रघुनंदन गोखले

तुम्हाला छानशा वातावरणात आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायच्या आहेत का? आणि त्याच वेळी तुम्हाला युरोप बघायचा आहे का? तुम्ही स्वत: किंवा तुमचे कुटुंबीय हे २००० पेक्षा कमी रेटिंगचे खेळाडू असाल तर तुम्हाला चेक रिपब्लिक या निसर्गसुंदर देशात जाऊन खेळायला आवडेल; आणि तेही खिशाला अधिक चाट न लावता! त्याच वेळी तुम्ही जर मास्टर किंवा ग्रँडमास्टर बनायचा प्रयत्न करत असाल तर बुडापेस्ट या हंगेरी देशाच्या राजधानीत वर्षभर उच्च दर्जाच्या स्पर्धा सुरू असतात. तिथे जाऊन तुम्ही आपले ध्येय पुरे करू शकता. 

Trade deficit narrows to five month low in September
व्यापार तूट घटून सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
loksatta balmaifal article
सुखाचे हॅशटॅग: सावकाश, पण हमखास!
india vs pakistan womens t20 world cup match preview
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला ट्वेन्टी२० विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने-सामने
IND vs BAN Rohit Sharma Surprising Reaction Video Viral on Akashdeep Wicket DRS
IND vs BAN: सरप्राईज, सरप्राईज…, आकाशदीपची भेदक गोलंदाजी अन् परफेक्ट निर्णय, रोहित शर्माही झाला अवाक्, पाहा VIDEO
chess olympiad 2024, india women participants
बुद्धीबळ सम्राज्ञी… बुध्दीबळ ऑलिंपियाडमधल्या ‘त्या’ पाचजणी आहेत तरी कोण?
India grandmaster chess player D Gukesh expressed that he did not even think about it during the chess Olympiad sport news
ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान जगज्जेतेपदाच्या लढतीचा विचारही नाही -गुकेश
Chess Olympiad Competition Indian men and women teams win gold sport news
दोन दशकांची प्रतीक्षा संपल्याचा आनंद! बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील सुवर्णयशानंतर द्रोणावल्ली हरिकाची भावना

जगभर वेगवेगळय़ा बुद्धिबळ संघटना आहेत, ज्या बुद्धिबळ संबंधी उपक्रम घेत असतात. या संघटना लोकशाही पद्धतीनं आपला कारभार चालवतात. त्यांच्या विविध उपक्रमांमध्ये स्पर्धा, खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरं, पंचांसाठी शिबिरं, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. परंतु गेली ३३ वर्षे एक कंपनी त्यांच्या देशात फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करते आणि तोच त्यांचा व्यवसाय आहे, असं जर तुम्हाला कळलं तर आश्चर्य वाटेल. ही कंपनी म्हणजे AVE KONTAKT आणि ती आहे चेक रिपब्लिक या देशाची. त्यांच्या स्पर्धाना ते ‘चेकटूर’ म्हणतात.

http://www.czechtour.net या साइटवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल.

एक बुद्धिबळवेडा हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये गेली ३२ वर्षे स्पर्धा घेत आहे; आणि त्याची स्पर्धा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सुरू होते. म्हणून त्या स्पर्धेचं नाव FIRST SATURDAY. हा आयोजक माजी सैनिक आहे, तो सैनिकी शाळेत रसायनशास्त्र शिकवायचा. त्याचं नाव लाझलो नेजी. त्याच्या FIRST SATURDAY  या नावाच्या स्पर्धेत आतापर्यंत साक्षात मॅग्नस कार्लसन, फॅबियानो कारुआना, नाकामुरा असे महान खेळाडू खेळून गेले आहेत.

AVE KONTAKT आणि FIRST SATURDAY परस्पर विरोधी प्रकारच्या स्पर्धा घेतात. चेक रिपब्लिकमधील स्पर्धा विविध गावं/ शहरं यांमध्ये होतात, तर लाझलो आपलं बस्तान हंगेरीची राजधानी येथेच बसवून आहे. चेकटूर आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी स्विस पद्धतीनं स्पर्धा घेतात. त्यामुळे त्यांच्या स्पर्धामध्ये कोणीही कधीही भाग घेऊ शकतो. लाझलो नेजी मात्र फार चोखंदळ आहे. त्याच्या बहुतेक स्पर्धा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मास्टर अथवा ग्रँडमास्टर बनण्यासाठी असतात. प्रत्येक स्पर्धेत जास्तीत जास्त १० ते १२ खेळाडू असतात. जास्त खेळाडू असले तर लाझलो त्यांचे अनेक गट बनवतो, पण प्रत्येक गटात १०-१२ पेक्षा जास्त खेळाडू नसतात. अर्थात सामान्य प्रकारच्या रेटिंग स्पर्धा तो घेतो, पण अपवादानं.

चेकटूर आणि AVE KONTAKT

उगाच सामाजिक कार्याचे ढोल बडवायचे आणि आपले विविध स्वार्थ साधून घ्यायचे, असे छक्के पंजे या युरोपिअन आयोजकांचे नाहीत. ते सरळसरळ नफ्यासाठी स्पर्धा घेतात. आपल्याकडे दुकानात पाटी असते- ग्राहकांचा संतोष हाच आमचा फायदा! असला भंपकपणा न करता AVE KONTAKT ही कंपनी ग्राहकांना देशाटनाचा आनंद देतेच आणि वर स्वत:चा फायदाही करून घेते. आपण एखाद्या दुकानात जावं आणि आपली बिलकूल फसवणूक न होता आपल्याला माल मिळावा; आणि तोही उत्कृष्ट प्रतीचा असं या कंपनीशी व्यवहार करताना वाटतं. माल म्हणजे आपल्याला अतिशय सुंदर वातावरणात बुद्धिबळ स्पर्धा खेळल्याचं समाधान मिळतं आणि बरोबरच्यांना राहायला स्वस्त आणि मस्त हॉटेल तसंच प्रवास, जेवणखाण यासाठी योग्य ते मार्गदर्शन!

माझा स्वत:चा अनुभव सांगतो. एकदा मुंबईहून माझं विमान उशिरा सुटलं, परिणामी माझी पुढची फ्लाइट चुकली. मला एक दिवस इस्तंबूला रहावं लागलं. मी चेकटुरच्या आयोजकांना ईमेल करून तसं कळवलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी टॅक्सी पाठवा असं सांगितलं. आयोजकांनी माझ्याकडून फक्त त्या दिवशीचे पैसे घेतले. आदल्या दिवशी त्यांचा ड्राइव्हर येऊन गेला होता, त्यांनी त्याचे पैसही त्यांनी नाही घेतले.

चेक रिपब्लिक (The Czech Republic ) या छोटय़ाशा निसर्गरम्य देशात विविध शहरात/गावात/ टुमदार खेडय़ात या स्पर्धा होतात. आश्चर्य म्हणजे, चेक ओपन या त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या बुद्धिबळ महोत्सवात किमान ४० देशातून लोक येतात आणि एक पंधरवडा पारडूबीसे या गावात १५०० लोक विविध प्रकारच्या अनेक स्पर्धामध्ये भाग घेतात. २००७ साली त्यांच्या या महोत्सवात ४७ देशातील तब्बल १७०४ लोकांनी भाग घेतला होता. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धेसोबत छोटय़ांसाठीही अनेक स्पर्धा असतात. हा महोत्सव इतका प्रसिद्ध आहे की, जपान सरकारने येथे जपानी बुद्धिबळ ‘गो’ याचीही स्पर्धा प्रायोजित केली आहे. वेगवेगळय़ा आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांना प्रायोजित करण्यासाठी गर्दी करतात, कारण इतक्या विविध देशांतील लोक त्यांना एकत्र कोठे मिळणार?

अनेक भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत येथे भाग घेतला आहे. येथे भाग घेण्यासाठी व्हिसापासून सर्व प्रकारची मदत आयोजक करतात. तुम्हाला कंपनी जे माहितीपत्रक पाठवते त्या माहितीपत्रकात विविध हॉटेलबरोबर स्वस्त होस्टेल्सची माहिती असते. जगभरचे बुद्धिबळविषयक साहित्य विकणारे विक्रेते येथे एकत्र येतात आणि तुम्हाला बुद्धिबळाची पुस्तके, सॉफ्टवेअर्स, विविध प्रकारचे पट आणि सोंगटय़ा विकत मिळतात. आपल्या गावात या स्पर्धा घ्याव्यात म्हणून अनेक महापौर या स्पर्धाना प्रायोजित करतात. हिवाळय़ात मेरियनबाद या गावी होणारी स्पर्धा तर फार प्रसिद्ध आहे. तेथे आपल्या हॉटेलभोवती बर्फच बर्फ असतो. जवळच गरम पाण्याचे औषधी झरे आहेत. सगळय़ा हॉटेलमध्ये ‘स्पा’ असतात. त्यामुळे बरोबर आलेल्या पालकांना वेळ कसा घालवावा याची चिंता नसते. हॉटेलपासून चालत जायच्या अंतरावर बर्फात चालणारे खेळ आहेत. आपल्याला हवे तर ७ दिवसात स्केटिंग शिकता येतं.

चेकटूरच्या बाकी स्पर्धा म्हणजे कमी दिवसांत जास्तीत जास्त स्पर्धा असं असतं. प्रत्येक ८ दिवसांच्या स्पर्धेत तुम्हाला ९ रेटेड डाव, ११ जलदगती रेटेड डाव आणि ११ विद्युतगती रेटेड डाव असे चक्क ३१ रेटिंग डाव खेळता येतात. आणि तेही जास्त ताण न पडता. कारण दोन दिवस सकाळी जलदगती आणि विद्युतगती स्पर्धा होतात. आणि तेथले पंच इतके तरबेज आहेत की ते तीन तासात या स्पर्धा संपवतात आणि या स्पर्धाचं प्रवेशशुल्क फक्त ४०० रुपये असतं.

या कंपनीचं कार्य इतकं  पद्धतशीर चालतं की आपल्याला थक्क व्हायला होतं. काही स्पर्धा रविवारी संपतात आणि सोमवारी पुढची स्पर्धा दुसऱ्या गावी सुरू होणार असते. त्या स्पर्धेला लागणारी टेबलं, पट, घडय़ाळं, इत्यादी साहित्य त्यांचे सदस्य आधीची स्पर्धा संपली की पटापट गोळा करतात आणि ट्रकमध्ये घालून पुढच्या गावाला रवाना करतात. आणि त्यांच्या स्पर्धा वेळेवर सुरू होतात. प्रमुख पाहुणा दोन मिनिटांचं भाषण उभ्या उभ्या करतो आणि लगेच स्पर्धेला सुरुवात होते. बक्षीस समारंभही तसाच. सगळे मान्यवर उभे असतात. पटापट बक्षिसं दिली जातात. आणि गंमत म्हणजे, बक्षिस न मिळालेल्यांनाही खास भेटवस्तू दिल्या जातात. डॉ. इयान माझूक हे पारडूबिसे गावचे उपमहापौर आहेत. त्यांचे सहकारी जिरी, लॉसमन आणि त्यांचा व्यवस्थापक मायकेल हे तुमच्या मदतीला कायम तत्पर असतात. आपल्या स्वत:च्या गावात सतत स्पर्धा घेणारे जगात खूप आहेत, पण देशातील विविध गावांमध्ये जाऊन स्पर्धा आयोजित करणारी  AVE KONTAKT ही जगातील एकमेव कंपनी आहे.

बुडापेस्ट ची FIRST SATURDAY स्पर्धा

याविरुद्ध लाझलो नेजी स्पर्धा घेतो. सव्वासहा फूट उंचीचा हा धिप्पाड माणूस वर्षभर आपल्या स्पर्धेसाठी मेहनत घेत असतो. त्याचं सर्व कुटुंबच या स्पर्धामध्ये मग्न असतं. या स्पर्धा हेच त्याचं उत्पन्नाचं साधन आहे. पण त्यासाठी तो काहीही छक्केपंजे करत नाही. माझी आणि लाझलोची पहिली भेट मला आठवते. तो मला म्हणाला की, मी तुला जेवायला नेतो. हॉटेल तू निवड. पण आपण बिल अर्ध अर्ध करायचं. इतका सरळ इसम बोलायला मात्र अघळपघळ आहे. त्याला हिंदीही थोडं थोडं येतं.

गोव्याचा छोटा खेळाडू लिऑन मेन्डोन्का आणि त्याचे वडील बुडापेस्टहून एमिरेट्सच्या विमानात चढत असताना त्यांना सांगण्यात आलं की, भारतानं त्यांच्या सीमा करोनामुळे बंद केल्या आहेत आणि तुम्ही रात्री १२ पर्यंत भारतात पोचू शकणार नाही. बिचाऱ्या मेन्डोन्का बापलेकांना बुडापेस्टमध्ये अडकून पडावं लागलं. त्यांना आधार होता लाझलो आणि त्याच्या FIRST SATURDAY स्पर्धाचा! लिऑननं या संधीचं सोनं केलं आणि काही महिने बुडापेस्टमधेच खेळून त्यानं ग्रँडमास्टर पदाकडे झेप घेतली. तीच गोष्ट अमेरिकी नागरिक अभिमन्यू मिश्राची! या छोटय़ानं तर कोविड काळात महिनोंमहिने बुडापेस्टमध्ये राहून जगातील सर्वात लहान ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला. तोही अवघ्या १२ वर्षे, चार महिने आणि २५ दिवस इतक्या वयाचा असताना!

मी अनेकदा बुडापेस्टला गेलो आहे. माझी लाझलोशी छान मैत्री झाली आहे. अनेक भारतीय सतत बुडापेस्टला जाऊन खेळत असल्यामुळे लाझलोला आता हिंदीही कळू लागलं आहे. लाझलो नेजी तुम्हाला कोणतीही मदत करायला तत्पर असतो आणि त्यातून तो त्याचं कमिशन वसूल करतो. तुम्हाला हॉटेल हवं, स्वस्तात टॅक्सी पाहिजे, बुडापेस्टची सफर हवी.. लाझलो तुमच्या दिमतीला हजर असतो. एकदा मी त्याला विचारलं, ‘‘हॉटेल मला ४००० फोरिंट घेऊन विमानतळावर सोडत आहे. ठीक आहे का?’’ लाझलो ताबडतोब म्हणाला, ‘‘मला ३५०० दे. मी करतो तुझी सोय!’’ खरोखरच स्पर्धेत खेळणारा एक आंतरराष्ट्रीय मास्टर त्याची गाडी घेऊन हजर होता.

वर्षांनुवर्षे महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध देशाच्या ग्रँडमास्टर आणि मास्टर्सना जमवून उच्च दर्जाच्या स्पर्धा घेणं सोपं नाही. पण माणसांचा भुकेला लाझलो आणि त्याचं कुटुंबीय स्वत:ला या स्पर्धामध्ये झोकून देतात. जागतिक संघटनेनं त्याला ‘आंतरराष्ट्रीय आयोजक’ हा सन्माननीय किताब देऊन त्याचा गौरव केला आहे. लाझलोला तुम्ही 

http://www.firstsaturday.hu या साइटवर जाऊन संपर्क करा. तुम्हाला लगेच उत्तर मिळेल.

असे हे मुलखावेगळे आयोजक एक प्रकारे स्वार्थाबरोबर बुद्धिबळ खेळाडूंना मदत करून परमार्थही साधत आहेत, असं म्हणावं लागेल.

gokhale.chess@gmail.com