‘‘हॅलो सुमा, सुशी बोलतेय. मगाचपासून फोन करतेय तर एंगेज्ड् लागतोय.’’
नागपूरहून ताईची मृणाल गप्पा मारीत होती. मधेच म्हणाली, ‘‘मावशी, आता किती वर्षे झाली तुझ्या लग्नाला?’’ ५० होतील, म्हटल्यावर ‘अभिनंदन, अभिनंदन’ म्हणायला लागली. तर मी म्हटलं, ‘‘त्यात कसलं अभिनंदन? आमच्या वेळी घटस्फोटाची पद्धत नव्हती ना, म्हणून झाली ५० वर्षे.’’
‘‘हाऽहाऽहाऽ! काय गं बाई बोलणं तुझं सुमे!’’
‘‘गंमत केली जरा. पण पेपरातून डोकं वर उचलून यांनीही रोखून बघितलं माझ्याकडे चष्म्यातून. संसारातल्या बारीकसारीक गोष्टी टोकाला न्यायच्या नसतात हे या नवीन मुलींच्या कानावर असलेलं बरं! तू का फोन करीत होतीस?’’
‘‘तुझ्याकडे भरल्या वांग्यांसाठीचा गरम मसाला आहे ना, तो थोडा तुझ्याकडच्या कुंदाबरोबर पाठवून दे ना!’’
‘‘पाठवते. पण चार दिवसांपूर्वी भेटली होतीस तेव्हा म्हणालीस की, भरल्या वांग्यांसाठी ताजा मसाला करून ठेवलाय म्हणून.’’
‘‘केलाय गं, पण तोच मेला सापडत नाहीये. फ्रीज उघडला तर छोले, सांबार, गावरान, पुलाव, मालवणी, चायनीज कसल्या-कसल्या मसाल्यांच्या बाटल्या इकडून-तिकडून हसताहेत मला. पण माझा भरल्या वांग्यांचा मसाला कुठं सापडत नाहीये.’’
‘‘सुमेधानं कुठे उचलून ठेवलाय का विचारलंस का?’’ ‘‘ती घरात कुठाय? राकेशला मराठीच्या क्लासला घेऊन गेलीय आणि तिथून..’’
‘‘काय? मराठीचा क्लास? रविवारचा? दुसरीतल्या मुलाला?’’
‘‘काय करणार? तुला माहितेय हा धाकटा नातू, मोठय़ा सुरेशसारखा शांत, समजंस नाहीये. अर्क आहे अर्क अगदी! एकसारखा इंग्लिशमधून बोलतो. म्हणून त्याला म्हटलं, ‘‘अरे, घरात तरी मराठी बोलावं. आपली मातृभाषा आहे ती!’’ तर म्हणाला, ‘‘ममा स्पीक्स इन इंग्लिश. सो व्हॉट इज माय मदरटंग?’’ असली घोडय़ाच्या पुढं धावणारी अक्कल! वर्गात टीचरने ‘गाय’ या विषयावर दहा ओळी लिहायला सांगितल्या तर याने काय लिहावं? ‘‘अमेरिकेत मुलांना ‘गाय’ असं हाक मारतात. भारतात गाय हा चार पायांचा प्राणी आहे. ती गवत खाते. ती दूध देते, पण आम्ही चितळय़ांचं दूध पितो.’’
‘‘हाऽहाऽहाऽ’’
‘‘ऐक पुढे. गाईच्या शीला शेण म्हणतात. त्याच्या गोवऱ्या बनवतात. गाईची पूजा करतात. वर्गात माझ्या शेजारी पूजा बसते. ती मला खूप आवडते.
‘‘छान, छान! अगदी मनापासून आणि मन:पूर्वक निबंध लिहिलाय राकेशनं.’’
‘‘त्याला क्लासला पोचवून सुमेधा जाणार पार्लरला. तिथून राकेशला घेऊनच घरी येईल ती. जाताना माझ्या भरल्या वांग्यांचं कौतुक करीत मला भरली वांगी करायचं गोड आवाजात फर्मावून गेलीय. दोन-तीन तास पार्लरमध्ये जाऊन काय स्वत:च्या जिवाचे चोचले करून घेतात कुणास ठाऊक! आम्ही आपली करतोय भरली वांगी.’’
‘‘आपल्या साळुंक्या पुष्कळ बऱ्या म्हणायच्या. परवा वसू तिच्या अमेरिकेहून आलेल्या सुनेबद्दल काय-काय सांगत होती! तीन आठवडय़ांसाठी आलेल्या या पाहुण्या सुना त्यांच्या माहेरी आणि माहेरच्याच गोतावळय़ात जास्त असतात. वसूकडे होती चार दिवस, तेव्हा वसू तिला म्हणाली, ‘अगं, घरात असताना नीलला डायपर लावू नकोस. दीड वर्षांच्या मुलाच्या नाजूक स्कीनला त्रास होतो.’ नाराजीनं आणि मनाविरुद्ध सुनेनं नीलला डायपर लावला नाही आणि त्याचे कपडे खराब झाल्यावर, हातातल्या मोबाइल स्क्रीनवरची नजरसुद्धा न उचलता, त्याच्या रडण्याकडे ढिम्मं पाहिलं नाही. शेवटी या शीतयुद्धात आजोबांनीच नातवाला स्वच्छ केलं.’’
‘धन्य गं बाई! मागच्या महिन्याच्या आपल्या ‘चम्मतग’ ग्रुपच्या मीटिंगला तू नव्हतीस ना! सुनेच्या बाळंपणासाठी सहा महिने अमेरिकेला राहून आलेली शुभा काय काय मजा सांगत होती! तिच्या नातवाच्या महिन्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुनेच्या मैत्रिणी सहकुटुंब आल्या होत्या. त्यातल्या एका मैत्रिणीने सुंदर पैठणीचा ड्रेस घातला होता. तिच्या सहा महिन्यांच्या बाळाला डायपर बांधलेला असूनही तिच्या ड्रेसच्या हातावर त्याच्या शीचा थोडासा ओघळ आलाच. तर काय करावं त्या मुलीनं? सरळ त्या ड्रेसचा हात कापून टाकून दिला. आहे की नाही?’’
‘‘शालन आली होती का गं ‘चम्मतग’ला?’’
‘‘नव्हती. आणि त्याआधीच्या ‘चम्मतग’ला तरी कुठे होती? मोबाइलवर फोन केला तर कध्धी उचलत नाही. ती एकीकडे आणि तिचा मोबाइल कुठे दुसरीकडे ठेवलेला. तिच्या लँडलाइनवर फोन करायचा म्हणजे आपल्या सहनशक्तीची परीक्षा!’
‘‘का बरं?’’
‘‘पुटुपुटु येऊन तिच्या सासुबाईच फोन घेतात आणि साऱ्या जगाच्या चौकशा करीत राहतात, नाहीतर तेच तेच पुन्हा नव्याने सांगत बसतात.’’
‘‘वय फार वाढलं की कठीण होत जातं जगणं. नव्वदीच्या पुढे असतील ना आता त्या?’’
‘‘हो तर! पण त्यांची गंमत माहितेय
ना तुला?’’
‘‘कसली गंमत?’’
‘‘मधे एकदा त्या घरातच पडल्या थोडय़ाशा. शालनच्या मुलाने डॉक्टरांना बोलावून कुठे हाडबीड मोडलं नाही ना याची खात्री करून घेतली. डॉक्टरांनी सांगितलं की, आता तुम्ही आजींना चालताना काठी वापरायला सांगा. तर नातवाने लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना छान चार पायांची काठी आणली. ती कशी वापरायची याचं आजीकडून प्रात्यक्षिक करून घेतलं. आजींनी दोन-तीन दिवस ती काठी वापरली. मग लागल्या पुन्हा पहिल्यासारखं तुरूतुरू चालायला. ते बघून नातवानं विचारलं, ‘‘अगं आजी, काठी कुठाय तुझी? डॉक्टरांनी चालताना काठी वापरायला सांगितलेय ना?’’ तर त्या म्हणाल्या, ‘‘नको अरे! काठी घेऊन चाललं की म्हातारं झाल्यासारखं वाटतं.’’
‘‘शाबास. गेट्रच आहेत अगदी. दोन दिवसांपूर्वी मोहिनी भेटली होती. ती तिच्या नणंदेकडली वेगळीच गंमत सांगत होती. नणंदेच्या नवीन सुनेच्या माहेरचे लोक ‘हरे राम’च्या पंथाला लागलेले. ती सूनसुद्धा कांदा-लसूण काही खात नाही. दर रविवारी सकाळपासून बाहेर. कधी मंदिरात भजन-कीर्तन तरी असतं नाहीतर कुणाकडे तरी साजूक तुपातल्या एकशेआठ पदार्थाचा अन्नकोट. मूर्तीवर गुलाबपाकळय़ांचा अभिषेक करायचा आणि प्रसाद म्हणून सर्वानी ते साजूक-नाजूक ड्रायफ्रुटचे पदार्थ, फळं खायची. ती सूनपण नेते एखादा पदार्थ करून. कांदा-लसूण, मसाले काही नाही. कपाळभर गंधाचा मळवट भरायचा आणि पांढऱ्या साडय़ा नेसायच्या! नस्ती एकेक थेरं. साधे घरात शेंगदाणे भाजले तरी त्याचा भोग दाखवायचा. प्रत्येक भोगाच्या वाटय़ा वेगवेगळय़ा. त्या इतर कशाला वापरायच्या नाहीत.’’
‘‘म्हटलं ना तुला, की आपल्या साळुंक्या पुष्कळ बऱ्या.’’
‘‘पुढच्या महिन्यात आपल्याला चारूच्या मुलाच्या लग्नाला जायचंय ना, त्याआधी आपण एखाद्या पार्लरमध्ये जाऊन यायचं का? बघू या तरी तिथे काय काय प्रकार असतात ते! आपण घरी रंगवलेल्या केसांचा काही दिवसांनी ‘तिरंगा झेंडा’ तयार होतो. केसांचा मूळ रंग, रंगवलेल्या केसांचा अर्धवट उडालेला रंग आणि मधेमधे डोकावणारे पांढरे केस.’’
‘‘चालेल-चालेल. आपली विद्या नेहमी फेशिअल करून घेते. तेही करून बघू या.’’
‘‘चल, ठेवते फोन. इतका वेळ मी फोन अडवून बसलेय, म्हणून फोनकडे आणि माझ्याकडे रोखून बघत यांच्या अस्वस्थ येरझाऱ्या सुरू झाल्या आहेत. आजची पत्त्यांची बैठक कुणाकडे ठरली ते विचारायला मोबाइलवरून फोन करून ते त्यांचा बॅलन्स कमी करणार नाहीत. मागच्या रविवारी आमच्याकडे होता तो पत्त्यांचा गोंधळ. अच्छा, पाठव लवकर मसाला.’’
‘‘पाठवते. पण आमच्या गप्पांची ‘भरली वांगी’ अगदी मसालेदार झाली नाही?’’     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा