अरुंधती देवस्थळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मला चित्रकारांपेक्षा कवींची सोबत जास्त आवडते,’ असं म्हणणाऱ्या मार्क शगालच्या (१८८७-१९८५) शैलीत फौविझम, क्युबिझम आणि सर्रिअलिझम यांचा उत्कृष्ट मिलाफ आहे असं काही जाणकारांचं मत आहे. त्यासाठी सबळ कारणंही आहेत. शगालना स्वत:ला मात्र कलेसंबंधी एकही थिअरी मान्य नव्हती आणि स्वत:सारखेच प्रत्येकासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मूलभूत वाटत असे. ते कुठल्याही इझमचे अनुयायी नव्हते. त्यांची फिगरेटिव्ह शैली तुकडय़ांमधून कहाणी सांगणारी.. स्वत:चं ज्यूईश स्वत्व न विसरणारी. जे रॉथकोसारखंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग होऊन चित्रांतल्या एखाद्या तपशिलातून समोर येतं आणि नैसर्गिकही वाटतं. शगाल यांना एक कलाकार म्हणून आपण सगळेच पाहत असतो. पण त्यांना एक माणूस म्हणून जाणून घ्यायचे असेल तर त्यांचं स्वत:चं आत्मवृत्त आणि त्यांच्याबरोबर सात वर्ष राहिलेल्या व्हर्जिनिया हॅगार्डचं ‘माय लाईफ विथ शगाल’ ही पुस्तकं महत्त्वाची!    

शगालचा जन्म आताच्या बेलारुसमधल्या विटेस्कचा. गरीब, मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या सश्रद्ध कुटुंबातला. गावातली अनेक कुटुंबं पिढीजात विणकर. त्यांची लाकडाने बांधलेली घरं नंतर महायुद्धात नष्ट झाली, कारण अर्धअधिक गाव ज्यू लोकांचं. त्याकाळी पूर्व युरोपात ज्यू असणं म्हणजे सामाजिक कलंक वागवण्यासारखं होतं. सर्वात वाईट म्हणजे त्यांना शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला जाई. आपण या वंशाचे, इतरांना न आवडणारे आहोत, हे लहान मुलांच्या मनावर बिंबवलं जायचं. ती भीती शगालच्या बुजऱ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनली. शगालला पुस्तकातील चित्रं परत काढायला आवडायची. एका नामी कलाकाराकडे पोट्र्रेट्स शिकायचा प्रयत्न करतानाच आपला पिंड कलाकाराचा आहे हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून मग सेंट पीटर्सबर्गच्या कलाविद्यालयात प्रवेश मिळवला. युरोपियन मॉडर्निझम आणि क्युबिझमशी ओळख झाल्यावर पॅरिसमध्ये येऊन कला शिकावी व तोच व्यवसाय करावा असं त्यांनी ठरवलं. विशीत शगाल फ्रान्समध्ये दाखल झाले ते पॅरिसबाहेरच्या भागात कलाकारांनी वसवलेल्या ‘ला रुश’ (म्हणजे मधमाश्यांचं पोळं) नावाच्या वसाहतीत. त्यात बाहेरून येऊन पॅरिसमध्ये कलाकार बनू इच्छुक असलेले पिकासो, मोदिग्लियानी, जोन मीरो, मॉन्द्रिआन आणि जॉर्ज ब्राकसारख्या दोनेकशे कलाकारांची साथसंगत होती. इथे सगळेच समानधर्मी. अनेक प्रवृत्तींचे. सर्वाच्या अभिव्यक्तीमध्ये वैविध्याची मांदियाळी म्हणून प्रायोगिकतेचा उल्हास. आणि हे सगळं बाहेर परिस्थिती अतिशय प्रतिकूल असूनही. शगालचं त्यांना हवी ती संधी देणाऱ्या पॅरिसवर जिवापाड प्रेम. पॅरिसच्या विविध रूपांची अनेक चित्रं त्यांनी काढली आहेत. ‘पॅरिस थ्रू द विंडो’(१३६ x १४२ से. मी. ऑइल ऑन कॅनव्हास) ही मध्यवर्ती हॉटेलच्या सज्जातून दिसणारी विसाव्या शतकाच्या सुरुवातीची सौंदर्यनगरी. खिडकीतून दिसणाऱ्या ऐतिहासिक इमारती, उलटी आगगाडी (त्यांच्या बहुसंख्य चित्रांत काही ना काही उलटं असतंच.) पॅरिसचा आयफेल टॉवर, त्यावर प्रेम करणारे स्त्री-पुरुष, उंच इमारती, मानवी चेहऱ्याचं कठडय़ावर बसलेलं पिवळं मांजर, जुन्या पद्धतीची रंगकाम केलेली खुर्ची. क्युबिझम आणि हसरे रंग यांचा योग्य ताळमेळ. आणि कोपऱ्यात एक दुभंगलेला माणूस.. म्हणजे ते स्वत:च? मध्येच प्रगतीशील तंत्रज्ञानाचं प्रतीक म्हणून पॅराशूटने शहरात उतरणारा माणूस.

नक्की वाचा >> अभिजात : फ्रेंच इम्प्रेशनिझममधली तेजस्विनी

शगाल स्वत:च्या कलेबद्दल मुद्देसूदपणे बोलणारे असल्याने त्यांची चित्रं समजायला सोपी होतात. बालपणाबद्दल ते सांगतात, ‘‘रेषा, कोन, त्रिकोन, चौकोन पाहता पाहता मला कल्पनालोकांत घेऊन जात.’’ भौमितिक आकार आणि मानवी आयुष्यासंबंधित जाणवणारं काही याचं मिश्रण म्हणजे क्युबिझम मनात रुजण्याची ती सुरुवात असावी. वास्तव तुकडय़ांत तोडून, त्यातील तुकडे निवडून हवे तसे जोडलेले. आठवणींचा संदर्भ असलेली ‘कॉम्पोझिशन्स’ काढताना शगाल त्यांचा वापर करत. वयाच्या विशीच्या सुरुवातीला पॅरिसमध्ये आल्यावर काढलेलं ‘आय अँड द व्हिलेज’ (१९२ x १५२ से. मी. ऑइल ऑन कॅनव्हास.. १९११) हे चित्र म्हणजे शगालचं आपल्या खेडय़ाकडे मागे वळून पाहणं. चित्रात एक बोकड/ मेंढा- गालावर निळ्या आकाशाचा तुकडा आणि गायीचं दूध काढणारी मुलगी वागवणारा. आणि एक माणूस गारगोटीच्या डोळ्यांचा, पांढऱ्या ओठांचा, ब्रॉन्झच्या रंगाच्या चेहऱ्याचा.. एकमेकांसमोर संवादासारखे उभे. मागे रशियन खेडय़ात असतात तशी रंगीत बैठी घरं. त्यातली दोन उलटपालट होऊन पडलेली. चर्च, एक शेतकरी कामावरून परतणारा, एक तरुणी उलटी (खाली डोकं, वर पाय) उभी, भौमितिक आकार, अर्धवर्तुळं, कोणा एका अंगणात फुललेलं रोपटं आणि चित्रावर पसरलेली गूढ संध्याकाळ. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे..’

शगालच्या डाव्या हाताला सात बोटं होती. त्यांनी काढलेल्या पहिल्या सेल्फ पोट्र्रेटबद्दल त्याने इडिशमध्ये (मातृभाषेत) साती बोटांनी काम करतोय म्हणजे खूप कष्ट करतोय असं म्हटलं होतं. सुरुवातीला खरंच ते रात्रंदिवस काम करत. त्यांच्या चित्रांमध्ये एकीकडे पॅरिस आणि दुसरीकडे मनाला ओढ लावणारं खेडं. दुधाची बादलीवाली मुलगी आणि गाय हे आवडतं मोटिफ इथेही आहेच. बेला हे शगालचं पहिलं प्रेम- जी त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीची आई बनली. त्यांनी तिची अनेक चित्रं काढली आहेत.

वयाच्या पंचविशीत त्यांचं पहिलं प्रदर्शन बर्लिनमध्ये भरलं आणि त्यांना समीक्षकांची दाद मिळाली. आर्थिक स्थैर्य आलं. आणि मग पहिलं महायुद्ध पेटलं आणि परत एकदा परिस्थितीशी झुंज सुरू झाली. तीन महिन्यांसाठी घरी आलेल्या शगालना पॅरिसला परतायला काही वर्ष लागली. दरम्यान १९१९ मध्ये त्यांनी कझिमोर मालेविच, येहुदा पेन यांसारख्या काही मित्रांसह विटेस्कमध्ये एक आर्ट स्कूल सुरू केलं. पण कायम होणाऱ्या मतभेदांमुळे शगाल त्यातून बाहेर पडले ते कायमचेच. काही महिने जर्मनीत घालवून पॅरिसला परतल्यावर पाहिलं तर त्यांच्या स्टुडिओत घुसून नाझींनी चित्रांची मोडतोड केली होती. त्यांची सर्व पेंटिंग्ज जर्मनीच्या कलादालनांतून वेचून काढून ध्वस्त केली गेल्याचं त्यांना समजलं. शगालना साहजिकच खूप मानसिक त्रास झाला. पुढली दोन-तीन वर्ष चरितार्थासाठी मिळेल ते काम करत त्यांनी आठवून आठवून परत त्यातली काही चित्रं काढली. सर्कसवरील गुएशेसची मालिका याच काळातली. दुसऱ्या महायुद्धाआधी शगालने फ्रान्सचं नागरिकत्व घेतलं.

१९३१ मध्ये तेल अवीवच्या मेयरने त्यांना दीर्घ मुक्कामासाठी पॅलेस्टाईनला आमंत्रित केलं. त्यानंतर आलेलं ‘व्हाइट क्रूसीफिक्शन’ (१५५ x १४० से.  मी. ऑइल ऑन कॅनव्हास) हे शगालच्या जीवनातलं एक महत्त्वाचं वळण. या विषयावर त्यांनी एक मालिकाच काढली. तीत ख्रिस्त आणि त्याची कुमारी माता यांची अनेक चित्रं आहेत. इथपासून त्यांनी ख्रिस्त ज्यूवंशीय असून त्याने मानवतेच्या कल्याणासाठी जिवाचं बलिदान दिलं, ही विचारसरणी स्वीकारल्याचं दिसतं. यात ख्रिस्ताने ज्यूईश पद्धतीचं कटिवस्त्र बांधलेलं. ख्रिस्तसंबंधित घटनेच्या धक्क्याने सगळीकडे धावपळ, जाळपोळ आणि दहशतवजा शोक पसरला आहे. काही जण बोटीने पळून जाताहेत. ज्यूडाइझमचं प्रतीक मानला गेलेला मेनोरा (मेणबत्त्यांचा स्टॅन्ड) दाखवला आहे. झेंडे घेऊन धर्मयुद्धाचं वातावरण तयार होत असल्याचं दिसतं. क्रुसाच्या वरच्या भागात ज्यू धर्मगुरू (रब्बाई) काळा लांब झगा, दाढी आणि टोपी अशा धर्मसंमत वेशात आहेत. नंतर आयुष्याच्या उत्तरार्धात शगालनी युरोप, अमेरिकेतल्या काही चर्चेस आणि सिनेगॉग्जसाठी अनेक सुंदर ग्लास पेंटिंग्ज केली. आजही इस्राएली पार्लमेंटच्या फ्लोअर आणि भितींवरही त्यांची मोझाइक्स आहेत.   

शगालचा आणखी एक जगप्रसिद्ध मास्टरपीस म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूनो) न्यू यॉर्कमधल्या कार्यालयात लावलेलं निळ्याशार काचेवरचं गहिरं पेंटिंग ‘पीस विंडो’! ( ३.७ x ४.६ मीटर. १९६७) वंशभेद आणि दोन महायुद्धांनी पोळलेल्या शगालना आयुष्यात प्रेम व  विश्वशांतीची आस लागणं तर्कसंगतच. १९६२ मध्ये एका विमान अपघातात यूएन महासचिव डाग हॅमरशिल्ड आणि त्यांचे सहकारी मृत्यू पावले होते. त्यांच्या विश्वशांतीच्या प्रयत्नांसाठी उभारलेलं हे स्मारकचिन्ह. पाहणाऱ्याच्या मनात उदात्ततेचा भाव जागवून नतमस्तक करवणारं. शगालची बहुतेक सर्वच ग्लास पेंटिंग्ज धार्मिक विषयांवर असत. तशाच यातही बायबलमधल्या काही आकृती (मोटिफज्) आहेत : क्रूस, मेणबत्ती, समुद्र, देवदूत, ट्री ऑफ नॉलेज, बाळाला कुशीत घेऊन पहुडलेली मेरी, मेंढरू वगैरे. असंही म्हटलं जातं की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझीग्रस्त युरोपात अडकलेल्या शगालना काही वर्ष अमेरिकेने कुटुंबासकट निमंत्रणपूर्वक आसरा दिला होता. त्याचीही वैयक्तिक कृतज्ञता म्हणून त्यांनी ही अतिशय देखणी कलाकृती संयुक्त राष्ट्राला सदिच्छांसह अर्पण केली. इथे येणाऱ्यांनी तिच्याकडे फक्त कलाकृती म्हणून न बघता विश्वाचा नागरिक म्हणून यामागच्या भावनांशी समरस व्हायचा प्रयत्न करावा, अशी नोंद त्यांनी करून ठेवली आहे. सहनाभुवतु सहनौ भुनक्तु..

शगालनी ‘माय लाईफ’ हे अतिशय सुरस, काव्यमय शैलीतलं आत्मकथन लिहिलं आहे, पण ते पस्तिशीतलं आहे. वयाच्या ९७ वर्षांपर्यंत लाभलेल्या सक्रिय दीर्घायुष्यात नंतरही बरंच काही घडलं असणार. यात त्यांनी स्वत:ची चित्रं, कलाक्षेत्रातील सुरुवातीचा प्रवास, राजकीय घटनांमुळे वाटय़ाला आलेला संघर्ष सटिक विधानांची पेरणी करत सांगितला आहे, ही मोठी जमेची बाजू.. ‘काम पैसे मिळवण्यासाठी नसतं करायचं, आयुष्याचं सार्थक करण्यासाठी करायचं असतं’ किंवा ‘सगळे रंग त्यांच्या शेजाऱ्यांचे मित्र असतात आणि विरोधी रंगांचे प्रेमिक.’

अमेरिकेत बस्तान बसलं होतं आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांत प्रदर्शनं होत होती, पण शगालना पॅरिसची याद सतावत होती. युद्धानंतर शांती प्रस्थापित होताच ते पॅरिसला परतले आणि त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या अंकातला अतिसुंदर भव्य ग्लास पेंटिंग्जचा मौसम सुरू झाला. काही काळ मातीस आणि पिकासोची साथ मिळाली. शगालना जगभरातून मिळालेल्या अगणित मानसन्मानांत सर्वात महत्त्वाचा म्हणजे १९७७ मध्ये त्यांच्या चित्रांचं एक प्रदर्शन लूव्रमध्ये भरवलं गेलं. त्याचं उद्घाटन फ्रान्सच्या पंतप्रधानांनी केलं. हयातीत असा मान मिळालेले शगाल पहिलेच कलाकार! पिकासोच्या शब्दांत सांगायचं तर- ‘मातीसनंतर रंग समजलेला शगाल हा एकमेव चित्रकार!!’

शेवटच्या काही दिवसांत भेटीला येणाऱ्या प्रत्येकाला ते विचारत, ‘तुम्ही विटेस्कचे का?’ विटेस्कमध्ये त्यांचं मूळचं लाकडी घर आता पूर्वीसारखंच, पण दगडांत बांधलं आहे. बागेत फ्रेंच व्हायोलिनवर विटेस्कचं गीत वाजवणाऱ्या कलाकाराचा पुतळा आहे. शगालचं नाव दिलेली गुलाबाची एक जातही बागेत मौजूद आहे.

arundhati.deosthale@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French artist marc chagall famous artworks marc chagall famous paintings zws