‘सायलेंट स्प्रिंग’ या रेचेल कार्सनच्या पुस्तकाने अमेरिकेतील पर्यावरणवादी चळवळ सुरू झाली. जगभर या पुस्तकाची चर्चा झाली. अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली. या पुस्तकानं इतिहास घडवला. एक क्रांतिकारक विचार साऱ्या मानवजातीला दिला. ‘सायलेंट स्प्रिंग’ला या वर्षी साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लक्ष्मण लोंढेलिखित ‘आणि वसंत पुन्हा बहरला’ या राजहंस प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या रेचेलच्या चरित्रातील काही अंश..
‘सायलेंट स्प्रिंग’ची जुळवाजुळव करताना रेचेलची भूमिका स्वच्छ होती. काही कंपन्यांच्या फायद्यासाठी अख्खी जीवसृष्टी कशी धोक्यात आणली जात आहे, हे तिनं कंपन्यांची नावं घेऊन सांगितलं. त्यातून कोणाचा किती फायदा होतोय याची आकडेवारीही तिनं पुस्तकात दिली. कंपन्यांच्या दुष्कृत्यांवर कोण आणि कसं पांघरूण घालतंय, निसर्गाची होत असलेली हानी कमी दिसावी म्हणून कशा प्रकारची फसवणूक केली जाते – हेही तिनं उघड केलं. हे लिहिताना तिनं फक्त आपल्या मनोदेवतेचाच सल्ला घेतला आणि सदसद्विवेकबुद्धीशी ती प्रामाणिक राहिली. आपण एकाच वेळी अनेक शत्रू तयार करीत आहोत, अनेक आघाडय़ांवर युद्धाला तोंड फोडतोय याची तिला कल्पना होती. पण त्याला तिचा इलाज नव्हता. एकीकडे कॅन्सरच्या हल्ल्यानं तिचं शरीर जर्जर होत होतं. आपल्यापाशी थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत, याची तिला आतून जाणीव होत होती, पण तिचा प्रामाणिकपणा तिला स्वस्थ बसू देत नव्हता.
नैसर्गिक घटनांचा वेग आणि माणसानं निसर्गचक्रात ढवळाढवळ सुरू करायला सुरुवात केल्यानंतर त्याला अपेक्षित असलेला बदलांचा वेग यात एक चमत्कारिक विसंवाद निर्माण झाला आहे, हे रेचेलनं ओळखलं होतं. मानवनिर्मित रासायनिक द्रव्यांचे निसर्गनिर्मित जीवसृष्टीवर दूरगामी परिणाम काय घडतील, हे जाणण्याची दूरदृष्टी दुर्दैवानं त्या काळातल्या अन्य शास्त्रज्ञांनी दाखवली नव्हती. याचा अर्थ मानवानं किंवा अन्य प्राण्यांकडून यापूर्वी निसर्गात कधी ढवळाढवळ केलीच गेली नव्हती, असं नाही. वर्तमानाच्या क्षणापासून भूतकाळात दूरवर नजर टाकली; तर पृथ्वीवर घडलेल्या प्रत्येक नैसर्गिक, भौगोलिक बदलांच्या परिणामी जीवसृष्टी बदलत गेली. बदल घडत गेले, तसतसा त्या जीवसृष्टीच्या वागण्याच्या परिणामामुळे निसर्गही बदलत गेला हे खरं होतं. पृथ्वीच्या आद्य वातावरणात प्राणवायू नव्हता. वनस्पतींच्या उदयानंतर तो निर्माण झाला आणि वातावरणाच्या तब्बल २१ टक्के झाला. ही जीवसृष्टीनं निसर्गात केलेली ढवळाढवळ होती.
याउलट कित्येक जीवघेण्या भौगोलिक, नैसर्गिक आपत्तीतून जीवसृष्टी सावरत गेली असंही दिसतं. पण हे सारे बदल अतिशय मंद वेगानं घडले आहेत. पृथ्वीच्या जन्मापासून म्हणजे सुमारे साडेचार अब्ज वर्षांत भूपृष्ठाची किमान पन्नास वेळा तरी संपूर्ण पुनर्रचना झालेली आहे. या प्रत्येक बदलाच्या वेळी जीवसृष्टीवर गंडांतरं आली, पण सजीव त्यातून वाचले; कारण दरवेळी घडणाऱ्या छोटय़ा छोटय़ा बदलांशी जुळवून घ्यायला त्यांना, स्वत:च्या जीवनात, शरीरात सुसंगत बदल करायला पुरेसा वेळ मिळत गेला.
उलटपक्षी दुसऱ्या महायुद्धानंतर रसायनशास्त्राची प्रचंड वाढ झाली. एखाद्या दशकभरात मानवानं उतावळेपणानं अक्षरश: हजारो नव्या रासायनिक पदार्थाची प्रयोगशाळांमध्ये निर्मिती केली. रसायनांचे सर्व गुणधर्म न तपासता त्यांच्या माहीत झालेल्या एखाद-दुसऱ्या उपयोगाकरिता ती रसायनं प्रचंड प्रमाणात विक्रीसाठी बाजारात आणली आणि पृथ्वीनं लक्षावधी र्वष कष्ट करून हळूहळू बनवलेल्या, एकमेकांवर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीत धसमुसळेपणाने सोडून दिली. अदूरदृष्टीचे उद्योजक आपल्या ताळेबंदातील त्या वर्षीचा फायदा या एकाच घटकाचा विचार करून आपली पुढल्या वर्षांतली खेळी ठरवत होते. त्यांनी असं करावं का – हा महत्त्वाचा आणि मूलभूत मुद्दा होता. रेचेलनं तो आपल्या पुस्तकात ऐरणीवर आणला. बरं, त्यांचं वागणं योग्य नसेल, तर केवळ व्यक्तिस्वातंत्र्य या गोंडस तात्त्विक सबबीखाली त्यांना साऱ्या जीवसृष्टीच्या जीवाशी खेळ खेळण्याचा परवाना मिळतो का – हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता. तसं नसेल, तर त्या उद्योजकांवर नियंत्रण आणणं हे शासनाचं कर्तव्य ठरत नाही का?
पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या तलम आणि नाजूक वस्त्राची मानवानं चालवलेली खेचाखेच रेचेलनं पाहिली आणि तिनं आपल्या लिखाणातून हे स्पष्ट केलं, की जमीन, पाणी, वनस्पती, अन्य प्राणी आणि मानव हे सारे घटक एकमेकांशी एवढय़ा विविध प्रकारे बांधले गेले आहेत, की या शृंखलेत कोठेही एका ठिकाणी विष कालवलं गेलं; तर त्याचा अन्य साऱ्या घटकांवर परिणाम घडणं केवळ अपरिहार्य आहे. बेरी या नावाच्या तत्त्वज्ञानं एके ठिकाणी म्हटलं आहे – ‘‘भूमी आणि आपलं शरीर यांच्यात नेहमीच देवाणघेवाण चालू असते. आपलं शरीर मातीवरच पोसलं जातं आणि अखेर मातीतच मिसळतं. तद्वतच सारे सजीव हे एकमेकांचे शेजारी म्हणून पृथ्वीवर राहत आहेत, हे मानवानं विसरू नये. मानव, वनस्पती आणि प्राणी यांपैकी कोणाही एका घटकाचा विकास स्वतंत्रपणे होणं शक्य नाही.’’
बेरी जे आध्यात्मिकदृष्टय़ा सांगत होता, तेच रेचेल शास्त्रीय सत्य म्हणून सांगत होती. तिनं ‘सायलेंट स्प्रिंग’मध्ये एका ठिकाणी म्हटलं आहे, ‘‘या पृथ्वीवरील प्रत्येक मानव आईच्या गर्भात जन्माला आल्यापासून ते आपला अखेरचा श्वास सोडेपर्यंत प्रत्येक क्षणी भयानक रसायनांची शिकार बनत चालला आहे. असा काळ मानवाच्या इतिहासात प्रथमच आला आहे. ही अतिशय दुर्दैवी पण खरी गोष्ट आहे. गेली केवळ दोनच दशकं मानव कृत्रिम रासायनिक पदार्थ बनवायला शिकला आहे. पण एवढय़ा अल्पावधीतच ते मानवनिर्मित रासायनिक पदार्थ उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत पाण्यात आणि प्रत्येक जीवाच्या शरीरात पोहोचले आहेत.’’
रेचेलच्या काळात खुद्द मानवी आईच्या दुधातून डीडीटी नवजात बालकाच्या शरीरात शिरायला सुरुवात झाली होती. इतकंच काय, मुलाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याला आईच्या शरीरात साठलेल्या या विषारी द्रव्याचे डोस मिळायला सुरुवात होते, असं खुद्द सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वैज्ञानिकांनी मान्य केलं होतं. तोपर्यंत असं मानलं होतं, की गर्भारपणात आईच्या शरीरात एखादं विषारी द्रव्यं शिरलं तरी त्याची बाधा मुलाला होत नाही; कारण आईच्या शरीराकडून मुलाच्या शरीराला अन्न व रक्तपुरवठा करणाऱ्या प्लॅसेंटामध्ये (वार) विषारी पदार्थ गाळले जातात. पण असं आढळून आलं होतं, की डीडीटी आणि तत्सम इतर हायड्रोकार्बन्स मात्र या नैसर्गिक गाळणीला दाद न देता मुलाच्या शरीरापर्यंत पोचतात! १९५० सालच्या प्रशासनाच्या एका प्रकाशनात याची कबुली दिलेली होती.
कीटकनाशकात वापरलं जाणारं क्लोर्डेन या नावाचं आणखी एक घातक द्रव्य तर माणसाच्या शरीरात कुठूनही प्रवेश करू शकतं. शेतावर फवारलेलं हे कीटकनाशक आधी जमिनीत, मग जमिनीतून अन्नधान्यात आणि अन्नधान्यातून प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतं. क्लोर्डेन कातडीद्वारे शोषलं जाऊ शकतं. हवेतून श्वासाबरोबर फुप्फुसात जाऊ शकतं आणि अन्नाद्वारे पचनसंस्थेत शिरू शकतं. शरीरात शिरलेली बहुतेक सर्व विषारी द्रव्यं आपल्या मूत्रपिंडाद्वारे शरीराबाहेर टाकण्याची सोय असते. पण आपल्या मूत्रपिंडांमध्ये क्लोर्डेन फेकून देण्याची क्षमता नाही; म्हणून आपल्या शरीरात ते साचत जातं, असंही आढळून आलं होतं.
रेचेलनं १९५८ साली ‘सायलेंट स्प्रिंग’साठी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली; तेव्हाच तिला जाणवलं, की मानवजात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचली आहे की, या साऱ्या व्यवहाराचं पुनर्मूल्यमापन करण्याची तातडीची आणि नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मानवाच्या सर्व गरजा भागवणारा, दु:ख, दारिद्रय़, पीडा आणि उपासमार यांपासून मुक्ती देणारा आणि मानवाला अंतिम कल्याणाकडे नेणारा एकमेव मार्ग म्हणून विज्ञानाची जी प्रतिमा मानवाच्या मनात तयार झालेली होती, ती खूपच भाबडी होती – असं सिद्ध करणाऱ्या घटना विज्ञानाच्या क्षेत्रात घडत होत्या. जीवनाचा एक नवीन अर्थ शोधण्याची गरज मानवाला वाटू लागली होती. जपानवर अणुबॉम्ब टाकल्याची घटना ताजी होती. ती अखिल मानवजातीच्या हृदयाला झालेली एक भळभळती जखम होती. शांततेसाठी अणुशक्तीचा वापर हा शब्दप्रयोगच निर्थक होता, कारण अणुशक्तीद्वारे ऊर्जा किंवा शस्त्र काहीही बनवलं गेलं; तरी त्यापासून निर्माण होणारी किरणोत्सर्गी राख सारखीच होती आणि मानव ती मागचा पुढचा विचार न करता समुद्रात बुडवून टाकत होता. मानवाचं हे पाप कायमचं समुद्रतळाशी राहणार नव्हतं. ते केव्हातरी तरंगून वर येणारच होतं.
निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर शक्तिक्षेत्रात असमतोल तयार झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केल्या गेलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानामुळे हा असमतोल निर्माण झालेला होता. वास्तविक युद्धानंतरच्या शांततेच्या काळात या शास्त्रीय ज्ञानाची कठोर चिकित्सा केली जायला हवी होती. ते न होता परिणामांचा काहीही विचार न करता त्या तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच प्रगती, विकास असं एक साधं सोपं पण धोकादायक समीकरण मांडलं जात होतं.
‘सायलेंट स्प्रिंग’च्या संदर्भात नंतर रेचेलनं जी भाषणं केली त्यातील एका भाषणात ती म्हणाली होती, ‘‘आज निसर्ग नष्ट करण्याची ताकद मानवाला मिळालेली आहे आणि म्हणूनच त्याचा निसर्गाकडे पाहण्याचा नेमका काय दृष्टिकोन आहे या प्रश्नाला फार महत्त्व आहे. हिरोशिमापूर्वीपर्यंत मला वाटायचं, माणसाला नैसर्गिक आपत्तींपासून भय आहे, धोका आहे. आज वाटतंय, उलट निसर्गालाच मानवापासून वाचवण्याची गरज आहे. पूर्वी वाटायचं, सागर केवढा विशाल आहे! त्याचं मानव काही वाकडं करू शकणार नाही. सागरातून सूर्याच्या उष्णतेनं ढग बनणं आणि ढगातून पाऊस पडून पुन्हा ते पाणी सागराला जाऊन मिळणं हे विशाल निसर्गचक्र बदलणं मानवाच्या कुवतीबाहेरचं आहे. किंबहुना सागरातला भरती-ओहोटीचा खेळ, पाखरांचं स्थलांतर, ऋतुचक्र या निसर्गातील नेहमी घडणाऱ्या सर्वच घटना अव्याहतपणे चालू राहतील, असा भरवसा मला वाटायचा. आज जाणवतंय, हा विश्वास अनाठायी आहे. या शाश्वत घटनाही माणसाच्या विघातक कृत्यांपासून सुटलेल्या नाहीत. एकेकाळी पावसाची प्रत्येक सर संजीवक वाटायची. आज त्या सरींबरोबर अणुबॉम्बच्या स्फोटाची धूळ खाली येते, अ‍ॅसिडचा पाऊस पडतो. पाणी हा माणसाला मिळालेला सर्वात मूल्यवान नैसर्गिक ठेवा आहे. पण आज तेच विषारी बनत चाललं आहे. कितीतरी जातींच्या इतर सजीवांच्या विरुद्ध आपण युद्धात वापरलेली संहारक रसायनं वापरायला सुरुवात केली आहे. जणू ते आपले शत्रू आहेत! या प्राण्यांना पृथ्वीवर जगायचा हक्क आहे की नाही हे जणू मानव ठरवू लागलाय.’’
रेचेलची भाषा प्रासादिक होती, पण तिच्या भाषेचं हे वैशिष्टय़ हा काही मुद्दाम कमावलेला वाङ्मयीन गुण नव्हता. ती प्रासादिकता तिच्या भाषेत अंगभूत होती, कारण त्यामागे तिचं पृथ्वीवरील साऱ्या चराचर सृष्टीविषयीचं/निसर्गावरचं प्रेम आणि तिला प्रत्येक प्राणिमात्राविषयी वाटणारा जिव्हाळा होता. रेचेलनं लग्न केलं नाही, पण ती निसर्गाची प्रेयसी आणि प्रत्येक सजीवाची जिवलग होती. तिला निसर्गातील प्रत्येक जीवाविषयी वाटणारा जिव्हाळा अकृत्रिम होता. संत तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या उक्तीशी नातं जोडणारा होता आणि म्हणूनच ती ‘सायलेंट स्प्रिंग’सारखं काळजाला हात घालणारं आणि पृथ्वीवरील साऱ्या मानवजातीची सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारं पुस्तक लिहू शकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लेखकाचा कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For intelligent human being