आमच्या नाटकवाल्यांचे किस्से म्हणजे बहुतेक वेळा नटाच्या रंगमंच फजितीचे तरी असतात किंवा बिनतयारीने ऐनवेळी, तालीम न करता प्रयोग कसा मारून नेला तरी तो रंगला कसा आणि प्रेक्षकांच्या ते लक्षातही आलं नाही, किंवा कलाकारांची गाडी उशिरा पोहोचली तरी प्रेक्षक कसे थांबून होते, अशा प्रकारचे असतात. त्याला काही अपवाद आहेत. पैकी एक परंपरागत चालत आलेला किस्सा म्हणजे नाटकाच्या एकाच रंगलेल्या प्रयोगाबद्दल प्रेक्षकांची मते किती परस्परविरुद्ध असू शकतात याचे उदाहरण आहे. हा किस्सा आमच्यापर्यंत आला तो भालबा केळकरांमार्फत. १८८१ मध्ये फक्त गद्य नाटकांसाठी शाहूनगरवासी नाटक मंडळी स्थापन करणारे गणपतराव जोशी (१८६७-१९२२) यांच्या अभिनयाचे मर्म अनेक जाणकार समीक्षकांनी उलगडून दाखवले आहे. त्यांनी शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकांतून मुख्य भूमिका केल्या. त्यांची विशेष गाजलेली भूमिका म्हणजे ‘हॅम्लेट’ (चंद्रसेन). पण त्यावेळच्या संगीत नाटकांच्या लाटेत बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या गायनाच्या प्रभावापुढे या आद्य गद्य-नटाकडे जेवढे लक्ष जायला हवे होते तेव्हढे गेले असे दिसत नाही. अनेकांनी अशा गद्य-नटांची संभावना ‘राणा भीमदेव थाटाचा अभिनय’ अशी केलेली दिसून येते. मात्र, याला चिंतामणराव कोल्हटकर, विश्राम बेडेकर, श्री. म. माटे असे काही अपवाद. पैकी श्री. म. माटे (१८८६-१९५७) यांनी ‘चित्रपट : मी व मला दिसलेले जग’ या त्यांच्या पुस्तकात गणपतराव जोश्यांच्या अभिनयाचे यथार्थ विश्लेषण केले आहे. ते लिहितात-
‘‘एकदा कऱ्हाडला गेलो असताना तेथे गणपतराव जोशी यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकाच्या जाहिराती लागलेल्या पाहिल्या; आणि या नामांकित नटाचा तो प्रयोग मी तेथे पाहिला.. हॅम्लेट नाटकातील विचारांची तात्त्विक बैठक थोडी सूक्ष्मच आहे. परंतु मानवी प्रकृतीशीं सर्वथा एकजीव होणाऱ्या या महानुभाव नटाने हें नाटक इतके सुंदर वठविलें, कीं तेथें ते लागतांच मागासलेले श्रोतेही केवळ हर्षभरित होऊन गेले. मानव्याचें गूढस्थ आवाहन कोणालाही पोंचतें, फक्त पोंचविणारा असला पाहिजे असें त्यावेळी दिसून आलें. गणपतरावांसारखा नट पाहावयास मिळाला हेंहि मी माझे भाग्य समजतों. आधुनिक महाराष्ट्रांत आजवर जी अव्वल दर्जाची माणसें होऊन गेली आहेत, त्यांतच या थोर नटाची गणना केली पाहिजे.. गणपतराव जोशी यांची मूर्ती साधारणपणें ठेंगणी, पण मोठी सुबक होती. थोडासा ऐटबाज वेश केला, कीं हें पात्र प्रत्यक्ष राजालासुद्धां हेवा वाटावा असें झोंकदार दिसे.. गणपतराव पायानें किंचित अधू आहेत, असें माझ्या एका जुन्या मित्रानें मला सांगितलें होतें.. पण हें असलें वैगुण्य ते इतक्या सफाईनें झाकून टाकीत, कीं माहीत असल्याशिवाय तें कोणालाही कळू नये. नटश्रेष्ठ असें नांव आपण अनेकांना देतों. पण महाराष्ट्रातला खरा श्रेष्ठ नट म्हणजे गणपतराव जोशी होते. नाटक पहात असतानां असें कित्येकदां वाटे कीं स्टेजवर दिसत असलेल्या विचारांच्या बारीक बारीक छटा खुद्द नाटककाराच्या मनांत तरी होत्या ना? गणपतरावांचा आवाज उंच, खडा, पल्लेदार, पण अत्यंत मधुर असे. त्याला कधी खर आली नाही कीं त्याच्या चिरफाळ्या झाल्या नाहींत.. मनाचा खरा मोठेपणा असल्याशिवाय अभिनयसुद्धां चांगला करतां येणार नाहीं. थिल्लरपणा, माकडचेष्टा, हातवाऱ्यांचे फेरे, कानठळ्या बसविणारे आवाज, खेंच-खेचून घेतलेल्या आवाजाची मोडणी.. या सर्वाची पुष्कळदां अभिनयांत गणना होते. पण गणपतराव असल्या उपाधींपासून सर्वथा अलिप्त होते.’’
(हे वर्णन श्री. म. माटे यांनी १९०८ मध्ये पाहिलेल्या प्रयोगाचे आहे.)
असें हे गणपतराव जोशी एक दिवस ‘हॅम्लेट’चा प्रयोग संपल्यावर मेकअप् काढत होते. नेहमीप्रमाणे नाटकाचा खेळ संपल्यावर काही भारावलेले रसिक प्रेक्षक गणपतरावांच्या भेटीसाठी ताटकळत होते. त्यांच्याशी त्यांचा झालेला संवाद असा :
एक प्रेक्षक (भारावलेला) : वा! ‘हॅम्लेट’चे अनेक प्रयोग बघितले. पण गणपतराव, आजचा अप्रतिम. आजच्याइतका प्रयोग पूर्वी कधीही रंगलेला नव्हता!
गणपतराव (मेकअप काढता काढता) : असं! काय आहे, की कधी कधी प्रयोगाची भट्टी जमते!
दुसरा प्रेक्षक (गंभीर, मान खाली घालून उभा) : गणपतराव, आजवर अनेक तुमचे ‘हॅम्लेट’चे प्रयोग पाहिले. पण आज काही जमलं असं नाही वाटलं. नेहमीसारखा तुमचा हॅम्लेट आज काही रंगला नाही!
गणपतराव (शांतपणे) : असं? काय आहे, की कधी कधी प्रयोगाची भट्टी नाही जमत!
तेव्हा नाटकाचा प्रयोग रंगतो म्हणजे नक्की काय होतं? ‘नाटय़ भिन्नरुचेरजनस्य बहुविधाप्येकं समाराधनम्’ असे म्हटलेले आहे ते किती अचूक आहे. रंगमंचावरचा प्रयोग आणि प्रेक्षक यांचं गूळपीठ नेमकं जमलं की ते उभयपक्षी भावतं. पण हे नेमकं शब्दांत पकडताना दमछाक होते. अशाच ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाबद्दल दोन देशांतील दोन अत्यंत भिन्न प्रतिक्रिया आम्हाला अनुभवायला मिळाल्या. एक ८० मध्ये लंडनला आणि दुसरी ८६ मध्ये अमेरिकेत- बाल्टिमोरला. ऑक्टोबर ८० मध्ये ‘घाशीराम’चे प्रयोग लंडनला हॅमरस्मिथमध्ये रिव्हरसाइड स्टुडिओ या नाटय़गृहात सलग आठ दिवस झाले. पहिल्या प्रयोगाला लंडनच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे नाटय़- समीक्षक आले होते. त्यांची पद्धत म्हणजे प्रयोग झाला की परीक्षण लगेच दुसऱ्या दिवशी छापून येते. पैकी ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने सविस्तर परीक्षण तर दिलेच, पण सोबत ‘घाशीराम’ नाटकाच्या शेवटी जे दृश्य दिसते, ते म्हणजे पुढे घाशीराम मरून पडलेला आहे, मागे बामणहरींची रांग उभी आहे, त्या रांगेत नाना फडणवीस समाविष्ट होतात. हे मागे चौथऱ्यावर उभा राहून एक इंग्रज अधिकारी पाहत असतानाच भैरवीच्या सुरावटीत ‘श्रीगणराय नर्तन करी..’ या नमनाच्या ओळी म्हटल्या जातात. आणि ठेका सुरू होताच पडदा पडतो. ‘गार्डियन’ने नेमक्या या शेवटच्या दृश्याचा फोटो छापला; ज्यात इंग्रज अधिकारी मागे उठून दिसतो आणि वर हेडलाइन दिली- ‘नो पन् इंटेन्डेड’ (म्हणजे ‘टीकेविना’ याअर्थी)! कारण १८१८ मध्ये पेशवाई गेली आणि इंग्रज आले, हा इतिहास सर्वश्रुत आहे. हे इतिहासाचं भान त्या समीक्षकाला होतं. याउलट, ८६ मध्ये आम्ही हेच नाटक घेऊन ‘थिएटर ऑफ नेशन्स’ या युनेस्कोप्रणीत आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवात प्रयोग केले. हे प्रयोग अमेरिकेत बाल्टिमोर इथे होते. नाटय़गृह १८४७ मध्ये स्थापन झालेल्या जगप्रसिद्ध जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संगीत विभागात- म्हणजे १८५७ पासून ख्यातकीर्त असलेल्या ‘पीबडी म्युझिक कॉन्झव्‍‌र्हेटरी’मध्ये होते. प्रयोगाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकसमूह होता. नाटकाचा प्रयोग संपला. काही प्रेक्षक आत येऊन भेटत होते. त्यात न्यूयॉर्कच्या चौथ्या रस्त्यावरच्या ‘ल् ममा’ या १९६१ पासून चालू असलेल्या जगप्रसिद्ध प्रायोगिक नाटय़संस्थेच्या संस्थापक एलन स्टीवर्ट (१९१९-२०११) या होत्या. अत्यंत सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या या आफ्रिकन-अमेरिकन विदुषीने अनेक रंगकर्मीना पुढे आणले. पैकी नाटककार सॅम शेपर्ड, संगीतकार फिलीप ग्लास हे प्रमुख. आफ्रिकेतील अनेक छोटय़ा देशांतील रंगकर्मी, संगीतकार, गायक यांना त्यांनी न्यूयॉर्कमध्ये हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, अशी त्यांची ख्याती. पण ‘घाशीराम’ बघून त्यांचा पहिला प्रश्न होता की, ‘दौरा संपल्यावर तुम्हाला नाटकाच्या साथीची वाद्ये विकायची आहेत किंवा कसे?’ आम्ही चकित झालो. आम्हाला वाटलं होतं की, त्या नाटकाच्या आशय-विषयाबद्दल प्रथम बोलतील. लंडनच्या ‘गार्डियन’ने तो फोटो छापला; पण अ‍ॅटलांटिक ओलांडल्यावर इतिहासाचं भान असं कमी होतं जाणं हे अपवादात्मक म्हणायचं की प्रातिनिधिक? नाटक एकच; पण दोन देशांतील या अशा दोन भिन्न प्रतिक्रिया.
गेल्या वर्षी मार्चमध्ये आम्ही पुण्याच्या भरत नाटय़मंदिरात येणाऱ्या नटसंचाची वाट पाहत होतो. कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होता. साडेतीन वाजून गेले तरी संचाचा पत्ता नव्हता. त्यामुळे जरा काळजीच होती. आता हा संच येणार कधी? सामान लागणार केव्हा? मेकअप कधी होणार? पुन्हा रात्री ९.३० ला दुसरं नाटक.. म्हणजे स्टेज रात्री ८ च्या आत मोकळं करावं लागणार. अशा चिंतेत असतानाच चार वाजता सामानाचा ट्रक एकदाचा आला. त्यातून साऊंड सिस्टीम, कपडेपटाच्या ट्रंका आणि अन्य सामान आलं. पाठोपाठ कलाकारांची बस आली. अंदाजे ४०-४५ कलाकार असतील. १७-१८ स्त्री- कलाकार, त्यांची काही लहान मुले. त्यांत दोन-तीन स्त्रिया लेकुरवाळ्या. बरोबर मुलांसाठी दुधाच्या बाटल्या. बऱ्याच स्त्री-कलाकारांचे पोशाख अस्सल शहरी. तर पुरुष कलाकारांचे पोशाख मात्र अस्सल ग्रामीण. आता या सगळ्या बायका तयार कधी होणार? प्रयोग तर ५.३० वाजता सुरू व्हायला पाहिजे. दरम्यान, संचाच्या प्रमुखाचा फोन आला की, ‘काळजी करू नका. बाकीची मंडळी पोचली आहेत. खेळ वेळेतच सुरू होईल.’ हा संच होता ‘रघुवीर खेडकर आणि पार्टी’ या प्रसिद्ध तमाशाचा. दिल्लीचे राष्ट्रीय नाटय़विद्यालय आणि ललित कला केंद्र यांनी आयोजित केलेला हा खेळ होता. त्यात आधी परंपरागत तमाशाचा खेळ आणि नंतर रघुवीर आणि त्याच्या संचाबरोबर गप्पा असा कार्यक्रम. प्रेक्षकांत पुण्यातले सगळे तरुण रंगकर्मी आणि अन्य जाणकार असणार होते. बरोब्बर ५.३० वाजता स्टेजवरून निरोप आला, की खेळ सुरू करायचा का? आम्ही चकित! ही मंडळी जवळपास ४.३० ला आलेली नि इतक्यात कसे सगळे तयार होतील? १७-१८ स्त्री- कलाकार नऊवारी नेसून, पायात घुंगरू बांधून, मेकअप करून इतक्या लवकर तयार? आत जाऊन खात्री केली की मंडळी खरंच तयार आहेत किंवा कसे, तर सगळं रेडी होतं. पण रघुवीर कुठाय? तर उत्तर आलं की, ‘आपण खेळ सुरू करू. रघुभाऊ त्यांच्या एन्ट्रीला येतील.’
‘नक्की? ट्रॅफिकमध्ये अडकले तर..?’ म्हणेपर्यंत तिसरी घंटा झाली नि खेळ सुरू झाला.
त्या दिवशी त्यांचा खेळ म्हणजे शहरी रंगकर्मीकरता तमाशाचा शैक्षणिक वर्गच भरत नाटय़मंदिरात भरलेला होता. गण रंगात आला. कृष्ण, पेंद्या आणि चक्क मिशी असलेला तरुण मावशीच्या भूमिकेत होता. सोबत १०-१२ गवळणी. ‘मावशे, तुला मिशा कश्या?’ असं विचारल्यावर मावशी म्हणते, ‘मला मिशा कश्या म्हंजी? मी माझ्या बापावर गेलीय.’ अशा संवादांची फोडणी उडायला लागली. त्यात त्यांनी गंमत केली होती ती म्हणजे- मावशी आणि गवळणी कृष्णाला ओळखतच नाहीत. कृष्ण परोपरीने विनवतोय की, ‘मी साधासुधा नसून श्रीकृष्ण आहे.’ गवळणी विचारायच्या- ‘कशावरून?’
संवाद साधारणपणे असा-
गवळण : ए बाबा, आरं तू हैस तरी कोण?
कृष्ण : मी कोण? आगं, मी साक्षात् श्रीकृष्ण!
मावशी : आगं, हाच तो श्रीकृष्ण आयोगाचा कृष्ण. याला दडवून ठेवलाय!
कृष्ण : तो नाही, तो नाही! अगं, मी म्हणजे (तो हाताचा पंजा वर करून देवासारखा उभा राहतो.)
मावशी : चला गं पोरींनो, पळा. ह्य़ानं पंजा वर केलाय. हा आय-काँग्रेसचा मानुस आहे. ह्य़ानं धरलं तर साठ र्वष सोडायचा न्हाय!
कृष्ण : अगं, नाही नाही पोरींनो, माझ्या डोळ्यांत बघा! काय दिसतंय तुम्हाला या दोन कमळांत?
मावशी : पोरींनो, मागं फिरा! हा कमळाचा.. म्हंजी भाजपाचा माणूस आहे. ह्य़ानं धरलं तर युती टिकत नाही..
असा हा संवाद सर्व राजकीय पक्षांचा उद्धार होत झाला. कृष्ण विनवतोय, की मी साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहे; पण एकही गवळण त्यावर विश्वास ठेवत नाही. सर्व राजकारण्यांची कृष्णाला समोर ठेवून यथेच्छ टवाळी, निंदा हळूहळू टिपेला जाते. प्रेक्षक हसून हसून बेजार. सगळं प्रेक्षागृह जणू श्रीकृष्णाच्या टिंगलीमध्ये सामील झालंय- असं सध्याच्या भाषेत म्हणजे ‘श्रद्धा विरुद्ध असहिष्णु’ वातावरण तयार झालेलं असताना कृष्णाचं काम करणारा नट एकदम पुढे होत जरबेनं म्हणतो की, ‘बायांनो, झाली तेवढी थट्टा पुरे झाली. आता माझी खरी ओळख सांगून देवपण सिद्ध करतो..’ असं म्हणून टिपेचा सूर लावतो आणि गातो-
‘मीच कृष्ण मुरारी,
जन्मलो वासुदेव-देवकीच्या उदरी
पांडवांना साहाय्य करी,
सारथी अर्जुन तशा या गवळणी,
देवकीचा पुत्र मी नंदा घरी,
अगं राधे तुला सांगतो मी ओळख खरी’
आपल्याला दिसतं की इतका वेळ श्रीकृष्णाची टिंगल करणारी मावशी आणि गवळणी साळसूदपणे नतमस्तक झालेल्या आहेत आणि प्रेक्षागृहात पुन्हा सहिष्णु वातावरण तयार झालं आहे- की जणू मागची टिंगल ही आम्ही केलीच नव्हती. नाटकाचं असं असतं. आधी देवाला खेळायला आणायचं. त्याला ‘तू देव नाहीच’ असं म्हणत चेष्टा करायची. आपला व्यवस्थेवरचा राग बाहेर काढायचा. आणि हे अती होत असतानाच त्याचं देवपण मान्य करायचं. या खेळात मायबाप प्रेक्षकांना सामील करून घ्यायचं. सहिष्णुता आणि असहिष्णुता यांचं भान या आपल्या तमाशातील मंडळींकडून समजावून घेतलं पाहिजे. पुढे गण संपला आणि रघुवीर त्याच्या एन्ट्रीला चोख वेळेवर आला.
तर मंडळी, रघुवीरची एन्ट्री जशी वेळेवर झाली तशी आता आमच्या ‘गगनिके’च्या एक्झिटची वेळ आलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी. दोन घटना वाटेत आल्या- २५ जून ७५ या दिवशी आणीबाणी घोषित झाली आणि ६ डिसेंबर ९२ ला बाबरी मशीद पाडली गेली. सध्याच्या सर्व स्तरांतल्या हिंसक वळणाच्या सहिष्णु-असहिष्णु वादाचं मूळदेखील या दोन घटनांमध्येच दडलेलं असावं. या घटना जर टाळता आल्या असत्या तर? गंमत म्हणजे आम्हाला उंडारायला मिळालेला काळही नेमका याच दोन घटनांमधला. गगनिकेच्या निमित्ताने या काळाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पाश्र्वभूमीवर घडलेल्या काही कलासृजनाच्या गंभीर- गंमत कळा आपल्यासमोर मांडता आल्या. वर्षभर खेळाला मजा आली. काही वेळा भट्टी जमली. काही वेळा नसेल जमली. पण प्रतिसाद उत्तम मिळाला. वेळही बरा गेला. आणि दुसरं म्हणजे कॉम्प्युटरवर युनिकोडमध्ये दोन बोटांनी लिहिण्याची सवय प्रथमच लागली. काय आहे की, नाटकवाला असल्यानं आतापर्यंत प्रेक्षकांच्या प्रतिसादाची थोडीफार सवय होती; पण चेहरा दिसत नसलेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांना सामोरं जाण्याची ही पहिलीच वेळ. या प्रतिक्रियाही निखळ आनंददायी होत्या, हेही नसे थोडकं! अनेकांनी पुस्तक काढण्याची सूचना केली आहे. ती नक्की अमलात आणली जाईल.
तेव्हा मंडळी, आता येतो आम्ही.. रामराम!
satish.alekar@gmail.com
(समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा