मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम यांचं ‘संघर्षांची मशाल हाती’ हे आत्मचरित्र १ जूनला सोलापूर येथे समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढलेल्या या झुंजार नेत्याची जडणघडण कशी झाली हे सांगणारा पुस्तकातील एक प्रसंग..
अगदी तरुण वयातच मी सोलापूरच्या कामगार चळवळीत ओढला गेलो. सिटूने १९७२मध्ये पुकारलेल्या संपात कारंबा रोडवरच्या हजारो टेक्स्टाइल कामगारांना सहभागी करून घेतलं. या कामगारांना वाढीव वेतन मिळवून दिलं. या यशस्वी लढय़ानंतर इतर अनेक कारखान्यांमधले कामगार माझ्याकडे येऊ लागले.
एके दिवशी मामडय़ाल टेक्स्टाइल्सचे काही कामगार माझ्याकडे आले. आठ तासांचा कायदा असूनही त्यांच्याकडून मालक बारा-बारा तास काम करवून घेत होता. तरीही त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नव्हतं. मी याविरोधात आवाज उठवायचं ठरवलं. या मिलचे मालक मामडय़ाल म्हणजे आमच्यासारखेच मूळचे तेलगू भाषक लोक. त्यामुळे मी जैन आणि मारवाडय़ांच्या कारखान्यांविरुद्धच आंदोलन करतो, हा शिक्का पुसायला मला ही उत्तम संधी वाटली.
मी मामडय़ाल कारखान्यातील कामगारांची नोंदणी केली. त्या कामगारांना घेऊन एक निवेदन तयार केलं. कारखान्याचे मालक मामडय़ाल आणि कामगार आयुक्त या दोघांना ते निवेदन दिलं. मामडय़ाल म्हणजे पैशात लोळणारा माणूस. त्याला मी खूपच चिल्लर वाटलो. त्यामुळे आमच्या निवेदनाकडे तर त्यांनी ढुंकून पाहिलं नाहीच, पण कामगार आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रालाही त्यांनी उत्तर दिलं नाही. मग आम्ही संप पुकारला. सुरुवातीला संप लाक्षणिक होता, पण मामडय़ाल काही दाद देत नव्हते. कामावर न आलेल्या कामगारांना ते काढून टाकायचे. मग मात्र आम्ही बेमुदत संप पुकारला. सगळय़ा कामगारांनी काम बंद केलं, पण तरीही मामडय़ाल दाद देईनात.
हा संप जवळपास महिनाभर चालला. कामगारांच्या घरांमधली चूल बंद व्हायची वेळ आली. त्यात तोंडावर दिवाळी होती. ऐन दिवाळीत थोडाबहुत बोनस मिळायचा, तर तोही आता संपामुळे मिळणं शक्य नव्हतं. शेवटी मी कामगारांना घेऊन कामगार आयुक्तांकडे गेलो. त्यांना दिवाळीची अडचण सांगितली. त्यांनीही कामगारांची अडचण समजून घेऊन मामडय़ाल यांना नोटीस काढली. मात्र, मामडय़ाल त्याला घाबरेल असं वाटत नव्हतं. झालंही तसंच. तोंडावरची दिवाळी प्रत्यक्षात आली. सगळीकडे दिवाळीची धूम, पण मामडय़ालच्या कामगारांवर मात्र उपाशी मरण्याची पाळी आली होती. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कामगार चेहरे उदास करून बसले होते. मी ठरवलं, कामगारांसाठी आपणच सामूहिक दिवाळी साजरी करायची आणि त्याच दिवशी मामडय़ालच्या घरावर मोर्चाही न्यायचा.
