईल याबद्दल शंका वाटते. व्यक्तिकेंद्री जीवनव्यवस्था पटत नाही, पण आपल्या खासगी आयुष्यावर आक्रमणही नको असतं.

पण असं उपरं वाटत असताना दुसऱ्या बाजूने मी आश्वस्तही होत असते, की आपण फक्त आर्थिक समृद्धीसाठी स्थलांतर केलं नाही, अनुभवांची दालनं विस्तारण्यासाठीही फिरत राहिलो, जिथे जाऊ तिथल्या समाजाशी आणि तिथल्या संस्कृतीशी जोडून घेत राहिलो, माणसांकडे भेदभावाच्या चष्म्यातून पाहिलं नाही, मित्र जोडताना फक्त समविचारी माणसं शोधली, जातीचा वा धर्माचा विचार केला नाही. आपल्याला निसर्गाबद्दल आणि इतर प्रजातींद्दल ममत्व वाटतं, जे अन्याय्य वाटतं त्याला आपण पाठीशी घालत नाही, आपल्या मातृभाषेशी आणि अस्मितांपलीकडल्या आपल्या संस्कृतीशी इमान बाळगून आहोत. मुख्य म्हणजे आपण आज, आत्ता, अजूनही आपल्या धारणा सतत तपासून पाहत राहतो. हे सगळं तपासताना जाणवत राहतं की या साऱ्यामागे आपण पंचवीस वर्षांपूर्वी मागे सोडलेला, समृद्ध अडगळींनी भरलेला आणि विविधतेने गजबजलेला एक देश आहे आणि हा वेताळ आपल्या खांद्यावर आजही बसून आहे. पन्नाशीला आल्यामुळे या वेताळाचं अस्तित्व हरघडी आणखीनच तीव्रतेनं जाणवायला लागलं आहे, इतकंच!

sameershilpa@gmail.com

Story img Loader