लेखक उभा आहे.
रस्त्याच्या काठाला उभा आहे. तो जराही पुढे जाऊ इच्छित नाही. रस्त्यावरून मोटारी जात आहेत. मोटारीवर निळे, पिवळे, लाल दिवे लागलेले आहेत. इतक्या वेगाने जाणाऱ्या मोटारी अचानकच थांबतात. त्याला वाटते, क्ररक्ररक्रॅन्च अशा अनेक लागोपाठ आवाजांनी त्याचे कान फाटतील. मोटारी आपल्या पुढच्या मोटारींवर आदळल्या असे त्याला वाटते. पण नाही. साऱ्याजणी सरावाने थांबतात. पुढच्या मोटारीच्या बुडाला आपले तोंड लावून मागची मोटार थांबते. सगळ्या मोटारींची दोन-दोन, चार-चार दारे एकाच वेळी उघडतात. त्यातून पांढरे, निळसर आणि खाकी रंगाचे कपडे घातलेली माणसे, पोते फाटून भडाभड कांदे सांडावेत तशी बाहेर पडतात. रेटारेटी सुरू होते. खाकीवाले काठी आडवी धरून गर्दीला मागे लोटतात. सारजाबाईजवळ ते येताच, तिच्या गावचे भाऊराव, खाकीवाल्यांना काही सांगतात आणि उजवा हात उंच करून जोरजोराने हलवतात आणि ‘इकडं इकडं’ असे जोराने म्हणतात की, एक घोळकाच सारजाबाईसमोर उभा राहतो. समोर एक पांढरेशुभ्र कपडे घातलेला उंच माणूस उभा राहतो. सगळेजण त्याच्यापासून एक हात अंतर सोडून उभे राहतात. भाऊराव त्यांच्या पाया पडायला जातात तर एक दांडगट माणूस खसकन त्यांना मागे ओढतो. कोणीतरी म्हणतो, ‘साहेब, भाऊराव.. आपला कार्यकर्ता.. भाऊराव.. पटकन सांगा..’ भाऊराव बोलू लागतात, ‘साहेब, या सारजामावशी रानकिन्ही गावच्या..’ साहेब हात वर करतात.. सगळं वातावरण चिडिचिप होते.. साहेब एक कदम पुढे येतात.. सारजाबाईच्या खांद्यावर हात ठेवतात.. अन् चमचम लाइट लागतात.. कॅमेरावाले घुसुघुसू करतात. साहेब म्हणतात, ‘मावशी, सांगा.. घाबरू नका. काय नुकसान झालं तुमचं या पावसानं..’ सारजामावशी मनात म्हणते, काय माय काही.. मी कुटं घाबरली.. पण एवढय़ा मोठय़ा माणसानं खांद्यावर हात ठेवला.. मावशी म्हणलं.. तिच्या गळ्यात गोळाच दाटून आला.. तरी आब राखून ती बोलली, ‘काय सांगू बाप्पा.. निऱ्हा दुस्मानावानी आला नं यंदा पानी.. समदी वावरातली माती खड्डून खड्डून नेली. आजून चार आण्याची मदत नाई दिली कोनं.. लय जनं आल्तें.. इचारतातंच निस्तं..’ लगेच काही जण सावध झाले. साहेबांनी खूण केली. मावशीचं नाव अन् गावाचं नाव घेतलं लिहून.. अन् लागलीच सगळ्या मोटारी ढुर्रढुर्र सुरू झाल्या. शिटय़ा, पोंगे वाजू लागले व दोन मिनिटांत रस्ता रिकामा झाला. सारजाबाईंनी अवतीभोवती पाहय़लं. फटफटीवर, घेऊन येणारा भाऊराव गायब झाला होता. दोन घंटय़ांपासून उभं राहून मावशीचे टोंगळे दुखून आले होते. तेवढय़ात लेखक आपली स्कूटर घेऊन पुढे आला, ‘मावशे. बैस पटकन. तुले गावात सोडतो.’ मावशी हरखून म्हणाली, ‘चाल बापा, त्यो भाडय़ा तं गेला मले इथी टाकून.. तू आला देवानानी..’ मावशीनं पदर डोक्यावरून घेऊन, उजव्या हाताच्या काखेतून पुढे घेतला आणि डाव्या बाजूला कमरेजवळ लुगडय़ात पक्का खोसला. स्कूटरवर बसली अन् उजव्या हातानं कडी घट्ट धरली. कडक झालेल्या चिखलातून वाट काढत गावात पोचले तर म्हातारी म्हणाली, ‘उतर ना, घोडीवरून घडिकभर. पानी तं पे..’ दारातच नारळाच्या दोऱ्यांनी विणलेल्या खाटेवर लेखक बसला. सारजामावशी भुईवरच बसली. दु:खानं की संतापानं काही कळेना, पण बोलू लागली.. ‘चार दिसापासून भाऊराव मांघं लागल्ता.. ‘साहेब म्हंजे शीयेम का कोण येणार न् आपलं गाव दौऱ्यात नंबर लगाला म्हनून हाये.. तं तू तयार ऱ्हा..’ तं म्या म्हनलं, ‘दर खेपी मीच काहून?’ तं बोहारा म्हने, ‘तू भुतालेबी घायबरात नाई अन् कोनासमोरबी टनटन चांगली करतं.. नाई तं तुले काय सोनं लागेल हाय. अन् बाई काई म्हनो तं कोनीबी दमानं ऐकते.’ म्या जरा चांगले लुगळं नेसून पाहय़टं तयार होतो त म्हने, ‘तथी कोन भरोसा ठेवंल अशा चांगल्याचुंगल्या कपळ्याईमुळं.. ’अन् मेल्यानं नेसलेलं लुगडं सोडून दुसरं फाटकं नेस्याले लावेलं.. मावशी मध्येच मुकी झाली. क्षीण थकलेल्या आवाजात लेखकाला म्हणाली, ‘असं काहून होत असलं बाबू? पानी येते न सत्यानास करून जाते अन् पानी येत नाई तरीबी सत्यानास होते. आपल्या जिमिनीतंच काय अवगुन हाये का खोट हाये म्हनाव? तू तं लय शिकेल हायेस नं? भासनं देतं नं तू.. वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड.. मंग दर खेपी.. दुस्काल पडला तरी बी अन् पूर आला तरी बी.. तुमी मले.. भीक मागायले काऊन लावता सरकारकडं?’
लेखकाला वाटलं, आता आपणं निघावं..
उत्तर शोधणं अवघड आहे म्हणून, की उत्तर माहीत आहे म्हणून?
लेखकाला माहीत आहे की, बराच गल्बला आहे. गदारोळ आहे, ओढाताण आहे आणि यातून मला सत्य शोधायचे आहे, जे कठीण काम आहे आणि जे सत्य सापडेल ते लेखनातून मांडायचे आहे आणि हे काम अडचणीचे आहे? कोणासाठी अडचणीचे आहे? लेखक अस्वस्थ होतो. उत्तराचा रोख स्वत:कडेच वळतो आहे, असे त्याला जाणवते. केव्हा तरी कोणाच्या तरी भाषणातून ऐकलेले वाक्य त्याला आठवते- ‘व्हेन यू पॉइंट अ फिंगर अॅट एनीवन, थ्री आर पॉइंटिंग बॅक अॅट यू.’
‘वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड’ हे शब्द ऐकल्यानंतर त्याला ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ही म्हण का आठवली? (साहित्याच्या भाषेत अशा प्रकाराला ‘असोसिएशन ऑफ आयडियाज’ किंवा संज्ञाप्रवाह असे काहीतरी म्हणतात, असे त्याला आठवले.) त्याच्या असेही लक्षात आले की, कथा-कादंबरी-कविता वगैरे लिहिण्यासाठी आधी खलनायक निश्चित करावा लागतो. एक किंवा अनेकही कथानकाच्या मागणीनुसार. (खरेतर लेखकाची सोय असते ती.) मग दु:खाचे चित्रण करायचे. या दु:खासाठी ‘अ’ किंवा ‘अ’ किंवा ‘ब’ यांना जबाबदार धरायचे. दु:खाची कारणे शोधण्याच्या भानगडीत पडायचे नाही. कारण मग विश्लेषण, आत्मपरीक्षण वगैरेच्या जटिल (आणि गैरसोयीच्या) गुंत्यात गुंतून पडावे लागते. (आणि इथे तर निष्कर्ष काढून मोकळे होण्याची घाई झालेली असते.)