मामडय़ाल मोठा चालू माणूस. ऐन दिवाळीत त्याने कामगारांची कोंडी केली होती. आपणही दिवाळीच्या रात्री त्याच्या घरावर मशाल मोर्चा नेऊन त्याची कोंडी करायची असं आम्ही नियोजन केलं. मामडय़ालमुळे कामगारांची दिवाळी काळी झाली होती. म्हणून या आंदोलनाला मी ‘काळी दिवाळी’ असं नाव दिलं. या आंदोलनाची जबाबदारी माझा खंदा कार्यकर्ता कॉम्रेड व्यंकटेश सुरावर सोपवली. भाऊबीजेचा दिवस असावा. आम्ही चाळीस-पन्नास मशाली आणल्या. त्या पेटवल्या आणि कारखान्यावरील संपाच्या स्थळापासून मामडय़ालच्या घरापर्यंत चालत जाऊन त्याच्या घराला घेराव घातला. परिसर कामगारांच्या मशालींच्या उजेडात उजळून गेला. व्यंकटेश सुरा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘आडम मास्तर झिंदाबादऽऽऽ’, ‘मामडय़ाल मालक मुर्दाबादऽऽऽ’, ‘हमारी मांगे पूरी करो!’ अशा घोषणांनी मामडय़ालचं घर पुरतं दणाणून गेलं. कामगारांचा आवेश आणि पेटलेल्या मशाली बघून मामडय़ालच्या घरातले घाबरून गेले.
कामगारांनी मशाली घरावर टाकल्या तर काय, या भीतीने मामडय़ाल कुटुंबीयांची गाळण उडाली. त्यांनी लागलीच पोलीस ठाण्याला फोन केला. सारे कारखानदार आणि पोलीस मामडय़ालच्या घराभोवती आले. मी पोलिसांना परिस्थिती समजावून सांगितली. ‘‘आम्ही महिनाभर आंदोलन करतोय, कामगार आयुक्तांनीही नोटिसा काढून झाल्या आहेत; पण तरीही मामडय़ाल ऐकायला तयार नाहीत. ऐन दिवाळीत ते कामगारांच्या स्वप्नांची होळी करतायत. त्यांनी कामगारांच्या पगारवाढीबाबत लेखी दिल्याशिवाय आम्ही त्याच्या घरासमोरून उठणार नाही,’’ असा निर्वाणीचा इशारा दिला. आमच्या मशाली आणि उग्र रूप पाहून पोलिसांनी आमच्यावर बळजबरी न करण्याचं धोरण स्वीकारलं. थोडय़ा वेळात कामगार आयुक्तही तिथे येऊन पोहोचले. पोलीस अधिकारी आणि कामगार आयुक्तांनी मामडय़ाल यांच्या घरी जाऊन त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगितलं.
अखेर मामडय़ाल घरातून बाहेर आले आणि त्यांनी तडजोड करण्याची तयारी दाखवली. आमच्या मागण्यांपैकी घसघशीत वेतनवाढ, आठ तासांनंतरच्या जादा डय़ुटीचा वेगळा भत्ता आणि संपावरच्या कामगारांना पुन्हा नोकरी, या दोन-तीन मागण्या त्यांनी तातडीने मान्य केल्या. आमचा संप यशस्वी झाला. या मध्यरात्रीच्या आंदोलनामुळे कारखानदारांनी माझा चांगलाच धसका घेतला, तर या ‘गनिमी काव्या’ने कामगारांमध्ये माझी लोकप्रियता आणखी वाढली.
मामडय़ाल यांनी मागण्या मान्य केल्याने त्यांच्या कारखान्यातील कामगारांनी पहिल्याच पगाराला माझा सत्कार सोहळा ठेवला, तोही कारखान्याच्या गेटवर. या सत्कार सोहळय़ाने मी भारावून गेलो. त्यांनी मला हार घातलाच, शिवाय आडम मास्तर कामगारांसाठी सगळीकडे पायीच फिरतो, त्याच्या कामाला गती मिळावी म्हणून या कामगारांनी वर्गणी गोळा करून मला नवी कोरी सायकल भेट दिली. माझ्या आयुष्यातील हे पहिलं वाहन होतं, तेही भेट मिळालेलं. कामगारांचं हे प्रेम पाहून माझ्या डोळय़ांत अश्रू तरळले. त्यांच्या सत्काराला उत्तर देताना मी विचारलं, ‘‘तुम्ही प्रेमाने दिलेल्या या भेटीतून मी कसा उतराई होऊ?’’