चिंटूचा एक मस्त जोक आहे. चिंटू आईसोबत दुकानात शर्ट खरेदी करायला गेलाय. दुकानदाराला आई म्हणते, ‘छे! हा रंग नाही चिंटूला आवडणार.’ दुसऱ्या शर्टबाबत म्हणते, ‘छे! हे डिझाइन नाही चिंटूला आवडणार.’ एवढय़ात चिंटू एक शर्ट अंगाला लावून म्हणतो, ‘आई, हा शर्ट मला आवडेल?’ किती मार्मिक भाष्य आहे आपल्या समाजजीवनावर!  
चिंटूसारखा निरागस, लाघवी मुलगा आपल्या संस्कारांत लहानाचा मोठा होताना मी रोज अनुभवते. माझ्या तपासण्याच्या खोलीत खऱ्या कुत्र्याएवढा कापडाचा कुत्रा (soft toy) आहे. आणि त्याच आकाराचा कापडाचा हत्तीही. चिंटुकली मुले आली की ती आधी तिकडे पळतात. मागून आई-वडिलांचे शब्द येतात, ‘त्याला हात लावू नको,’ ‘मार देईन हं. चालेल ते तुला?,’ वगैरे. मुले दोन पावले मागे येतात. मी म्हणते, ‘अहो, त्यांच्यासाठीच ठेवलीत ती. बघू दे त्यांना.’ मुलं आधी हळूच त्या कुत्र्याचे हात हलवतात. मग जवळ जाऊन त्याला नीट चाचपतात. कान, शेपटी हलवून पाहतात. खुद्कन स्वत:शीच हसतात. नंतर सगळा जोर लावून त्यांना उचलतात. त्यांच्या गालावरून गाल घासत मऊ मऊ स्पर्श अनुभवतात. जाताना मला आणि त्या कुत्र्यालाही टाटा करून जातात.
हेच चिंटू मोठे होतात. शाळेत जाऊ लागतात. सततच्या ‘गप्प बसा’ संस्कृतीमुळे मिटून जातात. कधीतरी दवाखान्यात येतात. मी विचारते, ‘काय होतंय?’
आई सांगते, ‘ताप, सर्दी-खोकला. आणि पोटातही दुखतंय.’
तो तपासण्याच्या टेबलवर झोपतो. ‘नीट झोप,’ ‘खाली सरक,’ ‘पायाला तिठी घालू नको..’ आईच्या सूचना चालू असतात. आणि तोही त्या यांत्रिकपणे पाळत असतो.
मी त्याला विचारते, ‘कुठं दुखतंय पोटात?’
आई चट्कन पुढे येऊन जागा दाखवते- ‘इथं.’
तो समोर शून्यात पाहत असतो. जणू हे शरीर दुसऱ्याच कुणाचे आहे, जे काही चाललंय त्याचा त्याच्याशी काही संबंधच नाही.
मी मुद्दाम विचारते, ‘घसा दुखतोय?’
काय उत्तर द्यावे त्याला माहीत नसते. तो नाइलाजाने आईकडे पाहतो. ‘आई, माझा घसा दुखतोय?’ त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न असतो.
हीच मुले मोठी होतात आणि स्वत:च्या छोटय़ा बाळाला घेऊन दवाखान्यात येतात. त्या बाळाच्या आजाराविषयी काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर हे ३० वर्षांचे ‘चिंटूराव’ म्हणतात, ‘घरी आईला विचारलं पाहिजे.’
मला खात्री आहे की, आई-वडिलांचं मुलांवर प्रेम असतं. त्यांना त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना मुलांचा अपेक्षाभंग झालेला, त्यांना दु:ख झालेलं, त्यांनी निराश झालेलं पाहवत नाही. त्यांच्या बाबतीतले सर्व निर्णय आपणच अधिक योग्यरीत्या घेऊ शकतो, असे वाटल्यामुळेच ते असे वागतात. मुलांनी कोणते शिक्षण घ्यावे, कोणाशी लग्न करावे, किती मुले होऊ द्यावीत, याबाबतही त्यांचे आग्रही सल्ले असतात. परंतु यामुळे निर्णय घ्यायला, त्या निर्णयाला जबाबदार राहायला मुले शिकत नाहीत. त्यांना स्वातंत्र्य पेलता येत नाही.
मला आठवतंय- एकदा आम्ही काश्मीरमधल्या कुठल्याशा बागेत बसलो होतो. समोर एक आयताकृती फूट- दीड फूट खोलीचा बांधलेला खड्डा होता. त्यातील कारंजे बंद होते आणि खड्डाही कोरडाच होता. आमच्यामागून एक भारतीय जोडपे आले. त्यांची दोन मुले उत्सुकतेने त्या खड्डय़ाकडे धावली. आई म्हणाली, ‘तिकडे जाऊ नका. पडाल आत.’ मुलेही गुपचूप आई-बाबांजवळ येऊन बसली. थोडय़ा वेळाने एक युरोपिअन जोडपे आले आणि आमच्या शेजारीच थोडय़ा अंतरावर बसले. त्यांचीही दोन मुले उत्सुकतेने त्या खड्डय़ाकडे गेली. त्यांनी वाकून आत पाहिलं. खड्डय़ातल्या एका मोठय़ा दगडावर पाय ठेवून मुलगा आत उतरला. मुलगी मागून हळूहळू उतरली. आई-वडील एकमेकांशी बोलत होते. पण त्यांचे मुलांकडे बारीक लक्ष होते. मुलांनी एकमेकांशी काहीबाही बोलत त्या खड्डय़ातून एक फेरी मारली. कारंजे, त्याची तोटी चाचपून पाहिली. आता त्यांना वर यायचे होते; पण ते उतरण्याएवढे सोपे नव्हते. त्यांनी वेगवेगळय़ा पद्धतीने प्रयत्न केले. शेवटी एका दगडावरून दुसऱ्यावर पाय ठेवत तो मुलगा वर आला. पण त्याच्या पाठीमागून येणारी मुलगी घसरली. आई चट्कन उठली. पण विशेष काही नाही असे वाटून पुन्हा बोलण्यात गुंतली. मुलाने बहिणीला वर यायला मदत केली आणि पुन्हा दोघे नव्या उत्सुकतेने कशाकडे तरी वळली. मला त्या जोडप्याच्या ‘Masterly Inactivity’चे फार कौतुक वाटले. ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ हा आपल्या संस्कारांचा पाया; तर ‘जा, पाहा, करा, आपल्या निर्णयाची जबाबदारी घ्या-’ हा त्यांच्या संस्कारांचा मूलमंत्र.
याच विषयासंदर्भात अजून एक घटना आठवते. एकदा एक बाई आपल्या सहा वर्षांच्या पुतणीला घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. ती भारतीय आई-वडिलांची मुलगी.. पण युरोपमध्ये जन्मली, वाढली होती. सध्या ती सुट्टीवर आली होती आणि तिच्या पोटात दुखत होते. मी तिला विचारले, ‘‘खाण्याच्या आधी पोटात दुखतं की नंतर? शी-शूचा काही त्रास आहे का?’’ ती विचारात पडली. म्हणाली, ‘Let me think for a moment..’ मी चमकलेच. असे वाक्य मी अजूनपर्यंत कधी मोठय़ा माणसाकडूनही ऐकले नव्हते आणि ही सहा वर्षांची मुलगी म्हणतीय, ‘मला थोडा विचार करू द्या.’ मिनिटभरात तिने शरीराशी संवाद साधला असावा. ‘जेवल्यावर जास्त दुखते. आणि त्याचा ‘kBlader,’ ‘Bowe’ शी काही संबंध नसावा. तिचे आई-वडील तर अस्सल भारतीय होते. मग हे संस्कार कोठून आले? शेवटी शाळेतून, मित्रमैत्रिणींकडून, आसपासच्या समाजातूनही संस्कार होतच असणार.
पौर्वात्य संस्कार सगळे चुकीचे आणि पाश्चिमात्य संस्कार सगळे चांगले, असे मला मुळीच म्हणायचे नाही. परंतु जबाबदारी घेण्यास शिकण्याचे, स्वातंत्र्य पेलण्यास शिकण्याचे संस्कार मात्र आपण जरूर त्यांच्याकडून घ्यायला हवेत.
चिंटूच्या वयाच्या मुलांपासूनच त्यांना स्वत:च्या भावना ओळखायला, त्या भावनांना नावे द्यायला आणि त्या व्यक्त करायला प्रोत्साहन दिले पाहिजे. लहान-मोठे निर्णय आपापले घेऊन त्यांच्या परिणामांना जबाबदार राहायला शिकवले पाहिजे. मुख्य म्हणजे त्यांना चुका करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे आणि अयशस्वी होण्याची मुभाही!                     
                      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा