दिलीप कुलकर्णी

राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘गांधी उद्यासाठी’ या दिलीप कुलकर्णी संपादित पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संकलित अंश..

जेव्हा ‘विज्ञाना’चा उदय झाला, तेव्हा उपभोगवादी, विस्तारवादी (साम्राज्यवादी) अशा- प्राय: युरोपीय – देशांच्या हाती अधिक प्रगत, प्रभावी अशी साधनं, वाहनं आली. ही दोन प्रकारांची होती. पहिला प्रकार म्हणजे स्वत:च्याच भूमीचं, निसर्गाचं अधिकाधिक शोषण करून उपभोग वाढवायला मदत करणारी. उदाहरणार्थ, झाडं तोडण्याचा, उत्खननाचा, विविध प्रक्रियांचा, वाहतुकीचा.. साऱ्याचा वेग आणि क्षमता वाढवणारी. या साधनांना आपण आज ‘तंत्रज्ञानं’ म्हणतो. ही तंत्रज्ञानं वापरून स्वत:चा ‘विकास’ करून घेताना युरोपीय देशांना ‘resource crunch’ जाणवणं अपरिहार्य होतं. मग त्यांनी ज्यांना ‘शस्त्रं’ म्हणता येईल अशा दुसऱ्या प्रकारच्या साधनांच्या आधारे पृथ्वीवरचे इतर भूभाग ताब्यात घ्यायला, तिथली संसाधनं, ऊर्जा आणि गुलामांच्या रूपातलं मनुष्यबळ यांच्या आधारे स्वत:चा ‘विकास’ पुढे चालू ठेवायला सुरुवात केली. त्यासाठी पुन्हा विज्ञानाचाच उपयोग झाला. दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी नकाशे तयार करणं, नौकानयन, तोफा, बंदुका, रूळगाडय़ा, टपालसेवा, तारायंत्र.. सारी वैज्ञानिक प्रगती ही मूलत: उपभोग वाढते ठेवणं, त्यासाठी उत्पादन वाढतं ठेवणं, त्यासाठी सातत्यानं वाढत्या प्रमाणात संसाधनं आणि ऊर्जेचा पुरवठा होत राहणं, बाजारपेठा विस्तारत राहणं यासाठी होती. या साऱ्याला मिळूनच आज ‘विकास’ म्हटलं जातं. ‘तंत्रं’ आणि ‘शस्त्रं’ यांच्या आधारे याच काळात वसाहतवाद ‘जागतिक’ बनला.

भारताच्या पारतंत्र्याकडे आपण जेव्हा या जागतिक घटनाक्रमाचा भाग म्हणून बघतो तेव्हा पारतंत्र्याच्या कारणांची व्यापकता, वैश्विकता आपल्या लक्षात येते. आशिया, आफ्रिका, द. आणि उ. अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा सर्वच खंडांतल्या तंत्र व शस्त्रदृष्टय़ा मागास राष्ट्रांना युरोपीयांनी टाचांखाली चिरडलं.

या पारतंत्र्यातून, गुलामीतून मुक्त होण्याचे दोन मार्ग या राष्ट्रांपुढे होते. पहिला म्हणजे जेत्यांचंच तंत्रबळ आणि शस्त्रबळ स्वत: प्राप्त करून ‘ठोशास ठोसा’, ‘जशास तसे’ अशाच पद्धतीनं त्यांना उत्तर देणं. हा मार्ग अत्यंत तार्किक, कोणालाही सकृद्दर्शनी पटण्याजोगा नि म्हणून प्रचलित आहे यात शंका नाही. ‘असंच वागायचं असतं’ हे आपण गृहीतच धरून चालतो. पण या मार्गात अनेक अडचणी होत्या. मागास अशा जित देशांकडे ना ती तंत्रं होती, ना ती शस्त्रं, ना ती विकत घेण्यासाठी पैसे. आणि पैसे असले, तरी त्यांना ती विकत मिळणार होती थोडीच! दुसरी अडचण म्हणजे, अशा प्रकारे सशस्त्र प्रतिकार करण्याचं धैर्य फारच थोडय़ा जणांकडे असतं. त्यामुळे या मार्गानं ‘स्वातंत्र्य’ ही एक व्यापक जनचळवळ होऊ शकत नव्हती.

घटकाभर असं धरून चालू की, सशस्त्र क्रांतीच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळालं; तरी ही मूळ समस्या.. माणसाचा उपभोगवाद, त्यासाठीचं अतिरेकी उत्पादन, पृथ्वीचं वाढतं शोषण, प्रदूषण, यांत्रिकीकरण, उद्योगीकरण, त्यासाठीचा वसाहतवाद, हिंसा इत्यादी.. कशा सुटणार? हे जित देश प्राय: तिसऱ्या जगातले होते. त्यांना वसाहतवाद गाजवण्यासाठी ‘चौथं जग’ कुठून मिळणार?

या प्रश्नांचाच तार्किक विस्तार म्हणजे स्वातंत्र्यानंतर हे देश आपला विकास कोणत्या पद्धतीनं करून घेणार? व्यवस्थेचं, रचनेचं स्वरूप कसं राहणार? ती रचना जर पुन्हा जेत्या- युरोपीय – देशांप्रमाणेच अत्याधुनिक, तंत्राधिष्ठित, संसाधन-सघन, ऊर्जा-सघन, रोजगार न वाढवणारी, पर्यावरण-विनाशक, शोषण-विषमता वाढवणारी असणार असेल, तर त्या राष्ट्रांमधल्या बहुसंख्यांसाठी तो अनुभव ‘आगीतून फुफाटय़ात’ असाच असणार. पुन्हा आजच्या परिभाषेत बोलायचं, तर जे विकास प्रतिमान (model) मूलत:च समस्या निर्मायक आहे, जेत्यांनाही ज्यानं समस्याग्रस्त करून सोडलेलं आहे- तेच राबवून जितांपुढच्या समस्या कशा सुटणार? भारत हा अशा जित देशांपैकीच एक होता आणि हे सारं विवेचन, हे प्रश्न भारतालाही लागू होते.

‘गांधी’ हे नाव नेमक्या या ठिकाणी जागतिक रंगमंचावर प्रवेश करतं. ‘वरच्यापैकी पहिल्या मार्गानं जाऊन जरी राजकीय स्वातंत्र्य मिळालं, तरी त्यानं मूळ समस्या सुटणारच नाही’ या मुद्दय़ापासूनच त्यांची मांडणी सुरू होते. त्यांना रस केवळ राजकीय स्वातंत्र्यात नाही, तर मानवाच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यात, ‘स्वराज्या’त आहे. पश्चिमी सभ्यता ही वर उल्लेखिलेल्या सर्व समस्या वाढवते, म्हणून तिलाच त्यांचा ठाम विरोध आहे. ती सभ्यता अनीती दृढ करत असल्यानं तिच्यातल्या सर्व बाबींना तो आहे, सर्वंकष आहे. तो आधुनिक तंत्रज्ञानाला आहे, आधुनिक वैद्यकाला आहे, रेल्वेला आहे. ‘खरी सभ्यता ही नव्हे’ असं ठामपणे म्हणून ते एका वेगळ्याच सभ्यतेची, विकासाच्या एका वेगळ्याच प्रतिमानाची मांडणी करतात. हे प्रतिमान खूप व्यापक आणि सखोल आहे. केवळ भौतिक-आर्थिक वाढीचं नाही, तर मानवाच्या सर्वागीण विकासाचं आहे. भौतिकतेला न नाकारता; पण तिला आवश्यक तेवढंच स्थान/ महत्त्व देऊन, सारा भर माणसाच्या नीतीच्या वाढीवर, ‘आंतरिक विकासा’वर देणारं असं ते आहे. त्यांना हवी आहे मानवाची उपभोगवादापासूनची मुक्ती. साऱ्या दुष्प्रवृत्तींपासूनची मुक्ती. षड्रिपूंपासूनची मुक्ती. ते स्वप्न पाहताहेत ते नीतीनं वागणाऱ्या मानवसमाजाचं.. शासनविहीन समाजाचं!

एक मार्ग राजकीय स्वातंत्र्याचा, तर गांधींच्या मनातला हा दुसरा मार्ग खूपच व्यापक, सार्वकालिक, वैश्विक. तो प्रथम शब्दांकित झाला ‘हिंद-स्वराज्य’मध्ये, नि नंतर त्यांच्या असंख्य लेखांतून. एकदा गांधींची ही व्यापक वैचारिक भूमिका आपल्याला समजली की, मग ‘हिंद-स्वराज्य’ काय, किंवा एकूणच गांधी काय, समजणं सोपं जातं.

गांधीचं ध्येय हे असा मानवसमाज घडवणं हे होतं. ते खूप दूरचं आहे, आज अशक्यप्राय वाटणारं आहे, हे त्यांनाही पुरतेपणी ठाऊक होतं. गांधीचं संपूर्ण जीवनच या विचार-व्यवहार द्वंद्वात अडकलेलं होतं. त्यांचे विचार फारच वरच्या पातळीवरचे होते, नि ते कायमच ‘अव्यवहार्य’ वाटत राहिले. कारण ज्या जनतेसाठी हे विचार होते, तिची वैचारिक पातळी फारच निम्न होती. गांधींनी तिला समजेल, झेपेल असे व्यावहारिक कार्यक्रम दिलेही; पण त्यातून जनतेचा वैचारिक स्तर फारसा उंचावणं शक्य नव्हतं. अहिंसेची, धर्माची ती पातळी गाठणं लोकांच्या आवाक्याबाहेरचं होतं. सर्वच महान व्यक्तींच्या बाबतीत हाच अनुभव येतो. अशा व्यक्ती खूप वरच्या पातळीवरून विचार करतात, मांडतात. समस्त मानवजातीच्या उन्नतीची आंतरिक आस त्यांना असते. पण त्या सामान्य माणसांचं आकलन आणि आचरण हे दोन्हीही खूप तोकडं पडतं. प्रसंगविशेषी अशा महामानवांचे विचार बाजूला ठेवून त्यांच्यातील षड्रिपू उसळी मारून मारून बाहेर पडतात.

पण म्हणून लोकांना हे विचार सांगण्याचं, त्यांना योग्य मार्गाला लावण्याचं, त्या मार्गावरून त्यांना पुढे नेत राहण्याचं काम थांबवूनही चालत नाही. ते नेटानं, फळाची आशा न ठेवता करतच राहावं लागतं. मात्र, हे परिवर्तन एकदम व्यावहारिक स्तरावर होऊ शकणार नाही. आधी ते वैचारिक स्तरावर व्हावं लागेल. आधी तत्त्वज्ञान आणि दृष्टी बदलल्याशिवाय विकासाचं ध्येय बदलणार नाही. विकासनीती बदलण्याची गोष्ट तर त्यानंतरचीच. त्यामुळे आपल्यालाही गांधींप्रमाणेच मानवातल्या असुरी प्रवृत्तीच बदलण्यासाठी काम करावं लागेल. हा साक्षात्कार आपल्याला जेव्हा होईल तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की, याच कारणामुळे गांधी हा माणूस आजही कालोचित (relevant) आहे!

Story img Loader