अरुण म्हात्रे

मिशांना पीळ घालत कुस्तीच्या आखाडय़ात उतरणारे पैलवान माहीत असतात आपल्याला, पण मिशांना पीळ घालत कवितेच्या आखाडय़ात उतरणारा हा कवी वेगळाच. त्याचे शब्द तुम्हाला पेचात अडकवतात, उलटसुलट फिरवतात नि धोबीपछाड घालतात. तरीही तुम्ही हसत असता, आत कुठेतरी दुखरेपण सोसत.. असा हा कवी म्हणजे अशोक नायगावकर.. त्यांच्या पंचाहत्तरीनिमत्त..

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Ajit Pawar on Walmik Karad
Ajit Pawar on Walmik Karad: वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”

पाब्लो नेरुदा या चिली देशातील एका कवीचे वाक्य आहे- ‘‘आयुष्य म्हणून जगायला आम्ही थकून गेलो आहोत..!’’ इथे पाब्लो तिथल्या सरकारबद्दल काही भाष्य करीत नाही. तो बोलतो स्वत:बद्दल, पण पर्यायाने ते सरकारला लागू पडतेच. पाब्लोला चिलीचे लोक डोक्यावर घेतात, कारण तो आम जनतेच्या मनातले बोलतो.. आपल्याकडेही असा एक कवी आहे, जो विदूषकाचा मुखवटा घालून कवितेतून बोलतो. त्यात तो सरकारला टारगेट तर करतोच, पण मिश्कीलपणे तो जे सांगतो त्यामुळे कोणालाच राग येत नाही. सरकारचे प्रतिनिधीही हसत हसत त्यांच्यावरची टीका ऐकून घेतात आणि वर शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतात..

एका कवितेत तो विदूषक कवी सांगतो-
‘‘रात्री झोपताना संपत मनात म्हणतो –
आयला,
सरकारने जगायची नाही, पण
हागायची तर सोय केली!’’ असे तिरकस लिहिणाऱ्या आणि आताच्या घडीला सर्वात लोकप्रिय असलेल्या कवीचे नाव आहे अशोक नायगावकर. विनोदी, तिरकस, उपरोधिक नायगावकरांनी केलेले भाष्य ऐकायला रसिक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. कवितेचा आनंद घेतात; हसून हसून ते इतके लोटपोट होतात की नायगावकरांचे भाष्य त्या हशा-टाळय़ांत लपून गेलेले असते.

वाई ते मुंबई व्हाया मनमाड असा जगण्यासाठीचा प्रवास केलेले नायगावकर नंतर पक्के मुंबईकर झाले; आणि नामदेव ढसाळबरोबर मुंबईच्या दलित वस्त्या फिरल्याने ‘डिकास्ट’ही झाले. वाईच्या प्राज्ञ प्राच्य शाळेत भरपूर अवांतर वाचन केलेले नायगावकर समाजवाचनात तर अव्वल बनले होतेच, पण अचानक कोसळलेल्या गरिबीमुळे अनाथ गावांच्या जवळ गेले होते. आधी आध्यात्मिक मर्ढेकर वाचणारे नायगावकर मुंबईत आल्यावर मार्क्सवादी नारायण सुर्वे जिभेवर ठेवू लागले. नामदेव ढसाळसोबत काही काळ एकत्र राहूनही नायगावकर विद्रोही वा जहाल बनले नाहीत. याचे कारण कदाचित त्यांचे सतारीचे गुरू योगीपुरुष आदरणीय बाबूराव कुलकर्णी असावेत. सतार शिकत दादांसोबत स्थितप्रज्ञ वृत्तीपर्यंतचा त्यांचा आत्मिक प्रवास त्याच तंद्रीत झाला असावा. नायगावकर लिहितात..

हे जिथून येते त्याचे
अथवा थिजून असते त्याचे
नाव खरेच आम्हास माहीत नाही
हे असण्या नसण्याचे
पंचामृत स्नान
स्वामी अमीबानंदाचे चरणी..