त्यात पुन्हा अलिखित संकेत! ग्रामीण भागातील लेखकाने (तो औरंगाबादेत शिकला न मुंबईत नोकरी केली तरी आठवून आठवून) ग्रामीण आणि कृषी या विषयावर लिहायचे. स्त्रियांनी स्त्रीवादी किंवा स्त्रियांसंबंधीच लिहायचे. शहरातील कवींनी जागतिकीकरणासंबंधी कविता लिहायच्या. दलित साहित्यिकांनी, पाने, फुले, चंद्र, प्रीती यांचा प्रत्यक्ष जीवनात अनुभव घेत असले तरी लेखनातून यांना बहिष्कृत करायचे. ही विभागणी कप्पेबंद नसेल, पण आपोआपच सांभाळली जाते की काय अशी शंका येते. अपवाद असतातच!
लेखकाला आठवते की, एका महाधिपतींनी त्याला सांगितले होते, की ‘तू शहरी लोकांचे ऐकू नकोस. त्यांची व आपली मानसिकता वेगळी आहे. आपण भूमिपुत्र आहोत. आपली बांधिलकी मातीशी आहे. इतके दिवस त्यांनी आपले कृत्रिम चित्रण केले. आता आपण आपली बाजू मांडू. आपणच आपल्याला नावे ठेवली, तर त्यांचे फावते. आपणच आपले प्रकाशक आता शोधले पाहिजेत. तू काळजी करू नकोस. तुझे पहिले पुस्तक एव्हाना यायला हवे होते..’ इत्यादी.
लेखक धास्तावला. त्यांनी कृत्रिम लिहिले, पण मी कसे लिहावे याची चौकट तुम्ही आखून देतात. (नाहीतर प्रकाशनाच्या संदर्भात अडचणी येतील, अशी गर्भित धमकी आहेच.)
लेखकाला नेत्यांना नावे ठेवण्याचाही कंटाळा येऊ लागला. एकदा पुढारी ही काय चीज आहे आणि कोणत्याही पक्षाचे असो- सरकारचा म्हणून एक स्वभाव असतो- हे जर कळले तर लेखक पुन:पुन्हा त्यांच्यावर आरोप करण्यात शक्ती वाया घालवणार नाही. ‘अकबर’ इलाहाबादींनी म्हटले होते-
‘कौम के गम मे डिनर खाते हैं हुक्काम के साथ
रंज तो लीडर को बहुत है मगर आराम के साथ’
लेखक विचार करतो की विकास, दूरगामी नियोजन ही सरकारची कामे नसतातच का? की एवढेच काम करायचे की एका पक्षाच्या सरकारने व्याज माफ करायचे तर दुसऱ्या पक्षाच्या सरकारने मुद्दलच माफ करून टाकायचे. लेखकाला भीती वाटते- कथेतील पात्राच्या तोंडून त्याने त्याचे मत व्यक्त केले तर लेखकाला ‘जनतेचा शत्रू’ घोषित केले जाईल की काय? कुठलीही नैसर्गिक आपत्ती कोसळली की ‘दु:खाचे ठेकेदार’ हजर होतात आणि अधिकाधिक रक्कम ‘मागून’ आणतात. त्यासाठी प्रदर्शनातल्याप्रमाणे सारजामावशीला उभी करतात. ही मदत म्हणजे वाटून खाण्यासाठी दिलेला प्रसाद असतो. तो भक्तांपर्यंत पोचतो; गरजूंपर्यंत नाही..
लेखकाला हे सगळे लिहावेसे वाटते. आपल्या सामाजिक पर्यावरणाची आणि सामाजिक गुणदोषांची, जुन्याला चिकटून राहण्याच्या वृत्तीची तपासणी करावीशी वाटते. पण असे केले तर आपलीच माणसे लेखण्या सरसावतील असे वाटते. त्यालाही म्हणावे वाटते-
‘उम्रभर एकही गलती हम बारबार करते रहे
धूल थी चेहरे पर और आईना साफ करते रहे’
लेखक उभा आहे. एकीकडे सत्य आहे. दुसरीकडे यश, लोकप्रियता, बक्षिसे इत्यादी. पण त्याला बळ एकवटावेच लागेल. विचार करता करता त्याला ‘बळीराजासाठी गाणं’ ही केव्हातरी वाचलेली एक कविता आठवू लागते-
बळीराजासाठी गाणं
अस्मानी जाईल
तर सुलतानी खाईल
तहसिलीतून सुटशील
तर कोर्टात अडकशील
जनावरानं सोडलं
तर माणसं फाडतील
टाकांच्या निफांनी
तुझी कणसं खुडतील
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा