भारतीयांसाठी नदी हा केवळ पाण्याचा स्राोत नव्हे, तर तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. आपल्याकडे नदीला आई मानण्याची पद्धत रूढ आहे. आपल्याकडील अनेक पौराणिक कथांमध्ये नदी प्रामुख्याने प्रतिबिंबित होते. किंबहुना, इथल्या बहुतांश नद्यांशी पौराणिक कथा जोडली गेली आहे. नदीला देवत्व बहाल केलेल्या अनेक पुराणकथाही प्रचलित आहेत. परंतु भारतीय नद्यांना ही पार्श्वभूमी असूनही त्यांची पर्यावरणदृष्ट्या फार चांगली अवस्था नाही हेही तितकेच खरे. एकीकडे आपण नदीला देवत्व बहाल करतो, पण तिचं सौंदर्य अबाधित ठेवण्याचे कष्ट मात्र घेत नाही. नदीची केवळ स्तुती गातो; परंतु या नद्यांच्या नैसर्गिक महानतेविषयी आपण फार अनभिज्ञ असतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्यात मूलत: असलेली निसर्गाविषयीची अनास्था.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातली कृष्णा नदी ही गंगा आणि गोदावरीनंतर भारतातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब नदी आहे. भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या या नदीला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. तिचे सांस्कृतिक महत्त्वही आहे. इथे कृष्णा नदीविषयी सांगण्याचे कारण म्हणजे कृष्णा खोऱ्यातील उपनद्यांची अभ्यासपूर्ण माहिती देणारे श्रीकांत इंगळहळीकर लिखित ‘कृष्णा परिक्रमा’ हे रंगीत सचित्र पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले. या पुस्तकाचे उत्तम छपाईमूल्य, रंगीत छायाचित्रं आणि महत्त्वाचं म्हणजे या नद्यांची माहिती वाचकामध्ये नदीविषयी आत्मीयता निर्माण करते. या पुस्तकात नदी, तिचा उगम आणि संगम या तीन गोष्टींशी संबंधित भरपूर माहिती गुंफली आहे.

हेही वाचा – दहा दिशांनी, दहा मुखांनी…

महाराष्ट्रात कृष्णा खोरे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांत विस्तारले आहे. पश्चिमेकडच्या तीन जिल्ह्यांत ५४ नद्या आणि पूर्वेकडच्या तीन जिल्ह्यांत आणखी ५४ नद्या अशा एकूण १०८ नद्यांचा विस्तार आहे. याविषयी लेखकाने सखोल माहिती संकलन केले आहे. कृष्णा खोऱ्यातील एकूण १०८ नद्या आणि संगम होणारी नदी, ती जागा, नदीवरील धरणे यांची तपशिलात आकडेवारीही पुस्तकात आहे. कृष्णा खोऱ्यातील ७ उपखोरी, ५४ नद्यांची वृक्ष आकृती, नकाशावरून नद्यांचे प्रवाह सचित्र दिले असल्याने वाचकाला सहज आकलन होते.

पुस्तकाच्या सुरुवातीला भीमा, मुठा, नारा, कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा या उपखोऱ्यांतील लहान-मोठ्या नद्यांची, परिसरातील मंदिरे, स्मारके, स्तंभ यांची सचित्र अशी माहिती मिळते. यातील अनेक नद्यांची नावेही आपल्याला माहीत नाहीत. पुढे या उपखोऱ्यांतील उपनद्यांचा परिचय लेखक करून देतात. या नद्या- उपनद्यांची नावेही उल्लेखनीय आहेत. कधी ती नावे त्या तिथल्या परिसराचे प्रतिनिधित्व करतात, तर कधी तिथला इतिहास कथन करतात. यातील काही नद्या पावसाळी आहेत. या नद्या कुठून कशा वाहतात, त्यांची नावे कशावरून पडली असावीत, ती नदी कुठल्या नदीला जाऊन मिळते याविषयीचे ज्ञान मिळते. या नदीच्या परिसरातील नैसर्गिक कुंडे, मंदिरे, खास नदीपात्रातील मंदिरे, गायमुख, पूल यांचा इतिहासही लेखकाने सांगितला आहे. ‘ब्रिटिशकालीन पूल’ या लेखात नदीवर ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांचा इतिहास आहे. या नद्यांच्या परिसरांचे भौगोलिक वैशिष्ट्य वाचताना निसर्गाची किमया जाणवते. नदीपात्रातील खडक, तिच्या सभोवताली असणारे दगड यांच्यातील विविधता वाचकाला अचंबित करते. नदीपरिसरातील जैवविविधता हा एक महत्त्वाचा नैसर्गिक आविष्कार म्हणावा लागेल. या परिसरातील दुर्मीळ वृक्षांची माहिती यात आहे. काठावर आढळणारे वृक्ष, तण वनस्पती, नदीकाठचे वारसा वृक्ष, स्थानिक मासे, तिथली राखीव जंगले व अभयारण्ये याविषयी माहिती देतानाच, हा अभ्यास करताना ‘फ्रेश वॉटर स्पॉन्ज’ या दुर्मीळ सजीवाचा शोध कसा लागला याची छोटेखानी गोष्ट आहे. या माहितीसोबत जैवविविधतेची रंगीत छायाचित्रे पाहिली की या निसर्गसंपदेविषयी अधिक कुतूहल निर्माण होते. ‘जलमय गतवैभव’ या लेखात पूर्वी या नद्या आणि परिसराची स्थिती कशी होती याच्या रंजक गोष्टी आहेत. मुळशी जलाशयात असलेलं कायम पाण्यात बुडालेलं एक मंदिर, काही मंदिरांना असलेला ऐतिहासिक वारसा… हे सारं सचित्र पाहणं एक नयनरम्य अनुभव आहे.

हेही वाचा – आबा अत्यवस्थ आहेत!

‘नदीचे आरोग्य’ या लेखात नद्यांत होणारे प्रदूषण, नदीचे स्व-शुद्धीकरण, नदीला मिळणारे ओढे यांचा आढावा घेताना, नदीची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं लेखक बजावतात. या १०८ उपनद्यांभोवतीच्या तीर्थाटनाविषयीही लेखक सांगतात. हे पुस्तक केवळ कृष्णा खोऱ्यातील नदींची माहितीच नव्हे, तर नद्यांचा अभ्यास करणे किती गरजेचे आहे, त्यांचे महत्त्व पुढच्या पिढीला समजावे यासाठी कसे प्रयत्न करावेत, लोकांना नद्यांविषयी जागरूक करणे का गरजेचे आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अन्य नद्यांचाही असाच अभ्यास व्हायला हवा व त्यावरही अशीच सुंदर पुस्तके यावीत अशी भावना वाचकाची होते हे निश्चित. प्रत्येक लहान-मोठ्यांनी आवर्जून वाचावेच असे हे पुस्तक आहे.

‘कृष्णा परिक्रमा’ – श्रीकांत इंगळहळीकर, करोला पब्लिकेशन्स, पाने- १७६, किंमत- ८०० रुपये.

lata.dabholkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For indians a river is not just a source of water it is a part of their faith ssb