तेव्हा पुण्याच्या पीएमटी बसमधून प्रवास करताना बसचा कंडक्टर स्टॉप आला की त्याचं नाव पुकारत असे. ती नावं पुण्याच्या ‘भांग्या, पत्र्या, जिलब्या मारुती’ या नावांच्या परंपरेला सुसंगत असत. म्हणजे फुटका बुरूज, फडके हौद, नानावाडा, नरपतगिरी, १५ ऑगस्ट (हे कसब्यातल्या लॉजचं नाव!), गाडीतळ अशी या स्टॉपची नावे. त्यातलाच एक सर्वाना परिचित असलेला बसस्टॉप म्हणजे ससून! ससून हॉस्पिटल परिसरात आमची ७२ ते ९६ अशी ऐन उमेदीची वर्षे गेली, हे मागं येऊन गेलंच आहे. त्या दिवसांचं हे थोडं संशोधन आणि त्यातून उमललेली नाटकं.
नुसतं ‘ससून’ म्हटलं की त्यात कितीतरी गोष्टी गंधित होतात, दिसतात, आठवतात.. आणि ऐकूसुद्धा येतात. ससून म्हणजे १७ व्या शतकातलं बगदादमधलं श्रीमंत इराकी ज्यू घराणं. त्यांचे पूर्वज स्पेनमधून आले असा प्रवाद. पैकी डेव्हिड ससून (१७६२-१८६४) व्यापारउदीमासाठी आधी इराकमधून इराण आणि मग मुंबईत १८३२ दरम्यान डेरेदाखल झाले. मुंबईतले कापड व्यापारी आणि ब्रिटिश यांच्यातील ते महत्त्वाचे मध्यस्थ बनले. १८४२ च्या चीन-ब्रिटिश यांच्यातल्या प्रसिद्ध नानकिंग व्यापारी करारानंतर त्यांनी चीनशी ब्रिटिशांतर्फे अफूचा रीतसर व्यापार सुरू केला. मुंबईत येणारी इंदौरची माळव्यातील अफू आणि कोलकात्यात येणारी बिहारी अफू या दोन्हीच्या निर्यातीत ससून कुटुंबाने उत्तम जम बसवला. मिळालेल्या पैशातून दानधर्म केला. मुंबईत ससून डॉक, ससून लायब्ररी, भायखळ्याचं सिनेगॉग आदींची निर्मिती केली. मग ही मंडळी पुण्यात आली. अखेर १८६४ मध्ये पुण्यात वृद्धापकाळानं डेव्हिडांनी आपला देह ठेवला. तत्पूर्वी त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी पुण्यातलं प्रसिद्ध लाल देऊळ- रेड चर्च बांधलं आणि १८६७ दरम्यान ससून हॉस्पिटलची इमारत ब्रिटिश वास्तुविशारद कर्नल विल्किन्सनी पुरी केली. आजही या वास्तूत ससूनचे काही वार्ड्स आहेत. पैकी एक म्हणजे २६ नंबरचा मनोरुग्ण विभाग. ज्या अमली पदार्थाच्या व्यापारातील पैसा या वास्तूच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरला, त्या व कालौघात उदयास आलेल्या अन्य अमली पदार्थाच्या अतिसेवनाने ग्रस्त झालेले रुग्ण उपचारासाठी त्याच वास्तूत आज येत असतात. असा हा काळाचा महिमा मंडळी! तर चीनमधली जनता १८ व्या शतकात निव्र्यसनी नव्हती म्हणून बरं! नाहीतर कुठून निर्माण झालं असतं ससून डॉक आणि ससून हॉस्पिटल? असते तेव्हा अफूच्या व्यापारावर र्निबध आजच्या डान्सबारसारखे म्हणजे? पण नाही! ते र्निबध आले १९४९ मध्ये- माओने केलेल्या क्रांतीनंतर! तेव्हा कंडक्टरने नुस्तं ‘ससून’ म्हटलं की या बसस्टॉपवर उतरताना एवढं मागे वळून मान दुखवावी लागते.
तेव्हा ‘ससून’ म्हणजे सगळा पुणे रेल्वे स्टेशन परिसर आणि या परिसराची १८५६ पासूनची परंपरा. कारण पुणे जंक्शन सुरू झालं याच सुमारास. त्यामुळे ससून म्हटलं की रुग्णांच्या कण्हण्याबरोबरच आगगाडीचा आवाज हा येतोच. दिवसरात्र गाडय़ांची ये-जा आणि रात्री मालगाडय़ांचं शंटिंग. या शंटिंगसाठी वाफेवरचं कोळशाचं इंजिन बरीच र्वष रेल्वेने सुरू ठेवलं होतं. त्या इंजिनाची झुकझुकच वेगळी. त्यामुळे परिसराला निवांतपणा म्हणून नाही. ससूनमध्ये यथावकाश नर्सिग स्कूल सुरू झालं. दानशूर पारशी बैरामजी जीजीभाय (१८२२-१८९०) यांच्या देणगीतून प्रथम १८७१ पासून बी. जे. मेडिकल स्कूल व १९४६ ला बी. जे. मेडिकल कॉलेज अस्तित्वात आलं. आज दिसत असलेली हॉस्पिटल आणि कॉलेजची भव्य इमारत १९४८-५१ दरम्यान राज्य शासनासाठी पालनजी शापूरजी यांनी बांधली. कॉलेजच्या पहिल्या बॅचचे दोन विद्यार्थी म्हणजे डॉ. श्रीराम लागू- ज्यांनी हे कॉलेज नाटकांसाठीदेखील प्रसिद्ध केलं; आणि दुसरे त्यांचे वर्गमित्र म्हणजे डॉ. एस. व्ही. ऊर्फ छोटू गोखले- ज्यांनी बी. जे. मेडिकल आर्ट सर्कलची धुरा वाहिली. हे दोघे मित्र आज नव्वदीजवळ आहेत. गोखलेसर शास्त्रीय संगीतातील दर्दी. अनेक गायक-वादक कलाकारांशी त्यांची व्यक्तिगत मैत्री. भीमसेनजींशी तर विशेष! पुण्याच्या प्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवाचं संयोजन ते कित्येक वर्षे करीत होते. आमच्या बी. जे. मेडिकल कॉलेजला कलेचं भक्कम कोंदण देणारी ही जोडी. बी. जे.चं आर्ट सर्कल म्हणजे कलाभिरुची घडवणारी अनौपचारिक कार्यशाळाच! प्रामुख्याने कार्यक्रम व्हायचे ते शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचे! वर्षांकाठी ८-१० कार्यक्रम तरी व्हायचे. पण एकेक दिग्गज यायचे. रविशंकर, अल्लारखां, विलायतखां, कुमार गंधर्व, भीमसेन, किशोरी आमोणकर, वसंतरावांपासून ते झाकीर हुसेन, मन्ना डे, सुधीर फडके, हेमंतकुमार व्हाया पु. ल. देशपांडे! हो- चक्क पुलं! ते अन्य कोणाला प्रयोग द्यायला नाखूश असायचे, पण आमच्या आर्ट सर्कलच्या आयोजनावर पुलं आणि विशेषत: सुनीताबाई खूश असायच्या! ‘बटाटय़ाची चाळ’, ‘असा मी असामी’, ‘हसविण्याचा माझा धंदा’ हे प्रयोग मी आर्ट सर्कलमध्येच पाहिले. आर्ट सर्कलचे सदस्य बी. जे.चे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांचा मित्रपरिवार असे. नंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थायिक झालेल्या या धन्वंतरींची अभिरुची या आर्ट सर्कलने घडवली. त्याचा परिणाम म्हणूनच की काय अनेक डॉक्टर्स आपापल्या गावांतून आपापल्या परीने अशा समांतर धारेतल्या अभिरुचीच्या करमणुकीच्या कार्यक्रमांचे आश्रयदाते झालेले दिसतात.
आर्ट सर्कलने अनेक नाटकांचे प्रयोगदेखील आयोजित केले. त्यात ‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘कटय़ार काळजात घुसली’ अशी नाटकं होती. १९७५-७६ दरम्यान कॉलेजच्या गच्च भरलेल्या म. गांधी सभागृहात मी लिहून बसवलेल्या आमच्या थिएटर अकॅडेमीच्या ‘महानिर्वाण’ या नाटकाचा प्रयोगदेखील तुफान रंगला होता. हे नाटक १९७४ च्या राज्य नाटय़स्पर्धेपासून २०१०-११ पर्यंत म्हणजे सुमारे ३६ वर्षे संस्थेनं चालवलं. त्याचे आम्ही ‘घाशीराम’बरोबरच ४०० च्या वर महाराष्ट्रात सर्वत्र तसेच देशांत अनेक ठिकाणी प्रयोग केले. हिंदी, गुजराती, राजस्थानी, बंगाली, तमिळ, काश्मिरी, पंजाबी अशा अनेक भाषांमधून ‘महानिर्वाण’ मंचित झाले. आनंद मोडकने संगीत दिलेलं हे त्याचं पहिलंवहिलं नाटक. ‘भाऊराव’ ही या नाटकातली नारदीय कीर्तन शैलीतली चंद्रकांत काळेंनी गाजवलेली मध्यवर्ती भूमिका अजून अनेकांच्या लक्षात आहे. ‘नाना’ ही भाऊरावांच्या मुलाची भूमिका सुरुवातीला मी केली. नंतर काही प्रयोग रवींद्र मंकणीने केले. पुढे कित्येक र्वष ही भूमिका प्रसाद पुरंदरे करीत असे. तर नानाची आई ‘रमा’च्या भूमिकेत प्रारंभी डॉ. माधुरी भावे (गोरे), मग मंजिरी परांजपे, हेमा लेले, सुजल वाटवे, कल्पना देवळणकर या होत्या. नंतर कित्येक र्वष गौरी लागू.. अशा नाटकातील आया बदलत गेल्या. नाटकातले इरसाल चाळकरी रंगवले होते ‘घाशीराम’मधल्याच बामणहरींनी! तर या नाटकाच्या विषयी थोडे ‘संशोधन’! कारण मुळात बी. जे.मधली माझी नोकरी जी होती ती आरोग्यविषयक संशोधन करण्यासाठी. पण म्हटलं तर दैवदुर्विलास, म्हटलं तर सुदैव असं की, या संशोधनामधून नाटकंच ‘ऑन डय़ुटी’ मला सापडत गेली. आता यानं आरोग्याचं नेमकं काय भलं झालं, हा पुन्हा संशोधनासाठी स्वतंत्र विषय.. ‘हेल्थ अ‍ॅण्ड थिएटर’!
ज्या विभागात मी काम करत होतो तो म्हणजे ‘रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध विभाग’ (पीएसएम). या विभागाकडे सार्वजनिक आरोग्य, माता-बालसंगोपन व आहार याच्याशी संबंधित संशोधनाचं काम असे. एमबीबीएसचा साडेचार वर्षांचा कोर्स पुरा झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा महिने शिरूर, ओतूर, नारायणगांव, दौंड, निमगाव-केतकी अशा गावांतल्या ग्रामीण आरोग्य केंद्रात आणि सहा महिने शहरातील सुसज्ज हॉस्पिटलात- पैकी तीन महिने महापालिकेच्या अखत्यारीतील दवाखान्यात इंटर्नशिप म्हणजे उमेदवारी करणे अनिवार्य असे. त्याशिवाय त्यांना पदवी मिळत नसे. हा इंटर्नशिपचा कार्यक्रम आमच्या पीएसएम विभागाच्या अखत्यारीत होता. आमच्या विभागातर्फे ससूनजवळ मंगळवार पेठेत कडबाकुट्टी गाडीतळ झोपडपट्टीदरम्यान असणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यात ‘नागरी आरोग्य केंद्र’ चालवले जायचे. एमबीबीएस पदवी पूर्ण केल्यावर ज्यांना सार्वजनिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल ते विद्यार्थी आमच्या विभागात आधी तात्पुरते लेक्चरर म्हणून येत आणि मग ‘पीएसएम’ विषयात एम. डी. किंवा डीपीएम करण्यासाठी येत. पुढे ते मेडिकल कॉलेजमध्ये संशोधक-शिक्षक तरी होत, नाहीतर राज्यात, देशात, परदेशात सार्वजनिक आरोग्य, संसर्गजन्य रोगविषयक तज्ज्ञ अधिकारी म्हणून काम करीत. काही ध्येयवादी विद्यार्थी डॉ. श्याम अष्टेकर (भारत वैद्यक, नासिक) किंवा डॉ. शशिकांत अहंकारी (हॅलो फौंडेशन, अणदूर, उस्मानाबाद) यांच्याप्रमाणे ग्रामीण आरोग्य कार्यकर्ते होऊन आपल्या सेवाभावी संस्थेला पूर्णपणे सहकुटुंब वाहून घेत.
मला नोकरीत लॅबमध्ये पहिली जबाबदारी दिली गेली ती नवजात शिशू-माता आहारासंदर्भातील संशोधनाची. गाडीतळ झोपडपट्टी परिसरातल्या आर्थिक दुर्बल गटातील नवजात शिशू व नवमाता यांची पाहणी करून, त्यांच्या अंगावरच्या दुधातल्या प्रथिनांचे प्रमाण आणि नवमातांच्या आहाराचा अभ्यास करणे. हा विषय त्यावेळी लेक्चरर असणाऱ्या डॉ. आशा प्रतिनिधी यांनी त्यांच्या एम. डी. (पीएसएम)च्या थिसिससाठी घेतला होता. आर्थिक दुर्बल गटातील नवमातांच्या दुधांच्या सॅम्पल्सचे पेनिसिलीन बल्ब्ज थरमॉसमधून लॅबमध्ये यायचे. या अंगावरच्या दुधातील प्रथिनांचे इलेक्ट्रोफोरेसीस पद्धतीने पृथक्करण करण्याचे काम माझे होते. त्यांची तुलना संतुलित आहार असलेल्या नवमातांच्या दुधातील प्रथिनांशी करायची आणि त्यांना पूरक आहार दिल्यावर या प्रथिनांत काय फरक पडतो किंवा कसे, याचे तपशील नोंदवून ठेवायचे, त्यांच्या बाळांच्या वजनांची नोंद ठेवायची, वगैरे. माझी नोकरी नवीन. तरुण वयातला हा पहिलाच संशोधन प्रकल्प. आणि लॅबमध्ये कशावर काम करायचं, तर अंगावरच्या दुधावर! पीएसएम विभागातले सगळे तरुण सहकारी यावरून माझी यथेच्छ चेष्टा करीत. आर्थिक दुर्बल गटातील नवमातांच्या दुधांची सॅम्पल्स गाडीतळ नागरी आरोग्य केंद्रातून यायची. पण तुलनेसाठी संतुलित आहार असलेल्या आर्थिक सुस्थितीतल्या नवमातांची सॅम्पल्स कशी मिळणार? यावर उपाय म्हणून मी सुचवलं की, ससूनमधल्या ज्या महिला कर्मचारी बाळंतपणाच्या रजेवरून परत आल्या असतील त्यांना विनंती करून बघूया. अशा नवमाता महिला कर्मचाऱ्यांची यादी आणून डॉ. प्रतिनिधी या त्यांना प्रकल्पासाठी ‘सॅम्पल’ देण्यास राजी करायच्या. त्या महिला लॅबमध्ये आल्या की प्रत्येक वेळी डॉ. प्रतिनिधी लॅबमध्ये हजर असतील असं नसे. बऱ्याच वेळा मी एकटाच असे. त्यामुळे सीन एकदम संयत, वास्तव, पण ड्रॅमॅटिक घडत असे. म्हणजे बघा की, आमच्या लॅबमध्ये मी एकटा. कोण आलं म्हणून बघावं, तर आर्थिक सुस्थितीतल्या गटामधली एखादी नवमाता आलेली. कशाकरिता, तर सॅम्पल द्यायला. कशाचं सॅम्पल, तर अंगावरच्या दुधाचं! एक विलक्षण संकोचाचं नि:शब्द वातावरण लॅबमध्ये साकळून येत असे. नवमातेचा न बोलता दबकत लॅबमध्ये प्रवेश. तिच्या केवळ एका दृष्टिक्षेपात ती येण्याचा उद्देश स्पष्ट. ती नवमाता सॅम्पलसाठी पेनिसिलीन बल्ब घेते आणि आत जाऊन दार बंद करते. मी संकोचून बाहेर व्हरांडय़ात.. ससून आणि कॉलेज या समोरासमोर असणाऱ्या, एका बाजूने जोडलेल्या इमारतींच्या समोरासमोर असणाऱ्या दोन्ही पोर्चवर तिसऱ्या मजल्यावरच्या कॅनोपीवर कोरलेल्या हत्तींच्या तोंडाकडे पाहत उभा! पहिल्या मजल्यावरच्या आमच्या लॅबमध्ये नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठीच्या अंगावरच्या दुधातल्या प्रथिनांसंदर्भात संशोधन, आणि वर हत्तींच्या तोंडाजवळ असलेल्या अ‍ॅनॅटॉमी लॅबमध्ये विद्यार्थ्यांचे फॉरमॅलिनच्या गंधात बेवारशी प्रेतांचे डिसेक्शन चालू. पलीकडेच असणाऱ्या अ‍ॅनॅटॉमीच्या म्युझियममध्ये न जन्मलेली बाळे फॉरमॅलिनने भरलेल्या काचेच्या जारांत अभ्यासासाठी डुंबत ठेवलेली. तर त्याच मजल्यावरच्या ससूनला जोडणाऱ्या व्हरांडय़ाच्या बाजूला असलेल्या गायनॅक विभागाची एका वेळी १०-१५ जणी बाळंत होतील अशी प्रशस्त लेबर रूम. तेव्हा ससूनमध्ये रोज अंदाजे १०-१५ बाळं जन्माला येत. सर्व आया आर्थिक दुर्बल वा दारिद्रय़रेषेखालील गटातल्या. कुठून कुठून लांबून प्रवास करीत ससून हॉस्पिटलच्या सरकारी आधाराला आलेल्या. अशा रीतीने आमच्या ससूनमध्ये ‘जन्म आणि मृत्यू’ यामध्ये फक्त एका व्हरांडय़ाचं अंतर!
