निरनिराळ्या आजारांत आहाराचे कोणते पथ्य पाळावे याचे मार्गदर्शन करणारे पाक्षिक सदर..
एका मोठय़ा रुग्णालयाचा आत्ययिक हृदयरोग विभाग (ICCU). वेळ सकाळी आठ-साडेआठची. रात्री अत्यवस्थ अवस्थेत प्रवेशित झालेल्या एका रुग्णाची परिस्थिती बरीचशी निवळलेली. त्यामुळे त्याचे नातेवाईकही काहीसे उत्साहित. इतक्यात त्या नातेवाईकांच्या घोळक्यात थोडीशी गडबड उडाली आणि वॉर्डमधून बाहेर पडलेल्या एका व्यक्तीभोवती त्यांनी गराडा घातला. त्यांच्या संभाषणातून त्यांनी आहारतज्ज्ञांना घेराव घातल्याचं लक्षात आलं. त्या तज्ज्ञांनी रुग्णाचा आहारतक्ता (Diet plan) नातेवाईकांच्या हातात दिला. काही गोष्टी समजावूनही सांगितल्या. तरी नातेवाईकांचं समाधान होत नव्हतं. आहारतज्ज्ञांवर प्रश्नांची सरबत्ती चालू होती. ‘सफरचंद चालेल ना?’, ‘पेरू?’, ‘थोडं कलिंगड देऊ का?’, ‘दही थंड असतं. देऊ दे ना?’, ‘खाकरा देऊ का? त्यांना आवडतो..’, ‘पेर चांगले मिळताहेत बाजारात. देऊ ना?’, ‘गुलकंद?’, ‘मोरावळा?’, ‘लोणच्यानं चव येईल ना जरा तोंडाला?’.. इतक्या गंभीर परिस्थितीतही मला मनात हसू आलं. आपण चांगले ठणठणीत बरे असतानाही रोज जे पदार्थ खात नाही, ते ही मंडळी ‘रुग्णाला देऊ का?’ म्हणून चौकशी करत होती. रुग्ण आत्ययिक विभागात असताना इतकं सगळं खाणार?! कधी?! कसं?!
मला आम्हा वैद्यांच्या दवाखान्यातलं चित्र आठवलं. काय काय ऐकवतात आमचे रुग्ण आम्हाला! ‘डॉक्टर, तुम्ही नं आमचे सगळे आवडते पदार्थच बंद केलेत.’
‘आजकालच्या काळात ते पथ्यबिथ्य नाही हो जमत.’
‘हे सगळं खायचं नाही. मग खायचं काय?’ (ती यादी वास्तविक वेगळी दिलेली असते.)
‘मला बरं वाटलं म्हणून माझ्या जावेला पण यायचंय तुमच्याकडे. पण तिला पथ्याची फार भीती (?) वाटते.’
‘आधीच माझे खूप दिवस आणि पैसे या आजारपणात गेलेत. तुम्ही गॅरेंटीनं बरं करणार का? आणि हो, मला ते पथ्य वगैरे पाळायला नाही जमणार हं.’
‘डॉक्टर, औषधं द्या थोडी जास्त; पण पथ्य मात्र पाळायला सांगू नका.’
‘बाहेर जेवायला गेलं कुणाकडे, की जाम पंचाईत होते हो. हसतात सगळे.’ (महिन्यातले किती दिवस आपण बाहेर जेवतो?)
‘मला सगळेजण म्हातारी म्हणतात.’
‘नातेवाईक म्हणतात- तुझ्या त्या डॉक्टरला काय कळतं? (बाप रे!) सगळं काही खायची सवय पाहिजे. आणि ते पचलं पाहिजे.’ (पण पचत नाहीए त्याचं काय?)
‘मित्र-मैत्रिणी म्हणतात- डॉक्टरांचं सगळंच नसतं काही ऐकायचं. (इथे व्हॉटस् अॅपवरचेीेूल्ल२ टाकायची सोय हवी होती.) हवं ते खायचं. एखादी गोळी जास्त घ्यायची. त्यात काय एवढं?’
‘माझा धाकटा भाऊ म्हणतो, खायचं नाही तर जगायचं कशासाठी?’
एकदा एका तरुणाच्या गंभीर आजारावर मी जे पथ्य सांगितलं, ते त्यानं नीट ऐकून घेतलं. नंतर त्याला बाहेर पाठवून त्याचे वडील मला म्हणाले, ‘अहो, त्याला किमान वडापावची तरी सूट द्या हो.’ सूट?! मी काय शिक्षा देत होते का?
‘खाल्ल्यानं कधी आजार होतात का? आजार तर किटाणूंमुळे होतात.’ (जय हो जाहिरातबाजी की!)
हे आणि असे असंख्य गैरसमज! ‘खाल्ल्यानं काही होत नाही..’ असं सगळेच जण म्हणतात. पण आजारी पडल्यावर ‘आता काय खायचं?,’ हा प्रश्नही ते हमखास विचारतात. आजारातून बरं व्हायला ‘योग्य आहार’ उपयोगी पडतो असं त्यांना वाटतं. ते खरंही आहे. पण मग चुकीचा आहार आजारांना कारणीभूत ठरू शकतो, हे आपण का नाही मान्य करत?
यासाठी आपली आरोग्याची संकल्पना स्वच्छ हवी. आजार झाल्यावर औषध किंवा इंजेक्शन घेऊन त्यापासून होणारी सुटका म्हणजे आरोग्य नव्हे. पाश्चात्य वैद्यकाच्या आधारे WHO नं बनवलेली आरोग्याची व्याख्या सुश्रुताचार्यानी काही हजार वर्षांपूर्वी सांगून ठेवली आहे.
दोष (वात, पित्त, कफ), धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र), मल (मल, मूत्र, स्वेद) या सगळ्यांची शरीरातील कामं सुरळीतपणे चालणं, वेळेवर व कडकडून भूक लागणं, खाल्लेलं अन्न उत्तम रीतीने पचणं, आत्मा, इंद्रिय आणि मन यांची प्रसन्नता तसंच अक्षुण्ण कार्यक्षमता म्हणजे आरोग्य! आरोग्याच्या या व्याख्येत आपण सगळे बसतो का, याचा आधी तपास घ्यायला हवा. साधासा वाटणारा ‘कंटाळा’ हेही अनारोग्याचं द्योतक आहे. उत्साह, बल, बुद्धी, प्रसन्नता ही निरोगीपणाची लक्षणं आहेत. जास्तीत जास्त व्यक्ती निरोगी असतील तरच कुटुंब, समाज आणि राष्ट्र निरोगी राहू शकतात.
रोगी मनुष्यानं निरोगी होण्याचा प्रयत्न करायचा, तर केवळ औषधावर अवलंबून कसं चालेल? शास्त्र तर सांगतं-
पथ्ये सति गदार्तस्थ भेषज ग्रहणेन किम्?
पथ्येऽ सति गदार्तस्य भेषज ग्रहणेन किम्?
जी आजारी व्यक्ती पथ्य पाळते, तिला औषधाची काय गरज? जी पथ्य पाळत नाही, तिला औषधाचा काय उपयोग?
श्रमपूर्वक असं आरोग्य प्राप्त झालं, की ते टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर ‘निरोगी आयुष्य’ ही नैसर्गिक अवस्था आहे. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना असे कितीसे आजार होतात? त्याचं कारण त्यांची जीवनशैली. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाल्यापासून आजपर्यंत प्राण्यांच्या/ पक्ष्यांच्या आहार-विहारात फारसे बदल झालेले नाहीत. वाघ मांसाहारी आणि हत्ती शाकाहारीच आहे. मनुष्याच्या आहारात मात्र आमूलाग्र बदल झाला आहे. जिभेचे चोचले पुरवत मनुष्य आहारात बदल करत गेला आणि आज तो जिभेचा गुलाम झालाय!
आयुर्वेदात ‘स्वस्थ हितकर’ म्हणजे निरोगी अवस्था टिकवून ठेवणारे आणि रोग उत्पन्न न करणारे असे नित्य सेवनीय पदार्थ सांगितले आहेत. या पदार्थाची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. गहू, तांदूळ, जव, जीवन्तीची भाजी, मुळा, जांगल देशात (म्हणजे पाऊस कमी पडणाऱ्या देशात) राहणाऱ्या प्राण्यांचं मांस, हिरडा, बेहडा, आवळा, द्राक्ष, पडवळ, मूग, खडीसाखर, गाईचं दूध आणि तूप, सैंधव, मध, डाळिंब आणि आंतरिक्ष जल (पावसाळ्याचं आकाशातून पडलेलं, थेट पात्रात संग्रहित केलेलं पाणी).. बस्स. संपली ही यादी!
आपण निरोगी असू, तर रोज खायचे पदार्थ इतकेच! यात बदल होतो तो ऋतूंनुसार उपलब्ध होणाऱ्या भाज्या आणि फळांचा. पण ते पदार्थ केवळ त्याच ऋतूंत कधीतरी खावेत. निरोगी व्यक्तीवर इतकी बंधनं; तर रोग्याचं काय विचारायचं? पाश्चात्य वैद्यकाच्या मते, जे ४४ घटक शरीराला आवश्यक आहेत, ते या स्वस्थ हितकर पदार्थामध्ये आहेत. आयुर्वेदाची संकल्पना ही त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. या ४४ आवश्यक घटकांची निर्मिती पाच महाभूतांपासून होते. पंचमहाभूतातून सहा रसांचे (चवींचे) पदार्थ निर्माण होतात. त्यामुळे षड्रसयुक्त आहार हा आपल्याकडे परिपूर्ण आहार मानला जातो. तसा आहार घेणारे आपले पूर्वज निरोगी, बलवान, बुद्धिमान आणि दीर्घायुषी होते.
रुग्ण व्यक्तीने यात आजार बरा व्हायला मदत करणाऱ्या आहारीय द्रव्यांचा समावेश करायला हवा (म्हणजे पथ्य); तर आजार वाढवणाऱ्या किंवा आजार निर्माण करायला कारणीभूत ठरलेल्या पदार्थाचा त्याग करायला हवा (म्हणजे अपथ्य). आजारानुरूप हे पथ्य-अपथ्य बदलत असतं.
या सदरात आपण ते जाणून घेऊ या.
श्रद्धा सावंत यांचे ‘वाचवूनिया धन’ हे पाक्षिक सदर पुढील आठवडय़ात…
रुग्णाचे मेन्यूकार्ड
निरनिराळ्या आजारांत आहाराचे कोणते पथ्य पाळावे याचे मार्गदर्शन करणारे पाक्षिक सदर.. एका मोठय़ा रुग्णालयाचा आत्ययिक हृदयरोग विभाग (कउउव). वेळ सकाळी आठ-साडेआठची.
First published on: 05-01-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व Rx=आहार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food for patients