नरेंद्र चपळगावकर
गेली सहा दशके आम्ही मित्र आहोत. शिष्टाचार म्हणून त्यांचा नावानिशी आणि आदरार्थी बहुवचनात उल्लेख करीत असलो, तरी व्यवहारात मी त्यांना एकेरी आणि ‘बापू’ असेच म्हणत आलो आहे. मी काही काळ त्यांचा औपचारिक विद्यार्थी राहिलो असलो तरी आमच्या स्नेहभावाला औपचारिकतेचे कोणतेही बंधन नव्हते आणि नाही. आम्ही दोघेही आयुष्याच्या संध्याछायेत वावरत आहोत आणि आता प्रकृतीमुळे अपवाद घडतो; अन्यथा आम्ही दररोज सायंकाळी भेटत आलो आहोत.
बापू हा स्वभावाने अबोल. भरपूर वाचून कमी बोलणे आणि प्रकाशकाच्या मागणीनुसार नव्हे तर स्वत:च्या आवडीनुसार आणि वेळापत्रकानुसार लिहिणे हा त्याचा स्वभाव आहे. लिखाणाच्या बाबतीत त्याला कोणतेही बंधन मान्य नसते. आज या वयात (त्याने नव्वदी ओलांडली आहे) घराच्या दुसऱ्या मजल्यावरील अभ्यासिकेत संगणकावर तो स्वत: मजकूर लिहीत असतो. त्याने संगणकावर लिहिण्याचे रीतसर शिक्षण घेतले ते वयाची साठी ओलांडताना. आज तो याबाबतीत पूर्णपणे स्वावलंबी आहे. सुमारे सात दशकांपूर्वी तेव्हाच्या औरंगाबादमध्ये आमचा परिचय झाला. हे शहर आमच्या केंद्रस्थानी आहे. मी येथे शिकलो आणि काही काळाने येथे व्यवसायासाठी आलो. स्थायिक झालो. बापू येथे आणि हैदराबादला शिकला. तेथे त्याने काही काळ नोकरी केली. नंतर तो येथे आला. आधी गव्हर्नमेंट कॉलेज आणि नंतर विद्यापीठात तो प्राध्यापक होता. आज सुरुवातीच्या काळाकडे पाहिले म्हणजे त्या काळातील चैतन्य फार विलक्षण होते हे जाणवते. ते केवळ राजकीय अथवा सार्वजनिक जीवनापुरते मर्यादित नव्हते. साहित्यिक, सांस्कृतिक जीवनातही होते. खेळाच्या मैदानाशी माझा क्वचितच संबंध आला असला तरी तेव्हा ते मैदानावरही दिसत होते.
हेही वाचा : झाकीरभाई…
आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी. तेव्हा म. भि. चिटणीस प्राचार्य होते. मे. पुं. रेगे, म. ना. वानखेडे यांच्यासारखे प्राध्यापक होते. चिटणीस, रेगे, वानखेडे ही मंडळी नव्या जगाची जाणीव असणारी होती आणि आमच्या दृष्टीने ते मोलाचे होते. मिलिंदचे ग्रंथालय उत्तम होते. विद्यार्थी तेथे काय वाचतात यावर प्राचार्य चिटणीसांचे लक्ष असे. खुद्द बापूने चिटणीसांचा या बाबतीतील फार चांगला अनुभव लिहून ठेवलेला आहे. वर्गात प्राध्यापक ज्या पुस्तकाचा उल्लेख करतात, ती पुस्तके हा विद्यार्थी ग्रंथालयातून वाचण्यासाठी घरी नेतो आणि वाचतो हे चिटणीस सरांना लायब्ररी कार्डवरील नोंदींवरून लक्षात आले होते. त्यांनी त्यांच्या ऑफिसात बोलावून बापूला वाचनाबद्दल विचारले आणि त्याने आणखी कोणती पुस्तके वाचावीत हेही सुचवले. या वाचनातून बापूची बी.ए.ला असतानाच एवढी तयारी झाली की, त्यानेच म्हटल्याप्रमाणे त्याला एम.ए.ला असताना फार अभ्यास करावा लागला नाही. तो उस्मानिया विद्यापीठाची एम.ए.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्यावेळी प्रथम श्रेणी अगदी दुर्मीळ होती. त्याच्या पूर्वी भगवंतराव देशमुख या श्रेणीचे मानकरी ठरले होते. जे वाड्.मय समजून घ्यायचे, त्याचा मूळ गाभा अगोदर लक्षात घ्यायचा आणि त्याच्याबद्दल आपले मत लिहायचे. इतरांच्या मतांचा परिणाम होऊ द्यायचा नाही. एखाद्या व्यक्तीबद्दलचे आपले आकलन किंवा आपण मांडत असणारा एखादा सिंद्धांत तर्काच्या कसोटीवर टिकला पाहिजे, हा त्याचा आग्रह असतो. हा बहुधा मे. पुं. रेगे यांचा परिणाम असावा.