बी. जे. मेडिकलचं व्हरांडा हे प्रकरण एकदम खास आहे. ज्यांनी ते बघितले आहे त्यांना नेमकी कल्पना येईल. कॉलेज आणि हॉस्पिटलला जोडणारे हे लांबसडक आणि स्वच्छ व्हरांडे! दिवसा विद्यार्थी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक, प्राध्यापक, परिचारिका यांनी गजबजलेले; तर रात्री एकदम इतके निर्मनुष्य, की १९८० मध्ये गाजलेल्या स्टॅनले क्युब्रिक याच्या ‘द शायनिंग’ या जॅक निकोल्सनने काम केलेल्या भयपटाची आठवण यावी. त्यात एका निर्जन प्रदेशातील रिकाम्या हॉटेलातले असेच लांबलचक निर्मनुष्य व्हरांडे दाखवले होते. का ते नीट आठवत नाही, पण एकदा खूप रात्री ससूनच्या वरच्या मजल्यावरच्या या निर्मनुष्य व्हरांडय़ातून कॉलेजकडून हॉस्पिटलच्या बाजूला जाण्याचा प्रसंग आला. जसा व्हरांडय़ातून जायला लागलो तसं अस्फूट रडणं, ओरडणं ऐकू येऊ लागलं. नीट ऐकल्यावर लक्षात आलं की गायनॅक विभागात असलेल्या लेबर रूममधून हे आवाज येतायत. जे आवाज स्पष्ट ऐकू यायला लागले ते म्हणजे- बाळाला जन्म देत असलेल्या, नवमाता होणाऱ्या या स्त्रिया होणाऱ्या बाळंतवेणांनी व्याकूळ होत आपापल्या नवऱ्याच्या नावाने अत्यंत कल्पनारम्य लिंगवाचक शिव्या घालत होत्या. कदाचित नको असताना बाळंतपण लादलं गेलेल्या, अत्यंत गरिबी व हलाखीच्या परिस्थितीत ससूनच्या आश्रयाला आलेल्या या स्त्रिया! ससून हॉस्पिटलच्या २०१३ च्या अधिकृत आकडेवारीनुसार, रोज २०-२२ बाळं इथे जन्माला येतात आणि गरिबीमुळे किंवा मूल नको असल्याने दर महिन्याला एक-दोन नवमाता आपलं बाळ तसंच टाकून पळूनही जात. मग या निराधार झालेल्या बाळांच्या नशिबी ससून परिसरात असणाऱ्या ‘सफोष’ संस्थेच्या श्रीवत्स या वॉर्डमध्ये दाखल होऊन दत्तक पालक येण्याची वाट बघणे, हे जणू पाचवीला पूजलेलं असतं. जन्म देत असताना वेदनांनी मनावरचा विवेक ढळतो म्हणून तोंडी या शिव्या. यातून सावरण्यासाठी आपल्याकडे बाळ जन्मल्यापासून पाच दिवसांचं सोयर असतं.
म्हणजे व्हरांडय़ात उभं राहून हत्तींची तोंडं बघताना हळूहळू संशोधनाचं मटेरियल जमायला लागलं की काय? जन्म, शिव्या, न जन्मलेली बाळं, नवमाता, दुधातली प्रथिने आणि मृत्यू..? तो तर मी लहानपणापासून रोजच बघत आलो. आता यात असंगत काहीही नाही. रोज म्हणजे रोज! कारण आमचं घर शनवारात आणि मुठा नदीकाठचं त्यावेळचं ओंकारेश्वर स्मशान घराजवळ. सकाळी रस्त्याच्या बाजूच्या गॅलरीत उभं राहिलं की एक तरी अंत्ययात्रा रस्त्यावरून जायचीच. सर्वाचे पंचप्राण जरी सारखे असले तरी प्रत्येक अंत्ययात्रेत व मागून विमनस्कपणे चालत जाणाऱ्या आप्तेष्टांच्या आक्रोशात किती वैविध्य! दु:खाच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याकडे तेरा दिवसांचं सूतक आणि जन्मल्यावर पाच दिवसांचं सोयर. या अंत्ययात्रांची गतीही वैविध्यपूर्ण. काही यात्रा संथ, काही अत्यंत जलदगतीनं. काही तोंडाने काही म्हणत, तर काही वाजतगाजत, फुलं आणि सुटे पैसे उधळत. बहुतेकांचे देह खांद्यावरून, तर काही काचेच्या पेटीतून! ससूनच्या व्हरांडय़ातून दिसणारे हत्ती, त्यांच्या बाजूच्या विभागात मृतदेहांचं डिसेक्शन, शेजारच्या म्युझियममध्ये न जन्मलेली बाळं, लेबर रूममधला आक्रोश, लॅबमध्ये अंगावरच्या दुधाची सॅम्पल्स आणि आमच्या घरावरून पुढे शनवार मारुती मंदिरावरून स्मशानाकडे मार्गस्थ होणाऱ्या अंत्ययात्रा. दरवर्षी हनुमान जयंती ते अक्षय्य तृतीयेदरम्यान मंदिर परिसरात कीर्तनं होत असत. अजूनही होतात. आता रात्री कीर्तन चालू असताना एखादी अंत्ययात्रा आली आणि समजा, परलोकवासी झालेली मृत व्यक्ती खांद्यावरून उठत जर आपल्या मरणाचं कीर्तन करू लागली तर जरा भीतीयुक्त गंमत येईल की नाही? प्रत्यक्षात नाही होणार असं. पण नाटकात व्हायला काय हरकत आहे? पण मंडळी अंत्ययात्रा ७२-७३ साली पुढे ओंकारेश्वर स्मशानात जाणार कशी? कारण पेशवे बाळाजी विश्वनाथांचे चिरंजीव- श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे कनिष्ठ बंधू श्रीमंत चिमाजी बल्लाळ भट पेशवा ऊर्फ चिमाजी आप्पा (१७०७-१७४१) यांच्या निधनानंतर सुरू झालेलं (असं ऐकून आहे!) ओंकारेश्वर मंदिराजवळचं स्मशान तर पुणे महापालिकेने ‘वैकुंठ’ इथे नव्या पेठेत ५ एप्रिल १९७१ रोजी नव्यानं बांधलेल्या अद्ययावत वास्तूत स्थलांतरित केलेलं! पण समजा, कीर्तन करणाऱ्या मृत व्यक्तीने हट्टच धरला, की मला माझ्या जुन्या स्मशानातच जाळा.. हीच माझी अखेरची इच्छा आहे; तर मग शोकाकुल आप्तेष्टांनी करायचं काय? त्यांची किती बरं धावपळ उडेल..?
आता हे उघडच आहे, की वरचं सगळं कल्पनारम्य, खोटंच तर आहे. आमच्या नाटकासारखं. तेव्हा शोकाकुल आप्तेष्टांनी काहीही करायचं नाही. त्यांनी फक्त नियमित तालमींना यायचं आणि भाऊरावांनी लावलेल्या ‘महानिर्वाण’ नाटकाच्या आख्यानात सलग दोन अंक काम करायचं. आणि ते जर जमत नसेल तर निदान आमचं नाटक तिकीट काढून जमलं तर बघायला यायचं.
..तर असं ‘संशोधन’ झालं आणि सापडलं ‘महानिर्वाण’ हे नाटक- जे १९७४ पासून पुढे ३६ र्वष चाललं. ल्ल

तळटीप : २२ नोव्हेंबर १४ ला ‘महानिर्वाण’च्या पहिल्या प्रयोगाला ४० र्वष झाली. योगायोगाने त्याच दिवशी वृत्तपत्रात मोठी बातमी होती की, पुणे महानगरपालिका एका सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने वैकुंठ स्मशानभूमीमध्ये CCTV  कॅमेरे बसवणार असून, त्याद्वारे परदेशी असणाऱ्या, वृद्ध असणाऱ्या आप्तेष्टांसाठी अंत्यसंस्कार ऑनलाइन प्रसारित करण्याची सोय अल्प दरांत उपलब्ध करून देणार आहे. यात मात्र असंगत (absurd) काहीही नाही. सगळं वास्तव तर आहे!

Switch Mobility bus
स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Woman suffers heart attack in Amravati Parvatawa bus of State Transport Corporation
अमरावती : धावत्‍या बसमध्‍ये काळाने गाठले! तिकीट काढतानाच महिला…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट

सतीश आळेकर
satish.alekar@gmail.com

 

Story img Loader