२७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन! त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या सद्य:स्थितीसंबंधात चर्चा करणे उचित ठरावे. इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. परंतु आज जागतिक संदर्भातही मराठीभाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या ऱ्हासाची ही भीती अनाठायी आहे असेच म्हणावे लागेल. खरे तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. या सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या निग्रहाची.. मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची.. आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची!
मराठीभाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अर्धशतक उलटून गेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती आणि दिशा प्राप्त होईल असे वाटत होते. भाषावार प्रांतरचनेच्या मागणीमागचे उद्दिष्टही हेच होते. परंतु मराठी भाषा संवíधत करण्याचे जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने झाले नाहीत. किंवा जे काही प्रयत्न झाले ते पुरेशा सामर्थ्यांने आणि दूरदृष्टीने केले गेले नाहीत. म्हणूनच ‘येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहील काय?’ असा चिंतेचा सूर आज सतत ऐकू येत आहे. याबाबत विविध व्यासपीठांवरून चर्चा होत आहे. ही चर्चा पूर्णत: गरलागू आहे असेही म्हणता येणार नाही. पण मराठी भाषेच्या संवर्धनाचा विचार करताना ती जिवंत राहणार आहे आणि आपण ती जिवंत ठेवणार आहोत, हे पहिल्यांदा गृहीत धरायला हवे. या भूमिकेतून वर्तमानातील मराठीच्या स्थिती-गतीचा शोध घेतला असता लक्षात येते की, मराठीबाबतचा आपला दृष्टिकोन हा सामाजिक- सांस्कृतिक जीवनातील भाषाविषयक उथळ, अविवेकी, अतिभावनाशील अशा आपल्या एकंदर अनास्थादर्शक वृत्तीचा परिपाक आहे. हे लक्षात घेऊन मराठी भाषेच्या अस्तित्वाबाबत किंवा सन्मानदर्शी यथोचित स्थानाबाबतच नव्हे, तर साकल्याने मराठी भाषेच्या भवितव्यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याची आणि त्या अनुषंगाने कृतिशील होण्याची निकड आज आहे.
भाषा संवíधत करायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भाषा हिरीरीने बोलायची. जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी ती भाषा बोलणे हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे. िहदी व बंगालीच्या उदाहरणावरून ते आपल्याला स्पष्ट दिसते. याबाबतीत मराठीची परिस्थिती आशादायक आहे. कारण आजच्या घडीला मराठी मातृभाषा असणाऱ्यांची संख्या सुमारे आठ ते साडेआठ कोटी आहे. पुढच्या ५० वर्षांतसुद्धा ही संख्या भक्कमच राहणार आहे. त्यामुळे सर्वत्र आपण हिरीरीने मराठी बोलले पाहिजे. ती बोलायला लाजायचे कारण नाही. आपण आपल्या भूमीत भक्कम उभे आहोत, आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपकी एक आहे, आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो, या आत्मविश्वासाने ती बोलण्याची आवश्यकता आहे.
भाषेच्या विविध बोली जोपासणे आणि वाढवणेही तितकेच गरजेचे आहे. मराठीच्या अनेक बोली आहेत. त्यातील वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी असे काही ठळक भेद आपल्याला माहीत आहेत. पण त्या बोलींमध्येही पोटबोली आहेत. उदाहरणार्थ- कोकणात वारली, ठाकरी, कातकरी, आगरी, कुणबी, मालवणी असे अनेक भेद आहेत. मराठीचे संवर्धन व्हायचे असेल तर या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. सुशिक्षितांनी आपल्या बोलीभाषांची लाज न बाळगता आपापल्या समूहात आणि प्रदेशात दैनंदिन व्यवहारांत बोलीभाषेचा वापर केला पाहिजे. याबरोबरच बोलीभाषांचे व्याकरण अद्ययावत करणे, त्यांच्यात साहित्यनिर्मिती करणे, त्या साहित्याचा गावोगावी प्रसार करणे, याही गोष्टी प्राधान्याने कराव्या लागतील. कारण मराठीचे संवíधत भवितव्य हे बोलींच्या विविधतेत आणि त्यांच्या समृद्धीतही सामावलेले आहे.
भाषाशिक्षण हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनातील महत्त्वाचा भाग असतो. भाषाशिक्षणासाठी शाळा जरुरी आहे. मात्र, याबाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप मोठा वर्ग अद्यापि दूरच आहे. त्यात पुन्हा मुलांपेक्षा मुलींचे शाळागळतीचे प्रमाण बरेच अधिक आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यापासून बराच मोठा वर्ग वंचित आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाची चर्चा करायची तर पहिल्यांदा ही गळती थांबवली पाहिजे. समाजातील मोठय़ा वर्गाला जर भाषेचे शिक्षणच मिळणार नसेल तर भाषेच्या संवर्धनाची वांझोटी चर्चा करण्यात काहीच हशील नाही. त्याआधी याकरता सर्व मुले-मुली निदान दहावीपर्यंत शिकतील आणि मराठी भाषेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळेल असे पाहिले पाहिजे.
शिक्षणासाठी इंग्रजीसारख्या परक्या भाषेचा स्वीकार केल्याने मराठी धोक्यात आली आहे, या मुद्दय़ाचाही विचार येथे करणे अपरिहार्य ठरावे. मराठी माध्यमातून शिकलेले लोक मराठी टिकवतील, ही कल्पनाही साफ चुकीची आहे. तसेच इंग्रजी माध्यमातून शिकलेले लोक मराठी बुडवतील, असेही समजण्याचे कारण नाही. ‘मराठी विरुद्ध इंग्रजी माध्यम’ असा वाद घालत न बसता मोकळ्या मनाने आणि संयमाने यासंबंधात विचार करायला हवा. आज खरी गरज आहे ती मराठी माध्यमाच्या शाळेत अगदी इयत्ता पहिलीपासून चांगले, दर्जेदार इंग्लिश शिकवण्याची आणि प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून दर्जेदार मराठी शिकवण्याची! इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून चांगली मराठी पुस्तके पुरवणी वाचन म्हणून लावली पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या मुलांना दर्जेदार मराठी साहित्य आपल्या घरात उपलब्ध करून दिले पाहिजे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना नुसतीच नाक मुरडून चालणार नाही, तर या शाळांमधून अमराठी मुलांना मराठीच्या कक्षेत आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमाच्या शाळांमधील मराठीचा दर्जा उच्च कसा राहील, यासाठीही ठोस पावले उचलावी लागतील. यासंबंधी एक उदाहरण येथे नमूद करायला हरकत नाही. १९९३ च्या सुमारास मीनल परांजपे यांनी मराठी माध्यमाच्या शाळांतील मुलांना इंग्रजी भाषेत पारंगत करणारा Functional English नावाचा आठवीपर्यंत राबवता येईल असा अभ्यासक्रम तयार केला आणि मराठी माध्यमाच्या बारा शाळांमध्ये तो यशस्वीरीत्या शिकवला गेला. हा उपक्रम सगळ्याच मराठी शाळांमध्ये लागू केला गेला असता तर मराठी शाळांच्या दुर्दशेला काही प्रमाणात तरी प्रतिबंध झाला असता.
भाषेच्या संवर्धनामध्ये ती भाषा निरनिराळी कामे करण्यासाठी सक्षम आणि लवचिक करणे हीसुद्धा एक महत्त्वाची दिशा आहे. त्यासाठी मराठी भाषेचे दरवाजे नवनवीन बदलांना कायम उघडे ठेवावे लागतील. ज्ञानासाठी इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत वापरणे म्हणजे अपराध आहे असे मानण्याचे कारण नाही. विशेषत: समाजात जेव्हा नित्य नवीन तंत्रज्ञान येते आणि अन्य भाषा तसेच संस्कृतींशी त्याचा संबंध येतो तेव्हा परभाषेतील शब्द आपण जसेच्या तसे उचलतो, किंवा त्या शब्दांमध्ये बदल वा मोडतोड करून निराळा शब्द तयार करतो, किंवा परभाषेतील शब्दाला प्रतिशब्द तयार करतो. अशा विविध स्तरांवरून मराठी भाषेत शब्दांची भर सतत पडत राहिली पाहिजे.
भाषेचे संवर्धन व्हायचे तर सामाजिक व्यवहाराच्या सर्व क्षेत्रांत तिचा प्रवेश व्हायला हवा. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंग्रजीचा बोलबाला आहे. त्यामुळे समाजव्यवहारातही इंग्रजीचाच वरचष्मा असणे स्वाभाविक आहे. परंतु प्रश्न आहे तो- इंग्रजीतील ज्ञानसंपदा मराठीत आणण्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत, याचा! या प्रश्नाच्या सकारात्मक आणि कृतिशील उत्तरावर मराठीच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा बरीचशी अवलंबून आहे. त्यासाठी प्रत्येक विषयाची पुस्तके मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. विज्ञानातील संज्ञा, संकल्पना, व्यक्ती आणि संस्था यांवरील साडेतीन हजार नोंदीचा समावेश असलेला कोश मराठी विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित करीत आहे, ही निश्चितच महत्त्वाची गोष्ट आहे. विश्वकोश, शासनव्यवहारकोश, शब्दकोश, परिभाषाकोश यासारखे मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचे प्रयत्न झाले आहेत, आजही ते सुरू आहेत. परंतु अशा प्रयत्नांचे नेमके महत्त्व, त्यांची उपयोगिता, त्यांचे प्रत्यक्षात भाषिक, वाङ्मयीन, ज्ञानात्मक कार्यातील उपयोजन यासंबंधी मराठीभाषक समाज उदासीन आहे. कोश, पुस्तके, ज्ञानसंच तयार होत राहिले. पण ते फक्त सरकारी खात्यांतून, गोडाऊन्समधून, ग्रंथालयांतून आणि मोजक्या जाणकार व्यक्तींच्या घरातच पडून राहिले. मराठी विश्वकोशात जगातील ज्ञान-विज्ञान मराठी भाषेत मांडलेले आहे. पण त्याचे मर्म समाजाला समजावून सांगण्याची काळजी कोणी घेतली नाही. हे करण्यासाठी जितक्या तातडीने आणि निष्ठेने मराठीभाषक समाज कामाला लागेल, तितक्या जोमाने मराठी भाषासंवर्धनाचा मार्ग प्रशस्त होत जाईल. अधिकाधिक लोकांना मातृभाषेतून ज्ञान उपलब्ध करून देणे हे आव्हान सर्वच भाषांना स्वीकारावे लागणार आहे. यासाठी भाषांतर कौशल्य विकसित करून, उत्तम भाषांतरकार घडवून, इंग्रजीच नव्हे तर इतरही भाषांमधील ज्ञान व माहिती मराठीत आणून, या ज्ञानाचे अभिसरण वाढवून एक व्यापक ज्ञानव्यवस्था उभारावी लागेल. ‘केल्याने भाषांतर’सारखे नियतकालिक, ‘मायमावशी’सारखा अंक, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र, मेहता, साकेत यांसारखे काही प्रकाशक यांच्या माध्यमातून भाषांतराचे सुरू असलेले काम महत्त्वाचे आहे. परंतु ते अधिक व्यापक स्तरावर आणि प्राधान्याने होणे गरजेचे आहे. तसेच केवळ कथा, कादंबरी अशा ललित साहित्यापुरतेच भाषांतरित साहित्याचे क्षेत्र मर्यादित न राहता विज्ञान, व्यवसाय, व्यवस्थापन, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांतील मजकुराच्या भाषांतरासाठीही तातडीने पावले उचलायला हवीत. व्यापक भाषांतरज्ञान प्रकल्प हाती घ्यायला हवा. सर्व विद्यापीठांमध्ये भाषांतरविद्य्ोचा अभ्यासक्रम सुरू व्हायला हवा. महाराष्ट्र ज्ञान मंडळाने एमएस-सीआयटीसारखा अभ्यासक्रम सर्वासाठी मराठी माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. त्याच धर्तीवर द्वैभाषिक भाषासाधनांचे विकसन करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान मंडळाने पुढाकार घ्यायला हवा.
जागतिकीकरणामुळे होत असलेल्या सांस्कृतिक सपाटीकरणाचे भान बाळगतानाच या अपरिहार्य स्थित्यंतराचा लाभ घेत मराठीला संवíधत भवितव्याच्या दिशेने नेण्यासाठी काही ठोस पावले टाकणे शक्य आहे. जागतिकीकरणात रिटेिलग म्हणजे किरकोळ विक्री, लघुकर्ज, विमा-विशेषत: आरोग्य विमा अशा विविध क्षेत्रांतील कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी लहानातील लहान खेडय़ांत, वस्तींत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रत्येक माणसाशी संपर्क साधण्यात रस आहे. त्यासाठी अधिकाधिक जाहिराती, माहितीपत्रके प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध व्हावीत, अशा प्रयत्नांत या कंपन्या आहेत. परदेशी संशोधक साहित्य, समाजशास्त्र, आरोग्याचे प्रश्न अशा अनेक क्षेत्रांत संशोधन करत आहेत. तेही प्रादेशिक भाषा शिकून लोकांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असतात. जागतिकीकरणाच्या बाजारपेठेतले आणि संशोधनातले हे प्रवाह प्रादेशिक भाषा प्रबळ करण्यासाठी पोषक असेच आहेत. याचा फायदा परकीय गुंतवणुकीत देशात प्रथम स्थानावर असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील मराठीभाषकांना आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी निश्चितच करून घेता येईल. बांधकाम, विमा, फॅशन डिझायिनग, प्रसारमाध्यमे, मनोरंजन, पर्यटन, इव्हेंट मॅनेजमेंट अशा विविध सेवाक्षेत्रांमध्ये जागतिकीकरणामुळे तांत्रिक भाषेची जास्त गरज भासत नाही. अशा क्षेत्रांमध्ये मराठी तरुणांनी येऊन प्रगतीबरोबर मराठी भाषेचा प्रसार केला पाहिजे. पण त्यासाठी नुसते डॉक्टर आणि इंजिनीअर होण्याकडेच मराठीभाषकांनी आपली मुले पाठवून चालणार नाही.
आजच्या काळातले टीव्ही हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आज पाच मराठी टीव्ही चॅनेल्स सक्रीय आहेत. त्यांच्या कार्यक्रमातील मराठी भाषा ही अचूक नसेल; पण इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की, आज त्यांच्यामुळेच मोठय़ा प्रमाणावर मराठीभाषक समाज हा िहदी आणि इंग्रजी टीव्ही चॅनेल्स सोडून रोज सकाळी भविष्य ऐकायला बसतो, सारेगमपमधील मराठी गाणी ऐकतो. हे माध्यम दुर्गम भागांतही पोचले आहे. आणि आता तर ते सातासमुद्रापलीकडेही पाहिले जाते. ते पाहणाऱ्या लोकांची संख्या काही कोटींच्या घरात आहे. या माध्यमामुळे मराठीचा नकळत का होईना, प्रसार-प्रचार होत आहे. या प्रभावी माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी मराठीच्या बाबतीत जाणीवपूर्वक काम केले पाहिजे.
आज संगणक- इंटरनेट युगात मराठीला जागतिक स्तरावर विस्तार पावण्यासाठी चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. अगदी अलीकडेपर्यंत संगणकावर मराठी हे इंग्लिश भाषेसारखे रोमन लिपीतून लिहावे लागायचे. आज सॉफ्टवेअरच्या मदतीने संगणकावर देवनागरीत लिहिता येणे शक्य झाले आहे. युनिकोडमुळे तर ते आणखीनच सोपे झाले आहे. ‘विकिपिडिया’सारख्या जागतिक ज्ञानकोशात इतर भाषांच्या बरोबरीने मराठीतून ज्ञानसंक्रमण करण्याचे माध्यम खुले झाले आहे. मायक्रोसॉफ्टने संगणकावर मराठीतून सर्व प्रकारचा पत्रव्यवहार, माहितीची साठवणूक, हिशेब ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मराठी-इंग्रजी शब्दकोश, शुद्धलेखनाची आज्ञावली आता संगणकाच्या पडद्यावर, इंटरनेटच्या महाजालावर उपलब्ध आहे. मराठी वर्तमानपत्रे इंटरनेटच्या माध्यमातून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आता वाचता येतात. विशेष म्हणजे गुगलवर आपल्याला हवं ते सर्च केलं तर मिळतंच, पण विशेष विषयांसाठी खास साइट असेल तर अधिक सोपं. मायबोली, मराठी सृष्टी, मराठी साहित्य या वेबसाइट्स अशा प्रकारचे काम करताहेत. यामुळे घरबसल्या जुनं-नवं साहित्य वाचायला मिळतंय. आता तर मराठी विश्वकोशाचे सगळे खंड विश्वकोशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. वेब, ब्लॉग, रेडिओ यांमुळे प्रकाशकाच्या मध्यस्थीशिवाय कुणालाही आपले लेखन, मनोगत आपल्या भाषेत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. या बाबींचा लाभ घेत मराठी समाजाने संगणक-इंटरनेटचा वापर करताना शक्य असेल त्या ठिकाणी मराठीचाच वापर आवर्जून केला पाहिजे.
मराठीभाषक समाजाची प्रवृत्ती आणि इतिहास लक्षात घेता कला, सामाजिक विचार आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये मराठीचे संवर्धन प्रभावीपणे होऊ शकते. जगात आपल्या भाषेचा जर खरोखरच प्रभाव पाडायचा असेल तर आपल्याला तिच्यात अफाट दर्जाचे साहित्य निर्माण करावे लागेल. हे काम होण्यासाठी वाचनाची भरघोस परंपरा जशी हवी, तसेच उत्साहवर्धक वाङ्मयीन वातावरणही हवे. सध्या दिखाऊपणा, कंपूशाही, साहित्यिकांचे क्षुद्र अहंकार आणि तुच्छतावाद यांमुळे मराठीचा शक्तिपात होतो आहे. तो थांबवून मराठी वाङ्मयविश्वाने एकदिलाने आपली सगळी ताकद मराठीच्या उत्कर्षांसाठी लावली पाहिजे. तसेच सामाजिक आणि आध्यात्मिक (धार्मिक नव्हे!) विचार ही मराठीची ताकद आहे. अशा विचारांची मराठीतील परंपरा जुनी तसेच भारतीय भाषांमध्ये अग्रणी स्वरूपाची आहे. या परंपरेची ताकद पुढच्या काळात अधिक वाढवली पाहिजे. मात्र, हा विचार पठडीबाज, झापडबंद न होता निकोप, मोकळा व सुसंवादी झाला तर या विचारांची शक्ती तर वाढेलच; पण त्याचा जनसामान्यांमध्ये प्रसारही होईल.
मराठी भाषा खरोखरच समर्थ व्हायची असेल तर तिच्याविषयीचा मराठीभाषक समाजाचा दृष्टिकोन मुळातून बदलायला हवा. मराठी भाषेवरचे आपले प्रेम प्रतिक्रियात्मक, सापेक्ष आणि नकारात्मक असता कामा नये. मराठीभाषकांची वृत्ती अधिक व्यवहारी आणि आधुनिक व्हायला हवी. ‘मायबोली’ या शब्दाने (खरोखर किंवा नाटकीपणाने) हळवे न होता, तिच्याविषयीच्या अभिमानाचे उमाळे काढत न बसता, निव्वळ गौरवाच्या भूमिकेतून तिच्याकडे न पाहता, भाषिक अस्मितेच्या लबाड राजकारणाला न भुलता, अन्य भाषांसंबंधीचे पूर्वग्रह उराशी न बाळगता मराठी भाषा काल-परवा कशी होती, याची तटस्थपणे जाणीव करून घ्यायला हवी आणि तिच्या सद्य: रंग-रूपातील दोष आणि ढोंग यांचा नायनाट करायला हवा, उद्याच्या जबाबदारीसाठी ती समृद्ध कशी होईल याचा स्वच्छ विचार व्हायला हवा.
मराठी भाषेचे भवितव्य
२७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन! त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या सद्य:स्थितीसंबंधात चर्चा करणे उचित ठरावे. इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. परंतु आज जागतिक संदर्भातही मराठीभाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या ऱ्हासाची ही भीती अनाठायी आहे असेच म्हणावे लागेल.
आणखी वाचा
First published on: 24-02-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Future of marathi language