प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com
‘गांधी’ या नावाचं गारुड साऱ्या जगावर आहे. त्यांची जयंतीची दीडशताब्दी झाली तरी त्यांच्या नावाची जादू ही काही उतरायला तयार नाही. त्यांचे आत्मचरित्र, त्यांचे लेख, त्यांची आंदोलनं, चळवळी, सत्य, अहिंसा, सत्याग्रह, आत्मक्लेश, मौन, तीन माकडे, भारत छोडो, प्रांजळपणा, अती साधेपणा या साऱ्याचे गारुड जगभरातल्या सामान्यांवर आणि असामान्यांवर आजही आहेच आहे.
गांधीजींवर कितीतरी नाटकं आणि चित्रपट आले. डॉक्युमेंटरीज् झाल्या. शेकडो पुस्तकं निघाली आणि तीही शेकडो भाषांतून निघाली. त्यांची अति स्तुती करणारे आणि त्यांच्यावर भयानक टीका करणारे असे हजारो लेख छापले गेले. निव्वळ त्यांच्या फोटोंचीही पुस्तकं निघाली. आणि व्यंगचित्रं?
गांधीजी हे गेल्या शतकातील एक असं व्यक्तिमत्त्व होतं, की जगातल्या बहुतेक सगळ्या वृत्तपत्रांतून त्यांच्यावर कधी ना कधी व्यंगचित्र आलेलं असेल! हा क्वचितच मिळणारा सन्मान आहे.
अहमदाबादच्या नवजीवन ट्रस्टने एक विलक्षण पुस्तक जवळपास साठ वर्षांपूर्वी- म्हणजे १९७० साली प्रकाशित केलं. ‘गांधी इन कार्टून्स’ या नावाचं. त्यात गांधीजींवर प्रकाशित झालेली ११२ व्यंगचित्रं आहेत. जगभरातल्या व्यंगचित्रकारांनी वेळोवेळी काढलेली. अर्थात गांधीजी जिवंत असतानाची अगदी दुर्मीळ म्हणावीत अशी व्यंगचित्रं त्यात आहेत. म्हणजे ‘मिस्टर एम. के. गांधी’ हे गांधीजी किंवा बापूजी किंवा महात्मा होण्याआधी कितीतरी वर्षांपूर्वी ही त्यांच्यावर काढलेली व्यंगचित्रं आहेत.
याची सुरुवातच मुळी दक्षिण आफ्रिकेतील घटनांपासून होते. दक्षिण आफ्रिकेतील वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेली ही व्यंगचित्रं तिथे घडणारी आंदोलनं, सत्याग्रह, संघर्ष यांवर आधारित आहेत. अर्थात १९०७-८ सालातील. या पुस्तकातील काही व्यंगचित्रं अतिशय मार्मिक असून त्यापैकी काहींचा उल्लेख करणं आवश्यक आहे.
गांधीजी हे शांततामय मार्गाने चरखा फिरवत आहेत आणि त्यांना भुकेलेल्या सिंहांनी (ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक) घेरलेलं आहे असं एक चित्र जर्मनीतील त्या काळात गाजलेल्या एका साप्ताहिकात आलं आहे.
एका अमेरिकन व्यंगचित्रात स्वदेशीच्या वापरामुळे गांधीजींना आर्थिक बळ मिळाले असून ब्रिटिश अगदी हवालदिल झाले आहेत असं दाखवलं आहे. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहावरून अनेक परदेशी व्यंगचित्रकारांनी चित्रं काढली आहेत. त्यात एका चित्रात ब्रिटिश साम्राज्याच्या सिंहाच्या शेपटीवरच्या जखमेवर गांधीजी मीठ शिंपडत आहेत असं चित्रण केलंय. इटलीतून प्रकाशित झालेल्या एका व्यंगचित्रात गांधीजींनी ब्रिटिश सिंहाच्या जबडय़ात आपलं मुंडकं घातलंय.. तेव्हा घाबरलेला पत्रकार म्हणतो, ‘‘हे फार धोकादायक आहे.’’ त्याला गांधीजी उत्तर देतात की, ‘‘सिंह इतका दमला आहे की आता जबडा बंद करण्याचीही ताकद त्याच्यात नाही!’’
मिठाच्या सत्याग्रहानंतर देशभर खूप हिंसाचार झाला आणि गांधीजी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत अशा आशयाचं हे सोबतचं चित्र इंग्लंडच्या ‘डेली एक्स्प्रेस’मधील १९३० सालातलं आहे. गांधीजींच्या सुप्रसिद्ध तीन माकडांचा वापर करून त्यात गंमत आणली आहे.
या पुस्तकाचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे. जणू काही चरख्यातून व्हायोलिनसारखे सूर निघून गांधीजी स्वातंत्र्याची सरगम अत्यंत आत्मविश्वासाने तल्लीन होऊन छेडत आहेत असा भास त्यातून होतो. जगभरातील काही अपवाद वगळता त्या काळातही गांधीजींच्या अहिंसा, सत्याग्रह इत्यादी राजकारणातील नव्या संकल्पनांमुळे बहुतेक सर्व व्यंगचित्रकारांनी त्यांच्याकडे आदरानेच पाहिलं आहे हे लक्षात येतं. विशेषत: युरोपमधील व्यंगचित्रकारांनी दोन महायुद्धांमुळे झालेली अत्यंत भयानक होरपळ अनुभवल्यामुळे त्यांना ‘अहिंसा’ या शब्दाचं महत्त्व कळलं असावं.
एकूणच गांधीजी हा समजून घ्यायला अत्यंत सोपा आणि छोटा वाटणारा, पण प्रत्यक्षातला अतिशय अवाढव्य आणि गूढ प्राणी आहे हे व्यंगचित्रकार अबू यांनी समर्पकपणे रेखाटलं आहे. या व्यंगचित्राला कालातीत म्हणायला हवं. कारण एकांगी विचाराने अंध झालेली, गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वावर कर्कश्श्य आवाजात प्रकट होणारी असंख्य भलीबुरी माणसं आपण आजही पाहतो आहोत.
मराठीतील अष्टपैलू आणि अद्वितीय चित्रकार दीनानाथ दलाल यांची चित्रं आपण सर्वानीच वेळोवेळी पाहिली आहेत. परंतु दलाल हे एकेकाळी उत्तम राजकीय व्यंगचित्रंही काढत असत याचं कदाचित काहींना आश्चर्य वाटेल. साधारण १९३५ ते ६० यादरम्यान दलाल यांनी मोठय़ा संख्येने तत्कालीन राजकीय विषयांवर व्यंगचित्रं काढलेली आहेत. ‘राजकीय टीकाचित्रं’ हा त्यांचा व्यंगचित्रसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्या काळात विविधधर्मीयांचे क्रिकेटचे संघ असत आणि त्यांच्यात चुरशीचे, पण लोकप्रिय क्रिकेटचे सामने होत असत. मात्र, यातून जातीयवाद किंवा धार्मिक अतिरेक व्यक्त होत असल्याचे सांगून गांधीजींनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यावरचे दलाल यांचं हे सोबतचं व्यंगचित्र. गोलंदाज गांधीजींच्या रेखाटनातील गती, लय, तोल, शरीररचना यातून दलाल यांची रेखाटनावरची हुकूमत दिसून येते. त्याबरोबरच गांधीजींचे अतिशय वेगळ्या कोनातून काढलेलं हे अर्कचित्र अफलातूनच! स्टंप्सच्या रूपातील विविधधर्मीयांचे मुखवटे दाखवणं ही कल्पनाही लाजवाब. त्यांच्या सुप्रसिद्ध घडय़ाळ्याचे चित्रही मस्त!
मराठीतले आद्य व्यंगचित्रकार म्हणून शंकरराव किर्लोस्कर (शं वा कि) यांचे स्थान वादातीत आहे. सामाजिक सुधारणांबरोबरच राजकीय भाष्य ते व्यंगचित्रांतून अत्यंत प्रभावीपणे मांडत असत. युरोपमधील दुसऱ्या महायुद्धाच्या तडाख्यात भारत सापडू नये म्हणून गांधीजी प्रयत्न करत होते, या पाश्र्वभूमीवरचं त्यांचं हे सोबतचं चित्र.
रिचर्ड अॅटनबरो यांचा ‘गांधी’ चित्रपट प्रकाशित झाल्यानंतर त्या चित्रपटाचा समाजावर झालेला परिणाम म्हणून मी एक व्यंगचित्रमालिका चितारली होती. ऑस्करचं प्रचंड यश मिळाल्याने त्यानिमित्ताने पार्टीमध्ये सगळे निर्माते, वितरक हे ग्लास उंचावून ‘चीअर्स फॉर गांधीज् सक्सेस’ असं म्हणताहेत. थिएटरबाहेर तिकिटांचा काळाबाजार करणारे ‘गांधी एकदम सस्ता.. दस का पंधरा, दस का पंधरा’ असं म्हणत गांधीवादाचं झालेलं अवमूल्यन त्यात दाखवलं होतं.
गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने एक मालिका एका दिवाळी अंकासाठी मी केली होती. सध्याच्या जमान्यात गांधीजी आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे भेटतात हे त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. उदाहरणार्थ, ‘एम. जी. रोड’ असं लिहिलेल्या पाटीखाली एक नवयुवक हातातल्या मोबाइलवरून जीपीएस ट्रॅक करत पत्ता शोधतोय. ते पाहून एक गांधीवादी आजोबा त्याला सांगत आहेत, ‘‘बाळा, महात्मा गांधी मार्ग सापडत नाहीये ना? गेल्या सत्तर वर्षांत त्या मार्गाने कोणी जायलाच तयार नव्हतं! म्हणून मग शेवटी सरकारने या रस्त्याचं नाव बदललं!!’’
खादी तयार करणाऱ्या एका कंपनीला प्रचंड प्रॉफिट (! ) झाल्याने सेलिब्रेट करण्यासाठी ते पार्टी आयोजित करत आहेत. त्याची तारीख एक किंवा तीन ऑक्टोबर असावी अशी त्यांच्यात चर्चा सुरू असल्याचंही एका व्यंगचित्रात दाखवलं होतं.
‘महात्मा गांधी साहित्यदर्शन’ या पुस्तकांच्या प्रदर्शनात गांधीजींचं ओरिजिनल ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक नाही, पण त्याची ‘पायरेटेड कॉपी’ उपलब्ध आहे असं विक्रे ता सांगतो असंही एका चित्रात रेखाटलं होतं.
गांधीजींच्या पोस्टाच्या तिकिटाचा वापर करून सोबतचं व्यंगचित्रं रेखाटलं आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या शहरांच्या पोस्टाचे शिक्के तर त्यावर पडले आहेतच, पण त्याबरोबरीनेच ते त्यांच्या विरोधकांना पुरून उरले आहेत यावर एक प्रकारचे हे शिक्कामोर्तबच त्यांच्या स्मितहास्यातून प्रतीत होतं!!