एखाद्या अवलियाला शोभावा असा नायगावकरांचा जीवनप्रवास आहे. मराठी कवितेचे हे भाग्य म्हणावे लागेल की, उतारवयामध्ये नायगावकरांना आपल्या मुलींकडे – प्राची, प्रज्ञा – इंग्लंडला दरवर्षी जावे लागते; आणि जावयाने सर्व जग फिरवून आणल्यावर ज्या प्रश्नावर नायगावकर जागतिक भिंगातून लिहितात, ते सर्व जगही त्यांनी अलीकडे जवळून पाहिले. नायगावकरांच्या सध्याच्या कवितांचे इंग्रजीत व अन्य आंतरराष्ट्रीय भाषांत अनुवाद झाले तर नायगावकर नक्कीच जागतिक कवी म्हणून मान्यता पावतील. मात्र कवी-लेखकांच्या बाबतीत आपण किती उदासीन आहोत हे सर्वाना ठाऊक आहे. ज्ञानपीठ मिळवण्यासाठीसुद्धा लेखकांना वयाची पंचाहत्तरी पार करावी लागते आणि योगायोगाने नायगावकरांची पंचाहत्तरी साजरी होत आहे. ती होत असताना त्यांचे कवितेचे फक्त दुसरेच पुस्तक (‘कवितेच्या वाटेवर’, ग्रंथाली) प्रकाशित होत आहे. कवितेच्या एकाच पुस्तकाने (‘वाटेवरच्या कविता’, ग्रंथाली- १९९२) लोकप्रिय झालेला नायगावकरांखेरीज दुसरा कवी माझ्या पाहण्यात नाही. इंग्लंडमधल्या हीथ्रो विमानतळावरही ‘‘अहो नायगावकर, इकडे कुठे?’’ असे ओरडून विचारणारे मराठी रसिक फक्त त्यांच्याच भाग्यात आहेत. दस्तुरखुद्द मंगेश पाडगावकरही म्हणायचे- ‘माझ्या काव्यवाचनानंतर रसिकांना ताब्यात ठेवणारा एकमेव कवी म्हणजे अशोक नायगावकर.’

एका कविता स्पर्धेच्या पुरस्कार वितरणात नायगावकरांना मी पहिल्यांदा ऐकले आणि आणि ‘सत्यकथे’तील कविता प्रमाण मानणारा मी अवाक् झालो. इतक्या तीव्रपणे जगण्यातले विरोधाभास कवितेमध्ये कुणी असे आणू शकतो यावर माझा विश्वासच नव्हता. कवितेत नायगावकरांनी लिहिले होते..
‘‘आम्ही पेटवतो चुली
शिमला फळांच्या रिकाम्या पेटय़ा फळकुटे पळवून
आणि भाजतो भाकऱ्या
खदखदतो रस्सा अल्युमिनियमच्या पातेल्यात
सूर्याच्या साक्षीने उघड.

आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाही रिबेरो..’’ त्या वेळच्या एकूण मराठी कवितेच्या तुलनेमध्ये ही कविता हटके होती. मराठीतील पारंपरिक भावविवश आंदोलने ओलांडून या कवितेने काही तरी वेगळेच कानात शिशासारखे ओतले होते. वेल्डिंग करताना आजूबाजूला ठिणग्या उडाव्या तसे त्यांचे शब्द उमटले होते. मराठी भावकवितेशी फारकत घेतल्यासारखी त्यातील सडेतोड समज होती. नायगावकर स्वत:ला विद्रोही वगैरे मानत नाहीत; पण विद्रोहाच्या बरोबरीची वा पुढची समग्र अस्वस्थता त्यांच्या कवितेत होती. नायगावकरांच्या कवितेतील ते चित्र आजूबाजूच्या वास्तवाचे थेट चित्र व त्यावरचे भाष्य होते. परिस्थितीच्या रेटय़ामुळे त्यांना वाई हे गाव सोडावे लागले व नंतर मनमाड, सातारा आणि पुन्हा मुंबई अशी पायपीट करावी लागली. त्यानेच त्यांच्या कवितांना ही देशी धार आली असावी.

अनियतकालिकांच्या चळवळीत जे अनेक कवी होते त्यांच्या सोबत नायगावकरही होते, पण व्यक्त होण्याच्या या भिन्नतेमुळे नायगावकर त्यापासून वेगळे पडत गेले. अनेक कवींनी आपल्या आत्ममग्न कोशात राहणे पसंत केले आणि समूहासोबत जाणे टाळले, अर्थात त्यांना ते झेपणारेही नव्हते. गावगन्ना म्हणून त्यांनी गावोगावी होणाऱ्या कवी संमेलनाची चेष्टा केली आणि आणि हळूहळू ते कालबा झाले. नायगावकर काव्यवाचनाच्या मंचावर आले आणि त्यांनी हा मंच समकालीन केला. स्त्रियांविषयी, खचलेल्या गावाविषयी, बदललेल्या शहरांविषयी, ग्लोबल फसगतीबद्दल, जगण्यातील दंभाबद्दल आणि माणूस म्हणून केलेल्या बौद्धिक अवनीतीबद्दल नायगावकरांनी जे तिरकस लिहिले त्याला रसिकांनी डोक्यावर घेतले. सादरीकरणातील मिश्किलीमुळे त्यांनी मंच हलता ठेवला आणि कविता सर्वदूर नेली. नायगावकरांना मंचीय मानणाऱ्या बुद्धिवंतांना आपण किती मोठय़ा जागतिक दर्जाच्या आशयद्रव्याला मुकले आहोत याची कल्पना नाही. एखाद्या जागल्याचे काम नायगावकर करीत आहेत. म्हणूनच त्यांची कविता साहित्यिक मासिकातून नव्हे, तर ‘मागोवा’ वा ‘नवभारत’ अशा सामाजिक मासिकांतून प्रसिद्ध झालेली आहे आणि तिने भारतीय ज्ञानपीठाचेही दार ठोठावले आहे.
नायगावकर कवितेच्या मंचामुळे घोटी, आटपाडी, कोपरगाव, कुंदल, सटाणा, पाथर्डी, बीड, खानापूर, पिंपळगाव बसवंत, चोपडा, मालेगाव, ओतूर, आजरा, आचरा, कुडाळ अशा गावांतून फिरले- जिथे आधीचे कवी गेले नव्हते आणि त्यामुळेच अस्सल देशी मातीला अस्सल गावरान कविता उरीपोटी भेटली.

‘‘मी म्हणालो बायकोला
आजपासून प्रेयसी तू,
ती म्हणाली
यापुढे चोरून भेटू!’’
यातील स्त्री-पुरुष नात्यातील आधुनिक पेच असो वा-
‘‘क्रांतीस वाहताना श्रद्धांजली मुक्याने
डाव्या बुटात त्यांच्या
उजवेच पाय होते..’’ यातील राजकीय वक्रोक्ती असो, नायगावकर सतत विनोदाच्या सारणीने वर्तमानाच्या विटा काढत राहिले.
‘‘भ्रमंतीच्या नाक्यावर
दहा गावांचे आडोसे
अरे पोरा नको बघू
बरे आभाळ आभाळ!’’ असा भ्रमंतीचा अभंग गात ते मुंबईत आले होते.
नायगावकरांना तुकोबासुद्धा जवळचे. सारे घरच कोसळून गेलेले तुकोबा आणि बहुजनांना आपली विहीर खुली करून देणारे महात्मा फुले यांची करुणा आणि लोकजीवनाशी नाळ नायगावकरांनी घेतली आणि त्यांच्या मिश्याही.
‘‘नंतर नंतर व्हावचरे बनवणारे
कॉरस्पोंडन्स करणारे लोक शहरात राहू लागले
आणि कुळीथ तूर उडीद बाजरी पिकवणारे येडे खेडय़ातच राहिले.
खेडय़ात गहू पिकतो शहरात व्हावचरे पिकतात’’
यातील शहर आणि गाव यामधली चीर
‘‘तुझ्या शताब्दीचा फेस फसफसतोय भीमा
मोहाची ताजी झिंग पसरलीय
शिवाशिवीचा खेळ सुरू झालाय
तुला भोज्या बनवलाय
काय घाई उडाली बघ तुला शिवून घ्यायची!’’
यामागचं सामाजिक शल्य किंवा
‘‘टिळक, तुम्ही चौपाटीला इथे
कशासाठी उभे आहात?
अहो, पाणीपुरी- भेळपुरी खाणं
हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि आम्ही तो रोज मिळवणारच ’’
यातील नव्या चंगळवादाची खिल्ली हे मराठी कवितेत आधी नव्हते.
आपल्या हुकमी वक्रोक्ती आणि व्यंगोक्तीच्या अंगाने जाणाऱ्या कवितांना उपरोधिकपणाचा कच्चा माल त्यांना भरपेट वाचनातून आणि सूक्ष्म निरीक्षणातून मिळाला आहे.
शंकर वैद्य सर हे नायगावकरांचे अंतस्थ गुरू, तर रुपारेल कॉलेजचे सुहास बापट हे कवितेतले सुहृद. आम्ही पाच कवींनी ‘कवितांच्या गावा जावे’ नावाचा काव्यवाचनाचा प्रयोग सुरू केला तेव्हा अगदी सुरुवातीला नायगावकर अत्यंत गंभीरपणे कविता सादर करीत. उपरोध, टवाळी, चेष्टा- जी त्यांच्या स्वभावात होती तीच त्यांच्या कवितेत आली होती. पण नंतर नंतर लोक आपली कविता ऐकून गंभीर होण्याऐवजी ते खो खो हसतात, हे पाहून नायगावकरांनी काव्यवाचनाची आत्ताची विनोदी सारणी सुरू केली आणि अत्यंत गंभीर कविता लिहिणारे नायगावकर रसिकांच्या गळय़ातले ताईत बनले. खरे तर ‘ज्योतिबा आभार’ कविता ही आपल्या प्रगतिशील जाणिवेच्या कल्पनांची लक्तरे फेडणारी आहे, ती ऐकून अजूनही अंगावर शहारा येतो. मराठी कवितेतला अत्यंत संभ्रमित असा तो काळ होता. कवितेत साठोत्तरी नंतर ‘नव्वदोत्तरी’ असा एक शब्दप्रयोग सुरू झाला होता. आणीबाणीनंतरच्या राजकीय उलथापालथीच्या काळामध्ये नायगावकर लोकांसमोर येऊ लागले.

‘‘तुझ्या जाण्यानंतरचा
अंधार इतका भीषण भयानक असेल..
..तर तू असतानाच्या प्रकाशात काही तरी गफलत असली पाहिजे!’’ अशी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या नरसंहारावर प्रतिक्रिया म्हणून त्यांनी कविता लिहिली होती.
वरवर मिश्किल संवादी वाटणारी नायगावकरांची कविता मात्र कारुण्य आणि वास्तव या धाग्यांनी विणलेली आहे. काहीशी चक्रमपणे भाष्य करणारी नायगावकरांची कविता सतत एक अस्वस्थ सत्य सांगत असते. इंदूरचे वसंत पोतदार नायगावकरांच्या काही कविता ऐकताना अक्षरश: ढसाढसा रडताना मी पाहिलेले आहे. महाडचे डॉक्टर हिंमतराव बावस्कर यांनाही नायगावकरांच्या कविता ऐकून लोक का हसतात, असा प्रश्न पडतो. परवा एका कार्यक्रमात रविराज गंधेसुद्धा म्हणाले की, स्वत:ला थपडा मारून घ्याव्यात अशा नायगावकरांच्या कविता लोक हसत कशा साजऱ्या करतात हेच कळत नाही.

दलित पँथर जोशात असतानाचा नामदेव (ढसाळ) हा त्यांचा खास मित्र होता. नामदेवचे पुस्तक (गोलपिठा) प्रकाशित करण्यात नायगावकरांचा मोठा सहभाग होता.नायगावकरांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने त्यांचा चाळीस वर्षांचा कवितेचा प्रवास डोळय़ासमोर येतो. रुपारेल कॉलेजचे सुहास बापट सर यांच्या घरी झालेल्या कवितेच्या मैफलीने आमचा कवितेचा एकत्र प्रवास सुरू झाला आणि तो आजपावेतो चालूच आहे. एकत्र किती फिरलो याची गणतीच नाही. पुढे ‘कवितांच्या गावा जावे’, रामदास फुटाण्यांची ‘हास्यधारा’ आणि स्वत:चा एकपात्री ‘मिश्किली कवितेच्या वाटेने’ अशा वेगवेगळय़ा नावांनी हा प्रवास चालूच आहे. आता तर नायगावकर ग्लोबल झाले आहेत. वसंत पोतदार असंही म्हणायचे की, हा कवी पेरू, चिली, इटली, पोलंड वगैरेंसारख्या छोटय़ा देशात असता तर लोक या कवीला डोक्यावर घेऊन नाचले असते.

‘‘मी गाणे म्हटले खूप आतले नि निर्थकाचा तळ शोधीत मी बसलो,
मी परिस्थितीच्या बेंबीमध्ये बोट घातले नाही..
मी लढलो नाही!’’
अशी कबुली ते देतात तर-
‘‘भीमा तू रस्ता
अवघड वाहनांच्या गुरगुरणाऱ्या चाकाखालचा..
कुठल्या निलाजऱ्या तोंडाने सांगू तुला
विसरून जा खाली मान घालणाऱ्या आठवणी!’’ अशा कवितांनी ते बाबासाहेबांबद्दलची व्याकुळ जाणीव व्यक्त करतात. अशा कैक कवितांची मराठी समकालीन कवितेचा निर्देशांक नायगावकरांनी उंचावलेला आहे.एकाच वेळी अध्यात्म, समाजचिंतन, त्यातच माणूसपणाला पडलेल्या चिरा आणि वास्तवातील पराभूतपण हे सारे समजून घेण्यासाठी नव्या युगाचे दुभंगलेपण समजून घ्यावे लागेल.

मात्र कविता म्हणतानाचा पांघरलेला वेडेपणाचा मुखवटा कोणालाही अचंबित करेल असाच आहे. नायगावकरांची कविता सादर करण्याची शैली चार्ली चॅप्लिनच्या स्वत:ला बावळट ठरवून जगाचे व्यंग दाखवण्याच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. मनुष्यत्वाच्या व्यंगावर मार्मिक बोट ठेवणारे नायगावकर बुवा हे मराठी साहित्यविश्वाचे नवे मानदंड आहेत..

पंचाहत्तरीच्या त्यांना शुभेच्छा देताना हेच म्हणावेसे वाटते..
तू गाणे म्हटलेस खूप आतले
अन् निर्थकाचा तळ शोधीत बसलाही
तू काळोखार्ची भिंत सारवत,
ज्ञानाचे दिवे पेटवीत बसलासी
पण आता मित्रा तुझे
ते गाणे जगभर जगभर गेले
जगण्याचे श्रेय मिळाले
काळोखा उजेड दिसला
अज्ञाना रस्ता दिसला
कवितेच्या वाटेवर तू
मस्त कलंदर ठरला .
तू असाच हिंडत रहा.
नववाटा धुंडत रहा
लोकांना हसवत रहा.
ही माय मराठी तुझ्या गळय़ातून फिरेल देशोदेशी
अन् कवितेच्या हातानी घेईल गलबलल्या हृदयाशी.
arunakshar@rediffmail.com

Story img Loader