|| मृणाल तुळपुळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॉलंड या टय़ुलिप्सच्या देशात जन्मलेली ज्युडिथ दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशात नवऱ्याच्या नोकरीनिमित्ताने आली काय, अन् अल्पावधीतच तिने दुबईवासीयांना माणसाच्या आयुष्यातले फुलांचे महत्त्व पटवून दिले! तिने चक्क फुलांचे दुकानच थाटले दुबईत. त्याविषयी..

रंगीबेरंगी फुलांनी नटलेल्या बागा, रस्त्याच्या कडेला असलेले फुलांचे ताटवे आणि मॉलमधील फुलांनी भरलेली दुकाने बघितली की आपण दुबईसारख्या वाळवंटाच्या देशात आहोत यावर विश्वासच बसत नाही. एक दिवस मी अशाच एका मॉलमधील फुलांच्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारची फुले बघत उभी होते. तिथे एक मुलगी पुष्परचना करत होती. मला बघून ती बाहेर आली आणि मला काय हवे आहे याची चौकशी करून तिने दुकानातील फुलांची माहिती दिली. ती होती दुकानाची डच मालकीण ज्युडिथ!

एका डच मुलीने दुबईत फुलांचे दुकान काढले आहे, हे ऐकून मी उत्सुकतेने तिला तिच्या दुकानाबद्दल विचारले. ज्युडिथ सांगू लागली, ‘‘माझा नवरा दुबईतील एका ब्रिटिश कंपनीत काम करतो. त्याच्याबरोबर दुबईला आल्यानंतर मी एका ऑफिसमध्ये काम करत असे. पण फुलांच्या सान्निध्यात वाढलेली मी तिथे एका जागी बसून काम करण्यात फार काळ रमू शकले नाही. माझ्या मनात फुलांशी निगडित असे काहीतरी करावेसे बरेच दिवस घोळत होते.’’

टय़ुलिप्सच्या देशात जन्मलेल्या ज्युडिथच्या वडिलांची हॉलंडमधील अल्स्मीर या गावात फूलशेती आणि फुलांचे दुकान होते. त्यामुळे ती फुलांच्या सोबतीनेच लहानाची मोठी झाली होती. तिने लहानपणापासून आपल्या आई-वडिलांना फुलांची काळजी घेताना आणि त्यांच्याशी संवाद करताना पाहिले होते. त्यामुळे तिच्यातही फुलांची आवड निर्माण झाली. मी तिच्या गावी अल्स्मीरला फुलांचा लिलाव बघायला गेले होते, हे ऐकल्यावर तर ती फारच खूश झाली. तिला काय बोलू आणि काय नको असे झाले.

दुबईमध्ये सहा-सात महिने चांगली हवा; पण उरलेले दिवस अगदी रखरखीत आणि गरम. अशा हवेत ताज्या टवटवीत फुलांमुळे नक्कीच मन प्रफुल्लित होते. ज्युडिथने नेमके हेच हेरले आणि तिने आपल्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या व ऑफिसमधील लोकांशी बोलून त्यांच्या फुलांच्या आवडीबद्दल जाणून घेतले. ज्या घरात ताजी टवटवीत फुले ठेवलेली असतात तिथे कायम आनंद नांदतो, असे तिच्या देशात मानले जाते. ही गोष्ट तिने दुबईवासीयांना पटवून दिली आणि मग आपली नोकरी सांभाळून मायदेशातून टय़ुलिप्स व इतर टिकाऊ फुले मागवून घरातूनच फुलांचा व्यवसाय सुरू केला. ती लहानपणी आपल्या आईकडून वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचना करायला शिकली होतीच; त्याचा उपयोग करायचे तिने ठरवले.

ज्युडिथला तिच्या ऑफिसमध्ये कुठेच फुले दिसत नसल्यामुळे ती अगदी बेचन व्हायची. फुलांचा व्यवसाय सुरू केल्यानंतर तिने आपल्या बॉसला विचारून ऑफिसच्या स्वागतकक्षात तसेच मीटिंग हॉलमध्ये फुले व लहान पुष्परचना ठेवायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये खूप लोकांची वर्दळ असे आणि ते ज्युडिथच्या पुष्परचनांचे नेहमी कौतुक करत असत. अल्पावधीतच तिला त्याच इमारतीतील व जवळपासच्या इतर ऑफिसांमधून फुले पुरवण्याचे काम मिळू लागले.

ज्युडिथ सांगते, ‘‘बहुतेक सगळ्या पुष्परचना मी स्वत:च करते व मदतीला असलेल्या मुलीला बरोबर घेऊन स्वत:च्या गाडीतून त्या- त्या ठिकाणी नेऊन देते.’’ प्राथमिक तयारी घरून किंवा दुकानातूनच करून नेल्यामुळे ती पुष्परचना पटकन् तयार होते. प्रत्येक ठिकाणच्या रचना आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा बदलाव्या लागतात. एखाद्या ठिकाणी काही खास कार्यक्रम असला तर त्याला अनुसरून योग्य अशी पुष्परचना ज्युडिथ करते.

या व्यवसायातला एखादा लक्षात राहणारा अनुभव सांगू शकशील का, असे विचारल्यावर ज्युडिथ म्हणाली, काही दिवसांपूर्वी एका ऑफिसमध्ये जपानी पाहुणे येणार असल्यामुळे तिथे तिने ख्रिसंथीममची (शेवंती) फुले, बांबूची पाने व लालचुटुक चेरीचे घोस वापरून ‘इकेबाना’ पद्धतीवर आधारित पुष्परचना केल्या. त्यामध्ये तिने प्रामुख्याने जपानच्या राष्ट्रध्वजाचे पांढरा व लाल हे दोन रंग वापरले आणि पाहुण्यांकडून वाहवा मिळवली.

ज्युडिथने हसत हसत अजून एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, ‘‘एकदा माझे आणि नवऱ्याचे काही कारणांवरून भांडण झाले. मग तो रागातच कामाला निघून गेला. त्यानंतर तास- दोन तास मीदेखील माझ्या कामात व्यग्र होते. आणि एवढय़ात घराची बेल वाजली. माझ्यासाठी कोणीतरी फुले पाठवली होती. बघते तर ती फुले माझ्या नवऱ्याकडून आली होती. माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदाच कोणीतरी फुले दिली होती. एका फूलवालीला फुले पाठवायचे धाडस फक्त माझा नवराच करू शकतो. मला त्याच्या कल्पनेचे खूप कौतुक वाटले. ती फुले बघून माझा राग कुठल्या कुठे पळाला आणि आमच्यातले भांडण मिटले, हे वेगळे सांगायला नकोच!’’

या अनुभवावरून ज्युडिथ पुढे सांगू लागली, ‘‘शब्दांशिवाय राग घालवण्याची, दुसऱ्याला आनंद देण्याची वा त्याचे अभिनंदन करण्याची किमया फक्त फुलांमध्येच असते. फुलांना भावना असतात हे खूप लोकांना माहीत नसते. माझ्या दुकानातून रोज अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी, आई-वडिलांसाठी, मित्र-मत्रिणींसाठी फुले घेतात. तर बहुसंख्य पुरुष आपल्या प्रेयसी वा बायकोसाठी फुले घेताना दिसतात. फुलांच्या माध्यमातून ते आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात..

‘‘टय़ुलिप या माझ्या आवडत्या फुलाची तर  स्वत:ची अशी भाषा आहे. टय़ुलिपच्या माध्यमातून नेहमीच आनंद आणि सकारात्मक विचार व्यक्त केले जातात. त्यांच्या रंगांतून वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या जातात. पांढरी टय़ुलिप्स माफी मागण्यासाठी, पिवळी टय़ुलिप्स आनंद व्यक्त करण्यासाठी वा अभिनंदन करण्यासाठी, तर गुलाबी टय़ुलिप्स ही शक्यतो कुटुंबातील लोकांना जिव्हाळा व प्रेम दाखवण्यासाठी दिली जातात. जांभळी टय़ुलिप्स रॉयल्टीचे व लाल टय़ुलिप्स प्रेमाचे प्रतीक मानले जाते..’’ ज्युडिथ फुलांबद्दल- विशेषत: टय़ुलिप्सबद्दल अगदी भरभरून बोलत होती.

सणांच्या वेळी, लग्न समारंभासाठी, नवीन वर्षांच्या स्वागतासाठी ज्युडिथकडे फुलांना खूप मागणी असते. या वर्षी व्हॅलेंटाइन डेला तिने लहान टोपल्या घेऊन त्यात लाल गुलाबांऐवजी लाल टय़ुलिप्स व चॉकलेट्स घातली आणि त्या टोपल्या रंगीत रिबिनी बांधून सजवल्या. तिची ही कल्पना लोकांना खूपच आवडली. टय़ुलिप्सच्या या टोपल्यांना इतकी प्रचंड मागणी आली की ती ज्युडिथ पुरी करू शकली नाही.

‘‘मला फुलांच्या संगतीत काम करताना खूप आनंद, समाधान मिळते आणि ते शब्दांत व्यक्त न करता येणारे आहे,’’ असे ज्युडिथ सांगते. तिला या व्यवसायात तिच्या वडिलांची खूप मदत होते. ते त्यांच्या शेतातून थेट ज्युडिथला फुले पाठवत असल्यामुळे कमिशनसारखे अवांतर खर्च होत नाहीत. साहजिकच इतर फूलवाल्यांच्या तुलनेत तिच्याकडे फुलांच्या किमती खूप कमी असतात.

परदेशात लहानसा का होईना, पण फुलांचा व्यवसाय करण्याचे ज्युडिथचे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण झाले. माझा निरोप घेताना तिने माझ्या हातात एक सुंदर टय़ुलिपचे फूल दिले. त्या फुलाने मला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या आणि न बोलता माझे आभार मानल्याचे मला समजले!

mrinaltul@hotmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flower girl in dubai