बापूची जडणघडण ज्या कुटुंबात झाली ते खास मराठवाड्यातील. आजच्या परिमाणाने निम्न मध्यमवर्गीय. तेव्हाचे कौटुंबिक वातावरण, सामाजिक जीवन आणि तेव्हाचे औरंगाबाद यावर त्याने लोभस, तसेच माणसं जिव्हाळ्याची या त्याच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अपवादात्मक पुस्तकात लिहिले आहे. त्यात काही नव्याने भर घालण्याचे कारण नाही. बापूंवर सर्वात मोठा प्रभाव त्याच्या वडिलांचा. त्याचे वडील न. मा. कुलकर्णी (गावचे कुळकर्णीपद असल्याने वडिलांनी कुळकर्णी हे आडनाव लावले, परंतु इतर सर्व जण रसाळ हेच आडनाव लावीत.)अतिशय निष्ठावान शिक्षक. शिकवण्या घेत पैसा कमावण्याची वृत्ती त्यांच्यापाशी कधीच नव्हती. ती असती तर त्यांनी अफाट पैसा कमावला असता. त्यांच्या शिकवण्याचा लौकिकच असा होता की, अन्य शाळांचे विद्यार्थी त्यांच्याकडे येत. चार कपडे कमी असले तरी चालतील, पण आपल्या मुलामुलींपाशी अभ्यासाची सर्व पुस्तके असायलाच हवीत अशी बापूंच्या वडिलांची दृष्टी होती. हीच दृष्टी बापूची आहे. तेव्हाच्या हैदराबादेत पुरोहितांचे पुस्तकांचे दुकान प्रसिद्ध होते. तेथे मराठी साहित्यातील अनेक नव्या पुस्तकाचा पहिला ग्राहक बापू असे. तेथे त्याने वाचलेल्या पुस्तकावर तो येथे आला म्हणजे चर्चा होत असे. बापू आज सर्वत्र कवितेचा समर्थ समीक्षक म्हणून सार्थपणे ओळखला जात असला आणि त्याच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय कवितेशी निगडित असला तरी त्याचा आवडीचा साहित्य प्रकार नाटक हा आहे. त्याने प्रबंधासाठी विषय निवडताना प्रा. चिटणीस आणि मागील पिढीतील व्यासंगी प्राध्यापक भालचंद्र महाराज कहाळेकर यांच्याशी चर्चा केली होती. ‘काव्यातील प्रतिमासृष्टीवर मराठीत काहीच काम झालेले नाही. तू तो विषय निवड.’ असे चिटणीसांनी त्याला सांगितले. कोणती पुस्तके वाचायला हवीत तेही सांगितले. अतिशय मेहनतीने बापूने प्रबंध लिहिला. त्यासाठी काही वर्षे खर्ची पाडली. त्याच्यासारख्या बुद्धिमान प्राध्यापकास प्रबंधासाठी एवढा वेळ लागावा, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण कोणतेही काम उरकून टाकावे हा त्याचा स्वभाव नाही. अभ्यासात आणि संशोधनात परिपूर्णता असावी असा त्याचा आग्रह असतो, त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखाली संशोधन – प्रबंध लेखन करण्यास बरेच प्राध्यापक उत्सुक नसतात. कारण त्यांना झटपट संशोधन करायचे असते. बापूच्या अध्ययन- अध्यापनाच्या ज्या कल्पना आहेत आणि ज्या त्याने स्वत: आचरणात आणलेल्या आहेत, त्यात ही मंडळी बसत नाहीत. बापूचाही त्यास इलाज नसतो, कारण त्याला तडजोड मानवतच नाही. त्याच्या प्रबंधाचा ग्रंथ ‘मौज’ने प्रकाशित केला त्यावेळी बापू आणि श्री. पु. भागवत यांची अत्यंत तपशिलाने चर्चा होत असे. कविता आणि कवितेतील प्रतिमांचा असा विचार करणारा दुसरा ग्रंथ मराठीत नाही. संशोधन प्रबंध आणि त्याचे ग्रंथरूप याकडे किती गांभीर्याने पाहायला हवे याचे हे उत्तम उदाहरण होय. त्यामागील दृष्टी, परिश्रम, व्यासंग, बौद्धिक शिस्त हे बापूच्या व्यक्तिमत्त्वातील गुण आहेत आणि अकादमीच्या पारितोषिकानिमित्ताने हेच गुण मुद्दाम लक्षात घ्यायला हवेत. बापूच्या शिक्षक या कामाशी असलेल्या निष्ठेबद्दल आणि त्यातही तो जे तारतम्य बाळगी त्याबद्दल येथे सांगितले पाहिजे.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
मराठवाड्यातील दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढावी म्हणून विद्यापीठात संप सुरू झाला. विद्यापीठ अक्षरश: ओस पडले. एके दिवशी २० – २५ विद्यार्थी बापूकडे आले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही आम्हाला शिकवा.’’ हा शिक्षक शिकवण्याबद्दल टाळाटाळ करत नाही हे त्यांना माहीत होते. तुमचा संप सुरू आहे. त्यात जर मी तुमचे वर्ग घेऊ लागलो तर मी संप फोडला असा अर्थ होईल, असे बापू त्यांना म्हणाला. मग विद्यार्थ्यांनी ‘‘आम्ही गावात भाड्याने जागा घेतो, तेथे तुम्ही शिकवा,’’ असा आग्रह धरला. प्राध्यापक सुधीर रसाळ हा सर्व विद्यार्थ्यांचा विश्वास असलेला शिक्षक होता.
बापू घडत होता आणि कामही करत होता. त्या काळात मराठवाड्यात तरी व्यक्तीपेक्षा संस्था मोठी हेच सूत्र होते. बापूवर दुसरा महत्त्वाचा प्रभाव अनंतराव भालेराव यांचा. त्यांनी बापूला साहित्य परिषदेच्या कामात लक्ष घालण्यास सांगितले. अनंतरावांचा उल्लेख झाल्यामुळे दोन प्रसंग आठवले. ते मुद्दाम सांगायला हवेत. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधील आंदोलन ऐन भरात असताना तेथे जाऊन ते पाहण्याचा तसेच समजावून घेण्याचा आणि त्यावर आधारित लेख मराठवाडा दैनिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाला. ते आंदोलन पाहण्यासाठी अनंतरावांबरोबर जे लोक बिहारला गेले होते त्यात बापू होता. परतल्यानंतर अंकासाठी लिखाण झाले. त्यातील बापूचे लिखाण सर्वांना आवडले कारण त्या लेखात सामाजिक आणि राजकीय गुंतागुंतीचे उत्तम आकलन होते. दुसरा प्रसंग अनंतरावांच्या हैदराबादचा मुक्ती संग्राम आणि मराठवाडा या ग्रंथास केशवराव कोठावळे पारितोषिक दिले गेले तेव्हाचा आहे. नानासाहेब गोरेंच्या हस्ते हा समारंभ झाला तेव्हा सुरुवातीला बापूचे भाषण झाले. खुद्द नानासाहेबांनी त्या भाषणास ‘‘अरे तू मराठीचा प्राध्यापक ना?’’ असा प्रश्न विचारत त्यांच्या पद्धतीने दाद दिली. अनंतरावांनी सांगितले म्हणून बापूने मराठवाडा साहित्य परिषदेच्या कामात लक्ष घातले. एरवी त्याचा पिंड संस्थात्मक कामात गुंतवून घेणारा नाही. साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचा तो दीर्घकाळ संपादक होता. संपादनाच्या कामात तेव्हा प्रुफे तपासणे तसेच प्रसंगी वेष्टनावर वर्गणीदारांचे पत्तेही लिहिणे या बाबी समाविष्ट होत्या. साहित्य परिषदेची प्रादेशिक संमेलने तेव्हा नियमित होत असत. या संमेलनाचा अध्यक्ष निवडला गेला की पुढील कामे बापू निस्तरत असे. परिषद तसे महामंडळावर असल्याने त्याला अ. भा. मराठी साहित्य संमलेनाच्या कारभाऱ्यांसोबत अनेकदा काम करावे लागले. त्या व्यासपीठावर तो परिसंवाद आणि अन्य निमित्ताने गेला. कारभाऱ्यांनी विचारले तर कामकाजाबाबत सल्लामसलतही केली. पण अनेकदा अनेकांनी आग्रह धरूनही त्याने संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधीही लढवली नाही. याबाबतीत त्याने त्याचा ठाम निश्चय टिकवून धरला. तो त्याच्या व्यासंगामुळे त्याला टिकवता आला असावा. त्याचा हा गुणही मुद्दाम लक्षात घ्यायला हवा.
बापूने जुन्या नव्या कवींवर लिहिले आहे. आपल्या लिखाणामुळे कोणाचे काय मत होईल याचा तो विचार करत नाही. त्याने अगदी कुसुमाग्रज आणि करंदीकरांवरही टीका केलेली आढळेल. पण त्या दोघांनीही अगदी अप्रत्यक्षपणे देखील बापूंबद्दल कधी कोठे रोष व्यक्त केला नाही, हेही आज लक्षात घेण्यासारखे आहे. त्याच्या एकूण समीक्षा लेखनावर स्वतंत्रपणे लिहायला हवे. त्याने वेगवेगळ्या कवींवर लिहिले असले तरी त्याच्या समीक्षादृष्टीचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून त्याच्या मर्ढेकरांवरील लिखाणाचा उल्लेख करता येईल. बाळ सीताराम मर्ढेकर हे एक आगळे मराठी कवी. त्यांच्या अनेक वैशिष्ट्याची येथे नोंद करता येईल. पण त्यांच्या वाट्याला मराठी समीक्षकांची नुसती उपेक्षाच नव्हे तर अडाणी उपेक्षा आली. तिचा पडदा बाजूला सारून त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बापूंनी अर्थात सुधीर रसाळांनी दिली. इतरही काही समीक्षकांचा – जसे विजया राजाध्यक्ष – उल्लेख करता येईल. परंतु मुख्य काम केले ते सुधीर रसाळ यांनी. सुदैवाने त्यांच्या या तीन खंडातील लेखनाच्या काही भागाला ते प्रत्यक्ष रूप देत असताना त्यांच्याबरोबर राहण्याचे मला भाग्य मिळाले. या काळात मी जे पाहिले त्याचा माझ्या मनावर चांगलाच ठसा उमटला. कविता ही एखाद्या रसायनाचे पृथ:करण करावे तशी अगोदर तपासावी लागते आणि नंतर कवीला त्यात काय सांगावयाचे आहे याचा विचार करावा लागतो. तो करताना तत्कालीन सामाजिक वास्तवाचे आकलन हे येथे फार महत्त्वाचे ठरते. मर्ढेकरांनी मराठी वाचकांच्या बाळबोध समजुतीला धक्का देणाऱ्या ज्या प्रतिमा वापरल्या, त्या आम्हाला लगेच समजल्या नाहीत. याचे कारण जीवनाचे ताजे, नागडे-उघडे सत्य स्वीकारण्याची तयारी मराठी वाचकांची नव्हती. मर्ढेकरांच्या वाट्याला आणखी एक दुर्दैव आले. आपल्याकडे हा आस्तिक आणि तो नास्तिक असे ठोकळेबाज वर्गीकरण करण्याची पद्धत आहे. नास्तिक हा ठसा आणि अश्लीलता हे दूषण अशा अनेक गोष्टी त्यांच्या माथी मारल्या गेल्या. वास्तवात ते धर्मश्रद्ध होते. एखाद्या भक्तासारखे हळवे होते. दुर्दैवाने मर्ढेकरांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मनात आणखी काय लिहायचे होते ते राहून गेले. पण आपण यात समाधान मानले पाहिजे की, सुधीर रसाळ यांच्यासारखा चिकित्सक – समीक्षक त्यांच्या वाट्याला आला. ज्यांना रसाळांची समीक्षादृष्टी समजावून घ्यायची आहे, त्यांनी त्यांचे हे लिखाण आवर्जून वाचायला हवे.
हेही वाचा : बालमैफल: जिंगल बेल… जिंगल बेल…
मर्ढेकरांप्रमाणेच रसाळांनी करंदीकरांवर लिहिले. करंदीकर हे मोठे कवी आणि त्यांचे गद्यालेखन तर अपवादात्मक म्हणता येईल. या लिखाणाची रसाळांनी चिकित्सक समीक्षा केली. याच समीक्षादृष्टीचा आणि सैद्धांतिक समीक्षेचा सतत आग्रह धरणाऱ्या रसाळ यांच्या भूमिकेचा अकादमीने गौरव केला आहे. या सार्थ गौरवाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या मर्मग्राही समीक्षादृष्टीइतकेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण आजच्या काळात विशेष महत्त्वाचे ठरतात.
(लेखक निवृत्त न्यायमूर्ती आहेत.)